शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

कोंडीत अडकलेला भुलोजी

 श्री 

कोंडीत अडकलेला भुलोजी

 आमच्या लहानपणी दसऱ्या पासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पाच दिवस भुलाबाईची पूजा घरोघरी केली जायची. भुलाबाई आणि भुलोजी म्हणजे पार्वती आणि महादेव आणि त्यांच्या मांडीवर बसलेला छोटासा गणपती. 

भोलानाथ असलेल्या भुलोजीची बायको ती भुलाबाई ! भुलाबाईच्या गाण्यांमध्ये माहेरी आलेल्या सासुरवाशिणींचे अनुभव, संसार - माहेरातला फरक, तिथे होणारी घुसमट, बदललेले वातावरण, जबाबदाऱ्यांचा ताण, आपले स्थान निर्माण करण्याची केविलवाणी धडपड आणि कडू गोड आठवणींचे सार दिसून येते. पण त्याचसोबत व्यावहारिक गोष्टी , चालीरीती आणि शारीरिक स्थित्यंतरेही शिकवण्यासाठी त्या गाण्यांचा सुयोग्य वापर केल्या गेलेला दिसतो. 

  अभ्यास,ट्युशन आणि  मोबाइल ने मुलामुलींचे निर्भेळ आनंदी बालपण हिरावून घेतले आहे. त्याचमुळे भुलाबाईची परंपरा आता लुप्त होत चालली आहे. पण भुलाबाईचे विश्व आजही तसेच आहे. हा, त्यात करिअर आणि बदललेल्या सामाजिक पैलूंची भरच पडली आहे. 

आजही अनेक भुलाबाई सासरच्या वाटेवरच्या काट्यांनी घायाळ होतातच आहे. अजूनही तिला घरच्या आणि बाहेरच्या कामांमधून निवांतपणा मिळवण्यासाठी रोज रोज कारल्याचा वेल लावून फुलण्याची वाट पाहावीच लागते आहे. अजूनही ती सासरच्या सत्ता राजकारणाने विद्ध होते आहे, सासू सासरे,नणंदा-जावा, आणि मुलांबाळांच्या पै पाहुण्यांच्या सरबराईच्या ओझ्याखाली आपल्या भुलोजी पासून दुरावली आहे.भरीसभर आता करिअर आणि बाहेरची कामे यांचे जोखड आहेच. भुलाबाई या सगळ्या कोंडमाऱ्यात रडवेली होणार नाही तर काय ?

 भुलोजीची कथा तरी काय निराळी ? तो बिचारा कमावता होऊनही घरात अजूनही दुय्यमच आहे. घरामध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अजूनही चाचपडतोच आहे. काही बोलायला जावे तर " आता तुझ्याकडून शिकायचे का आम्ही ?" या वाक्यात कधी वडिलांकडून तर कधी आई कडूनच त्याची भलावण केली जाते. लग्न झाले, पोरं झाली तरी सुद्धा अजूनही त्याला " मोठे " झाल्याचा मान नाही. अजूनही जेव्हा बायकोसमोर जेव्हा त्याच्या मतांना काडीचे महत्व नाही असे दाखवल्या जाते तेव्हा त्याचे दुखावलेले मन तो कुणाच समोर उघड करू शकत नाही. त्यातच त्याच्या बायकोचे देखील तेच गाऱ्हाणे असते. "ते" घर अजूनही " त्यांचे - आपले " झाले नसल्याची जाणीव तिला हि खुपते आहे आणि त्यालाही! पण तिच्या समोर ते कबूल करणे म्हणजे आपल्याच आई वडिलांविरुद्ध बोलल्या सारखे होते असे जाणवून तो तिला अजूनच दूर लोटतो आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ असल्यामुळे त्याने तोंड घट्ट मिटून घेतले खरे पण तोच कोंडीत अडकल्या गेला हे त्याला कळतच नाही. 

घरातला सत्ता संघर्ष आणि बाहेरची जीवघेणी चढाओढ यात त्याची कुतरओढ कुणाच्या लक्षात येताच नाही.  

  भुलाबाई तरी निदान माहेरी आपल्या दुःखाला वाट करून घुसमटीतून अंशतः मोकळी होते. 

पण भुलोजीच्या व्यथेला वाचा कधी फुटणार का ? 

- सौ.पूर्णिमा अतुल देशमुख-पुरेकर 

बुधवार, २७ मे, २०२०

शुक्राचार्य - गहन तिमिरातली तेजोशलाका


श्री
शुक्राचार्य  - गहन तिमिरातली तेजोशलाका
" विष्णूने सरळ सरळ शुक्राचार्यांनाच का नाही मारले ? म्हणजे मग असुरांना कोणी जिवंतच करू शकले नसते. आणि मग सारखे सारखे देवांना अवतार घ्यावेच लागले नसते." माझ्या मुलाने असला bouncer टाकून माझी विकेट उडवली.
मी त्याला कच -देवयानी ची गोष्ट सांगत असतांना त्याच्या डोक्यात असला काही विचार येईल असे मला वाटलेच नाही. आणि त्याच्या प्रश्नाने मी सुद्धा प्रश्नात पडले. खरेच मी कधी का असा विचार नाही केला ? शुक्राचार्यांना मारले असते तर मग असुरांची शक्तीच नष्ट झाली असती. आणि मग "ना रहे बांस ,ना बजे बांसुरी " या म्हणीप्रमाणे असुरांच्या धुमाकुळाला आवर बसला असता. पण इतके साधे सोपे उत्तर असते तर मग सर्वज्ञ देवाला सुचले नसते का ? नाही, या मागे खूप गहन तत्व आहे हे लक्षात आले. पण पहिले मुलाच्या प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे होते.
" शुक्राचार्य काही वाईट नव्हते काही. जे वाईट वागत असत त्यांनाच फक्त देव मारायचे. म्हणून विष्णूने असे काही केले नाही. " मी त्याला समजावले. गोष्ट ऐकून तो झोपी गेला पण माझ्या डोक्यात शुक्राचार्यांबद्दल विचारचक्र सुरु झाले. शुक्राचार्यांच्या अनेक गोष्टी आठवू लागल्या.
आणि आठवले नेहमी वापरल्या जाणारे एक सुभाषित !
अमंत्रं अक्षरं नास्ति , नास्ति मूलं अनौषधं।
अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकः तत्र दुर्लभ:॥ “
अर्थ - ज्याप्रमाणे मंत्रशक्ती नाही असे एकही अक्षर नाही आहे, ज्यात औषधी गुण नाहीत असे एकही मूळ( वनस्पती ) नाही, त्याचप्रमाणे कुठलाही मनुष्य अयोग्य अर्थात काही कौशल्य ,सामर्थ्य नसलेला असा असू शकत नाही. पण फक्त ते कौशल्य ओळखून त्याचा योग्य वापर करणारा "योजक" हा मात्र दुर्लभ असतो म्हणजेच विरळा असतो.
  हि प्रसिद्ध उक्ती आहे शुक्रनीति शास्त्रातली. आणि ते सांगणारे अर्थातच "शुक्राचार्य" ! आश्चर्य वाटले ना ? वाटणारच !
कारण शुक्राचार्य म्हंटले कि आठवते " झारीतले शुक्राचार्य " हि म्हण !
दैत्यांचे गुरु आणि देवांविरुद्ध युद्धात त्यांची मदत करून त्यांना जिवंत करणारे ऋषी एव्हढीच काय त्यांची ओळख.
आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल एक नकारार्थी प्रतिमा जनमानसात बनल्या गेली. कारण मुळात दैत्य,राक्षस, असुर हे वाईट होते हेच आपल्या मनावर पाशात्य विचारकांनी जाणून बुजून बिंबवून ठेवले आहे.
शुक्राचार्यांबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला पहिले सूर- असुर,देव-दानव, राक्षस,दैत्य या संज्ञांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
असुर,दानव,दैत्य आणि राक्षस हे समानार्थी शब्द नाहीत. ते वेगवेगळे आहेत.
तसेच त्यांचा अर्थ " शैतान" किंवा " devil/ Evil " असाही होत नाही. God and Devil हि विचारसरणी पाश्चिमात्य धर्मांमधली आहे तर  मसीहा - अल्लाह आणि शैतान हा विचार मुसलमानी धर्मातला.
हिंदू धर्मातल्या अनेक संकल्पनांचे  भाषांतर करतांना  समानार्थी शब्दांद्वारे सांगण्याचा प्रयत्न केल्या गेला आणि चुकीचे समज रुजू झाले.
दैत्य हे कश्यप ऋषींच्या दिती या पत्नी पासून झालेले आणि दानव हे दानू नामक पत्नी पासून झालेले पुत्र आहेत.
देव हे कश्यप ऋषींच्याच अदिती नामक पत्नीची मुले.
सुर म्हणजे ज्यांना सोमपान करण्याचा अधिकार मिळाला असे  तर असुर म्हणजे सोमपान करण्यापासून वंचित राहिलेले.
वैदिक काळातील अनेक देव हे असुर होते असा उल्लेख आहे. इंद्र,वरुण ,अग्नि हे देव वेदांमध्ये असुर म्हंटल्या गेले आहेत. नवल वाटते ना ?
पण पुराणकाळात हि संकल्पना बदलू लागली. देव किंवा सुर हे स्वर्गलोकात म्हणजेच पृथ्वीच्या वरती राहणारे तर असुर किंवा दैत्य हे पाताळ लोकात म्हणजेच पृथ्वीच्या खोल गर्भात राहणारे  असे समीकरण बनले.
राक्षस म्हणजे पृथ्वीवरील जंगल आणि त्या जवळील प्रदेशात राहणारे ,नागर संस्कृती कायदे न पाळणारे, रानटी लोक. पण ते रक्षक होते जंगलाचे !
वैदिक आणि पौराणिक देव-दैत्य संघर्ष हा स्वर्ग आणि पाताल यात राहणाऱ्यांचा संघर्ष आहे.
तर राक्षस आणि मनुष्य यांच्यातला संघर्ष हा पृथ्वीवरचाच संघर्ष आहे.
आणि त्या संघर्षाचे कारण आहे " लक्ष्मी " !
होय, लक्ष्मी हि प्रतीक आहे समृद्धीचे, वैभवाचे, सामर्थ्याचे. आणि कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल पण पुराणात लक्ष्मी आणि इंद्राची पत्नी शची ह्या असुरपुत्री आहेत असा उल्लेख आलेला आहे.
या प्रतीकामागचे गूढ काय आहे ?
पृथ्वीच्या खाली म्हणजेच पाताळलोकात सर्व प्रकारची संपदा साठलेली आहे. सर्व वनस्पती जमिनीतून उत्पन्न होतात, रत्न सुवर्ण,सर्व धातू, आणि खनिज हे जमिनीखालीच असतात. अगदी अमृत सुद्धा समुद्राच्या अथांग तळ्याखाली उत्पन्न झाले होते. वरुण हि समुद्राची देवता आहे असा उल्लेख काही ठिकाणी आलेला आहे त्यानुसारही लक्ष्मी असुर कन्याच होते. हि सगळी  संपत्ती म्हणजेच लक्ष्मी.
सृजन हे पृथ्वीच्या खोल गर्भातूनच होत असते. आणि हीच संपदा देव आणि दानवांच्या संघर्षाचे मूळ आहे.
तसेच मनुष्य आणि राक्षसांच्याही !
असुर हे संपत्तीचे सृजन करणारे आहेत त्यामुळे त्यांच्या मते त्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्यांनाच आहे.
पण देवांना त्या संपत्तीचा मानव आणि देवांमध्ये समान वाटप करून उपभोग घ्यायचा आहे.
स्वार्थ आणि परमार्थ ह्यात कधी देवांची सरशी झाली तर कधी असुरांची.
देव म्हणजे चांगले आणि असुर म्हणजे वाईट असे सरळधोपट विभाजन हिंदू संस्कृतीने केलेले नाही. असे अनेक देव आहेत ज्यांच्यात वाईट प्रवृत्ती होत्या आणि असे अनेक असुर देखील आहेत ज्यांनी सद्गुणांची सर्वोच्च सीमा गाठून देवत्वाला आव्हान दिलेले आहे. बलि, विरोचन,प्रल्हाद या सारखे असुर पूजनीय ठरले ते त्यांच्या सत्प्रवृत्तीमुळेच.
आता शुक्राचार्यांकडे वळूया.
शुक्राचार्य असुरांचे गुरु झाले कारण देवांनी त्यांना वेळोवेळी फसवले, त्यांच्यावर अन्याय केला. वर वर पाहता हि कारणे जरी असली तरी त्यामागची विधात्याची योजना वेगळीच असल्याचे समजून घ्यायला हवे.
शुक्राचार्य हे भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांचा पुत्र आहे असे काही ठिकाणी उल्लेख आहेत. त्यांचे मूळ नाव "उषण " असे होते असे म्हणतात तर काही ठिकाणी भृगु ऋषी आणि हिरण्यकश्यपूची मुलगी दिव्या यांचा पुत्र आहे असाही उल्लेख आढळतो. काही ठिकाणी आईचे नाव "काव्य माता " होते असे सांगतात.
शुक्राचार्य प्रथम अंगिरस ऋषींकडे ज्ञानोपासना करण्यास गेले. पण तिथे अंगिरस ऋषी स्वतःच्या मुलाला म्हणजेच बृहस्पतीला जास्त ज्ञान देत असत असे त्यांना दिसले. हा पक्षपात सहन होऊन त्यांनी तो आश्रम सोडला आणि ब्रम्हाची उपासना केली. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना गौतम ऋषींकडे जाण्यास सांगितले. बृहस्पती आणि शुक्राचार्यांमध्ये पहिली ठिणगी इथेच पडली.
शुक्राचार्य आश्रमात असतांना त्यांच्या मूळ गावी देव आणि असुरांमध्ये युद्ध सुरु झाले. त्यांची आई "काव्यमाता " हिला औषधी शास्त्र माहिती असल्यामुळे तिने असुरांची मदत केली. हे कळताच इंद्राने विष्णूला तिला मारण्यास विनवले आणि विष्णूने सुदर्शन चक्राने तिचा वध केला.
शुक्राचार्यांना जेव्हा हे कळले तेव्हा ते अतिशय क्रोधीत झाले. त्यांनी गौतम ऋषींना आपल्या आईला पुनः जीवित करण्यासाठी संजीवनी विद्या देण्याची विनंती केली. पण त्यांना ती विद्या अवगत नव्हती म्हणून त्यांनी शुक्राचार्यांना महादेवाची उपासना करण्यास सांगितले. शुक्राचार्यांनी अतिशय खडतर तपस्या आरंभिली.
ते पाहून इंद्रदेव घाबरले. त्यांनी आपली मुलगी "जयंती" हिला त्यांची सेवा करून त्यांना मोहित करण्याचे सुचवले. आणि तिने पितृआज्ञा पाळली. शुक्राचार्यांनी तिच्यासोबत विवाह केला. पण आपली तपसाधना सुरूच ठेवली. वृक्षाच्या फांदीला उलटे लटकून राहणे आणि खाली बाजूला पेटलेल्या अग्निमध्ये जी काही पाने पडतील त्या पानांचा धूर भक्षून शिवाचा पंचाक्षरी मंत्राचा जप करणे अशी कठीण साधना सुरु होती.
पुन्हा एकदा इंद्राने कपट केले. जयंतीला त्यांनी सांगितले कि यात मरीच म्हणजेच मिऱ्याचे पाने टाक. तिने विचार करता तसे करणे सुरु केले आणि त्या तिखट,उष्ण ,तीक्ष्ण धुराने शुक्रचार्यांच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. असह्य दाह होऊ लागला.
पण तरीही ते जप करतच राहिले. इंद्राचे कपट लक्षात येऊनही त्यांनी पत्नीला थांबवले नाही. जेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या असुरांच्या हे लक्षात आले तेव्हा त्यांनी जयंतीला तिथून हुसकावून लावले.
महादेवांना इंद्राचा हा घृणास्पद प्रकार पाहून अतिशय क्रोध आला. पण त्याचवेळी शुक्राचार्यांची अढळ भक्ती आणि अविचल साधना बघून ते प्रसन्न झाले. आणि त्यांना संजीवनी विद्या दिली. पण एक अट घातली कि जर या विद्येचा अनुचित वापर त्यांनी केला तर परिणाम भयंकर होतील. शुक्राचार्यांनी ते मान्य केले.
समुद्रमंथन करतांना आपली मदत घेऊनही अमृत देवांनीच मिळवले  याचा राग असुरांना होताच. त्यांना जेव्हा कळले कि शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या मिळाली आहे तेव्हा ते त्यांना आपले गुरु बनण्याची विनंती करण्यास निघाले. पण इथे पुन्हा एकदा देवगुरु बृहस्पतीने त्यांची फसवणूक केली. शुक्राचार्यांच्या वेष घेऊन ते मध्येच उभे राहिले. असुरांनी त्यांना गुरु बनण्यास विनवले आणि त्यांनी मान्य केले. त्यांना उलट सुलट शिक्षा देणे सुरु केले. जेव्हा शुक्राचार्य तिथे आले तेव्हा त्यांना हे कारस्थान कळले. त्यांनी असुरांना आपण खरे शुक्राचार्य असल्याचे सांगितले पण असुर ते काही मानेना. शेवटी क्रोधीत होऊन शुक्राचार्यांनी असुरांना शाप दिला कि तुम्ही युद्धात पराजित व्हाल.
झाले , बृहस्पतीने आपला कार्यभाग साधला होता. ते मूळ रूपात आले. असुरांना आपली चूक कळली. पण उशीरा! त्यांनी पश्चातापाने शुक्रचार्यांकडे क्षमायाचना केली. त्यांना क्षमा करून शुक्रचार्य त्यांचे गुरु तर बनले पण त्या युद्धात मात्र असुर पराजित झालेच.   
त्यानंतर जे जे युद्ध झाले त्यात शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा वापर करून असुरांना पुनर्जीवित केले. पण असुर फक्त तेव्हढ्यानेच शक्तिमान बनले का ? नाही. असुरांनी सुद्धा वेळोवेळी अथक परिश्रम करून, कठोरातली कठोर तपश्चर्या करून विविध शक्ती प्राप्त केल्या होत्या. आणि त्यांना तपस्येच्या ,ज्ञानाच्या मार्गावर नेले ते शुक्राचार्यांनी.
शुक्राचार्य काही प्रतिशोधाच्या हिंसक कल्पनेने पेटून उठलेले सामान्य मनुष्य नव्हते. संजीवनी विद्या म्हणजे त्यांच्या असीम ज्ञानातला एक कण फक्त.
त्या संजीवनी विद्येसाठी पुन्हा एकदा देवांनी शुक्रचार्यांची फसवणूक केली. बृहस्पतीचा पुत्र कच शुक्राचार्यांकडे शिष्य बनण्यासाठी गेला. काही काळासाठी का होईना पण बृहस्पती त्यांचे गुरुबंधू होते. त्यामुळे शुक्राचार्यांनी कचाला शिष्य मानले. ज्ञानदान सुरु केले. पण संजीवनी विद्या शिकवली नाही. जी विद्या त्यांनी असुरांनाही दिली नाही ती त्याला कशी काय देतील ?
कचाने शुक्राचार्यांनी पुत्री देवयानी हिच्यासोबत प्रेमसंधान सुरु केले. त्याचवेळी असुरांना त्याचा संशय येऊ लागला. त्यांनी त्याला मारले पण देवयानीच्या विनंतीवरून शुक्राचार्यांनी त्याला पुनर्जीवित केले. शेवटी मात्र असुरांनी कचाला मारून जाळले आणि ती राख मद्यात मिसळून शुक्राचार्यांना पाजली. जेव्हा पुन्हा एकदा देवयानीने कचाला जिवंत करण्याचे विनवले तेव्हा शुक्रचार्यांनी ध्यान केले आणि सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी देवयानीला सांगितले कि कच माझ्या पोटात आहे. त्याला जिवंत करायचे झाल्यास मलाच मारावे लागेल. पण प्रेमात आंधळी झालेली देवयानी हट्टाला पेटली. जो अविचल योगी पत्नीने दिलेल्या धुनीसमोरही तप करत राहिला तो पुत्रीसमोर मात्र हतबल झाला. त्यांनी देवयानीला संजीवनी मंत्र शिकविला आणि सूचना दिली कि जेव्हा कच माझे पोट फाडून बाहेर येईल आणि मी मरेल, तेव्हा हा मंत्र म्हणून तू मला जीवित कर.
देवयानीने तसेच केले. पण तिला मंत्र म्हणतांना कचाने ऐकले आणि ज्या कार्यासाठी तो आला होता ते पूर्ण झालेले पाहून तो तिथून जाऊ लागला. देवयानीने त्याला अडविताच त्याने तिला झिडकारत म्हंटले कि मी आता शुक्राचार्यांच्या मुलगा झालो , तू माझी बहीण. आपला विवाह होऊ शकत नाही. देवयानीच्या लक्षात आले कि हे सर्व नाटक संजीवनी विद्येची केल्या गेले. सात्विक संतापाने पेटून उठलेल्या त्या ब्राम्हणकन्येने शाप दिला कि ज्या विद्येसाठी हे कपट तुम्ही केले ती विद्या तु विसरशील आणि या पुढे देवांना कधीच हि विद्या मिळणार नाही.
 पुढे देवयानीचा विवाह ययातीसोबत झाला. आणि तिचा पुत्र यदु यापासून यादव वंश ! याच यादव वंशात विष्णूने अवतार घेतला. योगेश्वर श्रीकृष्ण हे शुक्राचार्यांशी जुळल्या गेले.  
शुक्राचार्यांबद्दल वर्णन करतांना त्यांची विविध नावे आणि विशेषणं वापरल्या गेली आहेत त्यावरून त्यांच्या अचाट सामर्थ्य आणि ज्ञानाची चुणूक मात्र दिसून पडते.
ग्रहाधिप
विश्वात्मा
मनोव्रज म्हणजे ज्यांनी मनावर कठोर विजय मिळवला आहे.
तेजोनिधी म्हणजेच सूर्याप्रमाणेच ज्ञानाने तळपणारे
महीप्रिय अर्थात पृथ्वी किंवा राजे यांना प्रिय असणारे
शिवाचे श्रेष्ठ भक्त
कवींमध्ये श्रेष्ठ कवी आहेत
ज्ञानवंतांवरच प्रसन्न होणारे
सुरपूजित म्हणजेच देव ज्यांची पूजा करतात असे. ( शत्रूच्या गुरुची पूजा कशाला केली असती ? )
आणि सगळ्यात महत्वाचे विशेषण म्हणजे ,
नवग्रह स्तोत्रात वेदव्यास त्यांना " सर्वशास्त्र प्रवक्ता" असे म्हणून नमन करतात.  
नीतिशास्त्र हि त्यांचीच देण आहे. राज्यशास्त्र आणि राजधर्म, अर्थशास्त्र आणि न्यायशास्त्र, धर्मशास्त्र आणि ज्योतिष्याविद्या, काव्यसाहित्यशास्त्र आणि तंत्रविद्या, कामशास्त्र आणि औषधीशास्त्र या सारख्या विषयांवर त्यांचे ग्रंथ आहेत. इतक्या विविधांगी विषयांवरचे त्यांचे प्रभुत्व पाहूनच सामान्य माणसाची छाती दडपून जाईल.
ज्योतिष शास्त्रात शुक्र हा भौतिक सुख-संपन्नता, प्रतिभा, कला, साहित्य, गायन, वादन, वैवाहिक सुख यांचा कारक ग्रह आहे. शुक्र बलवान असणाऱ्यांमध्ये उपरोक्त गुण प्रवृत्ती उत्तम असतात असे मानतात.
त्याचप्रमाणे शुक्राचार्य हे सृजनाचे अर्थात प्रजोत्पादनाचेही कारक आहेत. अतिरेकी आणि बेलगाम असे सृजन किंवा प्रजोत्पादन हे सुद्धा धोकादायकच असते. त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक ठरते. आणि ज्याचे मनावर कठोर नियंत्रण आहे, जो सत्प्रवृत्तीचा आहे तोच हे कार्य करू शकतो.
म्हणून शुक्राचार्य पूजनीय ठरले. कारण अमर्याद सृजनाला नियमबद्ध करणे हे त्यांचे कार्य सृष्टीसाठी उपकारक आहे. 
महाभारतात शुक्राचार्यांनी भीष्मांना राज्यशास्त्र आणि न्यायशास्त्र शिकवले असा उल्लेख आहे.
खरेतर त्यांचे प्रभुत्व पाहता तेच "देवगुरु" होण्याचे पात्र होते, असे नाही का वाटत ?
पण तसे न घडता त्यांना असुरांचा पक्ष घ्यावा लागला.
अट घातल्याप्रमाणे संजीवनी विद्येचा अतिरेकी वापर झाला. प्रत्येक युद्धात शुक्राचार्य प्रत्येक असुराला जिवंत करीत सुटले. देव आणि असुर यांच्यातील समतोल ढळू लागला.  तेव्हा क्रोधीत होऊन महादेवाने शुक्राचार्यांना गिळंकृत केले. महादेवाच्या उदरात शुक्राचार्य वर्षभर शिवाचा जप करत राहिले. तेव्हा त्यांच्या भक्तीने महादेवाचा क्रोध शांत झाला आणि शुक्राचार्य महादेवाच्या शिश्नामधून बाहेर पडले. एका अर्थी ते महादेवाचा पुत्रच बनले. महादेवाच्या उदरातून बाहेर आल्यामुळे ते अतिशय तेजस्वी, शुक्लवर्णी आणि देखणे झाले.
त्यानंतर मात्र त्यांनी संजीवनी विद्येचा गैरवापर केला नाही.
असुरांना शक्तिमान करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी साहाय्य आणि मार्गदर्शन केले. पण वेळोवेळी त्यांनी जेव्हा जेव्हा असुर अत्याचारी आणि अहंकारी बनले तेव्हा तेव्हा त्यांना सचेत करून मार्गावर आणण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचवेळी देवांच्या कपटी,फसवणूक करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्याचे प्रयास सुद्धा त्यांनी केलेले दिसून पडतात. अशी तारेवरची कसरत करणे किती कठीण काम आहे ?
आता प्रश्न उरला कि देवांनी शुक्राचार्यांना का नाही मारले ?
हिंदू धर्मातले तत्व हे सृष्टिचक्र अबाधित सुरु ठेवणे यावर आधारित आहे. जे काही घडते ते सृष्टीचा समतोल राखण्यासाठी. आणि त्यासाठीच वरपांगी पाहता एकमेकांचे शत्रू वाटणारे देव आणि असुर, मानव आणि राक्षस यांच्यातला समतोल राखणे हे क्रमप्राप्तच आहे. जिथे चांगले असेल तिथे वाईट असणारच. प्रकाशाचे अस्तित्व अंधार मिटल्यानंतरच जाणवते. दुर्गुणांच्या पार्श्वभूमीवरच सद्गुणांचा प्रभाव उजळून निघतो.
त्याचप्रमाणे हिंदू धर्माची एक विशिष्ट अशी संकल्पना आहे त्रिगुणात्मक प्रकृती !
सत्व ,रज आणि तम् ह्या तीन प्रकृतींवर सृष्टीतले सर्व व्यापार अखंडितपणे सुरु आहे. सात्विक चांगली आणि तामसिक वाईट असला भेदभाव धर्माने केलेला नाही. कारण कुठल्याच एका गुणाने कार्य होत नाही. म्हणूनच देवांमध्ये सुद्धा इंद्र, काली ,रुद्र हे तामसिक प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. आणि त्यांचे कार्य चांगलेच होते. वाईट नव्हते.  
देवांमध्ये जरी सत्व प्रवृत्ती प्रधान आहे आणि असुरांमध्ये तामसी प्रवृत्ती तरी मनुष्यात मात्र ह्या तीनही प्रवृत्ती कमी जास्त प्रमाणात वास करत असतात.
बृहस्पती हे सात्विक गुणाचे होते तर शुक्राचार्य तामसिक. या प्रवृत्तीचे नियमन करण्याचे कार्य दोघेही करत होते.
असुर हे सृजनासाठी अत्यावश्यक आहेत. पण त्यांच्या स्वार्थामुळे जेव्हा सृष्टीतले अन्य घटक वंचित राहू लागले तेव्हा मात्र देवांना असुरांविरुद्ध उभे ठाकावे लागते.
देव आणि मनुष्य निसर्गातल्या संपदेचा उपभोग घेऊन नियमन करण्याचे कार्य करतात. पण देवतांनी किंवा मनुष्याने जर उपभोगाची परिसीमा गाठली तर मात्र सृष्टीतल्या संपदेचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते आणि मग असुरांना त्यांची शक्ती एकवटून देव आणि मनुष्य यांच्याविरुद्ध युद्ध पुकारावे लागते. आज तेच घडते आहे नाही का ?
जसे लोकशाहीमध्ये सरकार, न्यायपालिका, अधिकारीयंत्रणा आणि प्रजा हे चारही स्तंभ मिळून एकमेकांचे साहाय्य आणि एकमेकांवर अंकुश ठेवून असतात त्याचप्रमाणे देवगुरु आणि दैत्यगुरू हे दोघेही क्रमशः देव आणि असुर यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे आणि त्यांना पथभ्रष्ट होऊ देण्याचे कार्य करतात. आणि त्याचमुळे सृष्टीतील समतोल राखल्या जातो. एकमेकांवर एक्मेकांचाच वचक ठेवून हे साधल्या जाते.
आणि हे दोघेही उपासक आहेत एकाचवेळी सृजन करणारा जगत्पिता  आणि नाश करणारा महारुद्र असणाऱ्या महादेवाचे !
स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ, देव,मनुष्य आणि असुर मिळून सृष्टिरूपी वर्तुळ पूर्ण होते. मग त्या वर्तुळाच्या एका भागाला नष्ट करून आत्मघात करण्याचे पाप देव का बरे करतील ?
शुक्राचार्यांचा सर्वश्रेष्ठ शिष्य , बलि चिरंजीवी झाला. पाताललोकाचा राजा बनून त्याने देवांविरुद्धचे युद्ध थांबवले. त्याच्या समर्थ,सत्शील आणि न्यायी नेतृत्वाकडे असुरलोक सोपवून शुक्राचार्य ग्रंथरूपी तेजोशलाका बनले. 
त्यांची अथक ज्ञानोपासना, नीरक्षिरविवेकबुद्धी , असीम भक्ती आणि समर्पण, अद्वितीय सामर्थ्य आणि असामान्य कर्तृत्व अवकाशात पंचतारका बनून लखलखत आहेत.
अज्ञानरूपी तिमिरात अडखळणाऱ्या, चाचपडणाऱ्या मनुष्यांना सौम्य शीतल प्रकाश दाखवीत मार्गदर्शन करणाऱ्या त्या गुरुत्तमाला माझा सविनय प्रणाम !  
 - पूर्णिमा देशमुख पुरेकर