सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

हिंदू स्त्रीची सहनशीलता,सतीत्व,पातिव्रत्य वैगरे वैगरे

हिंदू स्त्रीची  सहनशीलता,सतीत्व,पातिव्रत्य  वैगरे वैगरे
   
       मला जेव्हा एका नियतकालिकात वरील विषयावर लेख पाठवण्याबाबत विचारल तेव्हा आश्चर्यचकित होऊन मी विचारलं की माझ्यासारखी वयाने,अनुभवाने,ज्ञानाने लहान असलेली मुलगी या विषयावर लिहण्याच धारिष्ट्य कसं काय करणार ?पण madam मागेच लागल्या.तरुणांच्या दृष्टीने आपल्या धर्मासमोर काय काय आव्हानं आहेत यावर तुला जे वाटेल ते लिहावं असं त्यानी सांगितल्यावर मी विचारात पडले.आणि नशिबाने दुसऱ्याच दिवशी विषयही सुचला.निमित्त झालं Times ने झांशी च्या राणीचे नाव जगातल्या " Best Wife" यादीत गणल्याचे.त्यांच्या सर्वेक्षणानुसार जगातल्या ज्या स्त्रियांनी आपल्या पतीला उत्तम साथ देत स्वत:चं असं आगळं वेगळ स्थान निर्माण केलं,त्यात राणी लक्ष्मीबाईचं एक नाव आहे.बातमी वाचताच मला हसावं का रडावं असं प्रश्न पडला.बातमी वाचताच आठवले आदल्या दिवशी घडलेले दोन प्रसंग.
 एका रिसेप्शन मध्ये गेले असता मला ओळखीतल्या एक काकू भेटल्या.त्या सुमारे चाळीशीतल्या,चांगल्या सुखवस्तू घरातल्या,पदवीधर होत्या.मी व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचं आठवून त्यांनी मला त्यांचा उजव्या हाताचा अंगठा दाखवला.अंगठ्याच आणि अनामिकेचा हाड चांगलेच वाढले होते.सूजही भरपूर होती.त्यांना त्याचा खूपच त्रास होत होता.काम करतांना,हलकीशी वस्तू उचलतांना सुद्धा वेदना व्हायच्या.मी त्यांना विचारला की तुम्ही हाड इतकं वाढे पर्यंत का थांबल्या ? आधीच औषध घेतली असती तर ते लवकर बर झाला असता.तसा आत्ताही उपाय करता येईल पण त्याला ठीक व्हायला वेळ लागेल.तेव्हा त्या म्हणाल्या,
"अगं.मी एका allopathic doctor ला दाखवला तर तो म्हणाला की operation करावं लागले.operation म्हंटल  की admit व्हावे लागेल,मुलांची आबाळ होते,घर अस्ताव्यस्त होते.इ.इ.शेवटी त्यांनी ठेवणीतले वाक्य माझ्या अंगावर फेकले;"बाईने दुखणे जितके सहन करता येईल तितके करावे.त्यानेच सहनशक्ती वाढते."
            यावर मी की उत्तर  देणार ? काहीच न बोलता मी तिथून सटकले.त्याच दिवशी संध्याकाळी दुसरा प्रसंग घडला.माझी आई वकील आहे आणि तिच्या कडे एक सुमारे पस्तिशीतली,गरीब परिस्थितीतली बाई तिची केस घेऊन आली.आई तिच्या सोबत बोलत असतांना मी आतल्याच खोलीत होते.मोठ्या आवाजातले तिचे बोलणे मला सहज ऐकू येत होते.कहाणी नेहमीचीच.दारुडा,कामधंदा न करणारा नवरा, आणि पोटासाठी,मुलाबाळांसाठी धुणं भांडेयाची  कामं करणारी बायको !नवऱ्याचा मार खाणं,तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिव्यागाळ करणं,तमाशा करणं हे नेहमीचंच.काल तर तिला गरम तव्याने पाठीवर चटका दिला होता.हे सगळं सांगून झाल्यावर जेव्हा आईने तिला विचारला कि माझ्याकडे कश्याला आली,तेव्हा ती म्हणाली की तिला यातून काहीतरी मार्ग सुचवा.कुणीतरी तिला अनाहूत सल्ला दिला होता कि एक तर सरळ सरळ नवऱ्याला सोडचिठी दे नाहीतर एक नवीन कायदा झाला आहे,काहीतरी Domestic Violence Act नावाचा. त्यात नवऱ्याची तक्रार कर.त्या कायद्यामुळे बायकांचे संरक्षण होते,असं महाशयांनी कुठेतरी वाचलं होता.फारसं शिक्षण नसल्यामुळे तिला त्यातले काही कळले नाही पण थोडीशी हुशारी दाखवून ती सरळ वकीलाकडेच आली.तेच नीट सांगू शकतील असं तिला वाटलं.
  आईने तिला सोड चिठी द्यायची  का विचारताच ती घाबरून म्हणाली,"नाही जे,नवऱ्याले सोडून देल्ला तर मले स्वर्गात जागा मिळणार नाही.कसा बी असेना का म्हाया नवरा हाये त्यो.मले सोड चिठी नाही द्याची.थो दुसरा कायदा हाये त्यातनं कधी व्हईल का ?"
  आईने जेव्हा तो कायदा काय  आहे,त्यामुळे काय काय  होऊ शकते हे सांगितला तेव्हा तर ती अजूनच घाबरली."पोलीस पकडून नेतील का म्हणजे त्याले ? " 
"हो.मग नीट चौकशी करून कोर्टात केस होईल आणि मग काय  ती शिक्षा होईल."आईने सांगितले.
"मंग नको.बायको मुले नाव्र्याले मारपीट झाली तर मंग जीतेजी म्या नरकात जाईन.अन मारला तर काय  बिघडला ?त्याहीचा हक्कच नाही का ? शेवटी बाया हिच्या जातीले सहन करावाच लागते जी."असं म्हणत ती काहीच न करता चालली गेली.आई आत आली.अश्या अनेक केसेस तिने पाहील्याच होत्या. 
  कालचे ते प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.आपल्या धर्मात,समाजात,पिढ्यानपिढ्या विचार किती रूढ झाला आहे ? स्त्री म्हणजे सहनाशीलतेचा पुतळा असते, काही झालं तरी तिने सहन करावाच लागता,याचा इतका उदो उदो झाला आहे कि परका तर  दूरची गोष्ट झाली,पण प्रत्यक्ष नवरा,भाऊ,बाप किंवा अजून कोणीही जवळच्याने मारले,त्यामुळे प्रसंगी जीव जाण्याची वेळ आली तरीही "बाई च्या जातीला सहन करावंच लागतं"हे वाक्य स्वतः च म्हणते.
  सहनशीलता,पातिव्रत्य,सतीत्व या कल्पनांचा हिंदू स्त्री वर किती खोलवर परिणाम झालं आहे हे वरच्या दोन प्रसंगातून कळत.एकीकडे आपण ब्रिटीशांची गुलाम होण्यापेक्षा युद्ध करून वीरोचीत मरण पत्करणाऱ्या झाशीच्या राणीचे गोडवे गातो तर दुसरीकडे त्याच स्त्रीला पातीव्रत्येच्या,पाप पुण्याच्या कल्पनांच्या गुलामगिरीत अडकवून ठेवतो.नव्हे आपण अडकलो आहे हेच मूळी तिच्या लक्षात आलेले नाही आहे.अंथरुणावर खिळल्याशिवाय ती स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही,सहनशीलतेच्या,त्यागाच्या  नावाखाली ती कितीही तीव्र वेदना असो सहन करत जाते.पातीव्रत्येच्या पुराण कल्पनांमध्ये अडकून नवर्याने दिलेला गरम तव्याचा चटका "मारलं तर की झालं"म्हणत सहन करते.ती स्त्री झोपडपट्टीतली असो,मध्यमवर्गीय असो नाहीतर उच्च घराण्यातली असो,प्रत्येक स्त्री आदर्श पतीपरायण स्त्रियांमध्ये गणल्या जाण्यासाठी अनन्वित शारीरिक,मानसिक  अत्याचार छळ सोसतच असते.   
 Times ने राणी लक्ष्मीबाइचे नाव " best wife " मध्ये गणल्याच वाचताच मला खूप राग आला तो स्त्री ला दुटप्पी वागणूक देणाऱ्या पुरुषप्रधान हिंदू  संस्कृतीचा ! पण विचारांती लक्षात आलं कि आपण हिंदू धर्मालाच का नाव ठेवायची ?बाकीच्या संस्कृतींमध्ये तरी दुसरा काय  वेगळा सांगितला आहे ?
  ज्या राणी लक्ष्मीबाईनी,आपला राज्य परकियांच्या हातात जाऊ नये म्हणून अतुल्य पराक्रमाची शर्थ करत प्राण दिला त्या राणीचं कौतुक एक उत्तम पत्नी म्हणूनच का केल्या गेलं? एक उत्तम रणरागिणी म्हणून तिला का नाही नावाजल ? एक वीर योद्धा म्हणून तिचा गौरव का नाही केलं ? स्त्रीचा सगळं कर्तुत्व काय  फक्त तिच्या पतीसोबतच जोडलेला असतं का ? राणीचं स्वतःचं असं अस्तित्वच नाही का ? एक असामान्य,अद्वितीय,महान पराक्रमी मनुष्य असं तिचा वर्णन का नाही केल्या गेलं ?
 शेवटी Times  सारखं जागतिक स्तरावरच पशाचात्य वृत्तपत्र की किंवा आपल्या देशातला समाज की,स्त्रीचं मूल्यमापन तिच्या पतीच्या,मुलांच्या याशापयशावरच केलं जातं.हिंदू स्त्री तर अहिल्या,द्रौपदी,सीता,तारा आणि मन्दोदर या  प्रातः स्मरणीय स्त्रियांची नाव फक्त महापातकांचा नाश होऊन पुण्या कामाव्ण्यापुर्ता आणि आपण त्यांच्या सारख्याच सहनशील आहोत ह्या पुरतीच लक्षात ठेवते.पुरुषप्रधान हिंदू संस्कृतीने नेमक्या याच पाच स्त्रियांचा आदर्श घालून दिला.पाचही स्त्रियांनी त्यांच्या नवर्यानी त्यांच्या बाबतीत केलेले अपराध निमुटपणे सहन केले.जरी त्यांनी त्यांच्या चुकीच्या वर्तनाला आळा घालण्याचा,त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न केलं तरी त्यांच्या जीवन कर्तुत्व त्यांच्या पतीसोबतच जोडला गेलं आहे.
नवऱ्याच रूप घेऊन फसवणूक केली इंद्राने,पण दगड होऊन निस्प्रण जगण्याची शिक्षा भोगली अहिल्येने.स्वतःला पणाला लावून गुलाम झालेल्या पांडवानी,पत्नी पतीची गुलाम असते या न्यायाने द्रौपदीला पणाला लावले आणि भर राजसभेत वस्त्र हरण होण्याचा अपमान तिला सहन करावं लागला.अग्निपरीक्षा देऊनही एक आदर्श राजा होण्यासाठी रामाने सत्शील सीतेचा त्याग केलं.तारा आणि मंदोदरीचा तर विचारूच नका.परस्त्री मातेसमान असते ह्या धर्माने घातलेल्या नियमाचं सोयीस्करपणे करत त्यांच्या नवर्यांनी बायकोने केले उपदेश आपल्या अहंकाराच्या पायदळी तुडवले.त्यात त्यांनाच जीव गमवावा लागला.तारा आणि मान्डोदारीच्या हाती की आलं ? एक अयशस्वी आयुष्य !
 अश्या स्त्रियांचा आदर्श समोर असतं,भारतीय हिंदू स्त्री वाट्याला आलेला दुख,आतल्याआत दाबून,वरकरणी हसतमुखाने सहन करण्याशिवाय दुसरा की करू शकते ?
 एक मनुष्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणे तर दूरची गोष्ट पण एक स्त्री म्हणून आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करणाऱ्या प्रातः स्मरणीय स्त्रिया प्राचीन हिंदू धर्माला दिसल्याच नाही का ?
 धर्मशास्त्र निपुण गार्गी त्यांना का आठवली नाही ? आर्या संस्कृती वसवण्यासाठी  स्वदेश सोडून दूर दाद्शिनेत जाऊन,पतीच्या खांद्याला खांदा लावून,स्वतः ची अस्मिता जपत उत्तुंग कार्य करणारी विदर्भ्रज्कन्या लोपामुद्र दिसली नाही का ? सतत तेरा वर्ष,ऋषींचे रूप घेऊन आलेल्या देवान्सोबत विविध विषयांवर वाद घालून त्यांना पराजित करणारी अरुंधती आपण का विसरलो ? प्रत्यक्ष  त्रिदेवांना आपल्या तपः सामर्थ्याने बालरूप देणारी अनुसया आपण का नजरेआड केली ?
  धर्माने निरपेक्ष असावा.त्यात स्त्री पुरुष भेद नसावा.समान नीती नियम हवे.अर्थात स्त्रीपुरुषांच्या विशिष्ठ शरीरधर्माशी  संबंधित मुद्द्यांवर नियम बदलतात ते समजू शकतो.पण मानसिक आचरणाचे जे नियम आहेत त्यांचा जोर फक्त स्त्रियांवरच आहे.काळाप्रमाणे समाज सुधारकांनी काही नियमांमध्ये उचित बदल केले.सुधारणा केल्या.तरीही वर्षानुवर्ष स्त्रीला दुय्यम दर्जाचीच वागणूक मिळाली आहे.
 हिनुद धर्मापुढे आव्हान आहे ते स्त्रीला मनुष्य दर्जा मिळवून देण्याचं ! " स्त्रीपुरुष ही समाजरूपी रथाची दोन चाकं आहेत" हे वाक्य फक्त लग्नाच्या रुखवतात ठेवल्या जाणाऱ्या सप्तपदीच्या कागदांवरच दिसते.प्रत्यक्षात मात्र उलटंच चित्र दिसते.समाजाचा अर्धा घटक असलेला स्त्रीवर्ग जेव्हा असं कणाहीन.निस्तेज,शक्तिहीन,स्वत्व हरवलेला असतो तेव्हा तो समाज कधीच अत्तुच्य शिखरावर पोहचू शकत नाही.
  विवाहसंस्था ही तर मानवी समाजरचनेचा आधारस्तंभ ! त्यातही कालानुरूप बदल करणे  आवश्यक झालेले आहे.स्वतः च्या पायावर उभे असलेले,परिपक्व विचार झालेले मुलं मुली विवाहा ऐवजी जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपला प्राधान्य देतात तेव्हा,त्या पद्धतीला कायद्याने मान्यता द्यावी लागते तेव्हा " नवीन पिढीच उत्श्रुन्खल झालेली आहे असं आरोप करण्यापेक्षा त्यांना असं का वाटू लागला आहे,त्यामागची कारणं जाणून विवाह संस्थेमध्ये उचित बदल करायला हवेत.लग्न ठरवणे आणि टिकवणे हि आजच्या काळातली सगळ्यात मोठी समस्या होऊन बसली आहे.त्यात बदल करायला हवे.आपल्या मानसिकते मध्ये बदल करायला हवेत.
 हिंदू धर्म लवचिक आहे.कालानुरूप आपल्या धर्मात अनेक बदल केल्या गेलेत आणि म्हणूनच तो टिकून आहे.अनेक आघात सहन करूनही आपले अस्तित्व शाबूत ठेवून आहे.फक्त स्त्रीया पुढेच नव्हे तर  संपून हिंदू समाजाच्या आधारभूत संरचनेलाच काळाने ही दोन आव्हाने दिलेली आहेत.आवश्यकता आहे ती मुलभूत सुधारणा करण्याची,स्त्री बद्दल मानसिकता बदलण्याची,निकोप करण्याची.स्त्री कडे एक मनुष्य म्हणून पाहण्याची !
 पुढच्या वर्षी Times "Best Husband " ची यादी जाहीर करेल का ? अन केलीच तर त्यात एक तरी भारतीय नवरा असेल का ? मला शंकाच आहे !

 -पूर्णिमा देशमुख पुरेकर