गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

विवादात अडकलेले कुरु राजे

विवादात अडकलेले कुरु राजे
   Law of Primogeniture म्हणजेच ज्येष्ठ पुत्राला संपत्तीचा अधिकार हा जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये समाज आणि धर्ममान्य आहे. भारतातही १९५० पर्यंत हा कायदा अबाधित होता.पण असे असले तरी आपल्या प्राचीन स्मृती आणि धर्मग्रंथांमध्ये  वेगवेगळ्या प्रकारचे विवाह आणि विवाहबाह्य संबंध आणि त्यातून उत्पन्न संतती आणि त्यांचे वारसा हक्क या बद्दल इतके सूक्ष्म आणि व्यावहारिक विचारमंथन केलेले आहे कि आपण थक्क होतो. मनुस्मृतीमध्ये जवळपास १२ प्रकारचे पुत्र सांगितले आहे. त्यात औरस आणि अनौरस असे दोन्ही प्रकार आहेत. ज्येष्ठ पुत्र नसल्यास वारसा हक्क कुणाला याबद्दल स्पष्ट निर्देष दिलेले आहेत. अगदी पुत्री आणि पुत्रीची संतती यांच्याबद्दल सुद्धा सांगितले आहे.
 भारतीय संस्कृतीमध्ये राजेशाही म्हणजे हुकूमशाही अशी संकल्पना कधीच नव्हती. उलट राजा हा प्रजेचा पिता,पती आणि सेवक आहे असेच सर्वत्र मान्य होते. धर्माने सुद्धा हेच सांगितले आहे. राजा कोण बनेल या बाबत राजा, त्याचे मंत्रीगण आणि प्रजा या तिन्हीमध्ये एकवाक्यता असायला हवी असेच अभिप्रेत होते. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म म्हणतात कि " जो राजा उत्तम शासन करत नाही, ज्याचे मंत्रीगण दुराचारी आहेत अश्यांना प्रजा दंड देते आणि त्याच्या कुळाचा नाश करते." या वरून राजा आणि प्रजेचे अधिकार समजून येतात.
 वारसाहक्काचे नियम राज्यपदाच्या बाबतीत देखील सारखेच आहेत. साधारणतः राजाचा ज्येष्ठ मुलगाच राजा होत असे. पण या नियमाला अपवाद ठरलेले,विवादाच्या भोवऱ्यात अडकलेले अनेक राजे कुरुकुलात होऊन गेले. कौरव आणि पांडव यांचे राज्याधिकारासाठी झालेले युद्ध तर सर्वांनाच माहिती आहे. बाकीचे कोण होते याबद्दल लिहावेसे वाटले.
कुरुवंशातला भरत हा दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र. महाभारतामधली शकुंतला हि कालिदासाच्या नायिकेपेक्षा वेगळी आहे.ती व्यवहारी आणि महत्वाकांक्षी आहे.तिने राजाकडून गंधर्वविवाहापूर्वीच वचन घेतले कि तिचा मुलगाच राजा बनेल. महाभारतामध्ये आणि इतरत्र सुद्धा शकुन्तलेपूर्वी दुष्यन्तचे अन्य विवाह झालेले होते का आणि त्यातून पुत्र झाले होते का याबाबत काही सांगितलेले नाही. पण ज्या अर्थी राजा दुष्यन्त दोघांनाही नाकारतो त्या अर्थी असे वाटते कि कदाचित त्याचे आधीच पुत्र होते आणि म्हणून विद्रोह होऊ नये म्हणून तो सोयीस्करपणे पितृत्व नाकारतो.
कारण काही असो, शकुंतला भर सभेत धमकी देते कि जर तिच्या मुलाला राजा केले नाही तर ती येनकेन प्रकारेण तिच्या मुलाला राजा करूनच दाखवेल. या ठिकाणी दोन मते आहेत. काहींच्या मते तिची हि धमकी ऐकून मंत्रीगण संभाव्य धोका जाणवून राजाला तिचे म्हणणे ऐकण्यास भाग पाडतात. आणि अन्य मते आकाशवाणी होते कि शकुंतला जे म्हणते आहे ते सत्य आहे आणि भरतालाच राजा करावे.
भरत राजा झाला. त्याने चहुदिशेने राज्य विस्तारले आणि आर्यावर्त " भारतवर्ष " नावाने ओळखल्या जाऊ लागला. जेव्हा भरताचा उत्तराधिकारी ठरवण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा एकदा विवाद उत्पन्न झाला. भरताच्या तीन राण्या होत्या आणि तिघींना तीन असे त्याचे एकूण ९ पुत्र होते. पण त्यातूनही ज्येष्ठ पुत्र तर सोडाच अन्य आठही पुत्रांमध्ये राजा होण्याचे गुण नव्हते. भरत काळजीत पडला. एव्हढे मोठे साम्राज्य जर अयोग्य व्यक्तीच्या हाती दिले तर भरताकडून अधर्म घडेल, राज्य आणि प्रजेवर अन्याय होईल. काय करावे या विचारात तो विमनस्कपणे फिरत असता त्याला ऋषी भारद्वाजचा मुलगा " भूमन्यू" दिसला. तो अत्यंत पराक्रमी आणि बुद्धिमान तर होताच त्याचसोबत तो न्यायी आणि धर्मनुचारी होता. भरताने जेव्हा आपल्या नऊही मुलांना वगळून भूमन्यूला राजा म्हणून निवड केल्याचे सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पण त्याचे मंत्रीगण आणि प्रजा दोघांनीही त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवला. भरताच्या पुत्रांनी विरोध केला नाही. कदाचित त्यांच्यात तेवढी धमक नसेल किंवा धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुपुत्राचा वारसा हक्क त्यांना माहिती असल्यामुळे ते काही बोलले नाही असे असू शकते.
भूमन्यू नंतर काही पिढ्या गेल्या आणि पुन्हा विवाद निर्माण झाला.
राजा प्रतिपचे तीन पुत्र होते. मोठा देवापि, मधला बाल्हिक आणि लहाना शांतनू. प्रतिप जेव्हा संन्यास घेण्यास सिद्ध झाला तेव्हा त्याने देवापिला राजपद देऊ केले. उत्तम राजा बनण्याचे सर्व गुण त्यात होतेच शिवाय तो प्रजेचा अत्यंत लाडका होता. पण खुद्द देवापिनेच राजा बनण्यास नकार दिला. का ?
कारण त्याला दुर्धर असा कुष्ठरोग झाला होता आणि त्यामुळे त्याचा एक पाय अधू होत चालला होता. त्याच्या मते असा रोग असलेला राजा राज्य आणि प्रजेचे रक्षण करण्यास अक्षम असतो. आणि म्हणून स्वतःच राजत्याग करून तो जंगलात तपसाधना करण्यास चालला गेला.
ज्येष्ठ पुत्रानंतर प्रतिपने बाल्हीकला राजपद स्वीकारण्यास सांगितले. परंतु बाल्हिकला पूर्वीच मातेकडून राज्य ( आत्ताच बाल्ख प्रदेश) मिळालेले  होते. त्यामुळे तो तिथेच स्थायिक होता आणि त्याने दुसरे राज्य स्वीकारण्यास नकार दिला. सरतेशेवटी लहाना शांतनू राजा झाला. अर्थात तो सुद्धा राजा बनण्यास योग्य होताच. त्यामुळे असे वाटले कि आता तरी काही त्रास होणार नाही. पण तसे घडले नाही.
शांतनू राजा झाल्यानंतर सलग १२ वर्ष तीव्र दुष्काळ पडला. प्रजेमध्ये असंतोष निर्माण झाला. प्रजेचे म्हणणे पडले कि राजा जरी चांगला होता तरी ज्येष्ठ असलेल्या देवापिला राज्य न दिल्यामुळे देवांचा कोप झालेला होता आणि म्हणूनच राज्यावर अशी संकटे येत होती. जेव्हा शांतनूच्या कानावर हि बातमी गेली तेव्हा तो ताबडतोब देवापिला आणण्यासाठी जंगलात गेला. देवापिला सर्व वृत्तांत सांगून त्याच्या हक्काचे राज्य घेण्यासाठी गळ घातली. देवापिने पुनः नकार दिला. परंतु प्रजेच्या कल्याणासाठी आणि देवांचा कोप शांत करण्यासाठी त्याने यज्ञ केला. देव प्रसन्न झाले आणि पर्जन्यवृष्टी झाली.
लहान असलेल्या शांतनूचा मोठा मुलगा असलेल्या देवव्रताला(भीष्म) मात्र राजपद त्यागावे लागले. शकुंतलेप्रमाणेच महत्वाकांक्षी असलेल्या सत्यवतीने तिच्या मुलासाठी राजपद राखून ठेवले. पुन्हा एकदा ज्येष्ठत्वाला डावलले गेले.
ज्या मुलासाठी सत्यवतीने भीष्माचे जीवन दुष्कर केले तीच मुले वंशवृद्धी करण्यास असमर्थ ठरली. मोठा चित्रांगद अकाली मृत्यू पावला. आणि पुन्हा लहान असलेला विचित्रवीर्य राजा बनला. नावाप्रमाणेच त्याच्यात दोष असल्यामुळे शेवटी राज्याचा उत्तराधिकारी निर्माण करण्यासाठी सत्यवतीने पहिले साहजिकच भीष्माला साकडे घातले. पण त्याने ठामपणे नाही म्हंटले. त्यानंतर कुरुंच्या "बाल्हिक" शाखेकडे विचारणा केली. पण तिथूनही नकार आला. शेवटी सत्यवतीला आपल्या "कानिन " पुत्राची( व्यास ऋषी)  मदत घ्यावी लागली. शास्त्र संमत नियोग पद्धतीने धृतराष्ट्र आणि पांडू जन्माला आले आणि त्यांच्यासोबतच नवीन विवादहि जन्मला. ज्येष्ठ असा धृतराष्ट्र अंध होता. त्यामुळे राजमाता सत्यवतीनेच कनिष्ठ अश्या पांडूला राजा केले. भीष्माला आणि मंत्रिगणाला मौन रहावे लागले.
इथे एक लक्षात घ्यावे कि आत्तापर्यंत ज्या ज्येष्ठांनी राजपद नाकारले ते एकतर स्वतःहूनच किंवा खुद्द राजानेच त्यांचा अधिकार डावलला. पण धृतराष्ट्राचे तसे नव्हते. त्याला राजपद हवेच होते. ती त्याची एकमेव महत्वाकांक्षा होती. ज्येष्ठत्वाच्या नात्याने अधिकार होता. त्याला हा अन्याय वाटला. पण राजमाता,मंत्रीगण आणि प्रजा यांच्या विरुद्ध त्याला काही करता आले नाही. पांडूच्या मृत्यूनंतर जरी त्याला राजसिंहासनावर बसवले तरी पहिले झालेला अन्याय आणि त्यावेळी ज्यांनी मौन ठेवले त्यांच्याबद्दल त्याच्या मनात जी अढी पक्की झाली ती कायमसाठी. त्या अढीमुळेच पुढच्या पिढीत संघर्षाची बीजे रोपल्या गेली.
विचित्रवीर्याप्रमाणेच पांडू सुद्धा प्रजोत्पादनासाठी अक्षम होता. पुन्हा एकदा नियोग पद्धतीने कुंती आणि माद्रीने पुत्रांना जन्म दिला. पांडव हस्तिनापुरात आले आणि पुन्हा एकदा उत्तराधिकारी कोण ह्या प्रश्नाने आ वासला.
कौरवांचा पक्ष होता कि ज्येष्ठ असल्यामुळे धृतराष्ट्राचा राजपदावर अधिकार तर होताच होता. आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र म्हणून साहजिकच दुर्योधन हा उत्तराधिकारी होता. बरे, त्याच्या नावाला विदुर सोडता कोणीच विरोध करत नव्हते. मंत्री आणि प्रजा यांच्यात तो प्रिय होता आणि उत्तम राजाचे गुण त्याच्यात देखील होतेच. शिवाय पांडव हे नियोग पद्धतीने झालेले होते. कौरव औरस पुत्र होते. वारसा हक्कासाठी कधीही औरस पुत्राचा सर्वप्रथम विचार होतो. त्यामुळे सुद्धा राजा दुर्योधनानेच व्हावे असा आग्रह होता.
पांडवांचा पक्ष होता कि पांडूला राज्याभिषेक झालेला होता. धृतराष्ट्र हा त्याचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत होता. त्यामुळे त्याच्या मुलांनी  उत्तराधिकारी होण्याचा प्रश्नच चुकीचा होता. पांडुराजाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून युधिष्ठीरच राजा होणे योग्य होते.
दोन्ही पक्ष आपापल्या बाजूने योग्य असल्यामुळेच निर्णय करणे बिकट होते. शेवटी धृतराष्ट्राने राज्याचे विभाजन केले. पण संघर्ष कायम राहिला. भीषण असे युद्ध घडून आले. संपूर्ण कुरुकुलच नष्ट झाले. उरले फक्त पाच पांडव आणि त्यांचा एकमेव वारस - परीक्षित.

टीप :- ( जिज्ञासूंनी brief history of law of inheritance in Hindu religion वाचावे.)
_ सौ. पूर्णिमा देशमुख पुरेकर

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

एकलव्य - अज्ञात वास्तव

एकलव्य  - अज्ञात वास्तव 
गुरुभक्तीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून एकलव्य सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचसोबत द्रोणाचार्यांची क्रूरता आणि " वर्णाश्रम" पद्धतीच्या अन्यायाचे उदाहरण म्हणून एकलव्याचे नाव तर सगळ्यात आधी येते. पण एकलव्याच्या संपूर्ण आयुष्याबद्दल जाणून घेण्याची गरज एकाही धर्मविरोधकाला का वाटली नाही ?
 महाभारतामध्ये एकलव्याची संक्षिप्त कथा आली आहेच. पण हरिवंश पुराणामध्ये त्याचे सविस्तर वर्णन आहे असे समजते. एकलव्य कोण होता,त्याची जन्मकथा, त्याच्या कुळाची कुठल्या राजवंशासोबत संधी होती, त्याचे द्रोणाचार्यांसोबतचे संबंध, अंगठा कापून दिल्यानंतर त्याने काय केले,त्याचा मृत्यू कसा झाला या सगळ्याचे वर्णन त्यात आले आहे असे वाचले.
कृष्णाचा पिता वसुदेव यादव कुळातल्या वृष्णी वंशाचा राजकुमार होता. त्याची एक बहीण होती पृथा, जिला कुंतिभोजला दत्तक दिले आणि पृथाचे नाव झाले कुंती. वसुदेवाला अजून एक भाऊ होता वृद्धश्रवा. या वृद्धश्रवाचा मुलगा होता "एकलव्य".
काही संस्करणानुसार लहानपणी जंगलात फिरत असता एकलव्य हरवला आणि निषादराज "हिरण्यधनु" याला तो सापडला. त्याने त्याला आपला मुलगा मानून त्याचे पालन पोषण केले आणि त्याला युवराज म्हणून देखील घोषित केले.
अन्य संस्करणानुसार एकलव्याचा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी हा मुलगा यादवकुळासाठी घातक ठरेल असे भाकीत करून त्याचा त्याग करण्यास सांगितले. म्हणून एकलव्याला जंगलात सोडून दिले आणि मग तो निषाद राजाला सापडला आणि त्याने त्याला आपला पुत्र मानला अशी कथा येते.
दोन्ही संस्करणांमध्ये फरक असला तरी मूळ मुद्दा हा आहे कि एकलव्य हा नुसता एक साधासुधा आदिवासी नव्हता तर "निषाद राजा" चा पुत्र होता आणि युवराज म्हणून घोषित होता.
वर्णाश्रमावर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे कि रामायणात सुद्धा निषाद कुळाचा उल्लेख आलेला आहे. निषाद म्हणजे जंगलाजवळच्या प्रदेशी  राहणारे. पण म्हणून काही ते अन्य नागरी वसाहतींपासून तुटलेले किंवा त्यागलेले नव्हते. आर्यावर्ताच्या राजकीय पटावर त्यांचे स्थान अन्य राज्यांसारखेच होते. आणि निषाद राजा आणि राम हे एकाच गुरुकुलात शिकलेले होते असे वर्णन आहे. म्हणजेच निषाद किंवा क्षुद्र कुळाला शिक्षण वर्ज्य नव्हते. महाभारतामध्येच पुन्हा "नल  दमयंती" आख्यान आलेले आहे ज्यात "नल " हा मोठा निषाद राजा होता आणि तो अस्त्र शस्त्र विद्येत पारंगत होता. म्हणजेच त्यांना क्षत्रियोचित शस्त्रविद्या शिकवल्या जात होती हे प्रमाणित होते.
असे असतांना द्रोणाचार्यांनी केवळ "क्षत्रिय" नाही म्हणून एकलव्याला शिकवण्यास नकार दिला असे जे शतकानुशतकं बिंबवल्या गेले आहे ते चुकीचे वाटते. मग द्रोणाचार्यांनी असे का करावे ?
एक लक्षात घ्यायला हवे कि महाभारतात प्रत्येक कृतीमागे, घटनेमागे फार मोठे राजकारण लपलेले आहे. तिथे प्रत्येक जण एकतर एकमेकांचे हितसंबंध जोपासताना दिसतात नाहीतर प्रतिशोधासाठी किंवा अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी कुणासमोर उभे ठाकलेले दिसतात.
द्रोणाचार्यांना कुरुकुलाच्या राजकुमारांना शिक्षण देण्यासाठी भीष्मांनी नियुक्त केले होते. स्वाभाविकपणे द्रोणाचार्यांना कुरुकुलाच्या आणि तत्कालीन आर्यावर्ताच्या राजकारणाचे भान ठेवणे, कुरुकुलाचे मित्रराज्य आणि शत्रूराज्य आणि त्यांच्यातल्या घडामोडींचे आकलन करून संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त होते.
एकलव्याला ज्या "हिरण्यधनु " राजाने पुत्र मानले होते, त्या निषादकुलाचे अनेक पिढ्यांपासून जरासंधासोबत हितसंबंध होते. आणि जरासंध कुरुकुलापेक्षा जास्त बलाढ्य होता. जरासंध आणि शिशुपाल यांचे सख्य आणि त्या दोघांचे यादव कुळासोबतचे वैर हे सुद्धा सगळ्यांनाच ठाऊक होते.
एकलव्याला धनुर्विद्या शिकवणे द्रोणाचार्यांना शक्य नव्हते कारण त्यांची नियुक्ती हि फक्त कुरुकुलातल्या राजकुमारांना शिकवण्यासाठीच झालेली होती.याच कारणासाठी त्यांनी कर्णाला सुद्धा शिकवण्यास नकार दिला. त्यात वर्णाचा काहीच संबंध नाही. द्रोणाचार्यांचे स्वतःचे गुरुकुल नव्हते. तसे असते तर मग त्यांना कुणाला शिष्य म्हणून स्वीकारावे आणि कुणाला नाकारावे याचे स्वात्रंत्र्य असते. अशी बंधने पडली नसती. आजकाल जसे "exclusive rights" असतात तसेच द्रोणाचार्यांच्या बाबतीत होते. असे असता ते दुसऱ्या कुणाला कसे काय शिकवणार ?
एकलव्याने फक्त गुरुचे ध्यान करून धनुर्विद्या आत्मसात केली, नव्हे त्यात तो निष्णात बनला हे सर्वस्वी त्याच्यातल्या अद्वितीय क्षमतांचा परिणाम आहे. त्याच्या या असामान्य कर्तृत्वाशी द्रोणाचार्यांचे काहीच देणेघेणे नाही, त्यात त्यांचे काडीचेही श्रेय नाहीच आहे. तसे पाहता द्रोणाचार्यांना त्याच्याकडून दक्षिण घेण्याचा काही एक अधिकार नव्हता. पण हि एकलव्याची गुरुभक्तीच आहे कि त्याने द्रोणाचार्यांना गुरुस्थानी मानले आणि त्यांना दक्षिणा देण्यासही तो आनंदाने तयार झाला.
द्रोणाचार्यांनी आपल्या गुरुपदाचा असा गैरवापर का करावा ? शिकवले नसतांना सुद्धा फक्त कुणी आपल्याला गुरु मानले म्हणून दक्षिणा का मागावी ? आणि तीसुद्धा अशी ? अंगठा मागण्याची दक्षिणा? किती क्रूरता आहे हि !
काहींच्या मते अर्जुनाने द्रोणाचार्यांकडून वचन घेतले होते कि ते फक्त त्यालाच जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवतील. म्हणून द्रोणाचार्यांनी असे केले. पण हे पटत नाही. द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्येचे त्यांच्याकडे असलेले सर्व शिक्षण देऊन त्याला उत्कृष्ट धनुर्धर तर करू शकत होते. पण जगातल्या बाकी धनुर्धरांना उत्कृष्टता मिळवण्यापासून ते कसे काय अडवू शकणार होते ? ते असे थोडीच म्हणू शकत होते कि अर्जुनाशिवाय बाकी कुणी धनुर्विद्या शिकू नका म्हणून ?
एकलव्याचा अंगठा मागण्यामागे द्रोणाचार्यांची राजकारणातली दूरदृष्टी दिसून पडते. एकलव्याचे कुल हे कुरुकुलापेक्षा बलाढ्य असलेल्या कुलासोबत संधान ठेवून होते. जे भविष्यात कुरुकुलासाठी धोकादायक ठरले असते. एकलव्यासारखा महान धनुर्धारी जर कुरुकुळाविरुद्ध उभा ठाकला तर जिंकणे दुष्कर होते. द्रोणाचार्यांना जर क्रूरपणा करायचाच असता तर त्यांनी सरळ सरळ एकलव्याला आपला जीव दे असे म्हंटले असते. पण तसे केले असते तर निषादराज त्यांच्यावर चाल करून आला नसता का ? म्हणून जीव न घेता त्यांनी त्याला त्याचा अंगठाच मागितला. ते पाहता समोर उभ्या असलेल्या सगळ्या कुरुकुलातल्या राजकुमारांना ही खात्री पटली कि द्रोणाचार्यांनी कुरुकुलाप्रती किती निष्ठा आहे.अंगठ्याशिवाय कुणी बाण मारू शकणार नाही, आता एकलव्य धनुर्धारी म्हणून मेल्यातच जमा होता. कौरव पांडव वापस जायला निघाले. द्रोणाचार्यांनी एकलव्याला त्याच्या असामान्य गुरुभक्तीसाठी तो जगात प्रसिद्ध होईल असा आशीर्वाद दिला. आपल्यातल्या बहुतेकांना इथपर्यंतच गोष्ट ठाऊक आहे.
पण.. " कहानी अभी बाकी है मेरे दोस्त "
एका डोळ्यात गुरुदक्षिणा देण्याची कृतकृत्यता आणि दुसऱ्या डोळ्यात आपल्या स्वप्नभंगाचे दुःख घेऊन एकलव्य पाठमोऱ्या द्रोणाचार्यांकडे पाहत उभा होता. वापस जाणाऱ्या द्रोणाचार्यांच्या मनात विचारांचे वादळ उफाळून आले होते. एका श्रेष्ठ धनुर्धारीचे भविष्य आपण मारून टाकले याची टोचणी तर होतीच शिवाय असे करण्यास भाग पाडणाऱ्या दास्यत्वाचा रागही खदखदत होता. काय करावे जेणेकरून "गुरु" म्हणून आपण आपल्या शिष्याचे भवितव्य सुरक्षित करू शकू ? विचार करता करता त्यांना एक युक्ती सुचली. त्याच भरात ते माग वळले.
आणि त्यांनी एकलव्याला आपल्या उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा दाखवून खूण केली. कुशाग्र एकलव्याला ती कळली. आणि त्याने हि दोन बोटे वापरून बाण चालवण्याचा सराव सुरु केला. मनोमन द्रोणाचार्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिला कि पुढच्या पिढीतले धनुर्धर अंगठा न वापरता अश्याच पद्धतीने बाण चालवतील. आणि आजही अश्याच पद्धतीने बाण चालवतात.
पुन्हा चिकाटीने अभ्यास करून एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर झाला. निषादराजाच्या मृत्यूनंतर राजा झालेल्या एकलव्याने कुलपरंपरेनुसार जरासंधासोबत सख्य केले. पुढे काय झाले ?
काहींच्या मते रुख्मिणी हरणाच्या वेळी एकलव्य शिशुपालाच्या बाजूने कृष्णाविरुद्ध लढला. या युद्धात कृष्णाने एका दगडाच्या सहाय्याने त्याचा वध केला.
तर काहींच्या मते जरासंध आणि शिशुपाल जेव्हा मथुरेवर आक्रमण करत तेव्हा एकलव्य जरासंधाचा सेनापती बनून लढत होता. एकदा त्याने आपल्या पराक्रमाने सर्व यादवसैन्याची धूळधाण उडवली. तेव्हा कृष्णाने एकलव्याचा वध केला.
आता इथे पुन्हा प्रश्न पडतो कि जरी असे मानले कि एकलव्याला आपली जन्मकथा ठाऊक नव्हती म्हणून त्याने यादव कुलाविरुद्ध युद्ध पुकारले तरीसुद्धा कृष्ण तर सर्वज्ञ होता ना ? त्याने एकलव्याला का मारले ? तो तर त्याचा चुलत भाऊच होता, नाही का ?
कारण एकच. धर्माचे रक्षण ! अधर्माचा नाश ! एकलव्याने प्रत्यक्ष त्याचे काही शत्रुत्व नसतांना मथुरेविरुद्ध युद्ध केले. अधर्माची कास धरली. आणि या एकाच कारणापायी कर्णाप्रमाणेच एकलव्याची गत झाली. एक श्रेष्ठ धनुर्धारी गतप्राण झाला.
पण तो पुन्हा आला.
द्रोणाचार्यांचा वध करून प्रतिशोध घेणारा वीर योद्धा बनून !  धृष्टद्युम्न !

 - पूर्णिमा देशमुख पुरेकर


मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

शकुनि - द्वापारयुगाचा अवतार

शकुनि  - द्वापारयुगाचा अवतार 
  महाभारत युद्धाचा १८ वा दिवस. अंतिम दिवस. सूर्य कुरुक्षेत्रावर आग ओकत होता. सहदेव आणि शकुनि समोरासमोर होते. पांडवांमधल्या सर्वात ज्ञानी,त्रिकालदर्शी अश्या सहदेवाने शकुनिला अंतिम अवसर दिला.
शकुनिमामा, तुमचा सुड तर पूर्ण झालेला आहे. पितामह भीष्म धारातीर्थी पडलेच आहेत. आज ना उद्या ते मरणारच. सगळे कौरवहि मारले गेलेत. दुर्योधन सुद्धा मरणारच आहे. आता तुम्ही कशाला रणक्षेत्रात थांबले आहेत ? तुम्ही शरणागती पत्करा, गांधारदेशी वापस जा आणि राज्य करा."
आपले सगळे आयुष्य कट कारस्थानात घालवलेल्या शकुनिला जन्मात पहिल्यांदाच एकीकडे प्रतिज्ञापूर्तीचे सुख मिळाले होते आणि दुसरीकडे त्या सुखातला फोलपणा कळून चुकला होता. आता जगण्याचे काय प्रयोजन उरले होते ?
" सहदेवा,तू तर भविष्य,भूत जाणणारा ज्योतिष्य तज्ज्ञ. तुला सगळेच काही माहिती आहे. माझी प्रतिज्ञा मी पूर्ण केली. तू मला मारण्याची प्रतिज्ञा घेतली होतीस ना ? मग आता ती पूर्ण कर. मला या पवित्र कुरुक्षेत्रावर क्षत्रियोचित मरण दे. वीरगती दे."
 शकुनिने तलवार उचलली. आजपर्यंत त्याने आडून वार केले होते. पण आज पहिल्यांदाच त्याने पुढे होऊन वार केले. भीषण युद्ध झाले. आणि सहदेवाने शकुनिचा शिरःच्छेद केला. एका सूडनाट्याचा अंत झाला.
     मूळ महाभारतामध्ये शकुनिच्या सूडभावनेमागचा कार्यकारणभाव स्पष्टपणे सांगितला नाही. फक्त एव्हढेच सांगितले जाते कि गांधारीला अंध धृतराष्ट्रासोबत लग्न करावे लागले याचा राग होता. आणि त्या सूडभावनेनेच त्याने सगळे कटकारस्थान केले. पण दक्षिण भारतातल्या महाभारताच्या काही संस्करणांमध्ये शकुनिच्या खलनाट्यामागचे वेगळेच कारण सांगितल्या गेले आहेत.
वास्तविक पाहता कुरुवंशाच्या दडपशाहीपुढे मान तुकवावी लागणारी गांधारी हि काही पहिलीच राजकन्या नव्हती. त्या आधी सुद्धा भीष्माने काशी राजाच्या अंबा,अंबिका आणि अंबालिका या राजकन्यांचे भर स्वयंवरामधून हरण केलेले होतेच की ! त्या विरुद्ध अंबेच्या प्रेमासाठी शाल्व राजाने लुटुपुटुचा प्रतिकार केला पण भीष्मापुढे त्याचे काही चालले नाही. त्या तिघींपैकी फक्त अंबेनेच विरोध केला तो सुद्धा तिचे शाल्वराजावर प्रेम होते म्हणून. आणि नंतरही शाल्वराजाकडून झिडकारून वापस आल्यानंतर भीष्माने सुद्धा तिला अव्हेरले म्हणून ती केवळ भीष्माविरुद्धच सूड घेण्यासाठी पेटून उठली. अंबिका आणि अंबालिका मात्र मुकाटपणे प्राक्तन स्वीकारून जगल्या. पण एव्हढे होऊन सुद्धा काशीच्या राजाने कुरुवंशाविरुद्ध दंड नाही थोपटले. मग शकुनिलाच एव्हढा राग का होता ?
  असे म्हणतात कि गांधार देशाचा राजा सुबलचे १०० पुत्र आणि एक पुत्री होती (गांधारी). सगळ्यात धाकटा होता शकुनि. सुबलाच्या सगळ्या पुत्रांपैकी हा एकच जास्त चतुर आणि शूर होता. एका आख्यायिकेनुसार भीष्माने गांधार देशावर आक्रमण केले आणि सर्व राजपुरुषांना बंदी केले. भीष्मांचा क्रूरपणा इतका कि त्याने सर्वांना अन्नाच्या कणाकणासाठी हाल हाल केले. रोज प्रत्येकाला भाताचा एक शित देत असत. राजा सुबलाने भविष्य ओळखून आपल्या सगळ्या मुलांना जवळ बोलावून सांगितले कि भीष्माला आपल्या सगळ्यांना मारायचे आहेच. आपण आपल्या वाटणीचे एक शित शकुनिला देत जाऊ, जेणेकरून तो जिवंत राहील. तो आपल्या सगळ्यांपैकी सर्वात हुशार आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सुड तो घेईल. आणि त्याने आपल्या तलवारीने शकुनिच्या पायावर वार करून त्याला पंगू केले. त्यामागे एक कारण हे कि पंगू म्हणून त्याच्यावर दया येऊन भीष्म त्याला सोडून देईल आणि दुसरे कारण कि जेव्हा जेव्हा शकुनि लंगडत चालेल तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या पिता आणि बंधूंच्या बलिदानाची आणि सुड घेण्याची प्रतिज्ञा आठवत राहील. सुबलाने भाकीत केल्याप्रमाणेच झाले. शकुनिचे वडील आणि सगळे भाऊ भुकेने व्याकुळ होऊन हाल हाल होऊन मेले. वडिलांनी मरण्यापूर्वी त्याला सांगून ठेवले कि मी मेल्यांनंतर माझ्या मांडीच्या हाडापासून पासे बनव आणि त्यात माझा आत्मा राहील. जेव्हा तू खेळात हे पासे टाकशील तेव्हा तुला जो आकडा हवा तो पडेल.
 शकुनिच्या सगळ्या कृत्यांमागचा प्रमुख उद्देश हा भीष्म आणि कुरुवंशाचा विनाश करणे हाच होता. त्याला ना कौरवांचे सख्य होते ना पांडवांसोबत वैर. पण कौरव आणि पांडव हे कुरुकुलाचे भविष्य होते. त्याने हेतुपुरस्सर कौरव पांडवांमध्ये वैर निर्माण केले.अनेक कट केले, कारस्थाने केली. आणि महाभारत घडवून आणले.
  पांडवांचे सरंक्षण करणारी फक्त एकच महाशक्ती होती. वासुदेव श्रीकृष्ण ! वर वर पाहता दोघेही एकमेकांविरुद्ध असले तरी शकुनिला हे पक्के ठाऊक होते कि कृष्णापुढे कौरवांचे काहीही चालणार नाही. पण कुरुकुलाचा आणि भीष्माचा विनाश ह्या एकाच ध्यासापायी त्याने प्रत्यक्ष श्रीकृष्णासोबत वैर पत्करले. स्वतःच्याच लाडक्या बहिणीच्या वंशाचा नाश घडवून आणला.
पांडव नेहमीच कौरवांच्या दुष्कृत्यांचे खापर शकुनिच्या माथी मारत आले. काही अंशी ते खरेच होते. भीमावर विषप्रयोग करणे, लाक्षागृहातले हत्याकांड, द्यूतक्रीडेचे षडयंत्र आणि महाभारत युद्धातले काही डावपेच हे सगळे शकुनिच्या पाताळयंत्री बुद्धीचीच उपज होती.
पण द्रौपदीचा मानभंग करण्याचे पाप मात्र त्याचे नाही. ते दुष्कर्म कर्ण आणि दुर्योधनाचेच !
आणि दुर्योधनाची करणी काय वेगळी होती का ? त्याला स्वतःची अक्कल नव्हती का ? मग त्याच्या काळ्या कृत्यांसाठी पूर्णपणे शकुनिलाच  जबाबदार का ठरवावे ?
वास्तविक पाहता शकुनि जरी दुर्योधनाचे कान भरत होता तरी दुर्योधनाची महत्वाकांक्षा ही पांडवांबद्दल त्याच्या मनातल्या असुयेमुळे निर्माण झाली होती आणि त्या असूयेचे मूळ होते धृतराष्ट्राच्या मनात ! ज्येष्ठ असूनही फक्त अंध असल्यामुळे भीष्माने धृतराष्ट्राला डावलले. पांडूला कुरुकुलसम्राट केले याचा राग त्याच्या मनात खदखदत तर होताच, वरून त्या अपमानात भर पडली ती पांडूच्या निधनानंतर त्याला फक्त नामधारी राजा बनवून ठेवले या गोष्टीची. पांडूचा मुलगा युधिष्ठिर हा दुर्योधनापेक्षा मोठा होता हा त्याच्यासाठी आणखीन एक दैवदुर्विलास ! मुळात धृतराष्ट्रालाच पांडवांचा उत्कर्ष सहन होत नव्हता आणि त्याच दुर्भावना त्याने आपल्या ज्येष्ठ मुलाच्या मनात रुजवल्या पण त्यांना खतपाणी घातले ते शकुनिच्या हातून. म्हणूनच शकुनि गांधार देशी वापस न जाता हस्तिनापुरातच राहत होता तरी त्याला विरोध केला नाही कुणी. आणि कौरवांच्या दुष्कृत्यांकडे त्याने म्हणूनच दुर्लक्ष केले. हा, फक्त लोकांना दाखवण्यासाठी तो लुटुपुटीचा विरोध करत असे.
शेवटी त्याने आणि दुर्योधनानेसुद्धा अधर्माचा मार्ग धरण्याचा जो निर्णय घेतला त्याला सर्वस्वी तेच जबाबदार नव्हते का ?
     त्रेतायुगातला संघर्ष हा पूर्णपणे एकीकडे आप्त आणि दुसरीकडे शत्रू असा सरधोपट होता. पण द्वापारयुगात असे साधेसरळ सोपे गणित नव्हते. माणूस सूडाच्या नशेत सारासारविवेक विसरतो हे जेव्हढे खरे आहे तेव्हढेच धर्म आणि अधर्माच्या युद्धात सगेसोयरे कोणीच आपले नसतात हेसुद्धा सत्यच आहे. आणि हेच तर द्वापारयुगाचे सार होते. आणि शकुनि हा प्रत्यक्ष द्वारपारयुगाचा अवतार होता.ज्याप्रमाणे धर्मासाठी पांडवांना आपल्याच नातेवाईकांचा वध करावा लागला तसाच शकुनिने सुद्धा प्रतिशोधासाठी आपल्याच भाच्यांचा विनाश केला. पण दोघांमधला सगळ्यात मोठा फरक होता तो एकाच कृत्यांमागच्या हेतूचा. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणे धर्म आहे तर प्रतिशोधासाठी हत्या करणे अधर्म. पण शकुनिला धर्माशी घेणे देणे नव्हतेच मुळी. त्याच्यासोबत झालेल्या अधर्माचे प्रत्युत्तर त्याने अधर्मानेच देण्याचे ठरवले होते ना !
एका अर्थी दुर्योधनाला अधर्माच्या मार्गाकडे ढकलून त्याने पांडवांची मदतच केली असे नाही वाटत ?

 - पूर्णिमा देशमुख पुरेकर