मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

शकुनि - द्वापारयुगाचा अवतार

शकुनि  - द्वापारयुगाचा अवतार 
  महाभारत युद्धाचा १८ वा दिवस. अंतिम दिवस. सूर्य कुरुक्षेत्रावर आग ओकत होता. सहदेव आणि शकुनि समोरासमोर होते. पांडवांमधल्या सर्वात ज्ञानी,त्रिकालदर्शी अश्या सहदेवाने शकुनिला अंतिम अवसर दिला.
शकुनिमामा, तुमचा सुड तर पूर्ण झालेला आहे. पितामह भीष्म धारातीर्थी पडलेच आहेत. आज ना उद्या ते मरणारच. सगळे कौरवहि मारले गेलेत. दुर्योधन सुद्धा मरणारच आहे. आता तुम्ही कशाला रणक्षेत्रात थांबले आहेत ? तुम्ही शरणागती पत्करा, गांधारदेशी वापस जा आणि राज्य करा."
आपले सगळे आयुष्य कट कारस्थानात घालवलेल्या शकुनिला जन्मात पहिल्यांदाच एकीकडे प्रतिज्ञापूर्तीचे सुख मिळाले होते आणि दुसरीकडे त्या सुखातला फोलपणा कळून चुकला होता. आता जगण्याचे काय प्रयोजन उरले होते ?
" सहदेवा,तू तर भविष्य,भूत जाणणारा ज्योतिष्य तज्ज्ञ. तुला सगळेच काही माहिती आहे. माझी प्रतिज्ञा मी पूर्ण केली. तू मला मारण्याची प्रतिज्ञा घेतली होतीस ना ? मग आता ती पूर्ण कर. मला या पवित्र कुरुक्षेत्रावर क्षत्रियोचित मरण दे. वीरगती दे."
 शकुनिने तलवार उचलली. आजपर्यंत त्याने आडून वार केले होते. पण आज पहिल्यांदाच त्याने पुढे होऊन वार केले. भीषण युद्ध झाले. आणि सहदेवाने शकुनिचा शिरःच्छेद केला. एका सूडनाट्याचा अंत झाला.
     मूळ महाभारतामध्ये शकुनिच्या सूडभावनेमागचा कार्यकारणभाव स्पष्टपणे सांगितला नाही. फक्त एव्हढेच सांगितले जाते कि गांधारीला अंध धृतराष्ट्रासोबत लग्न करावे लागले याचा राग होता. आणि त्या सूडभावनेनेच त्याने सगळे कटकारस्थान केले. पण दक्षिण भारतातल्या महाभारताच्या काही संस्करणांमध्ये शकुनिच्या खलनाट्यामागचे वेगळेच कारण सांगितल्या गेले आहेत.
वास्तविक पाहता कुरुवंशाच्या दडपशाहीपुढे मान तुकवावी लागणारी गांधारी हि काही पहिलीच राजकन्या नव्हती. त्या आधी सुद्धा भीष्माने काशी राजाच्या अंबा,अंबिका आणि अंबालिका या राजकन्यांचे भर स्वयंवरामधून हरण केलेले होतेच की ! त्या विरुद्ध अंबेच्या प्रेमासाठी शाल्व राजाने लुटुपुटुचा प्रतिकार केला पण भीष्मापुढे त्याचे काही चालले नाही. त्या तिघींपैकी फक्त अंबेनेच विरोध केला तो सुद्धा तिचे शाल्वराजावर प्रेम होते म्हणून. आणि नंतरही शाल्वराजाकडून झिडकारून वापस आल्यानंतर भीष्माने सुद्धा तिला अव्हेरले म्हणून ती केवळ भीष्माविरुद्धच सूड घेण्यासाठी पेटून उठली. अंबिका आणि अंबालिका मात्र मुकाटपणे प्राक्तन स्वीकारून जगल्या. पण एव्हढे होऊन सुद्धा काशीच्या राजाने कुरुवंशाविरुद्ध दंड नाही थोपटले. मग शकुनिलाच एव्हढा राग का होता ?
  असे म्हणतात कि गांधार देशाचा राजा सुबलचे १०० पुत्र आणि एक पुत्री होती (गांधारी). सगळ्यात धाकटा होता शकुनि. सुबलाच्या सगळ्या पुत्रांपैकी हा एकच जास्त चतुर आणि शूर होता. एका आख्यायिकेनुसार भीष्माने गांधार देशावर आक्रमण केले आणि सर्व राजपुरुषांना बंदी केले. भीष्मांचा क्रूरपणा इतका कि त्याने सर्वांना अन्नाच्या कणाकणासाठी हाल हाल केले. रोज प्रत्येकाला भाताचा एक शित देत असत. राजा सुबलाने भविष्य ओळखून आपल्या सगळ्या मुलांना जवळ बोलावून सांगितले कि भीष्माला आपल्या सगळ्यांना मारायचे आहेच. आपण आपल्या वाटणीचे एक शित शकुनिला देत जाऊ, जेणेकरून तो जिवंत राहील. तो आपल्या सगळ्यांपैकी सर्वात हुशार आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सुड तो घेईल. आणि त्याने आपल्या तलवारीने शकुनिच्या पायावर वार करून त्याला पंगू केले. त्यामागे एक कारण हे कि पंगू म्हणून त्याच्यावर दया येऊन भीष्म त्याला सोडून देईल आणि दुसरे कारण कि जेव्हा जेव्हा शकुनि लंगडत चालेल तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या पिता आणि बंधूंच्या बलिदानाची आणि सुड घेण्याची प्रतिज्ञा आठवत राहील. सुबलाने भाकीत केल्याप्रमाणेच झाले. शकुनिचे वडील आणि सगळे भाऊ भुकेने व्याकुळ होऊन हाल हाल होऊन मेले. वडिलांनी मरण्यापूर्वी त्याला सांगून ठेवले कि मी मेल्यांनंतर माझ्या मांडीच्या हाडापासून पासे बनव आणि त्यात माझा आत्मा राहील. जेव्हा तू खेळात हे पासे टाकशील तेव्हा तुला जो आकडा हवा तो पडेल.
 शकुनिच्या सगळ्या कृत्यांमागचा प्रमुख उद्देश हा भीष्म आणि कुरुवंशाचा विनाश करणे हाच होता. त्याला ना कौरवांचे सख्य होते ना पांडवांसोबत वैर. पण कौरव आणि पांडव हे कुरुकुलाचे भविष्य होते. त्याने हेतुपुरस्सर कौरव पांडवांमध्ये वैर निर्माण केले.अनेक कट केले, कारस्थाने केली. आणि महाभारत घडवून आणले.
  पांडवांचे सरंक्षण करणारी फक्त एकच महाशक्ती होती. वासुदेव श्रीकृष्ण ! वर वर पाहता दोघेही एकमेकांविरुद्ध असले तरी शकुनिला हे पक्के ठाऊक होते कि कृष्णापुढे कौरवांचे काहीही चालणार नाही. पण कुरुकुलाचा आणि भीष्माचा विनाश ह्या एकाच ध्यासापायी त्याने प्रत्यक्ष श्रीकृष्णासोबत वैर पत्करले. स्वतःच्याच लाडक्या बहिणीच्या वंशाचा नाश घडवून आणला.
पांडव नेहमीच कौरवांच्या दुष्कृत्यांचे खापर शकुनिच्या माथी मारत आले. काही अंशी ते खरेच होते. भीमावर विषप्रयोग करणे, लाक्षागृहातले हत्याकांड, द्यूतक्रीडेचे षडयंत्र आणि महाभारत युद्धातले काही डावपेच हे सगळे शकुनिच्या पाताळयंत्री बुद्धीचीच उपज होती.
पण द्रौपदीचा मानभंग करण्याचे पाप मात्र त्याचे नाही. ते दुष्कर्म कर्ण आणि दुर्योधनाचेच !
आणि दुर्योधनाची करणी काय वेगळी होती का ? त्याला स्वतःची अक्कल नव्हती का ? मग त्याच्या काळ्या कृत्यांसाठी पूर्णपणे शकुनिलाच  जबाबदार का ठरवावे ?
वास्तविक पाहता शकुनि जरी दुर्योधनाचे कान भरत होता तरी दुर्योधनाची महत्वाकांक्षा ही पांडवांबद्दल त्याच्या मनातल्या असुयेमुळे निर्माण झाली होती आणि त्या असूयेचे मूळ होते धृतराष्ट्राच्या मनात ! ज्येष्ठ असूनही फक्त अंध असल्यामुळे भीष्माने धृतराष्ट्राला डावलले. पांडूला कुरुकुलसम्राट केले याचा राग त्याच्या मनात खदखदत तर होताच, वरून त्या अपमानात भर पडली ती पांडूच्या निधनानंतर त्याला फक्त नामधारी राजा बनवून ठेवले या गोष्टीची. पांडूचा मुलगा युधिष्ठिर हा दुर्योधनापेक्षा मोठा होता हा त्याच्यासाठी आणखीन एक दैवदुर्विलास ! मुळात धृतराष्ट्रालाच पांडवांचा उत्कर्ष सहन होत नव्हता आणि त्याच दुर्भावना त्याने आपल्या ज्येष्ठ मुलाच्या मनात रुजवल्या पण त्यांना खतपाणी घातले ते शकुनिच्या हातून. म्हणूनच शकुनि गांधार देशी वापस न जाता हस्तिनापुरातच राहत होता तरी त्याला विरोध केला नाही कुणी. आणि कौरवांच्या दुष्कृत्यांकडे त्याने म्हणूनच दुर्लक्ष केले. हा, फक्त लोकांना दाखवण्यासाठी तो लुटुपुटीचा विरोध करत असे.
शेवटी त्याने आणि दुर्योधनानेसुद्धा अधर्माचा मार्ग धरण्याचा जो निर्णय घेतला त्याला सर्वस्वी तेच जबाबदार नव्हते का ?
     त्रेतायुगातला संघर्ष हा पूर्णपणे एकीकडे आप्त आणि दुसरीकडे शत्रू असा सरधोपट होता. पण द्वापारयुगात असे साधेसरळ सोपे गणित नव्हते. माणूस सूडाच्या नशेत सारासारविवेक विसरतो हे जेव्हढे खरे आहे तेव्हढेच धर्म आणि अधर्माच्या युद्धात सगेसोयरे कोणीच आपले नसतात हेसुद्धा सत्यच आहे. आणि हेच तर द्वापारयुगाचे सार होते. आणि शकुनि हा प्रत्यक्ष द्वारपारयुगाचा अवतार होता.ज्याप्रमाणे धर्मासाठी पांडवांना आपल्याच नातेवाईकांचा वध करावा लागला तसाच शकुनिने सुद्धा प्रतिशोधासाठी आपल्याच भाच्यांचा विनाश केला. पण दोघांमधला सगळ्यात मोठा फरक होता तो एकाच कृत्यांमागच्या हेतूचा. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणे धर्म आहे तर प्रतिशोधासाठी हत्या करणे अधर्म. पण शकुनिला धर्माशी घेणे देणे नव्हतेच मुळी. त्याच्यासोबत झालेल्या अधर्माचे प्रत्युत्तर त्याने अधर्मानेच देण्याचे ठरवले होते ना !
एका अर्थी दुर्योधनाला अधर्माच्या मार्गाकडे ढकलून त्याने पांडवांची मदतच केली असे नाही वाटत ?

 - पूर्णिमा देशमुख पुरेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा