शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

चकलीची उंडी आणि अनारस्याची भाजणी


दिवाळीची चाहूल लागताच घराघरातून काही ठराविक संवाद ऐकू येऊ लागतात. पुरुष आणि स्त्रिया दोन वेगवेळ्या चढाओढी मध्ये गर्क असतात. पुरुष मंडळी  एकीकडे यंदाची दिवाळी आपले दिवाळे कसे काढणार यावर चर्चा करतात तर दुसरीकडे आपल्या कमाईची बढाई मारतात.
" अरे यावेळी तर मी xxxx  ( महागड्या) दुकानातून कपडे घेतले. दिवाळी आहे यार, एव्हढा खर्च तर करूच शकतो."
" मी तर नवीन मोबाइल घेऊन दिला बायकोला/ मुलाला/आईवडिलांना. काय जुनाच वापरायचा ? " 
आणि बायकांमध्ये दिवाळीच्या फराळाचा सुग्रणपणा दाखवण्याची  चढाओढ सुरु होते.
     " आमच्याकडे तर यांना माझ्याच हातचा फराळ लागतो. आणि मी बाई सगळे काही करते. लाडू, अनारसे, चकली,चिवडा, करंज्या आणि काय काय. शेवटी दिवाळी काय एकदाच तर येते वर्षातून ?" ( बाकी सण काय तीन चारदा येतात का ? )
" आमच्याकडे तेच ते टिपिकल पदार्थ नाही बाई आवडत.आजकाल तर काय लाडू चिवडा वर्षभर फस्त करणे सुरूच असते. आणि देवाला सुद्धा काही वेगळे नको का ? मी तर दरवर्षी नवीन रेसिपी करते. "
  आदल्या पिढीतल्या बायका आपण भाजणी कशी बनवतो, उंडी कशी चांगली होते, लाडू कसा करतो यावर आपापले मत मांडायच्या आणि मग दुसरीने त्यात काहीतरी खोच काढायची आणि आपण कसे भाजणी -उंडी expert आहोत हे दाखवण्यासाठी एकमेकींवर कुरघोडी करायच्या.
आताच्या पिढीत कोण घरीच सगळे काही बनवते आणि कोण  बाजारातून विकत आणते या वरून टीकाटिप्पणी सुरु असते.
" निदान एक तरी दिवस स्वतः काही घरी बनवावे, वर्षभर तर विकताचेच खात असतात. काय बाई आहे, काहीच करत नाही."
" वर्षभर तर राब राब राबतो , निदान दिवाळीत बाकीच्या कामाच्या रगाड्यात एखाद्या गृहउद्योगातून फराळाच्या वस्तू आणल्या तर काय वाईट ? त्यांची सुद्धा कमाई होते आणि आपला हातभार लागतो."
 कपडे , घरातल्या वस्तू, रंगरंगोटी, सजावट , फराळ, पाहुणचार, भेटवस्तू सगळ्या सगळ्या मध्ये चढाओढ सुरु असते. कधी कधी चढाओढ नसते पण दिखावा सुद्धा असतोच. मनात नसून सुद्धा, परवडत नसतांना सुद्धा लोक काय म्हणतील या भीतीने सण साजरा करण्याची वृत्ती असते.
आता हा सण साजरा करण्यातली सुद्धा इतकी मतमतांतरे आहेत कि माझी मति गुंग होते.
कुणी म्हणते उगाच निरर्थक भेटवस्तू देऊ नका, उगाच पैसे वाया जातात आणि घरात जागा नाही नकोश्या वस्तू ठेवायला.
कुणी म्हणते भेट देणे महत्वाचे, स्वस्त-महाग महत्वाचे नाही. दिल्याशिवाय कुणाला काही देण्याची सवय कशी काय लागेल ? आणि त्यामुळेच तर बाजारात पैसे खेळात राहतो.
कुणी म्हणतो काय गरज आहे सजावटीसाठी सामान विकत आणायची ? घरीच कचऱ्यातून कला करा.
तर कुणी म्हणते कि स्वदेशी वस्तू घ्या आणि त्यामुळे गरीबाच्या घरी सुद्धा दिवाळी साजरी केल्या जाईल. ते पुण्य मिळेल.
कुणी म्हणते ऑनलाईन खरेदी करा तर कुणी म्हणते बाजारदुकानांना चालना द्या.
कुणी म्हणते फटाके फोडू नका, प्रदूषण कमी करा, तर कुणी म्हणते फटाके फोडल्यामुळे वातावरणातले उपद्रवी जीवजंतू,किटाणू नष्ट होतात.
कुणी म्हणते कश्याला एव्हढ्या पणत्या दिवे लावून तेलाचा,विजेचा अपव्यय करता ?
तर कुणी म्हणते दिव्यांचा सण आहे तर घर काय अंधारलेले ठेवणार का ?
कुणी घरीच दिवाळी साजरी करावी असा अट्टाहास ठेवतात तर कुणी या सुट्ट्यांच्या दिवसात भ्रमण दौरा काढतात.
   हे सगळे ऐकून काय करावे काय करू नये असा प्रश्न पडतो. एकीकडे वाढलेला खर्च तर दुसरीकडे सण साजरा करण्याची रूढी आणि इच्छा यात दिवाळी हरवून गेल्यासारखी वाटते.
टिकल्या फोडतांना मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद आणि लक्ष्मीसमोर हात जोडणाऱ्या मोठ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानी भाव दोन्ही हरवून गेले आहे.
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

एकतर्फी प्रेम - दैवी सौंदर्य, शापित विद्रुपता

 एकतर्फी प्रेम - दैवी सौंदर्य, शापित विद्रुपता 

गेल्या काही वर्षांपासून प्रेमाचा स्वीकार न केल्यामुळे ऍसिड टाकून विद्रुप करण्याच्या अमानुष कृत्यांची लक्षणीय वाढ झालेली आहे. एकतर्फी प्रेम हि संकल्पना काही नवीन नाही. पण "मुलीचा नकार" पचवण्याची ताकद कापुरुषांमध्ये अजूनही आलेली नाही. असले निंदनीय कृत्य करणारे खरेच प्रेम करत होते का ? ज्या प्रेमाला  कथा पुराणांनी जगातले सर्वात उद्दात्त स्थान दिलेले आहे ते प्रेम असले अक्षम्य कृत्य करणे तर दूरच पण तस विचार सुद्धा करणार नाही.
राधा कृष्णाचे प्रेम एकतर्फी नव्हतेच. पण राधा विवाहित होती आणि सामाजिक नीतिनियमांच्या बंधनात अडकलेली असून सुद्धा तिचे प्रेम सोन्यासारखेच लखलखते राहिले. कृष्णाने वृंदावन सोडल्यानंतर कधीच तिची भेट घेतली नाही. तरी तिचे त्याच्या जीवनातले स्थान सर्वोच्चच राहिले.
मुलाने प्रेमाराधन  केल्यानंतर ते स्वीकारणे हे अनेकदा मुलींसाठी क्रमप्राप्तच होते. असे असले तरी मुलीने "propose " करण्याचे प्रसंग सुद्धा पुराणात उल्लेखित आहेत. रुख्मिणी, हिडिंबा,उलुपी,चित्रांगदा,सावित्री या सारख्या स्त्रियांनी स्वतःहूनच पुढाकार घेतलेला आहे. भलेही त्यांचे प्रेम एकतर्फी होते तरीसुद्धा त्या काळातल्या सभ्य,आर्यत्वाच्या शिष्टाचाराप्रमाणे त्यांचा विवाह प्रस्ताव स्वीकारलेला आहे. एकतर्फी प्रेमाची हि उदाहरणे सुंदरच आहेत.
 पण प्रेमभावनेचा स्वीकार न केल्यामुळे  शाप देऊन अथवा अन्य शिक्षा देऊन त्या नकाराचा वचपा काढणे हे सुद्धा पुराणांमध्ये  उल्लेखित आहेच. शूर्पणखेचे उदाहरण तर सगळ्यांनाच माहिती आहे. तिने पहिले रामाकडे आणि नंतर लक्ष्मणाकडे प्रेमयाचना केली पण त्यांनी नकार दिल्यावर ती चिडून त्यांच्यावर वार करण्यास येते आहे हे पाहताच रामलक्ष्मणानें तिचे नाक कान कापून टाकले. स्वरक्षणार्थ असे केले असे म्हणू शकतो. पण तरीसुद्धा हि एकप्रकारची शिक्षाच नव्हे का ? या अपमानाचा सूड घेण्यासाठीच तर रावणाने सीताहरण केले. शूर्पणखेला शिक्षा म्हणून दिलेली  हि विद्रुपता कितपत योग्य वाटते ?  त्या ऐवजी अन्य कुठला उपाय नव्हता का ?
 दुसरे उदाहरण गणेश आणि तुलसी यांचे देते. इथे दोघांनीही एकमेकांना शाप दिलेला आहे. तुलसी हि धर्मध्वज राजाची कन्या होती. तपसाधनेच्या तेजाने झळझळणाऱ्या गणेशाला पाहून ती त्याच्या प्रेमात पडली. तिने त्याच्यासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण गणेशाने त्यास नम्रपणे नकार दिला. तिने पुन्हा पुन्हा त्याचे आज़र्व केले. पण गणेशाचा नकार ठाम होता. त्यामुळे चिडून तिने गणेशाला शाप दिला कि " तुला तुझ्या मनाविरुद्ध विवाह करावा लागेल." या  शापाने क्रोधीत होऊन गणेशाने सुद्धा  तिला शाप दिला " तू असुराची पत्नी होशील आणि त्या नंतर एक झुडपे बनून राहशील."
हे ऐकून तुलसीला पश्चाताप झाला. तिने गणेशाची क्षमा मागितली. त्यामुळे गणेशाने उशाप दिला कि विष्णू तुझा उद्धार करेल आणि तू तुळशीचे झाड होऊन पृथ्वीवर राहशील.तुझी पाने त्याला सगळ्यात जास्त प्रिय होतील . पण माझ्या पूजेत तुझी पाने निषिद्ध होतील. "
दैत्यगुरू शुक्राचार्यांनी  मुलगी  देवयानीचे तर संपूर्ण जीवनच प्रेमभंग आणि विश्वासघाताने काळोखून गेलेले आहे. संजीवनी विद्या मिळवण्यासाठी शिष्य बनून आलेल्या बृहस्पतीपुत्र कचावर देवयानी प्रेम करू लागली. कचाने तिला दूर लोटले नाही. फसवणूक करून विद्या प्राप्त करण्याच्या हेतूने आलेल्या कचाला जेव्हा दैत्यांनी मारून जाळून टाकले तेव्हा त्याची राख दारूत मिसळून शुक्राचार्यांनी पिण्यास लावली. मृत कचाला जिवंत करण्यासाठी देवयानीने आपल्या वडिलांना खूप विनंती केली, एव्हढेच नव्हे तर आजन्म अविवाहित राहण्याची धमकी दिली. शुक्राचार्यंनी मुलींच्या प्रेमापायी तिला संजीवनी मंत्र शिकवला. कचाला जिवंत करण्यासाठी त्यांनी मंत्र  म्हणताच त्यांचेच पोट फाडून कच बाहेर आला. शुक्राचार्य गतप्राण पडले होते. कचाने देवयानीला संजीवनी मंत्र म्हणून त्यांना जिवंत करण्यास सांगितले.प्रेमभोळ्या देवयानीने तसे करताच कचाला तो मंत्र समजला. तो त्वरित तिथून निसटला. देवयानी स्तंभित झाली. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा तिने आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार करताच कपटी कच  तिला नकार देत म्हणाला " तुझ्या पित्याच्या पोटातून मी बाहेर आलो याचा अर्थ मी त्यांचा मुलगा झालो. तू माझी बहीण झालीस. आपला विवाह शक्य नाही."
हा विश्वासघात आणि कपटीपणा तिच्यासाठी धक्कादायक होता. तिने त्याला शाप दिला " ज्या विद्येसाठी  तू हे सगळे कपट  कारस्थान केलेस आणि मला फसवले ती विद्या तू कायमची विसरून जाशील. "  आणि याच शापामुळे देवांना कधीच संजीवनी विद्या मिळू शकली नाही.
यावर कचाने सुद्धा देवयानीला शाप दिला कि तुला इच्छित प्राप्त होऊन सुद्धा त्याचे सुख मिळणार नाही. म्हणजेच तू कधीच सुखी होणार नाहीस. आणि झालेही तसेच. ययातीने तिच्यासोबत विवाह केला तरी प्रेम मात्र शर्मिष्ठेवरच केले. तिच्या वाट्याला अवहेलनाच आली.
असे म्हणतात कि प्रेम हे खूपदा दुःखदायीच असते. सफल झाले तर ठीक नाहीतर प्रेमभंगाचे दुःख. आणि त्यातही एकतर्फी प्रेम होणे हेच मुळात एखाद्या शापा सारखे वाटते. आयुष्यच विद्रुप झाल्यासारखे वाटते. पण खरे प्रेम एकतर्फी असले तरीसुद्धा विद्रुपतेवर मात करून सौन्दर्य निर्माण करू शकते.
करण जोहरच्या ए दिल है मुश्किल मधले एक वाक्य सार्थ आहे
 " एकतर्फा प्यार कि ताकत हि कुछ और है, दुसरे रीश्तोकी तरह ये मोहोब्बत दो लोगोमें नहीं बँटती ; बस मेरे हक में रहती है "
प्रेमाचे सौंदर्य असेच असावे, नाही का ?

- पूर्णिमा देशमुख पुरेकर 

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

आंधळं पालकत्व , अज्ञानी पुत्रत्व

                  आंधळं पालकत्व , अज्ञानी  पुत्रत्व 
 इंटरनेटच्या माहिती जाळामध्ये अनेकदा प्रस्थापित संकल्पनांना छेद देण्याऱ्या पोस्ट येतात. विषयसंबंधित तीन पोस्ट मनात ठसल्या.
पहिली पोस्ट होती एका आईच्या "confession " बद्दल. त्यात ती म्हणते कि "आज मी मोकळेपणाने मनातलं खरं खरं सांगते. मुले आता मोठी,जाणती झालेली आहेत. या गोष्टी मी फक्त आई आहे म्हणून करायलाच हव्यात, नव्हे, मला तसेच वाटायला हवे असा जो पूर्वग्रह सगळ्यांच्या मनात आहे तो मला मान्य नाही. या नंतर ती अनेक गोष्टीबद्दल बोलते. उदा. आईच्या खाण्यातील घास मुलाला द्यायलाच हवा, आईने मुलांसाठी त्याग करायलाच हवा, नवऱ्याच्या आधी मुलांना प्राधान्य द्यायला हवे, आईला सगळे माहिती असते, आई म्हणजे देव, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ, आई कधी चुकूच शकत नाही या सारख्या अनेक गोष्टीबद्दल तिने खूप निर्भीडपणे लिहिले. शेवटी ती म्हणाली कि " आई माणूसच असते. आणि चुका करणे, चुका होणे कुठल्याच मनुष्याला चुकले नाही. मला देवपण नको. माणूस म्हणूनच वागवा. नाहीतर मनाविरुद्ध लादलेल्या या देवत्वाच्या ओझ्याखाली मी गुदमरून जाईन."
    या संदर्भात मी माझे स्वतःचेच उदाहरण देते. मला लहान बाळांचे काही करण्याची कधी वेळ आलीच नाही. जेव्हा मी स्वतः आई झाली तेव्हा मला अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. माझ्यासाठी ते नवीनच होते. उलट माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा जास्त सवय होती.कारण त्याने त्याच्या लहान भाऊबहिणींच्या मुलांना सांभाळण्याचे काम केलेले होते. पण तरीसुद्धा स्वतः आईवडील बनल्यानंतर जी एक जबाबदारी येते,एक बंधन येते , त्याने तो सुद्धा दबकूनच गेला होता. मुलांच्या बाबतीत निर्णय घेतांना एक प्रचंड दडपण येते. आपला निर्णय प्रत्येक वेळी योग्यच ठरेल असा दंभ मी तरी पाळत नाही. हा, माझा हेतू चांगला होता असे म्हणू शकते, पण निष्पक्षपणे पाहणाऱ्याला कदाचित ते चुकीचे वाटू शकते. कोणी सांगावे उद्या मुलांनाच आमचे काही चुकले असेही वाटू शकते. मुलांना तसे मला स्पष्ट सांगता यावे, आमच्यात तसा मोकळा संवाद व्हावा असे मात्र निश्चितपणे वाटते. माझ्या आईवडिलांसोबत माझे आणि माझ्या बहिणीचे असेच मोकळे नाते असल्यामुळे वाद असले , मतमतांतरे असली तरीसुद्धा आता समानतेच्या पातळीवर आमचे नाते आहे हे मी अभिमानाने सांगू शकते.
या उलट काही पालक " कुमाता न भवति " या भ्रमात अजूनही जगत आहेत. आम्ही आईवडील आहोत, चुकूच शकत नाही, असे छातीठोकपणे सांगत असतात, आणि आपल्या पालकत्वाच्या ओझ्याखाली मुलांना दडपून टाकतात. मातापित्यांच्या आदर्शत्वाच्या कल्पनेला छेद देणारे अनेक दाखले आपल्या पुराणांमध्ये सापडतात. वडील म्हणून दशरथ ,जनक, धृतराष्ट्र, ययाती, शंतनू  चुकले नाहीत का ? गांधारी तर डोळे असून आंधळी झाली आणि मुलांना डोळसपणे वाढवण्यात अपेशी ठरली. आपल्याच महत्वाकांक्षांपायी मुलांचा बळी देणारे कितीतरी पालकांचे उदाहरणं सापडतात.
दुसरी पोस्ट होती " बधाई हो " सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेली. आश्चर्य म्हणजे ती पोस्ट एका लेखकाने लिहिलेली होती. त्यात त्याने म्हंटले होते कि हा सिनेमा अनेक मुलांना,पुरुषांना आवडला नाही. कारण त्यात आई वडील हे माणूस आहेत, त्यांच्यासुद्धा खाजगी भावना असू शकतात हे नायक जसा मान्य करण्यास तयार नसतो, अजूनही भारतीय समाजातल्या पुरुषांची आणि अनेक स्त्रियांची तशीच मानसिकता आहे.
   मुले,घरदार आणि नोकरी या सगळ्यात नवराबायको इतके बुडून गेले आहेत कि त्यांना एकमेकांसाठी वेळ देणे अशक्य झाले आहे. " माझ्या नवऱ्याची बायको" या सिरीयल मधला नायक म्हणतो कि " माझी मैत्रीण आणि प्रेयसी होती ती संसाराच्या रगाड्यात कुठेतरी हरवून गेली. बायको सुद्धा राहिली नाहीस. कायम तू मुलाची आई,किंवा सून म्हणूनच समोर येतेस. " अर्थात बायको सुद्धा नवऱ्याला हेच म्हणू शकते. अनेक नवरे बायकोला कपडालत्ता,दागदागिने देऊन स्वतःचे नवरा म्हणून कर्तव्य पार पाडल्याचा अविर्भाव मिरवीत असतात. बायकोसोबत बोलायचे म्हणजे  बाहेरच्या आणि घरातल्या कटकटीचा राग काढण्यापुरते तोंड उघडतात. जवळीक फक्त शारीरिक नाही तर संवाद करणे, सोबत राहणे एकमेकांसोबत काही क्षण साजरे करणे हे सुद्धा अभिप्रेत असते. पण तसे होत नाही. बरं जे असे काही करायला जातात त्यांना " काय हे विचित्र चाळे , मुलाबाळांना सोडून कसे काय बाहेर फिरायला जाऊ शकतात " असले टोमणे ऐकावे लागतात.
तिसरी जी पोस्ट होती त्यात एकच वाक्य सगळे काही बोलून गेले,  " विवाहित मुलीच्या संसारात जसे आईने  दखल, लुडबुड करायला नको तसेच विवाहित मुलाच्या  सुद्धा संसारात त्याच्या आईने दखल , लुडबुड करायला नको."
भारतीय संस्कृतीने आईवडिलांना "देवतुल्य " मानले आहे. कारण मनुष्याला या संसारात आणण्यापासून त्याचे पालनपोषण करणे आणि रक्षण करणे, शिक्षण, संस्कार  देणे हे सगळे आईवडीलच तर करतात. प्रसंगी स्वतः उपाशी राहून , कष्ट, हालाअपेक्षा सोसून आपल्या मुलांचे भविष्य मात्र उज्ज्वल करतात. त्यामुळेच मातृदेवोभव, पितृदेवोभव,आचार्यदेवो भव असे बाळकडू पिढ्यानपिढ्या आपल्याला मिळत गेले आहे. आणि ते सत्यच आहे.आपल्या मातापित्यांची सेवा सुश्रुषा करणे हे प्रत्येकच मुलामुलींचे कर्तव्य आहे.त्यांनी केलेल्या प्रेमाचे ऋण कधीच फेडू शकत नाही हे देखील निर्विवाद सत्य आहे.
पण या सगळ्यात आपण आपले आई वडील हे सगळ्यात प्रथम माणूस आहेत हेच मुळात विसरून जातो.आणि त्याचमुळे मुलांच्या पलीकडे सुद्धा काही जग आहे हे मुलांना तर लक्षात येतच नाही पण बहुतेक आईवडील सुद्धा विसरून जातात. आणि मग एक विचित्र चक्रात सगळे अडकून जातात. पहिले मुलांना ७ ते ९ वर्षाच्या वयात गुरुकुलात पाठवून द्यायचे. विद्याभ्यास संपवून मुले गृहस्थश्रमात प्रवेश करायचे. लग्नानंतर मुलाला  मुलगा झाल्यानंतर आई वडील "त्यांच्या" गृहस्थाश्रमातून निवृत्ती घेऊन संन्यासाश्रम स्वीकारायचे. यात अपेक्षा अशी होती कि पुढ्च्या पिढीच्या  हातात सूत्रे सोपवून  मनुष्याने समाजाचे ऋण फेडण्यासाठी वेळ द्यावा. जेणेकरून मनुष्य सांसारिक मोहापासून दूर होईल आणि यामुळे दोन पिढ्यांमधील संघर्ष सुद्धा टाळला जातो. पण कालानुरूप हे धर्माचरण लुप्त झाले. आणि घराघरांमध्ये भांडे वाजायला लागली.
एका समाजशास्त्रज्ञाचे मत आहे कि ९० टक्के कौटुंबिक कलह हे मुलामुलींच्या आईवडिलांमुळेच निर्माण होतात. पुरुषप्रधान व्यवस्था जरी ह्यासाठी फक्त "सासूसुनेचा वाद " यालाच जबाबदार धरत असली तरी अनेक संघर्ष हे मुलगा आणि वडील यांच्यात आपले वर्चस्व, सत्ता,कर्तृत्व स्थापित करण्याच्या सुप्त महत्वाकांक्षा यामुळे सुद्धा होतात. प्रत्येक वेळी मुलाने वेगळे घर केले याचा अर्थ सासूसुनेचें पटत नव्हते असा होत नाही. याचे उत्तम चित्रण रेखा,अनुपम खेर अभिनित "संसार" या सिनेमा मध्ये केल्या गेले आहे. फक्त पितापुत्रांमधल्या या संघर्षाकडे समाज कानाडोळा करतो. कित्येक पालक आम्ही मोठे म्हणून आमचाच अनुभव कामाचा आहे, आमचाच सल्ला घ्यायला हवा या अट्टाहासापायी घरात आकांड तांडव करतात. आधीची पिढी जरी अनुभवी असली तरी पुढच्या पिढीतल्या समस्यांच्या वेळी तोच अनुभव कामी पडेल असे जरुरी तर नाही ना ? नवीन काळाची नवीन समस्या असेल तर कधी कधी उपाय सुद्धा नवीनच लागतो.
  बापाचा जोडा मुलाला होऊ लागला कि त्याला मित्रत्वाच्या नात्याने राहावे असे संस्कृत सुभाषित आहे. आईवडिलांना एकेरी हाक मारा अथवा अहोजाहो करा, डोळस पालक आणि सुज्ञ मुलेच या आद्य नात्याला सुंदर रूप देऊ शकतात.

-  पूर्णिमा देशमुख पुरेकर 

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

घरासाठी घर घर

                                       घरासाठी घर घर 
" तुम्ही सरळ फ्लॅटच घेऊन टाका. डोक्याला तापच नाही. " एकाची सूचना.
" फ्लॅट म्हणजे काय हो ? चाळीतल्या खुराड्यांचे नवीन नाव आहे, झाले. आपल्या मर्जीने ऐसपैस बांधलेले घर कधीपण चांगले." दुसऱ्याचा सल्ला.
" गावाच्या थोडे बाहेर असले ना कि जरा शांत निवांत वाटते हो. नाहीतर गावात तर नुसता गजबज , गोंगाट असतो."
" घर घ्यायचे ना तर कधी पण शाळा,ऑफिस,बाजार यांच्या जवळपासच घ्यावे. घर दूर असलं ना कि येण्याजाण्यातच वेळ,पेट्रोल आणि एनर्जी वाया जाते. आणि हाडं खिळखिळी होतात ते वेगळेच. "
" रेडी पझेशन वाला फ्लॅट घ्या. म्हणजे भाडे देणे वाचते आणि रंगरंगोटी,फर्निचर यांचा पसारा आवरायची झंझटच नाही. शिवाय  ताबडतोब राहता येते."
" अंडर कन्स्ट्रेशन फ्लॅट घायचा बरं का ! म्हणजे आपल्याला जे काय बदल करायचे ते करता येतात, शिवाय ते स्वस्तही पडते.टॅक्स ची बचतही होते ना. "
" आजकाल मस्त जिम , स्विमिंग पूल आणि काय काय सोयी असलेल्या कॉलनी असतात. मस्त आलिशान फ्लॅट घ्या. स्टेटस मेंटेन करावे लागते."
" साधासा आपल्या बरोबरीचा शेजार असलेले घर घ्यावे. फार श्रीमंत शेजार असला कि नाकापेक्षा मोती जड अशी स्थिती होते, आणि मुलांवर वाईट परिणाम होतो ते वेगळेच. कोणी बोलायला नाही, अडीअडचणीला कामाला  येऊ शकणार नाही असा शेजार काय कामाचा ?"
"मस्तपैकी मोठे, आलिशान, ३-४ bhk घर घे रे !  पै पाहुणे आले कि गैरसोय नको. आजकाल प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम हवी असते, प्रायव्हसी हवी असते ना.आपल्याकडे कोणी खाली झोपावे लागले असे टोमणे नाही ऐकायचे बाई मला."
"छोटेसे पण पुरेसेच घर बरे असते. दिवसेंदिवस मोठे घर सांभाळणे कठीण जाते गं. साफसफाई करणे सुद्धा जमत नाही. कामाला मिळत नाही. आणि आजकाल किती पै पाहुणे येतात? सगळे २ दिवस येतात आणि जातात. adjustment करावीच लागते. खाली गाद्या टाकून गप्पा मारण्यात सुद्धा मजा असते."
मागच्या पिढीपर्यंत तरी आपले घर असावे असे स्वप्न प्रत्येक भारतीय बघत होता. उपवर मुलीचे रंग,रूप आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जशी बघतात, तसेच मुलाची नोकरी,पगार आणि घर हा योग्यतेचा मापदंड. म्हणूनच "असावे आपुले घरकुल छान" असे स्वप्न प्रत्येक भारतीय बघायचा.
एक घर घ्यायचे त्यासाठी इतक्या सल्ला मसलती होतात कि डोके भणभणायला लागते. कष्ट करून, घाम गाळून पैपै जमवून घर बनवायचे, आणि  एवढे करून जेव्हा घर बनते  तेव्हा त्यात  काही ना काही खुसपट काढल्याच जातात. घर घेण्याचे स्वप्न तर पूर्ण होते. पण स्वप्नपूर्तीचा आनंद मात्र झाकोळून जातो. तसेही म्हणतातच ना " स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा" !
एकीकडे नवीन जागी जम बसण्याची कसरत  तर दुसरीकडे कर्जाचे हफ्ते आणि घरखर्च यांचा ताळमेळ जमवण्याची खटपट. डोक्याचा भुगा होतो. असे वाटते उगाच घर घेतले. आधी जसे होतो तसेच बरे होते.
घर घेण्याच्या बाबतीतली दुसरी बाजू सुद्धा आता लक्षात घ्यायला हवी.
 काही दिवसांपूर्वी पेपर मध्ये लेख आला कि मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याचे प्रमाण फार कमी झाल्यामुळे रिअल इस्टेट बाजाराला फटका बसतो आहे आणि  आर्थिक मंदी साठी हे सुद्धा एक मोठे कारण आहे. असे का झाले यामागची करणे सांगतांना लेखकाने खालील करणे सांगितली.
काही वर्षांपूर्वी संगणक क्रांती झाल्यानंतर पंचविशीतली पोरं लाखोंच्या पगाराची धनी झाली. लग्न झालेले नसल्यामुळे संसाराची भुणभुण नसणे, गावाकडे आई वडील अजूनही कमावते असलेले आणि तिथे वाडवडिलांची घर असल्यामुळे ह्या मुलांनी गुंतवणूक म्हणून घर घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे बाजार भाव वाढला. पण खरे प्रश्न नंतर  निर्माण झाले. ह्या मुलांमध्ये नोकरी बदलून दुसरीकडे जाण्याचा कल वाढला. मग ते घर भाड्याने द्या किंवा विकून दुसरीकडे  घ्या अशी स्थिती आली. आणि देशात असले तर एक वेळ  ठीक आहे, पण विदेशात गेल्यानंतर प्रॉपर्टी सांभाळणे कठीण जाऊ लागले. चांगला भाडेकरी मिळाला तर ठीक नाहीतर डोकेदुखी आणि घर रिकामेच ठेवले तर "dead investment " झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागू लागले.
आईवडील मुलाकडे आपले घर आणि देश सोडून राहायला तयार नाहीत, आणि देशात चांगली नोकरी मिळणे कठीण झाल्यामुळे आहे तिथेच राहण्याचा नाईलाजाने घेतलेले निर्णय यात एक मोठा वर्ग फसला.आणि पुन्हा मुलगा तर पैसे कमावण्यासाठी आईवडिलांना एकटे सोडून चालला गेला असे टोमणे आणि टोचणी सहन करावी लागते ते वेगळेच. त्यात भर म्हणजे विदेशी नागरिकत्व घेतल्यानंतर स्वतःचे घर आणि वाडवडिलांची घर यांची विक्री करणे एक खूप मोठी कायदेशीर गुंतागुंत बनली. आणि मग पुढच्यास ठेच मागच्यास शहाणपण या उक्तीनुसार स्वतःचे घर घेऊन डोकेदुखी विकत घेणे नको असा विचार मुलंमुली करू लागली. त्या पेक्षा आहे  तिथे भाड्याने घर घ्यावे, जितके दिवस राहावे लागतील, राहावे आणि नोकरी  बदलली कि पुन्हा दुसरीकडे बिऱ्हाड  घेऊन जावे हे सोयीस्कर अशी मानसिकता बनली.
ज्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी मोठी घर बांधली होती किंवा मोठे फ्लॅट्स घेतले होते ते विकणे सुद्धा कठीण झालेले आहे. "हम दो,हमारा एक" असे छोटेखानी कुटुंब १-२ bhk  घरांना प्राथमिकता देतात. आणि ज्यांचे घर आहे  त्यांची मुले नोकरी व्यवसायानिमित्त दुसरीकडे गेलेली आहेत आणि मुलांकडे राहायला जावे असे ठरवले तर  "माझे" घर सोडून "मुलासुनेच्या " घरात राहायला जाण्यास मनाची तयारी नसते, आणि तिथे जमले नाही तर  आपले "हक्काचे" घर असलेले बरे असा विचार करून ते घर विकणे जमत नाही. बरे तिथेच राहायचे असे ठरवले तर वय झाल्यामुळे एव्हढे मोठे घर सांभाळणे कठीण होऊन बसते.दुखले खुपले तर करायला कोणी नाही. नोकरी सोडून मुलं कितीदा येणार ? बरे पिढीजात व्यवसाय सुद्धा आता पिढीजात राहिले नाहीत. त्यांना सुद्धा घराचे  आणि व्यवसायाचे काय करावे हा प्रश्न भेडसावतो.
धरवतही नाही आणि सोडवतही नाही अशी त्रिशंकू अवस्था होऊन बसली आहे. घर बनवण्यात लागलेली घरघर आता घराचे काय करायचे या घरघरीत बदलून गेलेली आहे.

- पूर्णिमा देशमुख पुरेकर

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

शिष्टाचार, चालीरीती , व्यवहार आणि सोय

                          शिष्टाचार, चालीरीती , व्यवहार आणि सोय 
" सिंहासनी श्रीराघव बसता , "वामांगी " तू बसशील सीता,
जरा गर्विता ; जरा लज्जिता, राजभूषणा भूषविल हि,कमनीय तंव आकृती. "
 ग.दि.मा च्या गीतरामायणातल्या एका गीतातली ओळ ऐकली आणि शिष्टचार, चालीरीती, तथाकथित संस्कारी वागणे यांचा दुसऱ्या बाजूने विचार करावासा वाटला.
खरेतर आपल्या धर्माने पत्नीला "वामांगी " असे संबोधून तिला राजरोसपणे पतीच्या बाजूला बसण्याचा मान आणि अधिकार दिलेला आहे. पूजेच्या वेळी पत्नी नवऱ्याच्या हाताला हात लावून हा अधिकार बजावते. पण तीच पत्नी जर इतर वेळी मोठ्यांच्या उपस्थितीत नवऱ्याचा बाजूला बसली तर कोण गहजब होतो!  कितीतरी घरांमध्ये तर अजूनही नवरा,सासरा आणि इतर पुरुष नातेवाईकांच्या बाजूने बसणे निषिद्ध मानल्या जाते. पुरुषांच्या आधी जेवणे असंस्कारी समजल्या जाते. जेवण तर दूरचीच गोष्ट , साधे वर्तमानपत्र पहिले पुरुषानेच वाचले पाहिजे असे विचित्र नियम असतात.
अश्यावेळी नोकरी करणाऱ्या , आजार असलेल्या स्त्रियांचे खूप हाल होतात. तसेही आजकाल पंचविशी पासूनच काही ना काही शारीरिक त्रास असतात, त्यात लग्नानंतर या असल्या चालीरीतींमुळे अजून भर पडते.
माझ्या माहितीतल्या एका finance कंपनी मध्ये काम करणाऱ्या मुलीवर अशीच कुचंबणा  होऊन वरिष्ठांसमोर मान खाली घालण्याची वेळ आली. कारण काय तर आदल्या दिवशी रात्री जाहीर केलेले कर सवलतींचे बदलेले नियम तिला सकाळी पेपर न वाचल्यामुळे माहितीच नव्हते. आणि तेव्हा इंटरनेट नव्हता. तिचे पुरुष सहकारी एकमेकांना कोपरखळ्या मारीत तिची टिंगल करत होते आणि तिच्या सोबतच्या इतर स्त्रिया आपल्यावर हि वेळ येऊ नये म्हणून काय करावे लागेल या चिंतेत पडल्या.
बरे या चालीरीती फक्त स्त्रियांसाठीच त्रासदायक नाहीत तर पुरुषांसाठी सुद्धा तापदायक ठरतात. काही प्रसंग उदाहरणार्थ देते.
प्रसंग १ - नवरा , बायको आणि ३ पाहुणे कार मधून जाणार होते. २-३ तासांचा प्रवास होता.त्यातल्या ३ बायका स्थूल आणि पुरुष रोड होते.पुरुष पाहुणा स्वतःचे महत्व दाखवण्यासाठी आधीच समोरच्या सीटवर बसून गेला होता.आपला संस्कार दाखवण्यासाठी बायको आणि अन्य दोघी मागे अतिशय दाटीवाटीने  बसल्या. प्रवास संपेपर्यंत तिघींपैकी कुणाचा हात आखडून गेला, कुणाचा पाय ! नवऱ्याला त्यांची गैरसोय दिसत होती पण बोलणार कसे ?
प्रसंग २ - नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतांनाच सूनबाईला डॉक्टर कडे  नेण्याची वेळ आली. सासूबाई स्वतःच आजारी. आता ऑटो मध्ये सुनबाई सासऱ्याच्या बाजूला एकाच सीट वर कश्या बसणार या चर्चेतच १-२ तास वेळ गेला. शेवटी शेजारच्या काकू सोबत आल्या,त्या मध्ये बसल्या आणि पेच सोडवला.
प्रसंग ३ - मी नवऱ्याच्याच बाजूला बसणार या हट्टापायी बायको समोरच्या सीटवर बसल्यामुळे , उंच असलेले  मामेसासरेबुवा बिचारे पाय आखडून मागच्या सीटवर बसले.
     शिष्टाचार, संस्कार यापायी सोयीचा बट्ट्याबोळ वाजला. भारतीय असो किंवा पाश्च्यात्य शिष्टाचार असो दुसऱ्याला त्रासदायक होणारे, कुणाची गैरसोय करणाऱ्या रीती पाळण्यात कुठली " सभ्यता " दिसून पडते ?

  पूर्णिमा देशमुख पुरेकर -       

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

सण , उत्सव, कुलाचार आणि डे

                                          सण , उत्सव, कुलाचार आणि डे 
हिंदी सिनेमा मधला St. Valentine's Day पडद्यावरून उतरून घराघरांमध्ये शिरला आणि  तथाकथित हिंदू धर्म-संस्कृती रक्षकांची झोपच उडाली. त्यात भर म्हणजे Mother's Day, Father's Day , Son's  Day ,Daughter's Day या सारखे आधुनिक festival साजरे करणे सुरु झाले. भारतीय सण, उत्सव आणि परंपरा यांना आता कोणी वाली नाही, आता या उच्च चालीरीती बंदच पडतील आणि धर्म बुडेल अशी ओरड सुरु झाली.
भारतीय तरुणाईने आपल्या परंपरांकडे पाठ वळवली का ? पाश्च्यात्य सणांना अंगिकारायला सुरुवात का केली ? आणि असे असेल तर का याबद्दल विचार करणे आवश्यक वाटते. दुसऱ्या बाजूने विचार करावासा वाटतो.
Day साजरे करणारे फक्त दारू मांसमटन खाण्यासाठी , स्वैराचार करण्यासाठी या सगळ्यांकडे आकर्षित झालेत आणि उपास तापास , नियम पाळणे त्यांना नको आहे, असा जो आरोप होतो तो काही खरा असला तरी माझ्या पाह्ण्यातले असे अनेक लोक आहेत जे अभक्ष्य भक्षण करत नाहीत , डे साजरे करत नाहीत पण तरी सणवारांबद्दल त्यांच्या मनात अनास्था निर्माण झालेली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे जे  सण,उत्सव सध्या प्रचलित आहेत ते वेदकाळात उल्लेखित नाहीत. वेदांमध्ये वरुण ,इंद्र आणि इतर काही देवांची पूजा करणे,यज्ञ याग आणि बलि देऊन नैवेद्य अर्पण करणे एव्हढेच वर्णन आहेत.
जे सणवार , परंपरा आपण साजरे करतो ते काही विशिष्ट शुभ,अशुभ घटना घडल्या आणि त्या नंतर  प्रथा म्हणून समाजमान्य झाल्या. उदा. देवीने असुरांचा वध केल्यानंतर देवीचे नवरात्र, रामराज्याभिषेकानंतर दसरा, होलिका दहन, नरकासुर वधानंतर नरक चतुर्दशी , बली प्रतिपदा या दिवसांना महत्व प्राप्त झाले. जसे आजकाल जयंती आणि पुण्यतिथी यांना महत्व आलेले आहे तसेच. आपण सुद्धा "कारगिल दिवस" साजरा करायला लागलो आहेच ना ?
    पूजेचे जे स्वरूप सध्या प्रचलित आहे ते पुराण काळानंतर आदि शंकराचार्य आणि समकालीन धर्मज्ञ यांच्या कार्यामुळे प्राप्त झाले. अनेक प्रकारच्या उपासना, दर्शन शास्त्र तत्व, मूर्तिपूजक, मूर्तिपूजा न मानणारे , आस्तिक , नास्तिक ,द्वैतवादी , अद्वैतवादी ,शैव,वैष्णव शाक्त , गणपती संप्रदाय , इतर संप्रदाय  या सारख्या सगळ्यांना हिंदू धर्माने सामावून तर घेतलेच आहे पण त्यांच्या विचारांना,आचारांना मान्यता दिलेली आहे.
अनेक सण हे ऋतुबदल आणि त्या ऋतूमध्ये पाळावी लागणारी आहार विहार नियमावली आणि निसर्गाचा समतोल  यांची सांगड घालणारे आहे. उदा. नागपंचमी. पावसाळ्याची सुरुवात होताच वाफवलेले पदार्थ खाणे, हलका,पचायला सोपा आहार हवा म्हणून अनेक घरांमध्ये या दिवशी वाफवलेले पदार्थ नैवेद्याला असतात. त्यातच शेतीप्रधान देशात सापाचे महत्व स्मरणात हवे यासाठी त्यांचा सन्मान केल्या जातो. पण फक्त एकच दिवस वाफवलेले पदार्थ कुरकुर करत देवाचे आहे म्हणून नाईलाजाने खाल्ल्या जातात. काही घरी तर पुरणावरणाचा , तळण केलेला, पचायला अतिशय जड असा स्वयंपाक असतो. त्या सणाचा उद्देश फोल ठरला. असे कितीतरी दाखले देता येतात.
पहिले शेतीप्रधान समाज व्यवस्था होती. पण आता तसे नाही राहिले. देशाची आर्थिक आणि सामाजिक घडी हि फक्त शेतीपुरतीच मर्यादित न राहता उद्योग,व्यवसाय,परकीय गुंतवणूक, ग्राहकपेठ या सारख्या अनेक घटकांवर अवलंवून असते. गावातला समाज सुद्धा बाराबलुतेदार यांच्या परिघाच्या बाहेर विस्तारल्या गेला आहे.
शहरात तर वेगळीच परिस्थिती आहे. नोकरी व्यवसाय आणि त्यामागे होणाऱ्या फरफटीमध्ये माणूस अडकला आहे. एकीकडे आधीच्या पिढीतल्या लोकांचा  कुलाचार, परंपरा " जश्याच्या तश्श्याच " पाळायला हव्या हा अट्टाहास आणि दुसरीकडे नोकरी व्यवसायाचा धर्म  या मध्ये आताचा  माणूस त्रिशंकू सारखा लटकलेला आहे.त्यामागे त्या  सणांचा राग नाही. तर त्या सणांची प्रासंगिकता, कालोचितता  कुठेतरी कमी झालेली दिसून येते.वेळेचा अभाव हे कारण तर सगळ्यात मोठे आहेच. उदा.नवरात्रामध्ये अनेक घरी अखंड दीप प्रज्वलित ठेवतात. आता घरात इनमीन चार माणसे , नवरा बायको नोकरीसाठी आणि मुले शाळेत. असे असतांना त्या दिव्याची देखरेख कोण पाहणार ? हि परंपरा कशी पाळणार ? हा प्रश्न येतो. पूर्वी इलेक्ट्रिसिटी नव्हती. पण आता तसे नाही. नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवण्यासाठी इतके तेल वापरणे कितपत संयुक्तिक वाटते ?
आता तर इलेक्ट्रिसिटी सुद्धा गरज असेल तेव्हढीच वापरावी असे कानीकपाळी ओरडून सांगतात. इथे मी नम्रपणे एक सुचवू इच्छिते कि यज्ञ,होमहवन यामुळे वातावरण शुद्ध होते हे तर सिद्ध सत्य आहे. पण इतके दिवे लावण्याने काय साध्य होते ? देवळ्यांमध्ये नावाने  दिवा दिल्या जातो. तिथे मोठ्यामोठ्या हॉल मध्ये  दिवे लावतात. कितीतरी लिटर तेल वापरल्या जाते. त्या पेक्षा एकच दिवा सगळ्यांच्या नावाचा उच्चार करून लावला तर ? 
दुसरे कारण म्हणजे प्रांतीय न राहता जागतिक झालेल्या खाद्यसंस्कृतीने लोकांची "सणावारी हाच नैवेद्य करायला हवा" हि मानसिकता बदलते आहे. आणि त्यात काही वावगे आहे असे नाही.आयुर्वेदानुसार  जे ऋतुचर्येचे नियम आहेत त्यांचे पालन आणि तामसिक पदार्थ यांचा निषेध  करायला हवा असे वाटते. मद्यपान आणि मांसाहार हा भारतात तरी करूच नये. त्याला माझा विरोधच आहे.
आत्ताची तरुणाई कुठल्याही गोष्टीमागचे  "logic " काय आहे हे विचारते. ते लॉजिक सांगता यायला हवे.
आता Day बद्दल. भारतीय संस्कृतीने माता पिता आणि गुरु यांचा गौरव करायला सांगितलाच आहे. मग एक दिवस जर आपल्या आई वडिलांच्या आवडीचे करण्यात साजरा केला तर वाईट काय आहे ? मुलांचे कौतुक करण्यासाठी एक दिवस वेगळा ठेवला तर काय चूक ? गुढी पाडवा तर साजरा करायलाच हवा पण व्यवहारात जे calender आपण पाळतो आहे त्याचा पहिला दिवस तामसिक आहार विहार ना करता भारतीय संस्कृतीला साजेसा बदल करून साजरा करण्यात गैर काय ?  राहता राहिला या सगळ्याला सुरुवात करणारा Valentine डे. ज्या संस्कृतीमध्ये वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा गौरविले आहे, रती - मदन यांना देवत्व दिलेले आहे तिथे नैतिक रित्या समाज मान्य पद्धतीने प्रेम प्रकट केले तर काय बिघडते ? कुठल्याही विकृतींना थारा द्यायचा नाही, ते चुकीचेच आहे. पण आपल्या धर्माने सगळ्या नात्यांमध्ये पतिपत्नीच्या नात्याला सर्वोच्च स्थान दिले आहे. पारंपरिक भारतीय पुरुष आई वडील आणि बहीणभावाबद्दल तर भरभरून प्रेम दाखवतो पण पत्नीबद्दल मात्र मौन पाळतो. पत्नी वर विनोद करण्यात पुढाकार घेतो. पण तिचा सन्मान,कौतुक करण्यात मात्र कुचराई करतो. प्रेमाचे विकृत आणि सामाजिक प्रदर्शन न करता तुम्ही तो दिवस साजरा केला तर काय वाईट ?
 सण आणि उत्सव यांच्या ज्या काही परंपरा, कुलाचार कालबाह्य वाटत आहेत, त्यांना सोडून द्यायला हवे. लवचिक असलेल्या हिंदू धर्माने विचारमंथन करून  कालानुरूप बदल करावा अशीच अपेक्षा आहे. तरच उत्सवातील "उत्साह " टिकून राहील.
-पूर्णिमा देशमुख पुरेकर