शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

घरासाठी घर घर

                                       घरासाठी घर घर 
" तुम्ही सरळ फ्लॅटच घेऊन टाका. डोक्याला तापच नाही. " एकाची सूचना.
" फ्लॅट म्हणजे काय हो ? चाळीतल्या खुराड्यांचे नवीन नाव आहे, झाले. आपल्या मर्जीने ऐसपैस बांधलेले घर कधीपण चांगले." दुसऱ्याचा सल्ला.
" गावाच्या थोडे बाहेर असले ना कि जरा शांत निवांत वाटते हो. नाहीतर गावात तर नुसता गजबज , गोंगाट असतो."
" घर घ्यायचे ना तर कधी पण शाळा,ऑफिस,बाजार यांच्या जवळपासच घ्यावे. घर दूर असलं ना कि येण्याजाण्यातच वेळ,पेट्रोल आणि एनर्जी वाया जाते. आणि हाडं खिळखिळी होतात ते वेगळेच. "
" रेडी पझेशन वाला फ्लॅट घ्या. म्हणजे भाडे देणे वाचते आणि रंगरंगोटी,फर्निचर यांचा पसारा आवरायची झंझटच नाही. शिवाय  ताबडतोब राहता येते."
" अंडर कन्स्ट्रेशन फ्लॅट घायचा बरं का ! म्हणजे आपल्याला जे काय बदल करायचे ते करता येतात, शिवाय ते स्वस्तही पडते.टॅक्स ची बचतही होते ना. "
" आजकाल मस्त जिम , स्विमिंग पूल आणि काय काय सोयी असलेल्या कॉलनी असतात. मस्त आलिशान फ्लॅट घ्या. स्टेटस मेंटेन करावे लागते."
" साधासा आपल्या बरोबरीचा शेजार असलेले घर घ्यावे. फार श्रीमंत शेजार असला कि नाकापेक्षा मोती जड अशी स्थिती होते, आणि मुलांवर वाईट परिणाम होतो ते वेगळेच. कोणी बोलायला नाही, अडीअडचणीला कामाला  येऊ शकणार नाही असा शेजार काय कामाचा ?"
"मस्तपैकी मोठे, आलिशान, ३-४ bhk घर घे रे !  पै पाहुणे आले कि गैरसोय नको. आजकाल प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम हवी असते, प्रायव्हसी हवी असते ना.आपल्याकडे कोणी खाली झोपावे लागले असे टोमणे नाही ऐकायचे बाई मला."
"छोटेसे पण पुरेसेच घर बरे असते. दिवसेंदिवस मोठे घर सांभाळणे कठीण जाते गं. साफसफाई करणे सुद्धा जमत नाही. कामाला मिळत नाही. आणि आजकाल किती पै पाहुणे येतात? सगळे २ दिवस येतात आणि जातात. adjustment करावीच लागते. खाली गाद्या टाकून गप्पा मारण्यात सुद्धा मजा असते."
मागच्या पिढीपर्यंत तरी आपले घर असावे असे स्वप्न प्रत्येक भारतीय बघत होता. उपवर मुलीचे रंग,रूप आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जशी बघतात, तसेच मुलाची नोकरी,पगार आणि घर हा योग्यतेचा मापदंड. म्हणूनच "असावे आपुले घरकुल छान" असे स्वप्न प्रत्येक भारतीय बघायचा.
एक घर घ्यायचे त्यासाठी इतक्या सल्ला मसलती होतात कि डोके भणभणायला लागते. कष्ट करून, घाम गाळून पैपै जमवून घर बनवायचे, आणि  एवढे करून जेव्हा घर बनते  तेव्हा त्यात  काही ना काही खुसपट काढल्याच जातात. घर घेण्याचे स्वप्न तर पूर्ण होते. पण स्वप्नपूर्तीचा आनंद मात्र झाकोळून जातो. तसेही म्हणतातच ना " स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा" !
एकीकडे नवीन जागी जम बसण्याची कसरत  तर दुसरीकडे कर्जाचे हफ्ते आणि घरखर्च यांचा ताळमेळ जमवण्याची खटपट. डोक्याचा भुगा होतो. असे वाटते उगाच घर घेतले. आधी जसे होतो तसेच बरे होते.
घर घेण्याच्या बाबतीतली दुसरी बाजू सुद्धा आता लक्षात घ्यायला हवी.
 काही दिवसांपूर्वी पेपर मध्ये लेख आला कि मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याचे प्रमाण फार कमी झाल्यामुळे रिअल इस्टेट बाजाराला फटका बसतो आहे आणि  आर्थिक मंदी साठी हे सुद्धा एक मोठे कारण आहे. असे का झाले यामागची करणे सांगतांना लेखकाने खालील करणे सांगितली.
काही वर्षांपूर्वी संगणक क्रांती झाल्यानंतर पंचविशीतली पोरं लाखोंच्या पगाराची धनी झाली. लग्न झालेले नसल्यामुळे संसाराची भुणभुण नसणे, गावाकडे आई वडील अजूनही कमावते असलेले आणि तिथे वाडवडिलांची घर असल्यामुळे ह्या मुलांनी गुंतवणूक म्हणून घर घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे बाजार भाव वाढला. पण खरे प्रश्न नंतर  निर्माण झाले. ह्या मुलांमध्ये नोकरी बदलून दुसरीकडे जाण्याचा कल वाढला. मग ते घर भाड्याने द्या किंवा विकून दुसरीकडे  घ्या अशी स्थिती आली. आणि देशात असले तर एक वेळ  ठीक आहे, पण विदेशात गेल्यानंतर प्रॉपर्टी सांभाळणे कठीण जाऊ लागले. चांगला भाडेकरी मिळाला तर ठीक नाहीतर डोकेदुखी आणि घर रिकामेच ठेवले तर "dead investment " झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागू लागले.
आईवडील मुलाकडे आपले घर आणि देश सोडून राहायला तयार नाहीत, आणि देशात चांगली नोकरी मिळणे कठीण झाल्यामुळे आहे तिथेच राहण्याचा नाईलाजाने घेतलेले निर्णय यात एक मोठा वर्ग फसला.आणि पुन्हा मुलगा तर पैसे कमावण्यासाठी आईवडिलांना एकटे सोडून चालला गेला असे टोमणे आणि टोचणी सहन करावी लागते ते वेगळेच. त्यात भर म्हणजे विदेशी नागरिकत्व घेतल्यानंतर स्वतःचे घर आणि वाडवडिलांची घर यांची विक्री करणे एक खूप मोठी कायदेशीर गुंतागुंत बनली. आणि मग पुढच्यास ठेच मागच्यास शहाणपण या उक्तीनुसार स्वतःचे घर घेऊन डोकेदुखी विकत घेणे नको असा विचार मुलंमुली करू लागली. त्या पेक्षा आहे  तिथे भाड्याने घर घ्यावे, जितके दिवस राहावे लागतील, राहावे आणि नोकरी  बदलली कि पुन्हा दुसरीकडे बिऱ्हाड  घेऊन जावे हे सोयीस्कर अशी मानसिकता बनली.
ज्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी मोठी घर बांधली होती किंवा मोठे फ्लॅट्स घेतले होते ते विकणे सुद्धा कठीण झालेले आहे. "हम दो,हमारा एक" असे छोटेखानी कुटुंब १-२ bhk  घरांना प्राथमिकता देतात. आणि ज्यांचे घर आहे  त्यांची मुले नोकरी व्यवसायानिमित्त दुसरीकडे गेलेली आहेत आणि मुलांकडे राहायला जावे असे ठरवले तर  "माझे" घर सोडून "मुलासुनेच्या " घरात राहायला जाण्यास मनाची तयारी नसते, आणि तिथे जमले नाही तर  आपले "हक्काचे" घर असलेले बरे असा विचार करून ते घर विकणे जमत नाही. बरे तिथेच राहायचे असे ठरवले तर वय झाल्यामुळे एव्हढे मोठे घर सांभाळणे कठीण होऊन बसते.दुखले खुपले तर करायला कोणी नाही. नोकरी सोडून मुलं कितीदा येणार ? बरे पिढीजात व्यवसाय सुद्धा आता पिढीजात राहिले नाहीत. त्यांना सुद्धा घराचे  आणि व्यवसायाचे काय करावे हा प्रश्न भेडसावतो.
धरवतही नाही आणि सोडवतही नाही अशी त्रिशंकू अवस्था होऊन बसली आहे. घर बनवण्यात लागलेली घरघर आता घराचे काय करायचे या घरघरीत बदलून गेलेली आहे.

- पूर्णिमा देशमुख पुरेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा