दिवाळीची चाहूल लागताच घराघरातून काही ठराविक संवाद ऐकू येऊ लागतात. पुरुष आणि स्त्रिया दोन वेगवेळ्या चढाओढी मध्ये गर्क असतात. पुरुष मंडळी एकीकडे यंदाची दिवाळी आपले दिवाळे कसे काढणार यावर चर्चा करतात तर दुसरीकडे आपल्या कमाईची बढाई मारतात.
" अरे यावेळी तर मी xxxx ( महागड्या) दुकानातून कपडे घेतले. दिवाळी आहे यार, एव्हढा खर्च तर करूच शकतो."
" मी तर नवीन मोबाइल घेऊन दिला बायकोला/ मुलाला/आईवडिलांना. काय जुनाच वापरायचा ? "
आणि बायकांमध्ये दिवाळीच्या फराळाचा सुग्रणपणा दाखवण्याची चढाओढ सुरु होते.
" आमच्याकडे तर यांना माझ्याच हातचा फराळ लागतो. आणि मी बाई सगळे काही करते. लाडू, अनारसे, चकली,चिवडा, करंज्या आणि काय काय. शेवटी दिवाळी काय एकदाच तर येते वर्षातून ?" ( बाकी सण काय तीन चारदा येतात का ? )
" आमच्याकडे तेच ते टिपिकल पदार्थ नाही बाई आवडत.आजकाल तर काय लाडू चिवडा वर्षभर फस्त करणे सुरूच असते. आणि देवाला सुद्धा काही वेगळे नको का ? मी तर दरवर्षी नवीन रेसिपी करते. "
आदल्या पिढीतल्या बायका आपण भाजणी कशी बनवतो, उंडी कशी चांगली होते, लाडू कसा करतो यावर आपापले मत मांडायच्या आणि मग दुसरीने त्यात काहीतरी खोच काढायची आणि आपण कसे भाजणी -उंडी expert आहोत हे दाखवण्यासाठी एकमेकींवर कुरघोडी करायच्या.
आताच्या पिढीत कोण घरीच सगळे काही बनवते आणि कोण बाजारातून विकत आणते या वरून टीकाटिप्पणी सुरु असते.
" निदान एक तरी दिवस स्वतः काही घरी बनवावे, वर्षभर तर विकताचेच खात असतात. काय बाई आहे, काहीच करत नाही."
" वर्षभर तर राब राब राबतो , निदान दिवाळीत बाकीच्या कामाच्या रगाड्यात एखाद्या गृहउद्योगातून फराळाच्या वस्तू आणल्या तर काय वाईट ? त्यांची सुद्धा कमाई होते आणि आपला हातभार लागतो."
कपडे , घरातल्या वस्तू, रंगरंगोटी, सजावट , फराळ, पाहुणचार, भेटवस्तू सगळ्या सगळ्या मध्ये चढाओढ सुरु असते. कधी कधी चढाओढ नसते पण दिखावा सुद्धा असतोच. मनात नसून सुद्धा, परवडत नसतांना सुद्धा लोक काय म्हणतील या भीतीने सण साजरा करण्याची वृत्ती असते.
आता हा सण साजरा करण्यातली सुद्धा इतकी मतमतांतरे आहेत कि माझी मति गुंग होते.
कुणी म्हणते उगाच निरर्थक भेटवस्तू देऊ नका, उगाच पैसे वाया जातात आणि घरात जागा नाही नकोश्या वस्तू ठेवायला.
कुणी म्हणते भेट देणे महत्वाचे, स्वस्त-महाग महत्वाचे नाही. दिल्याशिवाय कुणाला काही देण्याची सवय कशी काय लागेल ? आणि त्यामुळेच तर बाजारात पैसे खेळात राहतो.
कुणी म्हणतो काय गरज आहे सजावटीसाठी सामान विकत आणायची ? घरीच कचऱ्यातून कला करा.
तर कुणी म्हणते कि स्वदेशी वस्तू घ्या आणि त्यामुळे गरीबाच्या घरी सुद्धा दिवाळी साजरी केल्या जाईल. ते पुण्य मिळेल.
कुणी म्हणते ऑनलाईन खरेदी करा तर कुणी म्हणते बाजारदुकानांना चालना द्या.
कुणी म्हणते फटाके फोडू नका, प्रदूषण कमी करा, तर कुणी म्हणते फटाके फोडल्यामुळे वातावरणातले उपद्रवी जीवजंतू,किटाणू नष्ट होतात.
कुणी म्हणते कश्याला एव्हढ्या पणत्या दिवे लावून तेलाचा,विजेचा अपव्यय करता ?
तर कुणी म्हणते दिव्यांचा सण आहे तर घर काय अंधारलेले ठेवणार का ?
कुणी घरीच दिवाळी साजरी करावी असा अट्टाहास ठेवतात तर कुणी या सुट्ट्यांच्या दिवसात भ्रमण दौरा काढतात.
हे सगळे ऐकून काय करावे काय करू नये असा प्रश्न पडतो. एकीकडे वाढलेला खर्च तर दुसरीकडे सण साजरा करण्याची रूढी आणि इच्छा यात दिवाळी हरवून गेल्यासारखी वाटते.
टिकल्या फोडतांना मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद आणि लक्ष्मीसमोर हात जोडणाऱ्या मोठ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानी भाव दोन्ही हरवून गेले आहे.
-पूर्णिमा देशमुख पुरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा