रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

दक्ष प्रजापती - कठोर पालक ; प्रेमळ पिता

                  दक्ष प्रजापती - कठोर पालक ; प्रेमळ पिता 
" प्रसूति , माझ्या मुलीला,सतीला, योगनिद्रेतून बाहेर काढण्यासाठी मी माझ्या सगळ्या शक्ती तिला देईन. पण तिला मी वाचवेन. " दक्षाचे बोलणे ऐकताच दक्षपत्नी दचकली.
"स्वामी, तुमच्या शक्ती गेल्या तर तुमचे सृष्टी नियंत्रित करण्याचे कार्य तुम्ही कसे करणार ? प्रजापतीच राहणार नाही तर प्रजेचे पालन कोण करणार ? "
सतीला वाचवण्यासाठी  मी काहीही करू शकतो,प्रसुति. त्या अघोरी संन्यासी शिवाचा स्पर्श सुद्धा माझ्या मुलीला होऊ देणार नाही. मी एक सामान्य पिता बनून राहीन पण हे होऊ देणार नाही. "
योगसमाधीत मग्न शिवाचे नेत्र खाडकन उघडले. अंतर्मनातून तीव्र निषेध व्यक्त झाला. " नाही, हे होता कामा नये."
दक्ष आपल्या सगळ्या शक्ती घेऊन सतीच्या दालनात जाऊ लागला. आणि क्षणार्धात प्रत्यक्ष शिवशंभू सतीच्या दालनात प्रकट झाले आणि त्यांनी सतीच्या भ्रूमध्याला स्पर्श केला. सती योगनिद्रेतून जागी झाली. महादेवाला पाहून हर्षित झाली. तिला वाटले कि शिव फक्त तिच्यासाठीच आले. पण तिचा भ्रम दूर करण्यासाठी महादेव म्हणाले,
" सती, वसंतोत्सवामध्ये तू मला नृत्यासाठी आमंत्रित केले, मी आलो, पण माझ्या स्पर्शाने तू योगनिद्रेत चालली गेलीस. केवळ माझ्या पुनःस्पर्शानेच तू त्यातून बाहेर येऊ शकत होतीस. पण तुझ्या पित्याला हे मान्य नव्हते. त्यासाठी त्याने आपल्या सगळ्या शक्ती तुला देऊन तुला वाचवायचे ठरवले. असे झाले असते तर दक्ष  " प्रजापती " न राहता एक सामान्य पिता राहिला असता. त्यामुळे सृष्टी अनियंत्रित झाली असती. असे होऊ नये म्हणून मी इथे त्वरेने आलो. दक्ष प्रजापतीचे पद अबाधित ठेवण्यासाठी मी इथे आलो. सती , यापुढे तू मला बोलावू नकोस. तुझ्या पित्याच्या आदेशांचे पालन करण्यातच तुझे भले आहे. "
एव्हढे बोलून शिव तिथून अंतर्धान पावले. तेवढ्यात दक्ष तिथे आपल्या शक्ती घेऊन आला. पण सतीला जागृत झालेले पाहून चकित झाला. सतीने त्याला सगळं सांगितले. पण दक्ष क्रोधीत झाला. त्याला वाटले कि शिवाने त्याचा पाणउतारा करण्यासाठीच मुद्दाम असे केले. शिवप्रति त्याचे शत्रुत्व अजूनच तीव्र झाले.
पुढची कथा तर माहितीच आहे.
इतके वर्ष मी "दक्ष प्रजापती " कडे नकारात्मक नजरेनेच बघत आले. एक अहंकारी, आत्मकेंद्री, शिवाचा कट्टर शत्रू या दृष्टीनेच त्याला पाहत होते.कथा कहाण्या आणि सिरिअल्स मध्ये सुद्धा त्याचे तसेच रूप दाखवले जाते. शिव आणि सतीच्या लव स्टोरी मधला villain !
पण काही दिवसांपूर्वी देवोंके देव महादेव  सिरीयल बघितल्या गेली आणि मग दक्ष प्रजापती या व्यक्तीरेखेकडे बघण्याची नजर बदलू लागली.
खरं म्हणजे शिव आणि दक्ष यांचे वैमन्यस्क हे व्यक्तिसापेक्ष नसून विरुद्ध विचारसरणी मधली तफावत आहे असे वाटते.
शिव हा कुठल्याही नियमबद्ध चाकोरीच्या बाहेर राहणारा ; स्मशानवैरागी ! तर दक्षाची निर्मिती हीच मुळात सृष्टीला एका नियमबद्ध चाकोरीत नियंत्रित करण्यासाठी झालेली. समाजाला एक शिस्त लावण्यासाठी, प्रजेला अनाचार,स्वैराचार यापासून दूर ठेवून समाजाला विकसित करण्यासाठी, मानवाला पशुच्या श्रेणीतून बाहेर काढून सभ्य, सुसंस्कृत करण्यासाठी दक्ष प्रजापतीने नियमावली तयार केली. ज्या प्रमाणे मनुस्मृती मध्ये सामाजिक हितासाठी कायदे , नियम सांगितले आहेत त्याचप्रमाणे दक्षाने सुद्धा सामाजिक हितार्थ नियम बनवले.
"दक्ष " या नाव प्रमाणेच तो प्रजेच्या हितासाठी दक्ष आणि सक्षम होता.
दोन भिन्न पण परस्पर पूरक अश्या विचारसरणी मधला विरोध शिव आणि दक्षाच्या बाबतीत घडतो.
दक्ष राजा होता. त्याला अनेक मुले आणि मुली होत्या. ( मुलींच्या संख्यांमध्ये मतभेद आहेत). सती आणि शिवाच्या मिलनाला त्याचा विरोध याच विचारसरणीच्या भिन्नतेमुळे झाला असे वाटते. धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही पण विवाह होण्यापूर्वीचा शिव हा तथाकथित सामाजिक सभ्यतेच्या रिंगणाला छेद देणारा असा, गृहस्थाश्रमाचा आधार असलेल्या माया,मोह, ममत्व, सौम्यत्व, प्रजोत्पत्तीची इच्छा या भावना नसलेला असा वैरागी, विचित्र वेशभूषा करणारा म्हणून प्रसिद्ध होता. न्यायनीती यांचे पालन करणारा दक्ष अश्या विरक्त व्यक्तीसोबत आपल्या राजसी, लाडाकोडात वाढलेल्या कन्येचा विवाह कसा काय लावून देणार ?
इथे एक सामान्य पिता मला दक्षामध्ये लपलेला दिसतो. अहंकारी जरी असला तरी आपल्या कन्येला काही त्रास होऊ नये म्हणून तिला जपणारा पालनकर्ता दिसतो. मुलीला "चांगले " स्थळ मिळावे म्हणून जोडे झिजवणारा बाप आजही दिसतो. दक्षसुद्धा तेच करत होता.
वर उल्लेखित प्रसंगात दक्ष सतीला वाचवण्यासाठी जेव्हा आपल्या शक्ती तिला देऊन देण्यासाठी तयारी करतो तेव्हा ब्रह्म सुद्धा त्याला अडवतांना  म्हणतात कि या शक्ती तुला समाजाच्या हितासाठी दिलेल्या आहेत. तू त्यांचा वापर स्वार्थासाठी का करतोस ? " तेव्हा दक्ष म्हणतो कि माझी कन्या हि सुद्धा या समाजाचाच एक अंश आहे. एक प्रजापती म्हणून आणि पिता म्हणून मी तिला माझ्या शक्ती दिल्या तर त्यात काय चूक ? मी प्रजापती नाही राहिलो तरी चालेल, माझ्या जागी दुसरा प्रजापती निर्माण करा पण सतीचा पिता म्हणून मी तिचे रक्षण करणारच !
आपल्या मुलीवर निरतिशय प्रेम करणारा एक पिताच एवढा मोठा त्याग करू शकतो. आपल्या पदाचा अहंकार असता तर त्याने असे केले असते का ?
चंद्र , रोहिणी आणि इतर २६ दक्षकन्या यांच्या वेळी हाच दक्ष एक कठोर शासक आणि पिता या दुहेरी भूमिकेत दिसतो. आपल्या इतर मुलींवर अन्याय झालेला बघून, चंद्राला ; प्रत्यक्ष आपल्या जावयालाच शिक्षा देण्याची धमक दाखवतो.
चंद्राने जरी दक्षाच्या २७ मुलींसोबत विवाह केला तरी तो फक्त रोहिणी सोबतच रममाण झालेला होता. अन्य बायकांकडे तो लक्षच देत नव्हता. जेव्हा त्या मुलींनी पित्याकडे तक्रार केली तेव्हा दक्षाने चंद्राला समजावले. पण चंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी दक्ष चिडला. इथेही अनेक कथांमध्ये दक्षाला " खलनायक " म्हणून दाखवतात. पण गृहस्थाश्रमाच्या आणि विवाह संस्कारांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चंद्राला जर त्याने तसेच सोडून दिले असते तर समाजात एक चुकीचा पायंडा पडला असता. "प्रजापती" या  नात्याने तसे करणे त्याला शक्य नव्हते. एकदा लग्न लावून दिले कि झाले मग तू मुलीला कसेही वागव, मला त्यात काही बोलण्याचा अधिकार नाही असे दक्ष म्हणत नाही. मुलगी परक्याचे  धन असल्या भंपक कल्पना दक्ष बाळगत नाही. इथे तो न्याय करतो आहे ते नवऱ्याने अन्याय करून, उपेक्षित करून, " टाकून " दिल्या सारख्या              " पत्नी " च्या बाजूने. पण मूळ कथा सांगतांना ,शिवाचे महत्व अधोरेखित करता करता चंद्राचा अपराध बाजूलाच पडतो. प्रत्यक्ष महादेव सुद्धा चंद्राला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावीच लागेल असे सांगून, शरण आला म्हणून त्याला डोक्यावर धारण करून शापाची तीव्रता कमी करण्यासाठी १५ दिवस क्षय होऊन १५ दिवस वृद्धी होईल असा उशाप देतात.
मला इथे अनायासच राजा जनकाची आठवण आली. सीतेचा त्याग केल्यानंतर ना सीता वापस आपल्या माहेरी गेली ना तिने आत्मत्याग केला.
उत्तर रामचरितमध्ये कौसल्या नेहमी चिंतेत दाखवली आहे कि सीतेवरच्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी जनक अयोध्येवर आक्रमण करेल का. पण असे काही घडत नाही. जनकाने तिला शोधण्याचा किंवा रामाला जाब विचारण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पण तरी कथा पुराणांमध्ये जनक " आदर्श " राजा म्हणून ख्याती पावला. आणि मुलीवरच्या अन्यायाविरुद्ध बोलणारा दक्ष मात्र " रागीट, अहंकारी राजा" म्हणून बदनाम झाला.
         काही लेखक दक्ष प्रजापती नियमबद्ध, प्रतिगामी लोकांचे प्रतीक म्हणून तर शिव हा  बंधन झुगारून नवीन मार्ग निर्माण करण्याऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून दाखवतात.पण असे असले तरी एक विसरतो कि शिवाने सुद्धा प्रजापती चे महत्व मान्य केले आहेच. मनुष्याच्या मूळ प्रवृत्तीला नियम झुगारून मनस्वी जगणे जास्त आकर्षक वाटते. पण व्यक्ती आणि समष्टी या दोहोंपैकी सगळ्याच धर्मानी समष्टी जास्त महत्वाची मानली आहे. मनुष्यच काय तर झुंडीत राहणारे इतर प्राणी सुद्धा आपल्या कळपाचे नियम पाळतात. प्रमुख प्राणी कळपाचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी स्वतःचे प्राण सुद्धा देतो.
     दक्षाचा अहंकार त्याच्या नाशाचे कारण ठरला. पण समाजाच्या कल्याणासाठी त्याला पुन्हा जीवन देणे अपरिहार्य होते. म्हणूनच दक्षाचा शिरच्छेद केल्यानंतर सर्व देवांनी महादेवाला विनंती केली आणि म्हणूनच शिवाने बकऱ्याचे शीर लावून दक्ष पुनर्जीवित केला.
आजही कुठल्याही धार्मिक विधी मध्ये "प्रजापती " ला मान आहे. त्याचा हविर्भाग अनिवार्य आहे. कारण अहंकार विहीन, प्रेमळ तरी न्यायी अश्या  " प्रजापती" चे संरक्षण व्यक्ती आणि समाज सगळ्यांनाच हवे असते.
    शेवटी कठोर असले तरी " वडील " ते  "वडील" च असतात. त्यांची माया दिसत नसली तरी त्या मायेची उब सदैव आपल्या भोवती असते. प्रजापती दक्ष मला त्याच प्रेमळ बापा सारखा वाटतो.
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

कोजागिरी पौर्णिमा आणि भुलाबाई

कोजागिरी पौर्णिमा आणि भुलाबाई ! अनेक आठवणी आज नेहमी प्रमाणे फेर धरून नाचत आहेत.  दुपार पासून रांगोळी आणि भुलाबाई ची सजावट करणे, स्वतः छान  तयार होईपर्यंत संध्याकाळ व्हायची. बाबा आम्ही मोठ्या झालो तरी सुद्धा आमच्यासाठी आणि आमच्या साळकाया साठी किती प्रकारचे चॉकलेट्स आणि बिस्किट्स आणायचे, आई भुलाबाईच्या खिरापती साठी अनेक पदार्थ बनवायची. आपल्या कडची खिरापत वेगळी व्हायला हवी यासाठी आम्ही कितीतरी खटाटोप करायला लावायचो तिला. अर्थात आईला स्वतःलाच पदार्थ बनवायची हौस आहेच. आमचे लग्न झाल्या नंतर सुद्धा ती अजूनही भुलाबाई साजरी करतेच.
    आज आठवते ते घरोघरी भुलाबाई चे गाणे म्हणत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हिंडणे. तेव्हा खाल्लेल्या मटकीच्या  उसळीची आणि चिवड्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. कोणी प्लिज ते सगळे पार्सल करेल का ?
  सगळीकडे खादाडी करून आल्यानंतर आजोबा, बाबा, आई ,ताई आणि मी गच्चीवर जायचो. ते वातावरण तर मी कधीच विसरू शकत नाही. बाबा संध्याकाळीच गच्चीवर पाणी टाकून, पाणी सुकल्यानंतर सतरंजी टाकून ठेवायचे. ती थंड सतरंजी, चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश, चांदण्यांसारखीच फुललेल्या चमेलीचा सुगंध , आटवलेले दूध, त्यात चंद्र दिसतो का हे बघणे, आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या शेंगा, गूळ मीठ  खात गप्पा मारणे आणि विविध भरती वरची गाणी ऐकणे  हे सगळे कसे विसरणार ?
 पंचतारांकित हॉटेल मध्ये सुद्धा हा साधा भोळा आनंद मिळणार नाही. आज ते सगळेच स्वरूप बदलले. भुलाबाई ची गाणी मुलींना माहितीच नाही. शाळा आणि ट्युशन ,परीक्षा आणि मोबाइल मध्ये गुरफटलेल्या लहानग्यांना भुलाबाई साठी वेळ नाही. कोजागिरीच्या चांदण्यांचा आवाज डीजे च्या कर्कश्श कल्लोळात बुजून गेला. आटवलेले दूध नो फॅट डाएट च्या नादात वाटी चमच्या पुरतेच राहून गेले.
  माझ्या सारख्या अनेकांच्या मनात उरल्या फक्त त्या आठवणी.
- पूर्णिमा देशमुख पुरेकर 

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

शिखंडीची घुसमट

स्त्री किंवा पुरुष नव्हे तर "योद्धा" म्हणून माझे नाव का नाही घेत ? - शिखंडीची घुसमट 
  महाभारतकालीन आणि त्या पूर्वीच्याहि समाजामध्ये नपुंसक मनुष्यांबद्दलचा दृष्टीकोण आजच्या पेक्षा फारच प्रगल्भ होता. तसे तर एकूणच लैंगिक संबंधांबद्दल, स्त्री पुरुषांच्या विविध नात्यांचा धर्माने उल्लेख केला आणि त्यांना संमती सुद्धा दिली होती . नियोग पद्धती, स्त्रीचा पुनर्विवाह, बहुपतित्व , पत्नीच्या विवाह पूर्व संततीला विवाहानंतर पतीने स्वीकारणे हे सगळे धर्मसम्मतच होते.
परंतु कलियुगात मात्र जिथे स्त्री बद्दलच पुरुषप्रधान समाजाने अनैसर्गिक, अमानवी आणि अन्यायी नियम धर्माच्या नावाखाली सर्रास सर्वमान्य केले तिथे "नपुंसक" असलेल्या समाजाच्या एका छोट्याश्या समुदायाबद्दल अत्यंत हिडीस आणि अमानुष धारणा पसरवल्या गेल्या त्यात नवल ते काय ?
महाभारतातल्या शिखंडीची घुसमट यापेक्षा वेगळीच आहे. अंबेचा शिखंडी होण्यापर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण काही गोष्टी अश्या आहेत ज्या एकतर हेतुपुरस्सर सांगितल्या गेल्या नाहीत किंवा तेव्हढ्या महत्वाच्या वाटल्या नाहीत.
१. शिखंडीच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झाली कि या "मुलीचे " संगोपन "मुलाप्रमाणे " करावे. त्या प्रमाणे द्रुपद राजाने शिखंडीला सर्वोत्तम असे  अस्त्र -शस्त्र  ज्ञान , युद्धकौशल्य आणि क्षात्रधर्म शिकवला. शिखंडी उत्तम योद्धा होता.
२. शिखंडीचे लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री जेव्हा त्याच्या पत्नीला त्याचे सत्य कळले तेव्हा ती घाबरून चिडून आपल्या पित्याकडे वापस गेली. ती दशार्ण देशाचा  राजा हिरण्यवर्ण याची मुलगी होती. राजाने संतापाने द्रुपदावर आक्रमण करण्याचे ठरवले. यामुळे अपमानित आणि व्यथित होऊन  शिखंडी आत्महत्या करण्यासाठी जंगलात  गेला. तिथे "स्थुन कर्ण " नामक यक्षाने त्याच्यावर दया करत शिखंडीला त्याच्या मृत्यूपर्यंत  त्याला पौरुषत्व दिले. शिखंडी मेल्यानंतर यक्षाला त्याचे पौरुषत्व वापस मिळाले.
३. पौरुषत्व मिळाल्यानंतर शिखंडी पत्नीकडे गेला. त्यांचे वैवाहिक जीवन सुरु झाले. त्याला एक पुत्रही झाला.
४.  महाभारताच्या युद्धाच्या वेळेपर्यंत शिखंडीचे " पौरुषत्व  " सिद्ध  झालेले होते. युद्धाच्या सुरुवातीलाच जेव्हा युद्धाचे नियम ठरवल्या गेले तेव्हाच कोण वीर कोणाकडून लढणार याची यादी ठरत असे.ती यादी शत्रुपक्षाला सुद्धा दिल्या गेली होती. शिखंडी पांडवांकडून लढणार हे पक्के झाले तेव्हा त्याबद्दल कोणीच आक्षेप घेतला नाही.
त्यामुळे भीष्मांना धारातीर्थी पाडण्यासाठी शिखंडीला जेव्हा उभे केले तेव्हा त्यावेळी भीष्मांना आक्षेप घेण्याचा काहीएक अधिकार नव्हता. त्यातही भीष्माचा भाऊ "विचित्रवीर्य " नावाप्रमाणेच  संतति उत्पन्न करण्यास असमर्थ होता, खुद्द पांडू सुद्धा तसाच होता. हे दोघे केवळ पुरुष म्हणून जन्माला आले म्हणून  त्यांचे योद्धा असणे भीष्माने स्वीकारले ? आणि स्त्री म्हणून जन्माला येऊन लिंग परिवर्तन करून पुरुष झालेल्या शिखंडीला तो मान का नाही दिला ?
युद्धाचा नववा दिवस उगवला. आत्तापर्यंत भीष्मांनी पांडवांच्या सेनेचा चांगलाच दारुण पराभव केला होता. विजयाचे पारडे कौरवांकडे झुकत होते. त्यातच अर्जुनाने " मी भीष्म आणि द्रोणाचार्यांवर बाण चालवणार नाही असे जाहीर केले. कृष्ण चिडला. भीष्मांना धारातीर्थी पडणे अत्यावश्यक होऊन बसले होते. कृष्णाने शिखंडीचे नाव सुचवले.
" पण शिखंडी स्त्री आहे , भीष्म एका स्त्रीसोबत युद्ध करणार नाही . हे धर्मसम्मत नाही. " युधिष्ठिराने तात्विक वाद केला. ( इथे प्रश्न पडतो कि हि बाब ९ दिवसापर्यंत युधिष्ठिराने सोयीस्करपणे दुर्लक्षित का केली ? म्हणजे असे होते का कि नऊ दिवस शिखंडी लढलेला चालला पण त्या दिवशी नाही ? )
" कुठला धर्म असे म्हणतो ? आणि धर्माची गोष्ट करायची तर भीष्मांने कुठला  धर्म पाळला ? धर्म म्हणतो कि २ पिढ्या पाहून झाल्यानंतर व्यक्तीने वानप्रस्थ स्वीकारावा.गृहस्थ धर्माचा त्याग करावा. निवृत्ती घ्यावी. पण भीष्माने  पित्याच्या स्त्रीमोहासाठी स्वतः ब्रह्मचारी राहून धर्माचा नियम तोडला. त्याला इच्छामरणाचे वरदान दिले तरी तो चार चार पिढ्या  बघे पर्यंत जिवंत राहिला. असे करून त्याने पृथ्वीवर भार  टाकला. त्याच्या या कृत्यामुळेच पुढचा सगळा नाट्यक्रम घडला. भीष्माचा अंत व्हायलाच हवा.  " कृष्णाने युधिष्ठिराला सुनावले.
ठरल्याप्रमाणे शिखंडी रथावर आरूढ झाला. प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच त्याचे सारथ्य केले. शिखंडीच्या मागे अर्जुन सज्ज होता. भीष्मांनी शिखंडीला बघितले  तेव्हा ते संतापले.
"कृष्णा , तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी एका स्त्रीला सामोरे केलेस ? मी स्त्री सोबत लढणार नाही. हा धर्म नाही. "
" धर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडी शोभत नाहीत पितामह भीष्म. तुम्हाला शिखंडी मध्ये एक स्त्री दिसते आहे जी पूर्वजन्मी अंबा होती. पण मला मात्र इथे एक मनुष्य  दिसतो आहे ज्याने पुत्राला जन्म देऊन आपले "पौरुषत्व" सिद्ध केले आहे. तुमच्या समोर एक योद्धा उभा आहे, युद्ध करा." कृष्णाने आव्हान दिले.
"नाही. हे धर्माला अनुसरून नाही. मला हे पटत नाही ! " भीष्मांनी प्रतिवाद केला.
" तुम्हाला पटत नाही ? तुमचे मत आहे म्हणून तो धर्म ठरत नाही भीष्म पितामह. आजपर्यंत कितीदा तुम्ही कुरुकुलाचा वंशविस्तार करण्यासाठी अधर्माची कास धरलेली आहे ? तुमचा भाऊ "विचित्रवीर्य" जो स्वतःच नपुंसक होता त्याच्या साठी तुम्ही ३ राजकन्यांचे बळजबरीने अपहरण केले. तो धर्म होता का ? त्या नंतर हि चार चार पिढ्या होईपर्यंत तुम्ही एखाद्या जळवा प्रमाणे जिवंत राहिले. निवृत्ती घेतली नाही ते धर्माला  अनुसरून होते का ? तुमच्याच कुळातल्या एका सुनेवर अत्याचार होत असतांना तुम्ही चूप राहिले, स्वतःचे क्षत्रियत्व विसरले , तेव्हा कुठे होता तुमचा धर्म ? युद्ध करा नाहीतर माघार घ्या. " कृष्णाची वाणी कडाडली.
"मी लढणार नाही. मी शस्त्र खाली ठेवतो. " भीष्मांनी युद्ध टाळण्यासाठी शस्त्र ठेवले.
" शिखंडी , अर्जुना , धनुष्य उचला, बाण चालवा. या वृद्ध मनुष्याला ठार करा. "
"पण कृष्णा , ते माझे पितामह आहे. वडीलधारे आहेत." अर्जुनाने पुन्हा कच खाल्ली.
आता मात्र कृष्णाचा संयम सुटला. त्याने अर्जुनाला निर्वाणीचा इशारा दिला.
" अर्जुना , हे युद्ध ना पिता पुत्रांचे आहे ना स्त्री पुरुषांचे . हे युद्ध आहे धर्म-अधर्माचे . धर्म म्हणजे समान न्याय. धर्मासमोर स्त्री असो पुरुष असो किंवा नपुंसक असो, सगळे समान असतात. धर्माचे पालन म्हणजे अंगी इतरांबद्दल करुणा , सहृदयता असणे. भीष्माच्या अंगी ती आत्ताही नाही आहे. शिखंडीकडे एक  योद्धा म्हणून न बघता ते अजूनही एक नपुंसक म्हणूनच बघत आहेत.
योद्धा कुणीही असू शकतो अर्जुना .  युद्धभूमी स्त्री पुरुष असा भेद करत नाही. असे असते तर प्रत्यक्ष 
 "आदिशक्ती " असुरांचा नाश करण्यासाठी युद्ध भूमीत उतरली नसती. सत्यभामाने नरकासुराचा वध केला नसता. शिखंडी , ज्या भीष्मामुळे अंबेच्या आयुष्याचे दशावतार झाले त्या भीष्माला मार , चालव बाण. "
शिखंडीने बाण चालवले. असे म्हणतात कि शिखंडीच्या बाणांनी भीष्माला काहीच झाले नाही. अर्जुनाच्या बाणांमुळे ते धारातीर्थी पडले.कदाचित हे शिखंडीचे महत्व कमी करण्यासाठी, अर्जुनाला वीर ठरवण्यासाठी आणि भीष्मांचे अजेयत्व सिद्ध करण्यासाठी कोणीतरी घुसडवले आहे असे वाटते.
भीष्म तसेही कुणाच्या बाणांनी मरणार नव्हतेच. त्यांची इच्छा होईल तेव्हाच त्यांचा मृत्यू होणार होता. बाण, मग ते कुणाचेही असो, निमित्तमात्र होते.
भीष्म खाली पडले पण पृथ्वीने त्यांचा स्वीकार केला नाही कारण त्यांनी इतके वर्ष जगून निसर्गा विरुद्ध वर्तन केले होते. स्वर्ग त्यांना स्वीकारत नव्हता कारण त्यांनी लग्न करून संतानोत्पत्ती केली नव्हती. पितृऋण फेडले नव्हते. महायोद्धा भीष्म त्रिशंकू अवस्थेत ६ महिने खितपत पडले. त्या महान क्षत्रिय कुरुश्रेष्ठाचा मृत्यूसुद्धा वीरोचित झाला नाही.
शिखंडी मुळे विजयाचे पारडे पांडवांकडे झुकले. शिखंडीचा वध अश्वत्थामाने तो  झोपेत असतांना केला.
आजही शिखंडी सारखेच अनेक आहेत जे स्त्री पुरुष भेदाच्या सीमारेषेवर जगत आहेत. समाज त्यांना तिरस्कृत करतो. का ? असे अनेक आहेत जे या भेदाच्या पलीकडे जाऊन अनेक भूमिका यशस्वीपणे निभावत आहेत. नोकरी व्यवसाय करण्यात अग्रेसर आहेत. पण कित्येकांना आजही समाज भयाने आपले "sexual  orientation लपवून ठेवावे लागते.
खरेतर कुणाच्या लैंगिक प्रवृत्ती कश्या आहेत ही ज्याची  त्याची  "खाजगी " बाब आहे. जो पर्यंत कुणाच्या या प्रवृत्ती मुळे अन्य व्यक्तीला त्रास होत नाही आहे तो पर्यंत समाजाला त्यात दखल देण्याची काहीच गरज नाही.
कलम ३७७ रद्द झाले. कायद्याने शिखंडीला न्याय दिला. पण समाजाचे काय ?
आजही शिखंडी " महाभारतातला एक योद्धा " या मानाच्या पदवी साठी झगडतच आहे.शिखंडीला तो जसा आहे तसाच स्वीकारणारा  फक्त आणि फक्त धर्मस्थापक कृष्णच आहे. बाकीच्यांचे काय ?
 शिखंडीची घुसमट कधी संपणार ?

- पूर्णिमा देशमुख पुरेकर


बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

द्रौपदीचा तळतळाट

पितामह,  तुम्ही सुनेचे रक्षण का नाही केले ? - द्रौपदीचा  तळतळाट 

" पितामह, तुम्ही कुलश्रेष्ठ , ज्येष्ठ, कुटुंबप्रमुख. मी द्रौपदी,तुमची कुलवधू. माझ्या पतींनी मला द्युतामध्यें  पणाला लावले. त्यांना तो अधिकार होता कि नाही ह्याचा वाद बाजूला ठेवा. दासी असो नसो मी तुमच्या कुळातली सून तर होतीच ना ? मग जर तुम्ही कुलरक्षणासाठी प्रतिबद्ध  होते तर मग माझे रक्षण करतांना तुमचे कर्तव्य कुठे गेले होते ? का कुरुकुलाची वीरसभा आज  कापुरुषांनी भरलेली दिसते आहे ? कुठे गेला तुमचा क्षात्रधर्म ? कुठे गेली तुमची  न्याय बुद्धी ? "
भर सभेमध्ये अपमानित, लज्जित झालेल्या द्रौपदीने त्या कुरुकुलप्रमुख भीष्म, धृतराष्ट्र आणि अन्य  कुरुकुल पुरुषांकडे मदतीची याचना केली पण ते सगळे डोळेझाक करून मूग गिळून गप्प बसले होते. सगळे क्षत्रिय वीर (?) माना खाली घालून बसले. ते पाहून द्रौपदीचा बांध सुटला. तिच्या तोंडून  एका मागून एक वाकबाण सुटले. त्या बाणांनी ती कुरुसभा कायमची घायाळ झाली. द्रौपदी आणि कुरुकुलात अन्याय झालेल्या सगळ्या स्त्रियांचा  तळतळाट त्या श्रेष्ठ कुरुवंशाला भोवला. कुरुवंशाचा भयंकर विनाश झाला.
  त्या भीषण समयी फक्त एक  विकर्ण होता ज्याने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पण तिचे रक्षण करण्यास तो असमर्थ होता. तिथे आला कृष्ण ! खरेतर कृष्ण तिचा कोणीच नव्हता, ना पिता, ना बंधू , ना पती ना पुत्र. तो तिच्या सासर  माहेरचा कोणी नातेवाईक देखील नव्हता. पण तो धर्मरक्षक होता. त्याने स्त्रीवर होणाऱ्या अपमानाविरुद्ध लढा दिला. तिचे रक्षण केले आणि जाताजाता  या अत्याचाराचे काय भीषण परिणाम होतील त्याची धोक्याची सूचना सुद्धा देऊन ठेवली.
"कुरुसभेतल्या पुरुषांनो, घरातल्या स्त्रीवर अत्याचार करणारे तर पापी असतातच , पण तो अत्याचार निमूटपणे होऊ  देणारे सुद्धा पापाचे भागीदार असतात. सुनेवर झालेल्या या अत्याचाराचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तिचे तळतळाट तुम्हाला मरेपर्यंत शांतता लाभू देणार नाही. आणि मरण येईल ते सुद्धा वीरोचित असणार नाही. "
आणि घडलेही तसेच. दुर्योधन, दुःशासन आणि कर्णाचे मरण क्षत्रियोचित तर नव्हतेच. आणि भीष्म ? ज्या कुरुकुलाचे रक्षण करण्याची भीषण प्रतिज्ञा करण्यासाठी त्यांनी मरण टाळले होते त्या भीष्मांना मृत्यू आला तो सुद्धा रणांगणावर नाही तर बाणाच्या शय्येवर, ना पृथ्वी ना स्वर्ग, अश्या त्रिशंकू स्थितीत ६ महिने खितपत पडावे लागले, मरणांतिक वेदना सहन कराव्या लागल्या पण मरण आले नाही. कुरुकुलाचा विनाश याची देही याची डोळा  पाहावा लागला. मरणही कृतकृत्य असे नशिबात नव्हते. कसे असणार ? कुळातल्या स्त्रियांवर अत्याचार होतांना ते मूक राहिले. भाऊबंदकी टाळू शकले नाही. मरतांना भीष्मांच्या कानात त्यांच्याच प्रतिज्ञेचा उपहास ऐकू येत होता.
महाभारताला कारणीभूत द्रौपदी आहे असा तिच्यावर दोषारोप  होतो.पण ते पटत नाही.ती गर्विष्ठ होती, तिने कर्णाचा, दुर्योधनाचा अपमान केला म्हणून तिचा अपमान झाला असा  तिच्या विरुद्ध
वाद होतो. पण कुठल्याही स्त्रीने जरी कुणाचा अपमान केला असेल तरी अश्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार करावे हे धर्मसम्मत तर नाहीच नाही पण माणुसकीला धरून सुद्धा योग्य नाही. हे म्हणजे एखाद्या स्त्रीने नाकारले म्हणून अपमान समजून तिच्या तोंडावर acid फेकण्यासारखे किंवा तिच्यावर बलात्कार करण्यासारखेच होणार नाही का ? हे अपराध धर्मसम्मत नाहीत ना ? मग द्रौपदी वर दोषारोप का ?
    संपूर्ण महाभारतात तिचा उल्लेख " नाथवती परि अनाथवत " असा केल्या गेला आहे. आणि खरेच नव्हते का ते ? बलाढ्य पांचाल राजाची मुलगी असूनसुद्धा, पाच वीर अश्या पांडवांची पत्नी असूनसुद्धा ती आपल्याच कुटुंबातल्या लोकांकडून तुडवल्या गेली आहे. कुंतीने भिक्षेत मिळालेली वस्तू समजून तिची वाटणी केली आणि त्याच पाच पतींमुळे तिचा भरसभेत अपमान झाला.
सीता खूप सोशिक , असहाय्य अशी आणि द्रौपदी मात्र तडफदार, काहीशी रागीट अशी प्रतिमा ठेवल्या जाते. पण मला तरी उलटेच वाटते. सीतेने बाणेदारपणा दाखवत रामासोबत पुन्हा संसार करायला ठाम नकार दिला. तिने स्वतःची अस्मिता जपली. पण द्रौपदीने  मात्र वाट्याला आलेले भोग निमूटपणे स्वीकारले. मग ते पाच पतींची पत्नी होणे असो, वनवासातले असंख्य परीक्षा घेणारे प्रसंग असो, राणी असून दासी बनून राहावे लागणे असो किंवा आपल्या पाच हि पुत्रांचा मृत्यू बघणे असो. पतिधर्म, गृहिणीधर्म आणि राजधर्म सुद्धा तिने उत्तमपणे पार पडला. पांडवांच्या अनेक राण्या होत्या पण वनवासात फक्त द्रौपदीच गेली. बाकी सगळ्या आपल्या मुलाबाळांना घेऊन माहेरी राहिल्या. द्रौपदीच्या  मनाचा मोठेपणा असा कि वस्रहरणानंतर धृतराष्ट्राने तिला २ वर दिले तेव्हा तिने स्वतःसाठी काहीच मागितले नाही. तिने आपल्या पाचहि पतींना दास्यत्वातून सोडवून घेतले.
 तरी तिच्या नशिबी सदेह स्वर्गारोहणाचे  भाग्य नव्हते.
कौटुंबिक अत्याचाराला  बळी पडलेली द्रौपदी खरोखरच अनाथच होती.
आजही कित्येक स्त्रिया कौटुंबिक अत्याचाराला बळी पडतात. कधी सासू,सासरा , कधी दिर -भासरा तर कधी नणंद जाऊ तिच्या वर अत्याचार करतात. कित्येक वेळी तर तिचा पतीच तिच्यावर अत्याचार करतो. सहनशीलतेच्या नावाखाली तिने किती आणि का सहन करावे ? शारीरिक अत्याचाराचे पुरावे तरी देता येतात, पण मानसिक अत्याचाराचे काय ?
घरात पत्नीला ,सुनेला यथोचित स्थान देत नाही, "माझे घर,माझा संसार" असे म्हणत सासू तिला डावलून टाकते. तिला घरातल्या सदस्याप्रमाणे वागवत नाहीत. घरातल्या निर्णयांमध्ये तिला कोणी विचारत नाही. विचारणे तर दूरच पण सांगण्याचे सुद्धा सौजन्य दाखवत नाही. तिने सगळ्यांची वर वर करावी पण तिला कमी लेखण्यासाठी तिच्या विरुद्ध कारस्थाने करणे, तिच्या नवऱ्याचे कान भरणे, तिची मुद्दाम कुचंबणा होईल असे वागणे हे सगळे मानसिक अत्याचार नाहीत तर काय ?
द्रौपदी प्रमाणेच आजही कित्येक सुना भरल्या घरात असहाय्य " नाथवती परि अनाथवात" आहेत, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात आहेत.
आजही कित्येक तथाकथित "कुटुंबप्रमुख" भीष्मांप्रमाणेच त्या अत्याचाराकडे डोळेझाक करून पगडी सांभाळत बसले आहेत.
त्या स्त्रियांचा तळतळाट कधी संपेल का ?

-पूर्णिमा देशमुख पुरेकर

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

माधवीचा विलाप-स्त्री चा सौदा करणे धर्मसम्मत कसे काय ?

स्त्री चा सौदा करणे धर्मसम्मत कसे काय ? - माधवीचा विलाप 
ययातिची मुलगी माधवी , रुपसंपन्न तर होतीच पण अतिशय विनम्र , संवेदनशील आणि गुणसंपन्न होती. तिच्या पत्रिकेत असे लिहिले होते कि ती चार सम्राटांची माता होईल. पण प्रत्येक प्रसूती नंतर ती पुन्हा कुमारीच राहील.
विश्वामित्रांचा एक शिष्य होता गालव. तो ज्ञानी तर होता परंतु त्या ज्ञानाने अहंकारी बनला. त्याने विश्वामित्रांना गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारले. त्याची गरीब परिस्थिती विश्वामित्रांना  ठाऊक होती. त्यांनी त्याला दक्षिणा देऊ  नको असे सांगितले. पण गालव हटूनच बसला. मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायचीच आहे , काय देऊ  सांगा असे वारंवार विचारू लागला. शेवटी विश्वामित्रानाही राग आला. आपला शिष्य अहंकाराने उन्मत्त झाला आहे, त्याचा अहंकार उतरवण्यासाठी त्यांनी त्याला सांगितले कि "तू मला गुरुदक्षिणा म्हणून ८०० शुभ्र वर्णी परंतु एक कान  काळा असलेले घोडे आणून दे. हे ऐकून गालव हादरला. एकाच वेळी एका राजाकडे एव्हढे सारखे घोडे असणे शक्यच नव्हते. काय करावे ?
गालव तेव्हा चक्रवर्ती सम्राट ययाती कडे गेला.त्याला असे घोडे देण्याची याचना केली. ययाती कडे तसा एकसुद्धा घोडा नव्हता. पण याचकाला रिकाम्या हाताने कसे पाठवावे ? ययातिची अपकीर्ती झाली असती. ययातीने "घोड्यांच्या" बदली आपली "कन्या" गालवांना "दान " केली. तिच्या कुंडलीतील योग  सांगितला. आणि गरीब गालवांसोबत माधवी निमूटपणे राजमहाल सोडून चालली गेली. प्रत्यक्ष जन्मदात्यानेच तिचा पहिला "सौदा" केला. हा तिच्यावर पहिला आघात होता.
गालवने माधवीचा  स्वीकार एका धूर्त विचाराने केला. तिच्या कुंडलीतील योग्  पाहून त्याने तिला तीन  वेगवेगळ्या राजांकडे एक एक वर्षासाठी पाठवले. माधवीने त्या राजासोबत एका वर्षासाठी रममाण व्हावे, पुत्र जन्माला घालावा आणि तो लगेच त्याच्या सुपूर्द करून दुसऱ्या राजाकडे चालले जावे हा क्रम ३ वर्ष चालला.  चक्रवर्ती सम्राट होणाऱ्या पुत्राच्या बदली त्या राजाने गालव ला  २०० घोडे द्यावे असे ३ "सौदे" झाले.
ह्या तीन वर्षांमध्ये माधवीच्या मनाला किती वेदना झेलाव्या लागल्या असतील ? पहिले एका पुरुषाला आपले शरीर उपभोगासाठी द्यायचे. मग ते मूल ९ महिने वाढवायचे. आणि जन्म झाल्याबरोबरच त्याला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जायचे, त्या मुलाचे लालन पालन करण्याचीही संधी तिला मिळाली नाही. तिच्या नशिबी मातृत्व तर होते  पण माता बनणे नव्हते.
३ राजांकडून ६०० घोडे घेतल्यानंतर कुठल्याच राजाकडे एक कान काळा असलेले शुभ्र अश्व नव्हते. आता काय करावे ? गालव माधवीला आणि ६०० घोड्यांना घेऊन विश्वामित्रांकडे गेला. उरलेल्या २०० घोड्यांच्या बदली त्यांनी माधवीला सुपूर्द केली. माधवीचा हा पाचवा "सौदा" झाला. विश्वामित्राच्या हाती पुत्र सोपवल्या नंतर विश्वामित्रांनी तिला  तिथेच राहण्यासाठी सुचवले. कारण गालव आता स्वतःची  घर गृहस्थी आणि आश्रम सुरु करण्यास उत्सुक होते. गुरुदक्षिणा देण्याचे "दिव्य" त्यांनी यशस्वीपणे पार पडले होते. माधवीच्या नशिबात चारच पुत्र होते. गालवांना आता तिचा काही "उपयोग " नव्हता. त्यांनी तिला आपल्या सोबत नेले नाहीच.
यावेळी मात्र माधवी आपल्या  दुर्देवाचे  दशावतार निमूटपणे सहन करण्यास तयार नव्हती.
तिच्या मनाचा , स्त्रीत्वाचा , मातृहृदयाचा विचार तिच्या आयुष्यात आलेल्या एकही पुरुषाने केला नव्हता. एक वस्तू समजून तिचा "व्यापार " मात्र करतांना एकालाही लाज वाटली नाही. धर्म तर दूरच पण साधी माणुसकी सुद्धा दाखवली नाही.
माधवीने अश्या दांभिक, स्वार्थी, धर्माच्या नावाखाली शक्तीरूपी स्त्री चा व्यापार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजाकडे पाठ फिरवली. सरळ संन्यास स्वीकारला. आणि ती लुप्त झाली.
सरोगेट मदर निदान स्वतःच पैश्यांसाठी आपले गर्भाशय भाड्याने देते. ज्याचा गर्भ ती वाढवते त्या दम्पत्ती मध्ये काही शारीरिक दोष असल्या मूळे " सरोगसि " चा आधार घ्यावा लागतो. पण माधवीच्या बाबत तसे काहीच नव्हते. घोड्यांच्या बदली माणसाचा सौदा करणाऱ्या या पुरुषांनी कोणत्या तोंडाने समाजात "सभ्यत्व "आणि "आर्यत्व "दाखवले ? आणि किती दिवस मुलगी, बायको किंवा अन्य स्त्री चा असा सौदा होत राहील ?
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

स्वाभिमानी,बाणेदार सीता

स्त्री असली तरी स्वाभिमानासोबत तडजोड का करू ? - 
सीतेचा बाणेदार प्रश्न 
धोब्याने घेतलेल्या संशयावरून आदर्श राजा रामाने गरोदर पत्नीचा त्याग केला.ते सुद्धा तिच्या तोंडावर सांगण्याची हिम्मत न करता. लक्ष्मणावर सीतेला वनविहार करण्यासाठी नेण्याचे आणि मग तिथेच सोडून येण्याचे कार्य सोपवून स्वतःला सोडवून घेतले. सीतेला जेव्हा हे कळले तेव्हा तिला किती मोठा धक्का बसला असेल ? तरीसुद्धा तिने ना लक्ष्मणाला पुन्हा अयोध्येला नेण्याच्या विनवण्या केल्या ना रामाला काही दोष दिला.तिने लक्ष्मणाकरवी रामासाठी फक्त एक निरोप पाठवला.
"आदर्श राजाने प्रजाहिताकडे दुर्लक्ष करून स्वतःला खोलीत कोंडून घेणे शोभत नाही. बाहेर येऊन आपल्या राजधर्माचे पालन करा."
या निरोपामागचा उपहास कोणाला कळणार नाही ? रामाने सीतेचा त्याग करतांना कदाचित हा विचार केला असेल कि ज्याप्रमाणे नवऱ्याने सोडलेल्या स्त्रिया आपल्या माहेरी जातात त्याप्रमाणे सीता सुद्धा माहेरी जाईल. तिथे ती सुरक्षित राहील. पण तसे झाले नाही. उत्तररामचरित्रात सुद्धा कौसल्येच्या मनात सीतेला सोडून दिल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी जनक अयोध्येयवर स्वारी करेल का अशी भीती सारखी घर करून असल्याचा उल्लेख आहे. पण जनकाने तसे काही करणे तर दूरच रामाला साधा जाब सुद्धा विचारला नाही. सीतेला सुद्धा हे अपेक्षितच  होते. म्हणूनच ती माहेरी वापस गेली नाही. तिला हेही माहिती होते कि आपला पिता जनक हा सुद्धा आदर्श राजा म्हणवून घेण्यासाठी पतीने टाकून दिलेल्या मुलीचा स्वीकार करणार नाही . बहुतांश मातापिता असेच तर करतात ना ?
एकदा लग्न करून दिले कि मुलीला आपल्या मातापित्यांचे घर परके होते. माहेरी भाऊ असतो, त्याचा स्वतःचा संसार असतो. भावाच्या बायको सोबत खटके उडतात.सगळ्यांनाच समाजाचे टोमणे , टीका सहन करावी लागते. जिणे नकोसे होऊन जाते. असेही मातापिता आहेत जे माहेरी वापस आलेल्या मुलीला म्हणतात कि " अशी टाकून दिलेली म्हणून जगण्यापेक्षा तू मेली असतीस तर बरे  झाले असते, अशी नामुष्कीची वेळ तर नसती आली . "
मग त्या मुली आत्महत्या करून संसारत्याग करून टाकतात. ज्या हे करत नाहीत त्यांना जगण्यासाठी पैसे हवे  म्हणून नवऱ्याकडून पोटगी मिळवण्यासाठी केस लढवावी लागते,मुलांच्या custody साठी सुद्धा भांडणे करावी लागतात. संसाराची लक्तरे समाजासमोर उघडी पडतात.
सीतेने असे काही केले नाही. ना ती माहेरी गेली ना तिने देहत्याग केला. कसा करणार ? पोटी मुलं वाढत होती. त्यांच्या प्रति तिचे कर्तव्य नव्हते का ?
लक्ष्मण अयोध्येला वापस गेल्यानंतर सीता त्या अरण्यात मार्ग काढत काढत वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात पोहोचली. त्यांनी तिचे स्वागत केले.तिची कहाणी ऐकल्यानंतर तिथेच राहण्यास सुचवले. लव कुश जन्माला आल्यानंतर सुद्धा सीता तिथेच राहिले. मुलांचा जन्म झाल्यानंतर सीतेने वाल्मिकी ऋषी सोबत आपल्या मुलांना रामाकडे का पाठवले नाही ? रामाच्या पितृत्वाबद्दल तर काही शंका नव्हती. पण स्वाभिमानी सीतेने तसे केले नाही. रामाने जेव्हा तिचा त्याग केला तेव्हा त्याला ती गरोदर आहे हे माहिती होते. तरीही त्याने तिला सोडले. कुठेतरी सीतेला हे खटकले होते. मुलांचे संगोपन करून त्यांना क्षात्रधर्म शिकवण्याचे कार्य तिने उत्तमपणे केले. ते सात वर्षांचे होते जेव्हा रामाने राजसूय यज्ञ  केला. यज्ञाचा घोडा लवकुशानी अडवला. घोडा सोडवण्यासाठी अयोध्येहून आलेल्या प्रत्येक वीराला त्यांनी आपल्या पराक्रमाने पराभूत केले. प्रत्यक्ष रामच जेव्हा तिथे आला तेव्हा मात्र सीतेने वाल्मिकीना पाठवून लवकुशांना संदेश दिला कि राम  तुमचा पिता आहे  म्हणून पित्याला पराभूत करण्याचे पाप करू नका.लवकुशांनी घोडा सोडून दिला. त्यानंतर राजसूय यज्ञ समापनाच्या  दिवशी लवकुश वाल्मिकीसोबत अयोध्येला गेले. रामायणाचे आख्यान गेले. वाल्मिकींनी रामाला जेव्हा लवकुश तुमचे मुलं आहेत हे सांगितले तेव्हा रामाच्या मनातले वात्सल्य आणि पुत्रमोह जागा झाला. "मी फक्त मुलांना स्वीकारतो " असे कसे म्हणणार ? त्याने सीतेला अयोध्येत पुन्हा येण्याचा आग्रह केला. हे कळल्यावर सीता तिथे आली. मुलांना रामाने स्वीकारले होतेच.त्यांचे भविष्य सुरक्षित झाले होते. सीतेलाही तो मोठ्या (?) मनाने स्वीकारायला तयार झाला होता. पण स्वाभिमानी सीतेने रामासोबत पुन्हा संसार करण्यास ठाम नकार दिला.
"धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि " असे वचन रामाने सप्तपदी समयी दिले होते. एकवचनी रामानेच ते वचन मोडले होते. तिच्या चारित्र्याबद्दल ज्या शंका लोकांच्या मनात होत्या त्या शंकांना रामाने तिचा त्याग करून दुजोराच दिला होता. पितृ आज्ञेनुसार राज्य सोडणे रामाला जमले. पण समाज त्याच्या बायकोवर लांछन लावत असतांना तो तिच्या बाजूने ठामपणे का उभा राहिला नाही ? राज्य सोडून तो सुद्धा तिच्या सोबत वनवासात का नाही गेला ? नवरा म्हणून तिच्या प्रति त्याचे कर्तव्य नव्हते का ?
सीता आणि द्रौपदी यांची तुलना करतांना सीता नेहमीच अगतिक, करुण , नशिबाचे तडाखे निमूटपणे सहन करणारी अशी दाखवतात. आणि द्रौपदी अन्यायाविरुद्ध लढणारी  अशी दर्शवतात. काही लेखक असे म्हणतात कि सीतेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. वनवासात जाण्याचा निर्णय तीचा , लक्ष्मणरेखा ओलांडण्याचा निर्णय तिचाच होता. त्याचमुळे तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगांना ती स्वतःच जबाबदार आहे असे जे म्हणतात ते जरी खरे असले तरी तिने निर्णयांची जबाबदारी तर घेतलीच पण त्यांच्या परिणामांनाही ती धाडसाने सामोरी गेली आहे.
तिला टाकून देण्याचा निर्णय रामाचा होता. मुलांना आणि सीतेला पुन्हा स्वीकारण्याचा निर्णय हि रामाचाच होता. पण या वेळी मात्र सीता त्या निर्णयाविरुद्ध गेली.
बाणेदारपणे तिने रामाला धिक्कारले. अग्निदिव्य करतांना एकदा तिचे स्वत्व पणाला लावले होते. पण पुन्हा नाही. ती भूमिगत झाली. कुठे गेली ते कुणालाच कळले नाही. मला वाटते कि जिथे मानाने , स्वाभिमानाने जगता येईल असे जग तिने निर्माण केले. तिथेच ती राहिली. परित्यक्ता अश्या असंख्य स्त्रियाना  तिने मानाने जगण्याचा  मार्ग दाखवला.स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आदर्श घालून दिला.एकटी स्त्री सुद्धा मुलांचे संगोपन उत्तमपणे करू शकते हे सिद्ध करून दाखवले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे  "मर्यादा पुरुषोत्तम "रामाच्या त्या तेजस्वी पत्नीने स्वाभिमानाला तडा जाईपर्यंत सहन करू नये अशी मर्यादा आखून दिली.
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

अहिल्या आणि रेणुकेचा जाब आणि कलम ४९७

नैतिकतेची दीक्षा आणि अनैतिकतेची शिक्षा मलाच का ? - अहिल्या  आणि रेणुकेचा जाब
अहिल्येची आणि रेणुकेची गोष्ट तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. इंद्राने अहिल्येला कपट  करून फसवले. गौतम ऋषीना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी इंद्र आणि अहिल्येला शाप दिला. इंद्राच्या शरीराला सहस्त्र छिद्रे पडली आणि अहिल्या शिळा बनली. राग शांत झाल्यानंतर गौतम ऋषीनी अहिल्येला उशाप दिला कि विष्णु जेव्हा राम अवतारात तिथे येतील तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने अहिल्या पुन्हा उध्दारीत होऊन जिवंत होईल.
  परशुरामची माता आणि जमदग्नी ऋषीची पत्नी रेणुका ही सुद्धा अतिशय पवित्र आणि पतिव्रता होती. जमदग्नी ऋषी फार वयस्क होते. रेणुका त्यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान होती. एके दिवशी नदी काठी पाणी भरण्यासाठी गेलेली असता तिला तिथे काही गंधर्व जलक्रीडा करतांना दिसले. एकच क्षण ! एकाच क्षणासाठी तिच्या मनात त्या यौवनसंपन्न पुरुषी सौंदर्याची भूल पडली. तीसुद्धा मनातल्या मनातच. पण तो एकच क्षण तिच्या नाशाचे कारण ठरला.
जमदग्नी ऋषीनी एक एक करत आपल्या पाच पुत्रांना आपल्याच आईचे शीर धडावेगळे करण्याचे आदेश दिले. पण थोरल्या चारहि जणांनी मातेची हत्या करण्यास नकार दिला. फक्त परशुरामानी पितृआज्ञा प्रमाण मानून एकाच वाराने  रेणुकेचे मस्तक धडावेगळे केले. आपला राग शांत झाल्यानंतर जमदग्नीना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. पण उघडपणे तसे कसे दाखवणार ? त्यांनी परशुरामांना २ वर मागण्यास सांगितले. परशुरामांनी आपल्या बंधूंना पुनर्जीवित करण्याचा आणि मातेचे शिर जीवित करण्याचा वर मागितला. रेणुकेचे फक्त शिर च पुनर्जीवित झाले. ती तिथेच स्थापित झाली. माहूरची रेणुका, "देवी " पदाला पोहोचली.भक्तांची सौम्य स्वरूपी माता बनली.
अहिल्या आणि रेणुकेच्या मनात आपल्याला हकनाक शिक्षा भोगावी लागली याबद्दल चीड निर्माण नसेल झाली का ? अहिल्येचे पावित्र्य इंद्राने भंग केले. त्याबद्दल तिला शिक्षा का झाली ? तिची काय चूक होती ?
रेणुकेच्या बाबतीत तिचा शिरच्छेद करावा असा तिचा अपराध होता का ? अपराधाच्या  तीव्रतेप्रमाणे शिक्षा द्यावी हा नियम जमदग्नी का विसरले ?
अनेक संस्करणांमध्ये अहिल्या जाणून बुजून इंद्रासोबत विषयविलास करते असे आलेले आहे.तसे जरी असले तरी कित्येक पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत. त्यांना या अपराध बद्दल त्यांच्या बायकांनी शाप दिल्याचे ऐकले आहे का ? नाही ना ? पुरुषांनी असे वागले तर चालते पण स्त्रियांनी असे वागले तर तो महापराध ठरतो हा कुठला न्याय ?
रेणुकेने तर एकाच क्षणासाठी आणि ते सुद्धा मनातल्या मनातच ,समोर  दिसणाऱ्या  उत्कृष्ट पुरुषी देहाचे  सौन्दर्य ग्रहण केले. देह प्राप्तीची कामना सुद्धा केली नाही. तरी तिचा शिरच्छेद करावा ?
विश्वामित्राच्या तपस्या  भंग करण्यासाठी मेनकेला पाठवले. त्यांच्या संयोगातून एक मुलगी सुद्धा जन्मली. तो व्यभिचार नव्हता का ? विश्वामित्र सुद्धा तेव्हा महर्षी झालेले होते. त्यांची तपस्या भंग झाली हे ठीक पण त्यांचे महर्षिपद,त्यांचे पावित्र्य का नाही भंग झाले ?
का व्यभिचार , मग तो शरीराने असो व मनाने , पुरुषांनी केला तर चालतो, पण स्त्रियांनी त्याचा विचार सुद्धा करणे महा पाप ठरते ? हा पक्षपात का ? त्यातच अजून एक मेख आहे. लग्न संस्था ही सर्वार्थाने फक्त आणि फक्त वंशवृद्धी साठीच निर्माण केली गेली आहे. विवाहित स्त्री अथवा पुरुष जर काही कारणाने अपत्य निर्मितीसाठी सक्षम नसेल तर "नियोग  " पद्धती चा अवलंब करू शकत होता. त्या बाबत तेव्हाचा समाज पुढारलेला होता. पण नियोग करण्याचे कारण नसतांना जर स्त्री ने संबंध ठेवले तर मात्र तो अपराध होता.
      नुकतेच सुप्रीम कोर्टाने ४९७ कलम रद्द केले. " विवाहबाह्य संबंध " या अतिशय नाजूक विषयाशी हे कलम जुळले होते. त्यानुसार जर पतीच्या संमतीने पत्नीने परपुरुषासोबत शरीर संबंध ठेवले तर तो अपराध नव्हता. पण जर कुण्या पर पुरुषाने पतीच्या संमती शिवाय त्याच्या पत्नी सोबत शरीरसम्बन्ध ठेवले तर पती त्या पुरुषाच्या विरोधात तक्रार करू शकत होता. आणि त्या अपराधाबद्दल त्या परपुरुषाला ५ वर्षांची कैद अथवा दंड अथवा दोन्ही ची शिक्षा देण्यात येण्याचे प्रावधान होते.
 अहिल्येच्या वेळी जर हे कलम असते तर तिला शिक्षा झालीच नसती. कारण या कलमानुसार फक्त पर पुरुषालाच शिक्षा होणार होती आणि ते सुद्धा त्या स्त्रीच्या पतीने तक्रार केली तरच. स्त्री तक्रार करू शकत नव्हती.
या कलमाविरुद्ध याचिका का झाल्या ? विरोधाचा पहिला मुद्दा हा होता कि तक्रार करण्याची मुभा फक्त पतीलाच होती हे पतीचा पत्नीवर मालकी हक्क असल्याचे सुचवत होता,पत्नी पुरुषाची संपत्ती असल्याचे दर्शवत होता जे भारतीय संविधानाने स्त्री आणि पुरुष समान असल्याचा जो अधिकार दिला आहे त्या विरोधात होते. दुसरा मुद्दा हा कि विवाहबाह्य संबंध ठेवण्यास प्रत्यक्ष त्या स्त्रीचीच संमती असली तरी पतीची संमती नसल्यामुळे तो अपराधच ठरत होता. पण त्याचवेळी पतीची संमती असतांना पत्नीच्या संमतीशिवाय परपुरुष संबंध ठेवत असेल तर तो अपराध ठरत नव्हता.
या दोन कारणांमुळे ४९७ कलम असंवैधानिक ठरवून रद्द केले. पुन्हा एकदा नैतिकता अनैतिकता व्यभिचार यावर चर्चा रंगल्या.
पण अहिल्या रेणुकेच्या वेळी ४९७ कलम नसतांनाही त्या बळीच्या बकऱ्या बनल्या. पुढे भलेही अहिल्या पंचकन्या पैकी एक झाली आणि रेणुका देवी बनली तरी मानवी देहात  आणि मनात असलेल्या निसर्गसुलभ भावनांच्या प्रकटीकरणाचे नियम  स्त्री साठी वेगळे आणि पुरुषासाठी वेगळेच राहिले आहेत हेच सिद्ध झाले. कायद्याने दिलेले अधिकार आणि प्रत्यक्ष समाजाची अश्या घटनांकडे बघण्याची दृष्टी हि स्त्रीविरोधीच राहिलेली आहे.
आज भलेही पुरुषाच्या विवाहबाह्य संबंधांना अपराध ठरवले आहे, कायदा तिच्या बाजूने आहे तरीही स्त्री च्या "sexual choice and rights " बद्दल आजचा तथाकथित प्रगत समाज उदासीनच आहे. नैसर्गिक भावनांबद्दल स्त्री आणि पुरुष असं भेद न करता दोघांनाही "मनुष्य" मानून एक समान धार्मिक आणि सामाजिक नियमावली कधी बनेल का ?
-पूर्णिमा देशमुख पुरेकर