पितामह, तुम्ही सुनेचे रक्षण का नाही केले ? - द्रौपदीचा तळतळाट
" पितामह, तुम्ही कुलश्रेष्ठ , ज्येष्ठ, कुटुंबप्रमुख. मी द्रौपदी,तुमची कुलवधू. माझ्या पतींनी मला द्युतामध्यें पणाला लावले. त्यांना तो अधिकार होता कि नाही ह्याचा वाद बाजूला ठेवा. दासी असो नसो मी तुमच्या कुळातली सून तर होतीच ना ? मग जर तुम्ही कुलरक्षणासाठी प्रतिबद्ध होते तर मग माझे रक्षण करतांना तुमचे कर्तव्य कुठे गेले होते ? का कुरुकुलाची वीरसभा आज कापुरुषांनी भरलेली दिसते आहे ? कुठे गेला तुमचा क्षात्रधर्म ? कुठे गेली तुमची न्याय बुद्धी ? "
भर सभेमध्ये अपमानित, लज्जित झालेल्या द्रौपदीने त्या कुरुकुलप्रमुख भीष्म, धृतराष्ट्र आणि अन्य कुरुकुल पुरुषांकडे मदतीची याचना केली पण ते सगळे डोळेझाक करून मूग गिळून गप्प बसले होते. सगळे क्षत्रिय वीर (?) माना खाली घालून बसले. ते पाहून द्रौपदीचा बांध सुटला. तिच्या तोंडून एका मागून एक वाकबाण सुटले. त्या बाणांनी ती कुरुसभा कायमची घायाळ झाली. द्रौपदी आणि कुरुकुलात अन्याय झालेल्या सगळ्या स्त्रियांचा तळतळाट त्या श्रेष्ठ कुरुवंशाला भोवला. कुरुवंशाचा भयंकर विनाश झाला.
त्या भीषण समयी फक्त एक विकर्ण होता ज्याने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पण तिचे रक्षण करण्यास तो असमर्थ होता. तिथे आला कृष्ण ! खरेतर कृष्ण तिचा कोणीच नव्हता, ना पिता, ना बंधू , ना पती ना पुत्र. तो तिच्या सासर माहेरचा कोणी नातेवाईक देखील नव्हता. पण तो धर्मरक्षक होता. त्याने स्त्रीवर होणाऱ्या अपमानाविरुद्ध लढा दिला. तिचे रक्षण केले आणि जाताजाता या अत्याचाराचे काय भीषण परिणाम होतील त्याची धोक्याची सूचना सुद्धा देऊन ठेवली.
"कुरुसभेतल्या पुरुषांनो, घरातल्या स्त्रीवर अत्याचार करणारे तर पापी असतातच , पण तो अत्याचार निमूटपणे होऊ देणारे सुद्धा पापाचे भागीदार असतात. सुनेवर झालेल्या या अत्याचाराचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तिचे तळतळाट तुम्हाला मरेपर्यंत शांतता लाभू देणार नाही. आणि मरण येईल ते सुद्धा वीरोचित असणार नाही. "
आणि घडलेही तसेच. दुर्योधन, दुःशासन आणि कर्णाचे मरण क्षत्रियोचित तर नव्हतेच. आणि भीष्म ? ज्या कुरुकुलाचे रक्षण करण्याची भीषण प्रतिज्ञा करण्यासाठी त्यांनी मरण टाळले होते त्या भीष्मांना मृत्यू आला तो सुद्धा रणांगणावर नाही तर बाणाच्या शय्येवर, ना पृथ्वी ना स्वर्ग, अश्या त्रिशंकू स्थितीत ६ महिने खितपत पडावे लागले, मरणांतिक वेदना सहन कराव्या लागल्या पण मरण आले नाही. कुरुकुलाचा विनाश याची देही याची डोळा पाहावा लागला. मरणही कृतकृत्य असे नशिबात नव्हते. कसे असणार ? कुळातल्या स्त्रियांवर अत्याचार होतांना ते मूक राहिले. भाऊबंदकी टाळू शकले नाही. मरतांना भीष्मांच्या कानात त्यांच्याच प्रतिज्ञेचा उपहास ऐकू येत होता.
महाभारताला कारणीभूत द्रौपदी आहे असा तिच्यावर दोषारोप होतो.पण ते पटत नाही.ती गर्विष्ठ होती, तिने कर्णाचा, दुर्योधनाचा अपमान केला म्हणून तिचा अपमान झाला असा तिच्या विरुद्ध
वाद होतो. पण कुठल्याही स्त्रीने जरी कुणाचा अपमान केला असेल तरी अश्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार करावे हे धर्मसम्मत तर नाहीच नाही पण माणुसकीला धरून सुद्धा योग्य नाही. हे म्हणजे एखाद्या स्त्रीने नाकारले म्हणून अपमान समजून तिच्या तोंडावर acid फेकण्यासारखे किंवा तिच्यावर बलात्कार करण्यासारखेच होणार नाही का ? हे अपराध धर्मसम्मत नाहीत ना ? मग द्रौपदी वर दोषारोप का ?
संपूर्ण महाभारतात तिचा उल्लेख " नाथवती परि अनाथवत " असा केल्या गेला आहे. आणि खरेच नव्हते का ते ? बलाढ्य पांचाल राजाची मुलगी असूनसुद्धा, पाच वीर अश्या पांडवांची पत्नी असूनसुद्धा ती आपल्याच कुटुंबातल्या लोकांकडून तुडवल्या गेली आहे. कुंतीने भिक्षेत मिळालेली वस्तू समजून तिची वाटणी केली आणि त्याच पाच पतींमुळे तिचा भरसभेत अपमान झाला.
सीता खूप सोशिक , असहाय्य अशी आणि द्रौपदी मात्र तडफदार, काहीशी रागीट अशी प्रतिमा ठेवल्या जाते. पण मला तरी उलटेच वाटते. सीतेने बाणेदारपणा दाखवत रामासोबत पुन्हा संसार करायला ठाम नकार दिला. तिने स्वतःची अस्मिता जपली. पण द्रौपदीने मात्र वाट्याला आलेले भोग निमूटपणे स्वीकारले. मग ते पाच पतींची पत्नी होणे असो, वनवासातले असंख्य परीक्षा घेणारे प्रसंग असो, राणी असून दासी बनून राहावे लागणे असो किंवा आपल्या पाच हि पुत्रांचा मृत्यू बघणे असो. पतिधर्म, गृहिणीधर्म आणि राजधर्म सुद्धा तिने उत्तमपणे पार पडला. पांडवांच्या अनेक राण्या होत्या पण वनवासात फक्त द्रौपदीच गेली. बाकी सगळ्या आपल्या मुलाबाळांना घेऊन माहेरी राहिल्या. द्रौपदीच्या मनाचा मोठेपणा असा कि वस्रहरणानंतर धृतराष्ट्राने तिला २ वर दिले तेव्हा तिने स्वतःसाठी काहीच मागितले नाही. तिने आपल्या पाचहि पतींना दास्यत्वातून सोडवून घेतले.
तरी तिच्या नशिबी सदेह स्वर्गारोहणाचे भाग्य नव्हते.
कौटुंबिक अत्याचाराला बळी पडलेली द्रौपदी खरोखरच अनाथच होती.
आजही कित्येक स्त्रिया कौटुंबिक अत्याचाराला बळी पडतात. कधी सासू,सासरा , कधी दिर -भासरा तर कधी नणंद जाऊ तिच्या वर अत्याचार करतात. कित्येक वेळी तर तिचा पतीच तिच्यावर अत्याचार करतो. सहनशीलतेच्या नावाखाली तिने किती आणि का सहन करावे ? शारीरिक अत्याचाराचे पुरावे तरी देता येतात, पण मानसिक अत्याचाराचे काय ?
घरात पत्नीला ,सुनेला यथोचित स्थान देत नाही, "माझे घर,माझा संसार" असे म्हणत सासू तिला डावलून टाकते. तिला घरातल्या सदस्याप्रमाणे वागवत नाहीत. घरातल्या निर्णयांमध्ये तिला कोणी विचारत नाही. विचारणे तर दूरच पण सांगण्याचे सुद्धा सौजन्य दाखवत नाही. तिने सगळ्यांची वर वर करावी पण तिला कमी लेखण्यासाठी तिच्या विरुद्ध कारस्थाने करणे, तिच्या नवऱ्याचे कान भरणे, तिची मुद्दाम कुचंबणा होईल असे वागणे हे सगळे मानसिक अत्याचार नाहीत तर काय ?
द्रौपदी प्रमाणेच आजही कित्येक सुना भरल्या घरात असहाय्य " नाथवती परि अनाथवात" आहेत, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात आहेत.
आजही कित्येक तथाकथित "कुटुंबप्रमुख" भीष्मांप्रमाणेच त्या अत्याचाराकडे डोळेझाक करून पगडी सांभाळत बसले आहेत.
त्या स्त्रियांचा तळतळाट कधी संपेल का ?
-पूर्णिमा देशमुख पुरेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा