संसारात किती तडजोड करायची ? - तारा , मंदोदरी चे मूक रुदन
प्रातःस्मरणीय पंचकन्यांमध्ये उल्लेखित तारा हि वानर राज वाली ची बायको.ताराची कीर्ती तिच्या रूपापेक्षा जास्त तिच्या वाक्चातुर्य , राजकारणातली जाण आणि धर्म अधर्मातले सूक्ष्म फरक समजणारी चतुर,बुद्धिमान स्त्री अशीच होती. का नसणार ? प्रत्यक्ष देवगुरु ब्रहस्पतीची कन्या होती ना ती !
वाली ने सुग्रीवाचे राज्य आणि त्याची बायको रुमा कपट करून हडपले. तिने वालीला असा अधर्म न करण्याचे पदोपदी विनवले. पण सत्तालोलुप आणि पुरुषी अहंकारामध्ये चूर असलेल्या वालीने बहुतांश नवऱ्यानंप्रमाणे तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. सुग्रीवाला न मारता त्याला राज्याबाहेर हाकलून दिले.
कालांतराने राम तिथे आल्यानंतर हनुमानाच्या मध्यस्थीने सुग्रीवाने रामासोबत संधी केली कि मला माझे राज्य आणि स्त्री मिळवून दे, त्या बदली मी सीतेचा शोध घेण्यात आणि युद्धात तुझी मदत करेन. ठरल्याप्रमाणे ,कमकुवत असलेल्या सुग्रीवाने धनुर्धारी श्रीरामाच्या मदतीने वालीला युद्धाचे आव्हान दिले. दोघं भावांमध्ये असलेल्या विलक्षण साम्यामुळे राम काही सुग्रीवाला ओळखू शकला नाही आणि वालीला मारू शकला नाही. त्या दिवशी युद्ध थांबले. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाने सुग्रीवाच्या गळ्यात माळ टाकली जेणेकरून तो ओळखू येईल. पुन्हा सुग्रीवाने वालीला ललकारले . युद्धात विशेष नैपुण्य नसलेल्या सुग्रीवाने पुन्हा वालीला आव्हान दिल्याचे कळताच तारा चपापली. तिने ओळखले कि सुग्रीवाला कोणातरी तुल्यबळ पुरुषाचे पाठबळ मिळाले आहे.भयकंपित ताराने वालीला युद्ध न करता सुग्रीवासोबत तह करून त्याला युवराजपद द्यावे असा सल्ला दिला. पण याही वेळी तिचे शब्द कानाआड करून वाली युद्धाला गेला. रामाने वालीला एका बाणाने घायाळ केले,मारले नाही जेणेकरून त्याला त्याच्या पापांची जाणीव करून देता येईल. वाली मरणोन्मुख आहे हे कळताच वालीच्या मंत्रिगणांनी तारा आणि तिचा पुत्र अंगद यांना पळून जाण्याचा सल्ला दिला पण वीर धर्मनुंचारिणी तारा आपल्या पतीजवळ गेली. तिने राम आणि सुग्रीवाला जे काही सुनावले त्याचे वर्णन मुळातून वाचणे जास्त योग्य. तिला असलेल्या धर्मज्ञानाने रामसुद्धा भारावून गेला.तिचा गौरव करत त्याने तिला शांत केले.
ताराची तडजोड तर पुढेच आहे. आपल्या मुलाला,अंगदला त्याचा अधिकार मिळावा, राज्य मिळावे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो सुरक्षित राहावा यासाठी ताराने स्वतःच्या पतीची हत्या करणाऱ्या सुग्रीवासोबतच पुनर्विवाह केला. काय यातना झाल्या असतील तिला ?
सुग्रीवाने अंगदला युवराज घोषित केले. ताराच्या रूपाचा त्याच्यावर इतका पगडा बसला कि तो स्वतःच्यच पहिल्या पत्नीला विसरला. तारामध्येच रममाण झाला. सुग्रीव सीतेचा शोध घेण्यात काहीच मदत करत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर रामाने लक्ष्मणाला जाब विचारायला पाठवले तेव्हा विलासी सुग्रीवाचा
बचाव करत ताराने शीघ्रकोपी लक्ष्मणापासून पतीला वाचवले. आपल्या वाक्चातुर्याने लक्ष्मणाचा क्रोध शांत केला.
तारा धर्मनुंचारिणी नसती तर तिने या संधीचा आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला असता. लक्ष्मणाच्या रागाच्या भरात जर का सुग्रीव मारला गेला असता तर तिच्या मुलाला आपोआपच राज्य मिळाले असते.पण तिने तसे केले नाही. पत्नीधर्माचे पालन करत तिने त्याला वाचवले. किती मानसिक तडजोड करावी लागली असेल तिला ?
मंदोदरीचे सुद्धा तेच झाले. रावणाने सीतेला सन्मानपूर्वक रामाकडे पाठवावे असे तिने वारंवार रावणाला सांगितले .पण रावण मागे हटला नाही. रामायणाच्या काही संस्करणांमध्ये रावण वधानंतर तिने बिभीषणासोबत पुनर्विवाह केल्याचा उल्लेख आहे. का केले असे तिने ? तारा प्रमाणे आपल्या पुत्रांसाठी काही तिला असे करावे लागले नाही कारण तिचे सगळे पुत्र युद्धात मारल्या गेले होते. मग " घरभेदी " अश्या बिभीषणासोबत लग्न करण्याची गरज का पडली तिला ? सुरक्षेसाठी ? सामाजिक मानसम्मान अखंडित राहावा म्हणून ? मंदोदरीच्या या तडजोडीमागचे कारण मला तरी समजू शकले नाही.
"स्त्री एकटी राहू शकत नाही. "
" अकेली औरत खुली तिजोरी कि तरह होती है "
" एकट्या स्त्रीला समाज कधीच चांगले म्हणत नाही "
असले वाक्य आजही सतत ऐकू येतात. लग्न करण्याची इच्छा नसलेल्या मुलींना समाजाची भीती दाखवत, धर्माचे दाखले देत देत आणि अनेकदा इमोशनल प्रेशर देऊन मनाविरुद्ध बोहल्यावर चढवल्या जाते.
तडजोड करण्याची शृंखला तिथेच सुरु होते.
मनाजोगता नसलेल्या मुलं सोबत लग्न करण्याची तडजोड.
संसाराचा गाडा रेटण्यासाठी आपल्या इच्छा ,आवडीनिवडी ,मानसम्मान ,विचारमूल्ये आणि प्रसंगी स्वाभिमान सुद्धा तडजोड नामक होममध्ये जाळून राख होतात.
"तडजोड केली तर काय झाल ? आम्हीही केली, करावीच लागते." असे वाक्य ऐकून ऐकून स्त्री आपले मन मारून टाकते.
नाहीतर " नो तडजोड " असे म्हणत संसाराचीच "तोडफोड " करून मोकळी होते.
संसार = सम + सार
जिथे समता असते तिथे तोडण्याची भाषा नसते, जिथे समता म्हणजेच चांगलेपणा असतो तिथे अन्याय आणि पक्षपात नसतो. ज्या संसारात असे वातावरण असते तिथे तडजोडीला स्थानच नसते. कारण तिथे माणसे माणसांसोबत माणुसकीच्या धाग्याने जोडली गेलेली असतात.
पण असे आदर्श संसार किती असतात ? घरासाठी राबणाऱ्या बाईची वास्तपुस्त करण्याची गरज कोणाला आहे का ? माझ्या घरी तू आली म्हणजे तू तुझे माहेरचे "तोडून " माझ्या घराशी "जोडून " घे. हीच धारणा जिथे समाजमान्य झाली आहे तिथे " सम +सार न होता " तडजोड "च होणार, नाही का ?
-पूर्णिमा देशमुख पुरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा