शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

करियर करणारी स्त्री दुय्यम का ? - मेनका , गार्गी ,मैत्रेयी आणि राणी लक्ष्मीबाई चा सवाल


करियर करणारी स्त्री दुय्यम का ? - मेनका , गार्गी ,मैत्रेयी आणि राणी लक्ष्मीबाई चा सवाल 
ब्रह्मवादिनी अश्या गार्गी मैत्रेयीना मी मेनकेच्या रांगेत का ठेवले हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. कुठे त्या ज्ञानसंपन्न स्त्रिया आणि कुठे ती उच्शृंखल मेनका ? काय साम्य आहे यांच्यात ? आहे. एक साम्य आहे.
आपले विहित कार्य करण्यासाठी या स्त्रियांनी सामान्य गृहिणी होणे पत्करले नाही. मेनकेला नाईलाजाने करावे लागले आणि बाकीच्यांनी स्वतःच तो निर्णय घेतला.
मेनका आणि विश्वामित्रांची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे. विश्वामित्रांचा तपोभंग करण्यासाठी मेनकेला इंद्राने पाठवले. तिने ते केलेही. दोघांच्या संयोगातुन एक कन्या जन्मली. पण विश्वामित्रांना  "ब्रम्हर्षी " ची पदवी मिळवायची होती. ते त्यांचे "करिअर "होते. त्यांनी शंकुन्तलेचे पितृत्व नाकारले. ते पुन्हा आपल्या कामाला लागले. पण मेनकेचे काय ?
" mission accomplished , get back to work ", इंद्राने ऑर्डर दिली.
"पण देवराज, माझ्या नवजात मुलीचे काय ? " मेनकेने अर्ज केला.
"तू तिला सुद्धा स्वर्गात घेऊन चल. ती सुद्धा मोठी होऊन अप्सरा बनेल."
मेनकेला ते नको होते. जे संसारसुख आपल्याला मिळाले नाही ते मुलीला मिळावे असे तिला वाटत होते. तिने नकार दिला. मेनका संसाराच्या मोहपाशात गुंतत आहेत हे बघून इंद्राने ultimatum दिले, " तू जर कामावर यायला नकार दिलासा तर परिणाम भयंकर होतील."
हतप्रभ झालेल्या मेनकेने नाईलाजाने आपल्या मुलीला कण्व ऋषींच्या आश्रमात सोडले. आणि स्वर्गात कामावर रुजू झाली. विश्वामित्रांनी पितृत्व नाकारले त्याबद्दल समाज फारसे काही बोलत नाही. पण मेनकेचे चरित्र चित्रण मुलीला सोडून स्वर्गात जाणारी स्वार्थी,निर्दयी विलासी स्त्री असेच काहीसे होते. तिची तळमळ कोणाला दिसत नाही का ? विश्वामित्रांनी तर मुलीकडे बघितले सुद्धा नाही.पण निदान मेनकेने तिचे उत्तम पालन पोषण होईल अश्या ठिकाणी तिला ठेवून तिला सुरक्षित भविष्य देण्याचे कर्तव्य तरी केले.
   अप्सरा असणे काही वाईट नाही. अन्य व्यवसायांप्रमाणे तो सुद्धा एक व्यवसाय आहे. गौतम बुध्दांनी म्हंटल्याप्रमाणे स्त्री देहविक्रयाला का बाध्य होते ? पुरुषांमुळेच ना ? मग तिला हीन का लेखावे ?तिला दुय्यम स्थान का द्यावे. ?
गार्गी मैत्रेयीचे जीवन वेगळेच आहे. दोघींनी वेदपठण आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती साठी संसाराचे सर्व सुखोपभोग सोडले. आपण त्यांची नावे घेतो ते फक्त भारतात स्त्रियां पाहिलेपासूनच शिक्षण घेत होत्या हे सिद्ध करण्यासाठीच. त्यांची बाकी उपलब्धी काय आहे हे बहुतेकांना माहितीच नाही
वेदांमध्ये विज्ञान आहे हे आपल्याला माहिती आहे पण याच वेदांमध्ये गार्गीच्या नावाने अनेक सूक्त आहेत हे माहिती आहे का ? ती एक वैज्ञानिक होती, एक सायंटिस्ट होती हे लक्षात येते का ? एव्हढी मोठी कामगिरी करणाऱ्या या दोन स्त्रियांचा उल्लेख पंचकन्यांमध्ये का नाही केला ? त्यांनी गृहिणी बनून त्याग,बलिदान, अग्निदिव्य पार पडले नाही म्हणून ? समाजाच्या कल्याणासाठी ऋषी महर्षींनी जे कार्य केले त्या बद्दल त्यांना सप्तर्षी वैगरे पदव्या मिळून उत्तम स्थान मिळते. पण तेच कार्य करणाऱ्या स्त्रियांना मात्र दुय्यम दर्जा का ?
  जागतिक दर्जाच्या "Times " नामक वृत्तपत्राने राणी लक्ष्मीबाईंचे नाव "Best Wife " यादीत समाविष्ट केले. Best  Wife  का ? तिचे असामान्य कर्तृत्व, वीरत्व आणि बाणेदारपणा काय फक्त बायको म्हणूनच मर्यादित होता का ? निदान Best queen  म्हणून तरी उल्लेख करायचा होता. उद्या टिपू सुलतान महात्मा गांधींचा उल्लेख बेस्ट husband म्हणून करतील का ? नाही ना ? स्त्रीच्या कर्तृत्वाचे मोजमाप फक्त त्यांनी संसार कसा केला आणि किती तडजोड केली यावरूनच करायचे का ? त्या पलीकडे त्यांच्या कक्षा रुंदावल्याच नाही का ?
एका प्रथितयश बँकेच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या, " Most Influencial person " म्हणून नावाजलेल्या चंदा कोचरने सुद्धा आपल्या लेकीला लिहिलेल्या पत्रात कामाच्या व्यस्ततेमुळे मुलीकडे नीट लक्ष देऊ शकले नाही अशी खंत व्यक्त केली. करिअर आणि घर सांभाळण्याची तारेवरची कसरत करणाऱ्या प्रत्येकच स्त्री च्या मनात  अशी आत्मग्लानी असते.
तर दुसरीकडे गृहिणी च्या मनात सुद्धा करिअर करणाऱ्या स्त्री बद्दल सुप्त असूया असते आणि स्वतः बद्दल न्यूनगंड असतो.
पुरुष सुद्धा ऑफिस मध्ये जातो, लग्न करतो, संसार करतो. आजकाल तर अनेक पती आणि पिता घरातली आपली जबाबदारी बरोबरीने यशस्वीपणे पार पडतो. त्याच्या मनात असा न्यूनगंड का नाही येत ?
समानतेच्या वाटेवर जाताना स्वतःलाच दुय्यम समजणे स्त्रिया कधी थांबवतील ?

-पूर्णिमा देशमुख पुरेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा