बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

माझे घर कोणते ? - सतीचा आक्रोश

                            श्री 

माझे घर कोणते ? - सतीचा आक्रोश 

" जन्मदात्या आईवडिलांकडे जाण्यासाठी कुणाच्या आमंत्रणाची आणि परवानगी च गरज असते का हो ? जाऊ द्या मला." - सती शिवाला विनवीत होती. पण त्याला ते पटत नव्हते. 
" जिथे आमंत्रण नाही तिथे शहाण्या माणसाने जाऊ नये सती, अपमान होतो." महादेवाने नीतिशास्त्राचा दाखला दिला. 
"अहो,पण ते घर काही परकं थोडी आहे ? माझेच आहे ना ? आणि आपल्याच घरी जाण्याचे का कोणी आमंत्रण मागतं ? मला तुमचे पटतच नाही आहे. ते काही नाही, माझे बाबा एव्हढा मोठा यज्ञ करतात आहे तर मला जायलाच हवे. तुम्हाला नसेल यायचे तर नका येऊ. "सतीने ठणकावले . 
अनिष्ठाच्या आशंकेने थरकापलेले आणि पहिल्यांदाच आपली अवज्ञा होण्याचा प्रसंग आलेला पाहून संतापलेल्या महादेवाच्या तोंडून नकळत शब्द पडले, "सती, यावेळी जर तू गेली तर तुला माझ्या घरात स्थान नाही , जे काही भलेबुरे होईल त्याला तोंड द्यायला तयार रहा. "सती कडे पाठ करून स्मशानवासी महादेव रागारागाने चालले गेले. 
पुढे काय झाले ते सर्वानाच माहिती आहे.माहेरी गेल्यानंतर सतीच्या पित्याने ,दक्षाने तिचा आणि  महादेवाचा अपमान केला.त्यामुळे संतापलेल्या सतीने त्या धगधगत्या यज्ञ कुंडात स्वतःचीच आहुती दिली.पण त्यापूर्वी तिने आपल्या मनातला आक्रोश प्रकट केला. 
"माझं घर कोणतं  ? जन्मदात्यांच्या घरात जिथे मी लाडाकोडात मोठी झाले ते घर माझे नाही ? मुलगी परक्याचा धन म्हणत प्रत्येकवेळी मला लग्नानंतर तुझ्या घरी  तू जा असे सगळे म्हणायचे. पण  इथे येण्याआधी  माझा नवरा मला माझ्या घरात तुला स्थान नाही असे म्हणून मला पाठमोरा झाला. हे घर माझे नाही, ते घरही  माझे नाही . मग माझे घर तरी कोणते ?
जळजळीत नजरेने पित्याकडे बघत तिने अग्नीला प्रणाम केला आणि विनंती केली कि "हे अग्निदेवा, पुढच्या जन्मामध्ये  मला प्रेमळ आणि माझ्या इच्छांचा मान ठेवणारा पिता मिळू दे आणि त्यासोबत मला माझे स्वतःचे हक्काचे घर मिळू  जिथून मला कोणीही परकं करू शकणार नाही."
आणि सतीने देहत्याग केला . 
देवांना तिची विनंती मान्य करावीच लागली. आदिशक्ती होती ना ती ! प्रेमळ अश्या पर्वतराज हिमालयाच्या पोटी पार्वतीने जन्म घेतला. आणि लग्नानंतर महादेव हिमालयाच्या राज्यातच असणाऱ्या कैलास पर्वतावर निवासमान झाले. सासर माहेर एकाच ठिकाणी !
पार्वतीला ते स्थान मिळाले पण सामान्य स्त्रियांचे काय ? सतीचा प्रश्न आजही तसाच वारंवार विचारल्या जातो. कधी प्रकटपणे तर कधी मनातल्या मनात घुसमटत . विवाहित ,अविवाहित कुणीही असो, माझे घर कोणते हे कुठल्याच स्त्रीला आजपर्यंत समजले नाही.
 कायद्याने जरी वाडवडिलांच्या, वडिलोपार्जित  आणि  नवऱ्याच्या  प्रॉपर्टी मध्ये स्त्रीला वाटणी मिळण्याचा अधिकार दिलेला आहे तरी भावनिक दृष्टया आजही तिला हे घर माझेच आहे असे ठणकावून म्हणता येते का ?
एक विनोद आठवला. सासू चिडून सुनेला म्हणते कि मनात येईल तसे वागायला  हे घर काही तुझ्या   आईचे नाही आहे. नीट राहत जा. त्यावर सुनेने सुद्धा प्रत्युत्तर दिले कि हे घर तुमच्या सुद्धा आईचे नाही आहे.तुम्ही पण नीट राहत जा.   
शेवटी निष्कर्ष काय  ? घर ना सासूचे ,ना सुनेचे, ना आईचे ना मुलीचे !
मग घर असते तरी कुणाचे हो ? 
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 
                                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा