सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

धर्म, न्याय आणि कायदा

                                                   धर्म, न्याय आणि कायदा 
काही दिवसांपूर्वी परदेशात राहणाऱ्या एका तरुण  मातेचे  मनोगत वाचले. तिने आपल्या परदेशात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना "भारतीय संस्कृती आणि धर्माची" ओळख व्हावी म्हणून रामायण महाभारत यातल्या गोष्टी सांगितल्या आणि मुद्दाम टीव्ही वर येणारी महाभारत हि मालिका दाखवली. त्यातल्या अनेक प्रसंगाकडे त्या मुलांनी वेगळ्याच दृष्टीने बघितले आणि त्यांच्या त्या बालसुलभ तर्कांवर तिच्याकडे काहीच उत्तर नव्हते. उदा. जेव्हा पांडवांना खांडव वनासारखी  बंजर जमीन आणि जंगली प्रदेश राज्य म्हणून देतात तेव्हा ती म्हणाली कि "अरे रे, काय हि वेळ आली त्यांच्यावर ? तेव्हा तिचा मोठा मुलगा म्हणाला " तू अरे रे का म्हणतेस ? उलट हे तर त्यांच्यासाठी मस्त adventure आहे. challenge आहे. आयतेवायते राज्य मिळवण्यात काय मज्जा ? I would rather prefer creating my own kingdom !
हे ऐकून तिला जे वाटले ते काहीच नाही. पांडव जेव्हा सदेह  स्वर्गारोहण करतात तेव्हा एक मुलगा म्हणाला, " युधिष्ठिराला स्वर्गात का जाऊ दिले ? त्याच्यामुळेच तर त्याचे भाऊ नोकर ( दास ) बनले. द्रौपदीला अपमान सहन लागला. हे चूक नव्हते का ? मला असा राजा नाही आवडला. "
त्या मातेला काय उत्तर द्यावे हेच कळेना. कारण कुठेतरी तिला सुद्धा ते पटले नव्हतेच. पण आईबापांना अश्या अनेक "धर्मसंकटात " टाकणाऱ्या गोष्टी टाळण्याची जी कला अवगत करावी लागते ती तिनेही केलीच होती. काहीतरी  थातुर मातुर उत्तर देऊन तिने त्यांना चूप केले. असे अनेक प्रसंग तिने  सांगितले. तिची विनोदी शैली खूप आवडली. पण लक्षात राहिले ते त्या अबोध  मुलांचे विचार.
वर वर पाहता महाभारत हे हस्तिनापूरच्या राज्यावर अधिकार मिळवण्यासाठी कौरव  आणि पांडवांमधले वैमनस्य,ज्याची अखेर भीषण नरसंहारात झाली त्या युद्धाची कथा आहे असे वाटते. अनेक पाश्चात्य आणि भारतीय लेखकांनी सुद्धा हि कथा एक " जमीनजुमल्याची केस " आहे असे म्हंटले  आहे. पण ते चूक वाटते.
युद्ध घडले कारण  पांडव आणि कौरव  या दोन्ही पक्षांच्या बाजू न्याय्य होत्या.
पांडवांचे म्हणणे होते कि त्यांचे वडील पांडू हे राजा होते. त्यांनी वनात जातांना धृतराष्ट्राला "care taker " म्हणून सिंहासनावर बसवले. त्यामुळे पांडूनंतर  त्याचा मोठा मुलगा हाच खरा उत्तराधिकारी.
कौरवांचे म्हणणे होते कि ज्येष्ठ होणे हाच मापदंड मानला तर मग धृतराष्ट्र खरा ज्येष्ठ होता. आणि पांडू नंतर त्याला राजा हेच नामाभिधान दिल्या गेले होते. त्याला राजा म्हणून निर्णयस्वातंत्र्य दिल्या गेलेले होते.  त्यामुळे दोन्ही मापदंड वापरले तरी दुर्योधन हाच खरा उत्तराधिकारी.
ह्या पेचातून मार्ग काढणे ना सर्वज्ञ अश्या विदुराला जमले, ना कुलश्रेष्ठ अश्या भीष्माला. कृष्णाने पांडवांचा  पक्ष धर्माचा म्हणून त्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला.
इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि "धर्म" हि संज्ञा खूप क्लिष्ट आहे. भारतीय सनातन संस्कृतीमध्ये धर्म म्हणजे न्याय असे नाही. न्याय/नीती हि खूपदा नाण्याची दुसरी बाजू ठरते.
भारतीय आणि ग्रीक/रोमन काव्यांमध्ये साम्य दाखवतांना धर्म म्हणजे justice असा जो तर्क केला आहे तोच मुळात चूक वाटतो. कारण धर्म म्हणजे न्याय असा जर अर्थ केला तर धृतराष्ट्राची  बाजू योग्य वाटते. त्याच्या  अंधत्वामुळे त्याला ज्येष्ठ असून राज्याभिषेक केला नाही. पण पांडूच्या निधनानंतर मात्र त्यालाच राजा म्हणून स्वीकारले. का बरे ? तेव्हा तो अंध नव्हता का ? त्याच्या मोठ्या मुलाला राज्यपद देणे हे न्यायसंगतच होते.
द्रौपदीवर जेव्हा जेव्हा अपमानाचे प्रसंग आले, तिच्या अब्रूवर धावा झाला तेव्हा तिचे पाचही शूर म्हणवणारे पती तिचे रक्षण करू शकले नाही. त्यांचे वागणे पतिधर्माला सुसंगत होते का ? नाही. तो अन्याय नव्हता का ?
दुर्योधनाचा वध करण्यासाठी त्याच्या जांघेवर प्रहार केले गेले जे मुष्ठी युद्धाच्या नियमांमध्ये निषेधित आहे.
निशस्त्र कर्णाचा वध सुद्धा युद्धशास्त्राच्या नियमांविरुद्धच आहे.
भीमाने आणि अर्जुनाने  नियम / कायदा पाळला का ? नाही.
असे अनेक प्रसंग आहेत जिथे अनेक व्यक्तींवर अन्याय झालेला आहे. पण धर्माची बाजू म्हणून त्या कृतींचे समर्थन केल्या गेले आहेत. यामागे एकच कारण आहे.
धर्म म्हणजे समाजाच्या हिताच्या उद्देश्याने केलेल्या कृती. व्यक्ती पेक्षा समष्टी नेहमीच जास्त महत्वाची मानल्या गेली आहे. पांडवांनी तर वारणावतचे राज्य नम्रपणे स्वीकारले होते. आणि स्वकर्तृत्वाने  ते विस्तृत देखील केले. राजसूय यज्ञ करून त्यांनी त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली. पण मत्सरी कौरवांना ते सहन झाले नाही. त्यांनी द्यूत क्रीडेमध्ये त्यांना हरवून त्यांचे सगळे काही  बळकावले आणि पुन्हा त्यांना देशोधडीला लावले. द्यूतक्रीडा हि जरी द्वापारयुगातल्या राजधर्माला मान्य होती तरी सुद्धा त्यामागचा हेतू  हा पारमार्थिक  नसून पूर्णपणे स्वार्थाने बटबटलेला होता. आणि म्हणूनच कौरवांची बाजू धर्माची नव्हती असेच सगळ्यांना वाटले.
हिंदू धर्मामध्ये  बदल  होत आलेत, होतील हि. ज्या गोष्टी त्रेता युगात धर्म संमत नव्हत्या त्या द्वापार युगात धर्म म्हणून  प्रचलित झाल्या. कलियुगात त्यात आणखीन बदल घडले.
धर्म,न्याय,रूढी आणि  कायदा या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यांना एकाच पारड्यात तोलता येत नाही. ज्या गोष्टी धर्मसम्मत आहेत त्या कायद्याला स्वीकार असतीलच असे नाही. काही कायदे हे न्याय्य ठरतीलच असेही नाही. धार्मिक नियम आणि रूढी परंपरा यामध्ये खूपदा तफावत दिसून येते. उदा. स्त्रीला शिकवू नये हि रूढी प्रचलित होती. पण प्रत्यक्षात हिंदू धर्मात असे कुठेच म्हंटलेले नाही. सीता आणि अनेक ऋषीकन्या वेदशास्त्र पारंगत होत्या. गुरुकुलामध्ये सुद्धा मुलंमुली दोघेही एकत्रच शिकत असत. तशी वर्णने सुद्धा काव्यांमध्ये आहेत.
नरबळी आणि पशुबळी हि संकल्पना वेदकाळात प्रचलित होती. पण विश्वमित्र ऋषींनी त्या दोन्हीचा निषेध केला. विरोध केला. आणि त्या अन्यायी प्रथा बंद झाल्या. धर्माने सुद्धा हा बदल स्वीकारला. नरबळी देणे हे पाप समजल्या जाऊ लागले.
सामाजिक हितासाठी कालानुरूप बदल स्वीकारणे, नवीन नियम लागू करणे, जुन्या नियम रूढींचा त्याग करता येणे हा हिंदू धर्माचा सगळ्यात महत्वाचा भाव आहे. देवांनी जे अवतार घेतले त्यात सुद्धा म्हणूनच उत्क्रांती चे सिद्धांत दिसून पडतात. धर्म कठोर वाटतो कारण मनुष्य प्राण्याला नियमांचे बंधन झुगारून मनस्वीपणे जगता येण्याचे आकर्षण असते. पण असे घडले तर समाजात अनाचार घडेल. हिंदू धर्म कट्टर नाही. तो लवचिक आहे . म्हणूनच त्यात समाजाच्या आणि काळाच्या गरजांप्रमाणे स्थित्यंतर घडत आले. पुढेही घडत राहिल.
आणि त्याचमुळे  हिंदू धर्म हा शाश्वत आहे.
" धर्मो रक्षति रक्षित: I
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

नाण्याची दुसरी बाजू

                             नाण्याची दुसरी बाजू 
मी आणि माझी ताई लहान असल्यापासून आई,बाबा आणि आजोबांसोबत अनेक विषयांवर चर्चा,वाद,विवाद करायचो. अनेक वेळा आई आमच्या मुद्द्याच्या विरुद्ध मुद्दा मांडायची. खूपदा तिचे स्वतःचे मत आमच्या सारखेच असून सुद्धा ! जेव्हा आम्ही याबद्दल तिला विचारायचो,तिचे एकच वाक्य असायचे. " तुम्हाला दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करण्याची सवय व्हावी म्हणून असे करते. वादे वादे तत्व जायते बोध: !
त्या अनेक चर्चा आणि वाद यामधून आम्ही घडत गेलो, स्वतःने विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाच्या भल्याबुऱ्याची जबाबदारी घेण्याची सवय लागली. वाचनाने विविध विषय समजू लागले. घरी  वेगवेगळ्या केसेस पाहणारे तीनवकील लोक आणि त्यांचे असंख्य प्रकारचे पक्षकार, वटवृक्षाप्रमाणे विस्तृत कुटंब, वैद्यकीय व्यवसायात बघायला मिळालेले रुग्ण आणि आजूबाजूला दिसणारे लोक यांचे अवलोकन करण्याची संधी मिळाली.
माझे हे लिखाण नाण्याची दुसरी बाजू बघण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत तशीच का वागली हे किंवा काही रूढी,समज तसेच का झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. कुणाच्या धार्मिक  भावना दुखवायच्या नाही. धर्मावर भाष्य नाही करायचे. ( तेव्हढी पात्रता नाही माझी!). सनातन धर्म महान आहे. त्यातले सूक्ष्मातिसूक्ष्म तत्व समजून घेणे कठीण आहे. रामायण महाभारत यासारखे ग्रंथ हे प्रत्येक वेळी नवीन, वेगळेच काही तरी सांगून जातात. त्याचमुळे त्यांची अनेक संस्करणे झालेली आहेत.कितीतरी कथा, उपकथा आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत.अनेक विद्वानांनी महाभारत त्यांना जसे दिसले, आकलन झाले तसे सांगितले आहेत. अनेक मतमतांतरे आहेत. सगळेच काही माहिती नाही.कदाचित त्याचमुळे पुढेमागे आत्ताचा दृष्टिकोन बदलू पण शकतो.
हे लिखाण माझ्या आई बाबा आणि आजोबांना अर्पण करते !
- पूर्णिमा देशमुख पुरेकर 

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

कटकट केसांची

कटकट केसांची 
केसांबद्दल ममत्व कुणाला नसते ?
केसांच्या बाबतीत स्त्री असो वा पुरुष, अतिशय दक्ष असतो.
ज्याचे केस कुरळे असतात त्याला सरळ केस हवे असतात, अन ज्याचे सरळ असतात त्याला कुरळे !
कुणाला छोटे केस आवडतात तर कुणाला लांबसडक !
केसांबद्दल कितीतरी समज आणि गैरसमज आहेत.
काही लोक जन्मानंतर लगेच काही महिन्यांनी जावळे काढून " अशुद्ध" केस काढून टाकावे असे मानतात. आणि तेच केस त्या नंतर मात्र कापणे निषिद्ध मानतात.
केस आणि नख कापणे हे स्नान करून शरीरशुद्धी करण्याप्रमाणेच शुचितेचे लक्षण मानतात.
पण मग तोच नियम श्रावण, नवरात्र आणि काही तिथीना का लागू होत नाही?
पहिलेचा काळ वेगळा होता. नख कापणे, दाढी करणे, केस कापणे हे घरात होत नव्हते. बाहेर जाऊन करावे लागायचे. त्यात वेळ जायचा. म्हणून ज्यांना कुठली धार्मिक उपासना करायची आहे त्यांनी तो वेळ त्यासाठी वापरावा आणि बाह्य रुपाकडे लक्ष देण्यापेक्षा अंतर्मुख होऊन साधना करावी म्हणून ह्या दिवसांमध्ये नख-केस कापणे,दाढी करणे ह्या गोष्टी करत नव्हते. पण स्नान करणे तर अनिवार्यच आहे. मग तेव्हढाच निषेध का बरं ? तुम्ही स्वछ, शुचिर्भूत होऊनही उपासना करू शकताच कि !
केसांच्या बाबतीत एक विरोधाभास आहे. जरा कुठे एक पांढरा केस दिसला,लगेच काळजाचा ठोका चुकतो. माणसाला "आम्हाला पण काही ज्ञान आहे हो, उगीच नाही काळ्याचे पांढरे झाले " असे म्हणायचे तर असते, पण ते पांढरे झालेले केस दाखवायचे पण नसतात. मोठेपणा तर हवा पण म्हातारपण नको असते. आणि त्याचमुळे अनेक केशकलापांचे पेव फुटले आहे.
या बाबतीत विदेशी लोकांचे बरे असते. तिकडे केसांचे अनेक रंग असल्यामुळे ह्या सगळ्या भानगडीच नसतात. पण त्यातही केसांच्या रंगावरून स्वभाव आणि बुद्धी चे गैरसमज आहेतच. उदा. "as dumb as blonde" असे वाक्प्रचार त्यातूनच आलेत.
काहीही असले तरी एकवेळ केस तुटतील पण केशप्रेमाचा पाश तुटता तुटत नाही, हेच खरे.


-पूर्णिमा देशमुख पुरेकर


रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

दक्ष प्रजापती - कठोर पालक ; प्रेमळ पिता

                  दक्ष प्रजापती - कठोर पालक ; प्रेमळ पिता 
" प्रसूति , माझ्या मुलीला,सतीला, योगनिद्रेतून बाहेर काढण्यासाठी मी माझ्या सगळ्या शक्ती तिला देईन. पण तिला मी वाचवेन. " दक्षाचे बोलणे ऐकताच दक्षपत्नी दचकली.
"स्वामी, तुमच्या शक्ती गेल्या तर तुमचे सृष्टी नियंत्रित करण्याचे कार्य तुम्ही कसे करणार ? प्रजापतीच राहणार नाही तर प्रजेचे पालन कोण करणार ? "
सतीला वाचवण्यासाठी  मी काहीही करू शकतो,प्रसुति. त्या अघोरी संन्यासी शिवाचा स्पर्श सुद्धा माझ्या मुलीला होऊ देणार नाही. मी एक सामान्य पिता बनून राहीन पण हे होऊ देणार नाही. "
योगसमाधीत मग्न शिवाचे नेत्र खाडकन उघडले. अंतर्मनातून तीव्र निषेध व्यक्त झाला. " नाही, हे होता कामा नये."
दक्ष आपल्या सगळ्या शक्ती घेऊन सतीच्या दालनात जाऊ लागला. आणि क्षणार्धात प्रत्यक्ष शिवशंभू सतीच्या दालनात प्रकट झाले आणि त्यांनी सतीच्या भ्रूमध्याला स्पर्श केला. सती योगनिद्रेतून जागी झाली. महादेवाला पाहून हर्षित झाली. तिला वाटले कि शिव फक्त तिच्यासाठीच आले. पण तिचा भ्रम दूर करण्यासाठी महादेव म्हणाले,
" सती, वसंतोत्सवामध्ये तू मला नृत्यासाठी आमंत्रित केले, मी आलो, पण माझ्या स्पर्शाने तू योगनिद्रेत चालली गेलीस. केवळ माझ्या पुनःस्पर्शानेच तू त्यातून बाहेर येऊ शकत होतीस. पण तुझ्या पित्याला हे मान्य नव्हते. त्यासाठी त्याने आपल्या सगळ्या शक्ती तुला देऊन तुला वाचवायचे ठरवले. असे झाले असते तर दक्ष  " प्रजापती " न राहता एक सामान्य पिता राहिला असता. त्यामुळे सृष्टी अनियंत्रित झाली असती. असे होऊ नये म्हणून मी इथे त्वरेने आलो. दक्ष प्रजापतीचे पद अबाधित ठेवण्यासाठी मी इथे आलो. सती , यापुढे तू मला बोलावू नकोस. तुझ्या पित्याच्या आदेशांचे पालन करण्यातच तुझे भले आहे. "
एव्हढे बोलून शिव तिथून अंतर्धान पावले. तेवढ्यात दक्ष तिथे आपल्या शक्ती घेऊन आला. पण सतीला जागृत झालेले पाहून चकित झाला. सतीने त्याला सगळं सांगितले. पण दक्ष क्रोधीत झाला. त्याला वाटले कि शिवाने त्याचा पाणउतारा करण्यासाठीच मुद्दाम असे केले. शिवप्रति त्याचे शत्रुत्व अजूनच तीव्र झाले.
पुढची कथा तर माहितीच आहे.
इतके वर्ष मी "दक्ष प्रजापती " कडे नकारात्मक नजरेनेच बघत आले. एक अहंकारी, आत्मकेंद्री, शिवाचा कट्टर शत्रू या दृष्टीनेच त्याला पाहत होते.कथा कहाण्या आणि सिरिअल्स मध्ये सुद्धा त्याचे तसेच रूप दाखवले जाते. शिव आणि सतीच्या लव स्टोरी मधला villain !
पण काही दिवसांपूर्वी देवोंके देव महादेव  सिरीयल बघितल्या गेली आणि मग दक्ष प्रजापती या व्यक्तीरेखेकडे बघण्याची नजर बदलू लागली.
खरं म्हणजे शिव आणि दक्ष यांचे वैमन्यस्क हे व्यक्तिसापेक्ष नसून विरुद्ध विचारसरणी मधली तफावत आहे असे वाटते.
शिव हा कुठल्याही नियमबद्ध चाकोरीच्या बाहेर राहणारा ; स्मशानवैरागी ! तर दक्षाची निर्मिती हीच मुळात सृष्टीला एका नियमबद्ध चाकोरीत नियंत्रित करण्यासाठी झालेली. समाजाला एक शिस्त लावण्यासाठी, प्रजेला अनाचार,स्वैराचार यापासून दूर ठेवून समाजाला विकसित करण्यासाठी, मानवाला पशुच्या श्रेणीतून बाहेर काढून सभ्य, सुसंस्कृत करण्यासाठी दक्ष प्रजापतीने नियमावली तयार केली. ज्या प्रमाणे मनुस्मृती मध्ये सामाजिक हितासाठी कायदे , नियम सांगितले आहेत त्याचप्रमाणे दक्षाने सुद्धा सामाजिक हितार्थ नियम बनवले.
"दक्ष " या नाव प्रमाणेच तो प्रजेच्या हितासाठी दक्ष आणि सक्षम होता.
दोन भिन्न पण परस्पर पूरक अश्या विचारसरणी मधला विरोध शिव आणि दक्षाच्या बाबतीत घडतो.
दक्ष राजा होता. त्याला अनेक मुले आणि मुली होत्या. ( मुलींच्या संख्यांमध्ये मतभेद आहेत). सती आणि शिवाच्या मिलनाला त्याचा विरोध याच विचारसरणीच्या भिन्नतेमुळे झाला असे वाटते. धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही पण विवाह होण्यापूर्वीचा शिव हा तथाकथित सामाजिक सभ्यतेच्या रिंगणाला छेद देणारा असा, गृहस्थाश्रमाचा आधार असलेल्या माया,मोह, ममत्व, सौम्यत्व, प्रजोत्पत्तीची इच्छा या भावना नसलेला असा वैरागी, विचित्र वेशभूषा करणारा म्हणून प्रसिद्ध होता. न्यायनीती यांचे पालन करणारा दक्ष अश्या विरक्त व्यक्तीसोबत आपल्या राजसी, लाडाकोडात वाढलेल्या कन्येचा विवाह कसा काय लावून देणार ?
इथे एक सामान्य पिता मला दक्षामध्ये लपलेला दिसतो. अहंकारी जरी असला तरी आपल्या कन्येला काही त्रास होऊ नये म्हणून तिला जपणारा पालनकर्ता दिसतो. मुलीला "चांगले " स्थळ मिळावे म्हणून जोडे झिजवणारा बाप आजही दिसतो. दक्षसुद्धा तेच करत होता.
वर उल्लेखित प्रसंगात दक्ष सतीला वाचवण्यासाठी जेव्हा आपल्या शक्ती तिला देऊन देण्यासाठी तयारी करतो तेव्हा ब्रह्म सुद्धा त्याला अडवतांना  म्हणतात कि या शक्ती तुला समाजाच्या हितासाठी दिलेल्या आहेत. तू त्यांचा वापर स्वार्थासाठी का करतोस ? " तेव्हा दक्ष म्हणतो कि माझी कन्या हि सुद्धा या समाजाचाच एक अंश आहे. एक प्रजापती म्हणून आणि पिता म्हणून मी तिला माझ्या शक्ती दिल्या तर त्यात काय चूक ? मी प्रजापती नाही राहिलो तरी चालेल, माझ्या जागी दुसरा प्रजापती निर्माण करा पण सतीचा पिता म्हणून मी तिचे रक्षण करणारच !
आपल्या मुलीवर निरतिशय प्रेम करणारा एक पिताच एवढा मोठा त्याग करू शकतो. आपल्या पदाचा अहंकार असता तर त्याने असे केले असते का ?
चंद्र , रोहिणी आणि इतर २६ दक्षकन्या यांच्या वेळी हाच दक्ष एक कठोर शासक आणि पिता या दुहेरी भूमिकेत दिसतो. आपल्या इतर मुलींवर अन्याय झालेला बघून, चंद्राला ; प्रत्यक्ष आपल्या जावयालाच शिक्षा देण्याची धमक दाखवतो.
चंद्राने जरी दक्षाच्या २७ मुलींसोबत विवाह केला तरी तो फक्त रोहिणी सोबतच रममाण झालेला होता. अन्य बायकांकडे तो लक्षच देत नव्हता. जेव्हा त्या मुलींनी पित्याकडे तक्रार केली तेव्हा दक्षाने चंद्राला समजावले. पण चंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी दक्ष चिडला. इथेही अनेक कथांमध्ये दक्षाला " खलनायक " म्हणून दाखवतात. पण गृहस्थाश्रमाच्या आणि विवाह संस्कारांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चंद्राला जर त्याने तसेच सोडून दिले असते तर समाजात एक चुकीचा पायंडा पडला असता. "प्रजापती" या  नात्याने तसे करणे त्याला शक्य नव्हते. एकदा लग्न लावून दिले कि झाले मग तू मुलीला कसेही वागव, मला त्यात काही बोलण्याचा अधिकार नाही असे दक्ष म्हणत नाही. मुलगी परक्याचे  धन असल्या भंपक कल्पना दक्ष बाळगत नाही. इथे तो न्याय करतो आहे ते नवऱ्याने अन्याय करून, उपेक्षित करून, " टाकून " दिल्या सारख्या              " पत्नी " च्या बाजूने. पण मूळ कथा सांगतांना ,शिवाचे महत्व अधोरेखित करता करता चंद्राचा अपराध बाजूलाच पडतो. प्रत्यक्ष महादेव सुद्धा चंद्राला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावीच लागेल असे सांगून, शरण आला म्हणून त्याला डोक्यावर धारण करून शापाची तीव्रता कमी करण्यासाठी १५ दिवस क्षय होऊन १५ दिवस वृद्धी होईल असा उशाप देतात.
मला इथे अनायासच राजा जनकाची आठवण आली. सीतेचा त्याग केल्यानंतर ना सीता वापस आपल्या माहेरी गेली ना तिने आत्मत्याग केला.
उत्तर रामचरितमध्ये कौसल्या नेहमी चिंतेत दाखवली आहे कि सीतेवरच्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी जनक अयोध्येवर आक्रमण करेल का. पण असे काही घडत नाही. जनकाने तिला शोधण्याचा किंवा रामाला जाब विचारण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पण तरी कथा पुराणांमध्ये जनक " आदर्श " राजा म्हणून ख्याती पावला. आणि मुलीवरच्या अन्यायाविरुद्ध बोलणारा दक्ष मात्र " रागीट, अहंकारी राजा" म्हणून बदनाम झाला.
         काही लेखक दक्ष प्रजापती नियमबद्ध, प्रतिगामी लोकांचे प्रतीक म्हणून तर शिव हा  बंधन झुगारून नवीन मार्ग निर्माण करण्याऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून दाखवतात.पण असे असले तरी एक विसरतो कि शिवाने सुद्धा प्रजापती चे महत्व मान्य केले आहेच. मनुष्याच्या मूळ प्रवृत्तीला नियम झुगारून मनस्वी जगणे जास्त आकर्षक वाटते. पण व्यक्ती आणि समष्टी या दोहोंपैकी सगळ्याच धर्मानी समष्टी जास्त महत्वाची मानली आहे. मनुष्यच काय तर झुंडीत राहणारे इतर प्राणी सुद्धा आपल्या कळपाचे नियम पाळतात. प्रमुख प्राणी कळपाचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी स्वतःचे प्राण सुद्धा देतो.
     दक्षाचा अहंकार त्याच्या नाशाचे कारण ठरला. पण समाजाच्या कल्याणासाठी त्याला पुन्हा जीवन देणे अपरिहार्य होते. म्हणूनच दक्षाचा शिरच्छेद केल्यानंतर सर्व देवांनी महादेवाला विनंती केली आणि म्हणूनच शिवाने बकऱ्याचे शीर लावून दक्ष पुनर्जीवित केला.
आजही कुठल्याही धार्मिक विधी मध्ये "प्रजापती " ला मान आहे. त्याचा हविर्भाग अनिवार्य आहे. कारण अहंकार विहीन, प्रेमळ तरी न्यायी अश्या  " प्रजापती" चे संरक्षण व्यक्ती आणि समाज सगळ्यांनाच हवे असते.
    शेवटी कठोर असले तरी " वडील " ते  "वडील" च असतात. त्यांची माया दिसत नसली तरी त्या मायेची उब सदैव आपल्या भोवती असते. प्रजापती दक्ष मला त्याच प्रेमळ बापा सारखा वाटतो.
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

कोजागिरी पौर्णिमा आणि भुलाबाई

कोजागिरी पौर्णिमा आणि भुलाबाई ! अनेक आठवणी आज नेहमी प्रमाणे फेर धरून नाचत आहेत.  दुपार पासून रांगोळी आणि भुलाबाई ची सजावट करणे, स्वतः छान  तयार होईपर्यंत संध्याकाळ व्हायची. बाबा आम्ही मोठ्या झालो तरी सुद्धा आमच्यासाठी आणि आमच्या साळकाया साठी किती प्रकारचे चॉकलेट्स आणि बिस्किट्स आणायचे, आई भुलाबाईच्या खिरापती साठी अनेक पदार्थ बनवायची. आपल्या कडची खिरापत वेगळी व्हायला हवी यासाठी आम्ही कितीतरी खटाटोप करायला लावायचो तिला. अर्थात आईला स्वतःलाच पदार्थ बनवायची हौस आहेच. आमचे लग्न झाल्या नंतर सुद्धा ती अजूनही भुलाबाई साजरी करतेच.
    आज आठवते ते घरोघरी भुलाबाई चे गाणे म्हणत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हिंडणे. तेव्हा खाल्लेल्या मटकीच्या  उसळीची आणि चिवड्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. कोणी प्लिज ते सगळे पार्सल करेल का ?
  सगळीकडे खादाडी करून आल्यानंतर आजोबा, बाबा, आई ,ताई आणि मी गच्चीवर जायचो. ते वातावरण तर मी कधीच विसरू शकत नाही. बाबा संध्याकाळीच गच्चीवर पाणी टाकून, पाणी सुकल्यानंतर सतरंजी टाकून ठेवायचे. ती थंड सतरंजी, चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश, चांदण्यांसारखीच फुललेल्या चमेलीचा सुगंध , आटवलेले दूध, त्यात चंद्र दिसतो का हे बघणे, आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या शेंगा, गूळ मीठ  खात गप्पा मारणे आणि विविध भरती वरची गाणी ऐकणे  हे सगळे कसे विसरणार ?
 पंचतारांकित हॉटेल मध्ये सुद्धा हा साधा भोळा आनंद मिळणार नाही. आज ते सगळेच स्वरूप बदलले. भुलाबाई ची गाणी मुलींना माहितीच नाही. शाळा आणि ट्युशन ,परीक्षा आणि मोबाइल मध्ये गुरफटलेल्या लहानग्यांना भुलाबाई साठी वेळ नाही. कोजागिरीच्या चांदण्यांचा आवाज डीजे च्या कर्कश्श कल्लोळात बुजून गेला. आटवलेले दूध नो फॅट डाएट च्या नादात वाटी चमच्या पुरतेच राहून गेले.
  माझ्या सारख्या अनेकांच्या मनात उरल्या फक्त त्या आठवणी.
- पूर्णिमा देशमुख पुरेकर 

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

शिखंडीची घुसमट

स्त्री किंवा पुरुष नव्हे तर "योद्धा" म्हणून माझे नाव का नाही घेत ? - शिखंडीची घुसमट 
  महाभारतकालीन आणि त्या पूर्वीच्याहि समाजामध्ये नपुंसक मनुष्यांबद्दलचा दृष्टीकोण आजच्या पेक्षा फारच प्रगल्भ होता. तसे तर एकूणच लैंगिक संबंधांबद्दल, स्त्री पुरुषांच्या विविध नात्यांचा धर्माने उल्लेख केला आणि त्यांना संमती सुद्धा दिली होती . नियोग पद्धती, स्त्रीचा पुनर्विवाह, बहुपतित्व , पत्नीच्या विवाह पूर्व संततीला विवाहानंतर पतीने स्वीकारणे हे सगळे धर्मसम्मतच होते.
परंतु कलियुगात मात्र जिथे स्त्री बद्दलच पुरुषप्रधान समाजाने अनैसर्गिक, अमानवी आणि अन्यायी नियम धर्माच्या नावाखाली सर्रास सर्वमान्य केले तिथे "नपुंसक" असलेल्या समाजाच्या एका छोट्याश्या समुदायाबद्दल अत्यंत हिडीस आणि अमानुष धारणा पसरवल्या गेल्या त्यात नवल ते काय ?
महाभारतातल्या शिखंडीची घुसमट यापेक्षा वेगळीच आहे. अंबेचा शिखंडी होण्यापर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण काही गोष्टी अश्या आहेत ज्या एकतर हेतुपुरस्सर सांगितल्या गेल्या नाहीत किंवा तेव्हढ्या महत्वाच्या वाटल्या नाहीत.
१. शिखंडीच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झाली कि या "मुलीचे " संगोपन "मुलाप्रमाणे " करावे. त्या प्रमाणे द्रुपद राजाने शिखंडीला सर्वोत्तम असे  अस्त्र -शस्त्र  ज्ञान , युद्धकौशल्य आणि क्षात्रधर्म शिकवला. शिखंडी उत्तम योद्धा होता.
२. शिखंडीचे लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री जेव्हा त्याच्या पत्नीला त्याचे सत्य कळले तेव्हा ती घाबरून चिडून आपल्या पित्याकडे वापस गेली. ती दशार्ण देशाचा  राजा हिरण्यवर्ण याची मुलगी होती. राजाने संतापाने द्रुपदावर आक्रमण करण्याचे ठरवले. यामुळे अपमानित आणि व्यथित होऊन  शिखंडी आत्महत्या करण्यासाठी जंगलात  गेला. तिथे "स्थुन कर्ण " नामक यक्षाने त्याच्यावर दया करत शिखंडीला त्याच्या मृत्यूपर्यंत  त्याला पौरुषत्व दिले. शिखंडी मेल्यानंतर यक्षाला त्याचे पौरुषत्व वापस मिळाले.
३. पौरुषत्व मिळाल्यानंतर शिखंडी पत्नीकडे गेला. त्यांचे वैवाहिक जीवन सुरु झाले. त्याला एक पुत्रही झाला.
४.  महाभारताच्या युद्धाच्या वेळेपर्यंत शिखंडीचे " पौरुषत्व  " सिद्ध  झालेले होते. युद्धाच्या सुरुवातीलाच जेव्हा युद्धाचे नियम ठरवल्या गेले तेव्हाच कोण वीर कोणाकडून लढणार याची यादी ठरत असे.ती यादी शत्रुपक्षाला सुद्धा दिल्या गेली होती. शिखंडी पांडवांकडून लढणार हे पक्के झाले तेव्हा त्याबद्दल कोणीच आक्षेप घेतला नाही.
त्यामुळे भीष्मांना धारातीर्थी पाडण्यासाठी शिखंडीला जेव्हा उभे केले तेव्हा त्यावेळी भीष्मांना आक्षेप घेण्याचा काहीएक अधिकार नव्हता. त्यातही भीष्माचा भाऊ "विचित्रवीर्य " नावाप्रमाणेच  संतति उत्पन्न करण्यास असमर्थ होता, खुद्द पांडू सुद्धा तसाच होता. हे दोघे केवळ पुरुष म्हणून जन्माला आले म्हणून  त्यांचे योद्धा असणे भीष्माने स्वीकारले ? आणि स्त्री म्हणून जन्माला येऊन लिंग परिवर्तन करून पुरुष झालेल्या शिखंडीला तो मान का नाही दिला ?
युद्धाचा नववा दिवस उगवला. आत्तापर्यंत भीष्मांनी पांडवांच्या सेनेचा चांगलाच दारुण पराभव केला होता. विजयाचे पारडे कौरवांकडे झुकत होते. त्यातच अर्जुनाने " मी भीष्म आणि द्रोणाचार्यांवर बाण चालवणार नाही असे जाहीर केले. कृष्ण चिडला. भीष्मांना धारातीर्थी पडणे अत्यावश्यक होऊन बसले होते. कृष्णाने शिखंडीचे नाव सुचवले.
" पण शिखंडी स्त्री आहे , भीष्म एका स्त्रीसोबत युद्ध करणार नाही . हे धर्मसम्मत नाही. " युधिष्ठिराने तात्विक वाद केला. ( इथे प्रश्न पडतो कि हि बाब ९ दिवसापर्यंत युधिष्ठिराने सोयीस्करपणे दुर्लक्षित का केली ? म्हणजे असे होते का कि नऊ दिवस शिखंडी लढलेला चालला पण त्या दिवशी नाही ? )
" कुठला धर्म असे म्हणतो ? आणि धर्माची गोष्ट करायची तर भीष्मांने कुठला  धर्म पाळला ? धर्म म्हणतो कि २ पिढ्या पाहून झाल्यानंतर व्यक्तीने वानप्रस्थ स्वीकारावा.गृहस्थ धर्माचा त्याग करावा. निवृत्ती घ्यावी. पण भीष्माने  पित्याच्या स्त्रीमोहासाठी स्वतः ब्रह्मचारी राहून धर्माचा नियम तोडला. त्याला इच्छामरणाचे वरदान दिले तरी तो चार चार पिढ्या  बघे पर्यंत जिवंत राहिला. असे करून त्याने पृथ्वीवर भार  टाकला. त्याच्या या कृत्यामुळेच पुढचा सगळा नाट्यक्रम घडला. भीष्माचा अंत व्हायलाच हवा.  " कृष्णाने युधिष्ठिराला सुनावले.
ठरल्याप्रमाणे शिखंडी रथावर आरूढ झाला. प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच त्याचे सारथ्य केले. शिखंडीच्या मागे अर्जुन सज्ज होता. भीष्मांनी शिखंडीला बघितले  तेव्हा ते संतापले.
"कृष्णा , तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी एका स्त्रीला सामोरे केलेस ? मी स्त्री सोबत लढणार नाही. हा धर्म नाही. "
" धर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडी शोभत नाहीत पितामह भीष्म. तुम्हाला शिखंडी मध्ये एक स्त्री दिसते आहे जी पूर्वजन्मी अंबा होती. पण मला मात्र इथे एक मनुष्य  दिसतो आहे ज्याने पुत्राला जन्म देऊन आपले "पौरुषत्व" सिद्ध केले आहे. तुमच्या समोर एक योद्धा उभा आहे, युद्ध करा." कृष्णाने आव्हान दिले.
"नाही. हे धर्माला अनुसरून नाही. मला हे पटत नाही ! " भीष्मांनी प्रतिवाद केला.
" तुम्हाला पटत नाही ? तुमचे मत आहे म्हणून तो धर्म ठरत नाही भीष्म पितामह. आजपर्यंत कितीदा तुम्ही कुरुकुलाचा वंशविस्तार करण्यासाठी अधर्माची कास धरलेली आहे ? तुमचा भाऊ "विचित्रवीर्य" जो स्वतःच नपुंसक होता त्याच्या साठी तुम्ही ३ राजकन्यांचे बळजबरीने अपहरण केले. तो धर्म होता का ? त्या नंतर हि चार चार पिढ्या होईपर्यंत तुम्ही एखाद्या जळवा प्रमाणे जिवंत राहिले. निवृत्ती घेतली नाही ते धर्माला  अनुसरून होते का ? तुमच्याच कुळातल्या एका सुनेवर अत्याचार होत असतांना तुम्ही चूप राहिले, स्वतःचे क्षत्रियत्व विसरले , तेव्हा कुठे होता तुमचा धर्म ? युद्ध करा नाहीतर माघार घ्या. " कृष्णाची वाणी कडाडली.
"मी लढणार नाही. मी शस्त्र खाली ठेवतो. " भीष्मांनी युद्ध टाळण्यासाठी शस्त्र ठेवले.
" शिखंडी , अर्जुना , धनुष्य उचला, बाण चालवा. या वृद्ध मनुष्याला ठार करा. "
"पण कृष्णा , ते माझे पितामह आहे. वडीलधारे आहेत." अर्जुनाने पुन्हा कच खाल्ली.
आता मात्र कृष्णाचा संयम सुटला. त्याने अर्जुनाला निर्वाणीचा इशारा दिला.
" अर्जुना , हे युद्ध ना पिता पुत्रांचे आहे ना स्त्री पुरुषांचे . हे युद्ध आहे धर्म-अधर्माचे . धर्म म्हणजे समान न्याय. धर्मासमोर स्त्री असो पुरुष असो किंवा नपुंसक असो, सगळे समान असतात. धर्माचे पालन म्हणजे अंगी इतरांबद्दल करुणा , सहृदयता असणे. भीष्माच्या अंगी ती आत्ताही नाही आहे. शिखंडीकडे एक  योद्धा म्हणून न बघता ते अजूनही एक नपुंसक म्हणूनच बघत आहेत.
योद्धा कुणीही असू शकतो अर्जुना .  युद्धभूमी स्त्री पुरुष असा भेद करत नाही. असे असते तर प्रत्यक्ष 
 "आदिशक्ती " असुरांचा नाश करण्यासाठी युद्ध भूमीत उतरली नसती. सत्यभामाने नरकासुराचा वध केला नसता. शिखंडी , ज्या भीष्मामुळे अंबेच्या आयुष्याचे दशावतार झाले त्या भीष्माला मार , चालव बाण. "
शिखंडीने बाण चालवले. असे म्हणतात कि शिखंडीच्या बाणांनी भीष्माला काहीच झाले नाही. अर्जुनाच्या बाणांमुळे ते धारातीर्थी पडले.कदाचित हे शिखंडीचे महत्व कमी करण्यासाठी, अर्जुनाला वीर ठरवण्यासाठी आणि भीष्मांचे अजेयत्व सिद्ध करण्यासाठी कोणीतरी घुसडवले आहे असे वाटते.
भीष्म तसेही कुणाच्या बाणांनी मरणार नव्हतेच. त्यांची इच्छा होईल तेव्हाच त्यांचा मृत्यू होणार होता. बाण, मग ते कुणाचेही असो, निमित्तमात्र होते.
भीष्म खाली पडले पण पृथ्वीने त्यांचा स्वीकार केला नाही कारण त्यांनी इतके वर्ष जगून निसर्गा विरुद्ध वर्तन केले होते. स्वर्ग त्यांना स्वीकारत नव्हता कारण त्यांनी लग्न करून संतानोत्पत्ती केली नव्हती. पितृऋण फेडले नव्हते. महायोद्धा भीष्म त्रिशंकू अवस्थेत ६ महिने खितपत पडले. त्या महान क्षत्रिय कुरुश्रेष्ठाचा मृत्यूसुद्धा वीरोचित झाला नाही.
शिखंडी मुळे विजयाचे पारडे पांडवांकडे झुकले. शिखंडीचा वध अश्वत्थामाने तो  झोपेत असतांना केला.
आजही शिखंडी सारखेच अनेक आहेत जे स्त्री पुरुष भेदाच्या सीमारेषेवर जगत आहेत. समाज त्यांना तिरस्कृत करतो. का ? असे अनेक आहेत जे या भेदाच्या पलीकडे जाऊन अनेक भूमिका यशस्वीपणे निभावत आहेत. नोकरी व्यवसाय करण्यात अग्रेसर आहेत. पण कित्येकांना आजही समाज भयाने आपले "sexual  orientation लपवून ठेवावे लागते.
खरेतर कुणाच्या लैंगिक प्रवृत्ती कश्या आहेत ही ज्याची  त्याची  "खाजगी " बाब आहे. जो पर्यंत कुणाच्या या प्रवृत्ती मुळे अन्य व्यक्तीला त्रास होत नाही आहे तो पर्यंत समाजाला त्यात दखल देण्याची काहीच गरज नाही.
कलम ३७७ रद्द झाले. कायद्याने शिखंडीला न्याय दिला. पण समाजाचे काय ?
आजही शिखंडी " महाभारतातला एक योद्धा " या मानाच्या पदवी साठी झगडतच आहे.शिखंडीला तो जसा आहे तसाच स्वीकारणारा  फक्त आणि फक्त धर्मस्थापक कृष्णच आहे. बाकीच्यांचे काय ?
 शिखंडीची घुसमट कधी संपणार ?

- पूर्णिमा देशमुख पुरेकर


बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

द्रौपदीचा तळतळाट

पितामह,  तुम्ही सुनेचे रक्षण का नाही केले ? - द्रौपदीचा  तळतळाट 

" पितामह, तुम्ही कुलश्रेष्ठ , ज्येष्ठ, कुटुंबप्रमुख. मी द्रौपदी,तुमची कुलवधू. माझ्या पतींनी मला द्युतामध्यें  पणाला लावले. त्यांना तो अधिकार होता कि नाही ह्याचा वाद बाजूला ठेवा. दासी असो नसो मी तुमच्या कुळातली सून तर होतीच ना ? मग जर तुम्ही कुलरक्षणासाठी प्रतिबद्ध  होते तर मग माझे रक्षण करतांना तुमचे कर्तव्य कुठे गेले होते ? का कुरुकुलाची वीरसभा आज  कापुरुषांनी भरलेली दिसते आहे ? कुठे गेला तुमचा क्षात्रधर्म ? कुठे गेली तुमची  न्याय बुद्धी ? "
भर सभेमध्ये अपमानित, लज्जित झालेल्या द्रौपदीने त्या कुरुकुलप्रमुख भीष्म, धृतराष्ट्र आणि अन्य  कुरुकुल पुरुषांकडे मदतीची याचना केली पण ते सगळे डोळेझाक करून मूग गिळून गप्प बसले होते. सगळे क्षत्रिय वीर (?) माना खाली घालून बसले. ते पाहून द्रौपदीचा बांध सुटला. तिच्या तोंडून  एका मागून एक वाकबाण सुटले. त्या बाणांनी ती कुरुसभा कायमची घायाळ झाली. द्रौपदी आणि कुरुकुलात अन्याय झालेल्या सगळ्या स्त्रियांचा  तळतळाट त्या श्रेष्ठ कुरुवंशाला भोवला. कुरुवंशाचा भयंकर विनाश झाला.
  त्या भीषण समयी फक्त एक  विकर्ण होता ज्याने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पण तिचे रक्षण करण्यास तो असमर्थ होता. तिथे आला कृष्ण ! खरेतर कृष्ण तिचा कोणीच नव्हता, ना पिता, ना बंधू , ना पती ना पुत्र. तो तिच्या सासर  माहेरचा कोणी नातेवाईक देखील नव्हता. पण तो धर्मरक्षक होता. त्याने स्त्रीवर होणाऱ्या अपमानाविरुद्ध लढा दिला. तिचे रक्षण केले आणि जाताजाता  या अत्याचाराचे काय भीषण परिणाम होतील त्याची धोक्याची सूचना सुद्धा देऊन ठेवली.
"कुरुसभेतल्या पुरुषांनो, घरातल्या स्त्रीवर अत्याचार करणारे तर पापी असतातच , पण तो अत्याचार निमूटपणे होऊ  देणारे सुद्धा पापाचे भागीदार असतात. सुनेवर झालेल्या या अत्याचाराचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तिचे तळतळाट तुम्हाला मरेपर्यंत शांतता लाभू देणार नाही. आणि मरण येईल ते सुद्धा वीरोचित असणार नाही. "
आणि घडलेही तसेच. दुर्योधन, दुःशासन आणि कर्णाचे मरण क्षत्रियोचित तर नव्हतेच. आणि भीष्म ? ज्या कुरुकुलाचे रक्षण करण्याची भीषण प्रतिज्ञा करण्यासाठी त्यांनी मरण टाळले होते त्या भीष्मांना मृत्यू आला तो सुद्धा रणांगणावर नाही तर बाणाच्या शय्येवर, ना पृथ्वी ना स्वर्ग, अश्या त्रिशंकू स्थितीत ६ महिने खितपत पडावे लागले, मरणांतिक वेदना सहन कराव्या लागल्या पण मरण आले नाही. कुरुकुलाचा विनाश याची देही याची डोळा  पाहावा लागला. मरणही कृतकृत्य असे नशिबात नव्हते. कसे असणार ? कुळातल्या स्त्रियांवर अत्याचार होतांना ते मूक राहिले. भाऊबंदकी टाळू शकले नाही. मरतांना भीष्मांच्या कानात त्यांच्याच प्रतिज्ञेचा उपहास ऐकू येत होता.
महाभारताला कारणीभूत द्रौपदी आहे असा तिच्यावर दोषारोप  होतो.पण ते पटत नाही.ती गर्विष्ठ होती, तिने कर्णाचा, दुर्योधनाचा अपमान केला म्हणून तिचा अपमान झाला असा  तिच्या विरुद्ध
वाद होतो. पण कुठल्याही स्त्रीने जरी कुणाचा अपमान केला असेल तरी अश्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार करावे हे धर्मसम्मत तर नाहीच नाही पण माणुसकीला धरून सुद्धा योग्य नाही. हे म्हणजे एखाद्या स्त्रीने नाकारले म्हणून अपमान समजून तिच्या तोंडावर acid फेकण्यासारखे किंवा तिच्यावर बलात्कार करण्यासारखेच होणार नाही का ? हे अपराध धर्मसम्मत नाहीत ना ? मग द्रौपदी वर दोषारोप का ?
    संपूर्ण महाभारतात तिचा उल्लेख " नाथवती परि अनाथवत " असा केल्या गेला आहे. आणि खरेच नव्हते का ते ? बलाढ्य पांचाल राजाची मुलगी असूनसुद्धा, पाच वीर अश्या पांडवांची पत्नी असूनसुद्धा ती आपल्याच कुटुंबातल्या लोकांकडून तुडवल्या गेली आहे. कुंतीने भिक्षेत मिळालेली वस्तू समजून तिची वाटणी केली आणि त्याच पाच पतींमुळे तिचा भरसभेत अपमान झाला.
सीता खूप सोशिक , असहाय्य अशी आणि द्रौपदी मात्र तडफदार, काहीशी रागीट अशी प्रतिमा ठेवल्या जाते. पण मला तरी उलटेच वाटते. सीतेने बाणेदारपणा दाखवत रामासोबत पुन्हा संसार करायला ठाम नकार दिला. तिने स्वतःची अस्मिता जपली. पण द्रौपदीने  मात्र वाट्याला आलेले भोग निमूटपणे स्वीकारले. मग ते पाच पतींची पत्नी होणे असो, वनवासातले असंख्य परीक्षा घेणारे प्रसंग असो, राणी असून दासी बनून राहावे लागणे असो किंवा आपल्या पाच हि पुत्रांचा मृत्यू बघणे असो. पतिधर्म, गृहिणीधर्म आणि राजधर्म सुद्धा तिने उत्तमपणे पार पडला. पांडवांच्या अनेक राण्या होत्या पण वनवासात फक्त द्रौपदीच गेली. बाकी सगळ्या आपल्या मुलाबाळांना घेऊन माहेरी राहिल्या. द्रौपदीच्या  मनाचा मोठेपणा असा कि वस्रहरणानंतर धृतराष्ट्राने तिला २ वर दिले तेव्हा तिने स्वतःसाठी काहीच मागितले नाही. तिने आपल्या पाचहि पतींना दास्यत्वातून सोडवून घेतले.
 तरी तिच्या नशिबी सदेह स्वर्गारोहणाचे  भाग्य नव्हते.
कौटुंबिक अत्याचाराला  बळी पडलेली द्रौपदी खरोखरच अनाथच होती.
आजही कित्येक स्त्रिया कौटुंबिक अत्याचाराला बळी पडतात. कधी सासू,सासरा , कधी दिर -भासरा तर कधी नणंद जाऊ तिच्या वर अत्याचार करतात. कित्येक वेळी तर तिचा पतीच तिच्यावर अत्याचार करतो. सहनशीलतेच्या नावाखाली तिने किती आणि का सहन करावे ? शारीरिक अत्याचाराचे पुरावे तरी देता येतात, पण मानसिक अत्याचाराचे काय ?
घरात पत्नीला ,सुनेला यथोचित स्थान देत नाही, "माझे घर,माझा संसार" असे म्हणत सासू तिला डावलून टाकते. तिला घरातल्या सदस्याप्रमाणे वागवत नाहीत. घरातल्या निर्णयांमध्ये तिला कोणी विचारत नाही. विचारणे तर दूरच पण सांगण्याचे सुद्धा सौजन्य दाखवत नाही. तिने सगळ्यांची वर वर करावी पण तिला कमी लेखण्यासाठी तिच्या विरुद्ध कारस्थाने करणे, तिच्या नवऱ्याचे कान भरणे, तिची मुद्दाम कुचंबणा होईल असे वागणे हे सगळे मानसिक अत्याचार नाहीत तर काय ?
द्रौपदी प्रमाणेच आजही कित्येक सुना भरल्या घरात असहाय्य " नाथवती परि अनाथवात" आहेत, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात आहेत.
आजही कित्येक तथाकथित "कुटुंबप्रमुख" भीष्मांप्रमाणेच त्या अत्याचाराकडे डोळेझाक करून पगडी सांभाळत बसले आहेत.
त्या स्त्रियांचा तळतळाट कधी संपेल का ?

-पूर्णिमा देशमुख पुरेकर