गुरुवार, २६ मार्च, २०२०

कै. रमेश मोरेश्वर पुरेकर - एक आधारवड


कै. रमेश मोरेश्वर पुरेकर - एक आधारवड
दादाकाकांबद्दल काय लिहावे ? एकच सुभाषित आठवते.
वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि l
लोकोत्तराणां चेतांसि को हि विक्षातुमर्हति ll
थोर पुरुष हे प्रसंगी कधी इंद्राच्या वज्राप्रमाणे कठोर तर कधी फुलासारखे कोमल असतात. आणि हे प्रसंगोचित वर्तनच त्यांना समाजात सन्मान आणि कीर्ती मिळवून देतात.
दादाकाका असेच होते.
बुद्धी आणि आत्मविश्वास, जिद्द आणि तत्पर निर्णय क्षमता, धैर्य आणि विवेक या गुणांनी त्यांचे आयुष्य उजळून टाकले.
कै. मोरेश्वर उर्फ भाऊसाहेब पुरेकर आणि कै. इंदुमती पुरेकर यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र. लहानपणापासूनच कुशाग्र ! पुढे scholarship मिळवून त्यांनी धनबाद येथील school of Mines मधून Mining मध्ये engineering केले. आणि Indian coal Mines मध्ये रुजू झाले.
बंगालच्या आसनसोल येथे अनेक वर्ष त्यांना अतिशय कठीण, धोकादायक वातावरणात राहावे लागले. तरीही तिथे सुद्धा त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने नावलौकिक मिळवला. नंतर जेव्हा नागपूरला त्यांची बदली झाली तेव्हा सुद्धा त्यांचा दरारा आणि कुठलेही काम तडीस लावण्याची हातोटी यामुळे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि Director ( Technical ) या उच्च पदावर पोहचून ते सेवानिवृत्त झाले. "Task Master " या नावानेच ते प्रसिद्ध होते. निवृत्ती नंतर सुद्धा अनेक लोक त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत.
 त्यांचा दरारा आणि धाक जरी असला तरी त्यांची सगळ्यांना मदत करणे आणि दुसऱ्यांमधले सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देत पुढे येण्याची संधी देणे या स्वभाव वैशिष्ठ्यांमुळे अनेक लोक त्यांच्याशी जुळले. त्यात गरीब-श्रीमंत , शिक्षित-अशिक्षित असाही भेद नव्हता. कारण त्यांच्या वर वर कठोर वाटणाऱ्या स्वभावामागची त्यांची तळमळ समजून यायची.
  आम्हा पुरेकर घराण्याचे तर ते "आधारवड" होते. वडाच्या पारंब्या सर्वदूर पसरल्या आहेत. छोट्यातल्या छोट्या पारंबीसाठी त्यांचा आधार होता. सख्खे-चुलत कोणीही असो ते प्रत्येकासाठी एक संरक्षक ढाल होते. कठीण प्रसंगी त्यांनी अनेकदा कठोर निर्णय घेतले पण ते कुटुंबाच्या भल्यासाठीच ! प्रत्येकालाच त्यांनी सर्वतोपरी मदत केलेली आहे. आर्थिक मदत तर केलीच पण त्याचसोबत मानसिक पाठबळ दिले. कुटुंबातल्या प्रत्येकासाठी कष्ट घेतले.
त्यांच्या या सर्व प्रपंचामध्ये त्यांची पत्नी, सरोजकाकू हिचा खूप मोठा वाट आहे. तिने त्यांना सगळ्याच प्रसंगी भक्कम साथ दिली. दोघांनीही नातेवाईकांचे आस्थेने केले. शिक्षण असो अथवा लग्नकार्य असो, त्यांनी सगळ्यांचे थोरलेपणाने केले.
शिक्षणासाठी मी जेव्हा नागपूरला त्यांच्याकडे होती तेव्हा काकांच्या स्वभावाच्या दोन्ही बाजू बघण्याची संधी मला मिळाली. लहानपणापासून त्यांच्या प्रति एक आदरयुक्त भीती वाटत होती. पण त्याकाळात काकांच्या काळजी घेण्याच्या स्वभावाचा प्रत्यय आला. काकू तिथे नसतांना रोज ते मला सकाळी चहा करून देत. मी पहिल्यांदा जेव्हा नागपूरहुन वर्धेला बसने जाण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांना तो पटला नाही, तरीसुद्धा माझ्या हट्टापायी त्यांनी मला बस मध्ये स्वतः बसवले. बसचा नंबर लिहून घेतला आणि बाबांना फोन वर तो कळवून त्यांना मला घ्यायला जाण्यास सांगितले. मी घरी पोहचे पर्यंत त्यांनी - वेळा फोन केले. त्यांची काळजी अजूनही आठवते. माझा मुलगा चि.ऋत्विक सोबत त्याच्या गाड्यांसोबत खेळणे आठवते. त्या सगळ्या आठवणी आज भोवती जमल्या आहेत.
आज ते आमच्यात नाहीत. खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पण दैवगतीपुढे कुणाचे काय चालते ?
त्यांचे आश्वासक आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच. त्यांचे आयुष्य आमच्यासाठी मार्गदर्शक राहील. 
त्यांना शांती मिळो हि प्रभू चरणी प्रार्थना !
-पूर्णिमा देशमुख पुरेकर


  

 
     


शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

नावात न गुंतलेले नाते

नावात न गुंतलेले नाते
कालच व्हॅलेन्टिन डे साजरा केल्या गेला. प्रेमाचा दिवस ! प्रेम, मग ते आईवडिलांप्रती असो , भाऊ बहीण,नातेवाईक, नवरा बायको किंवा प्रियकर प्रेयसी असो, अथवा मातृभूमीबद्दल असो, त्या प्रेमाच्या भावनेला मान देण्यासाठी खास हा दिवस !
प्रेम म्हंटले कि आपल्या समोर येतात ते राधा आणि कृष्ण !
त्यांच्या नात्याबद्दल तर खूप काही लिहिल्या गेले आहे. त्यांचे अवर्णनीय, पवित्र असे प्रेम अद्वितीय आहे. भलेही त्यांचे एकमेकांसोबत लग्न झालेले नसले तरी सुद्धा मूर्तिरूपात राधा नेहमीच कृष्णाच्या बाजूला असते आणि दोघेही एकत्रितपणे पुजल्या जातात. पण त्याच कृष्णाची धर्मसम्मत पत्नी , रुख्मिणी मात्र त्याच्या सोबत कधीच राहत नाही. विठ्ठलाचे आद्य पूजनीय स्थान असलेल्या पंढरपुरात दोघांचेही मंदिर वेगवेगळे आहेत. हा, बाकी गावांमध्ये नंतर बांधलेल्या देवळांमध्ये जरी विठ्ठल-रुख्माई सोबत असली तरी कृष्णाच्या रूपात असतांना बाजूला असण्याचा मान नेहमीच राधेला मिळालेला आहे. " प्रियकर प्रेयसी" या नात्याचे ते आदर्श आहेत.
पण आज कृष्णाच्या आयुष्यातल्या एका दुसऱ्याच नात्याबद्दल लिहावेसे वाटते.
द्रौपदी !
अग्निकन्या, पांचाली, कुरुकुलसम्राज्ञी,पांडवपत्नी अशी द्रौपदी हि कृष्णा या नावाने सुद्धा ओळखल्या जाते.
संपूर्ण महाभारतामध्ये कृष्ण जिला "सखी " या नावाने संबोधतो अशी हि एकमेव स्त्री आहे. राधेचा उल्लेख महाभारतात नसला, तरी सुद्धा कृष्णाने त्याच्या कुठल्या राणीला देखील सखी मानलेले नाही.
भारतीय लोकांना प्रत्येक संबंधांना नात्याचे लेबल देण्याची खूप वाईट खोड आहे. साधे बाजारात, रस्त्यावर असतांना सुद्धा कुणाला काही म्हणायचे असले तर काका,भैय्या, काकू,मावशी ,ताई अशी हाक द्यावी लागते. जर चुकूनच कुणाला "ओ बाई म्हंटले तर फणकारुन ती स्त्री मारक्या म्हशीसारखी आपल्याकडे बघते. पुरुषासाठी तर काय हाक मारतात हेच मला आठवत नाही आहे, यातच सगळे काही आले.
  कृष्ण आणि द्रौपदी मात्र कुठल्याच नात्याने बांधलेले नाहीत. हा, कोणी म्हणते कि त्यांचे नाते भाव-बहिणी सारखे होते, द्रौपदी ने आपला भरजरी शेला फाडून कृष्णाची जखम बांधली होती तेव्हापासून राखीला सुरुवात झाली अशी अख्यायिका प्रसिद्ध असली तरी सुद्धा, महाभारतात त्याने तिला बहीण म्हंटलेले नाही. जगन्नाथपुरी येथे कृष्ण,बलराम आणि सुभद्रा या बहीणभावांचे असे एकमेव देऊळ आहे. तिथे द्रौपदी नाही.
कृष्णाने द्रौपदी स्वयंवरात भाग न घेता फक्त श्रोत्यांची भूमिका निभावली. म्हणजेच कृष्ण द्रौपदीचा "संभाव्य पत्नी" या नात्याने सुद्धा विचार करत नव्हता.
पांडव कृष्णाचे आत्येभाऊ होते. या नात्याने द्रौपदी त्याची वहिनी होते. पण त्याने तिला कधीच त्या नावे संबोधले नाही.
अर्जुन तर त्याचा आत्येभाऊ असण्यापेक्षा मित्र म्हणून जास्त जवळचा होता. पण त्यांच्यात सुद्धा कृष्ण एक मार्गदर्शक या नात्याने थोडासा वरचढच दाखवल्या जातो. अर्जुन त्याच्याकडे भक्तिभावाने पाहतो असेच जाणवते.
भक्त आणि देव यांच्यात सुद्धा छोटा-मोठा हा भाव असतो. पण कृष्ण आणि द्रौपदी या दोघांचे नाते एका सामान पातळीवर दाखविल्या गेले आहे. त्यांचे अनोखे नाते अधोरेखित करणारे अनेक प्रसंग आपण बघतो.
विदुषी असलेली द्रौपदी कधी कृष्णासोबत वाद घालतांना दिसते तर कधी कृष्ण तिला चुकांसाठी धारेवर धरताना दिसतो.
कधी संकटात तिने आर्तपणे त्याला साद घातली आहे आणि तोही तितक्याच तीव्रतेने तिच्यासाठी धावून आला आहे.
वस्रहरणाचा प्रसंग हा एक सांकेतिक भाग समजायला हवा.
पांडव आपले राज्य आणि सगळे अधिकार गमावून बसले होते. दास म्हणून त्यांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार नव्हता.वस्त्रहरण म्हणजे त्यांचे सगळे सामाजिक आणि राजनैतिक अधिकारांचे हरण. द्रौपदी आणि पांडवांना दास बनवून कौरवांनी आपले शक्तिप्रदर्शन केले.
द्यूत होणार हे सगळ्यांनाच माहिती होते. अगदी पांचालांना सुद्धा. आणि त्यामागे कौरवांचा काय राजकीय डाव असू शकतो हे न समजण्याइतके पांचाल निर्बुद्ध नव्हते. त्या वेळी पांचाल राज्य खूप बलाढ्य होते. त्यांचा दबदबा खूप होता. द्रौपदी तर त्याची मुलगीच. तिने त्यांना का नाही बोलावले ? द्यूताचे संभाव्य परिणाम आणि धोके लक्षात घेता जर पांचालांचे बलाढ्य सैन्य आधीच तयारीत असते तर कौरवांना द्रौपदीच्या नखालाही हात लावण्याची हिम्मत झाली असती का ?
आता या ठिकाणी भावनिक आणि चमत्काराचा भाग सोडला तरी सुद्धा हे बघायला हवे कि तेव्हाच्या सामाजिक आणि धार्मिक संकेतानुसार कृष्णाला द्रौपदीची मदत करण्याचा,किंवा तिच्यासाठी शस्त्र उचलून युद्ध करण्याचा काहीच अधिकार नव्हता. पांडव द्यूतामध्ये सगळे काही हरले होते. कृष्ण त्यांच्या मदतीला गेला नाही. अगदी त्यांना दास बनवले तेव्हा सुद्धा नाही. पण तो चतुर राजकारणी होता. त्याला द्युतामागचे राजकारण समजत होते. आणि तो संपूर्ण तयारीत होता.
त्याने द्रौपदीभोवती वस्त्रांचा वेढा घातला आणि तिची लाज राखली याचा अर्थ कृष्णाने आपल्या संपूर्ण नारायणी सेनेसोबत हस्तिनापूरला वेढा घातला आणि कौरवांना युद्धाचा इशारा दिला.यादवांच्या अतिबलाढ्य नारायणी सेनेसमोर कौरवांचे सैन्य काहीच नव्हते. आणि म्हणूनच धोका जाणवून धृतराष्ट्राने सामोपचाराची भाषा करत द्रौपदीला तीन वर देऊन यादव सेनेपासून आपल्या मुलांची सुटका करून घेतली.
भलेही महाभारताच्या युद्धात पांडवांनी कौरवांचा नाश करून या अपमानाचा सूड घेतला तरी प्रत्यक्ष तेव्हा कृष्णानेच द्रौपदी आणि पांडवांची लाज राखली हेच खरे.   
महाभारताचे युद्ध टाळण्यासाठी जेव्हा कृष्ण शांतिप्रस्ताव घेऊन जातो तेव्हा द्रौपदी त्याला विद्ध स्वरात जाब विचारते कि माधवा, माझा भरसभेत इतका मोठा अपमान करणाऱ्या दुष्टांचा विनाश करण्याऐवजी तू त्यांच्यासोबत संधी का करतो आहेस ? तेव्हा कृष्ण तिला आश्वस्त करत म्हणतो कि तुझ्या अपमानाचा सूड अवश्य घेतल्या जाईल. हा शांतिप्रस्ताव एक राजनैतिक उपचार आहे, तो पाळावाच लागेल.
या वर ती मानिनी विचारते कि जर त्यांनी प्रस्ताव स्वीकारला तर ?
तेव्हा हसून तो द्रष्टा म्हणतो कि मला दुर्योधनाच्या अहंकारावर विश्वास आहे. तो हा प्रस्ताव कधीच स्वीकारणार नाही. आणि झालेही तसेच. शांतिप्रस्ताव नाकारल्या गेला आणि युद्ध अटळ झाले.युद्ध पूर्वी सुद्धा कृष्ण द्रौपदीला युद्धाची भयावहता सांगून सावध करतो कि तू सगळे काही गमावशील. उरेल ते फक्त तुझे पाच पती. तुझ्या अपमानाचा प्रतिशोध तर घेतला जाईल पण त्याची जबर किंमत तुलाच चुकवावी लागेल.
द्रौपदी त्यासाठी तयार होती. धर्माचे राज्य स्थापन करण्यासाठी कृष्णाने सगळे नीतिनियम बाजूला ठेवत पांडवांना युद्ध जिंकवून दिले. पण प्रत्येक वेळी त्याने द्रौपदीच्या अपमानाचा उल्लेख करून भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन आणि कौरवांची निर्भत्सना केली आहे. तो प्रत्येकाच्या वधापूर्वी हेच म्हणतो कि बाकीचे दुष्ट्कर्म तर आहेतच पण द्रौपदीचा अपमान करणे आणि त्याचा विरोध न करता चूप राहणे या एकाच पापाची शिक्षा म्हणून तुम्हाला वीरोचित मरण मिळणार नाही. उपरोल्लेखित सगळ्याच वीरपुरुषांना क्षत्रियोचित मरण मिळाले नाही. या परती दुर्गती काय होऊ शकते ?
कृष्णाला द्रौपदी बद्दल इतकी आत्मीयता का वाटायची याबद्दल व्यास मौन आहेत. द्रौपदीच्या स्वयंवराचा पण अर्जुनाने जिंकून सुद्धा जेव्हा पाच पांडवांसोबत तिचे लग्न लावण्याचे ठरते तेव्हा व्यास तिथे येऊन म्हणतात कि द्रौपदीने पूर्वजन्मामध्ये पाच वेळा पांच गुण असेलेला पती मागितला म्हणून तिला या जन्मात पाचजणांसोबत लग्न करावे लागते आहे.त्या वेळी कृष्ण तिथे नव्हता. एका आख्यायिकेनुसार कृष्ण द्रौपदीला विचारतो कि तू इतकी विद्वान असूनहि पूर्वजन्माच्या या तर्कावर कसा काय विश्वास ठेवला ? पूर्व जन्म आणि त्याचे कर्मफळ हे योनीज जीवांना भोगावे लागते. म्हणजेच ज्यांचा जन्म नैसर्गिक रित्या झालेला आहे. तू अयोनिजा आहेस. तुला पूर्वजन्म कुठून आला ? आणि पूर्वजन्मच नाही तर मग त्याचे कर्मफळ तरी कश्याला मिळणार ? तुला पाच लोकांसोबत लग्न करण्याची गरजच नव्हती. इथे मात्र कृष्णाच्या एकंदर संवादातून , आपण द्रौपदीला पाच पतींसोबत संसार करण्याच्या कठीण प्रसंगापासून वाचवू शकलो नाही  याची खंत दिसून पडते. जे घडले ते घडले हे स्वीकारून कृष्ण द्रौपदीला शुभकामना देतो. पण तिच्याप्रति त्याची काळजी जाणवून येते.
सत्यभामा  जेव्हा पतीला खुश कसे ठेवायचे याबद्दल विचारणा करते तेव्हा कृष्ण द्रौपदीकडेच तिला पाठवतो. का बरे ? कारण त्याला द्रौपदीच्या कर्तृत्वाची सार्थ जाणीव होती आणि ती  योग्य मार्गदर्शन करेल याची खात्री होती.
अनेक प्रसंग, अनेक आख्यायिका !
परस्परांबद्दल विश्वास, आत्मीयता,प्रेम,आदर, अभिमान आणि स्नेह असे सगळेच पैलू त्या दोघांच्या नात्यात दिसतात. म्हणूनच सगळ्या नात्यामध्ये आदर्श असलेला पुरुषोत्तम,पूर्णावतार श्रीकृष्ण तिच्यासाठी "सखा" आहे आणि ती त्याची "सखी".
स्त्रीपुरुषांच्या मैत्रीकडे दूषित नजरेने पाहणाऱ्या समाजाला त्यांचे नाते जरी कुठल्या नावाच्या चौकटीत बांधून ठेवायचे असले तरी ते तसे होऊ शकत नाही. त्यांचे नाते त्या पलीकडले आहे असे मला नेहमीच वाटत आले.
जेव्हा जेव्हा मी कवीश्रेष्ठ गुलझारचे हे गीत ऐकते तेव्हा मला कृष्ण आणि त्याच्या त्या सखीचीच आठवण येते. 
" हमने देखी है उन आँखोंकी महकती खशबू , हाथ से छुके उसे रीश्तो का इलझाम ना दो
सिर्फ एहसास है ये, रुह से मेहसूस करो, प्यार को प्यार हि रहने दो कोई नाम ना दो "
 
-    पूर्णिमा देशमुख पुरेकर


शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

चकलीची उंडी आणि अनारस्याची भाजणी


दिवाळीची चाहूल लागताच घराघरातून काही ठराविक संवाद ऐकू येऊ लागतात. पुरुष आणि स्त्रिया दोन वेगवेळ्या चढाओढी मध्ये गर्क असतात. पुरुष मंडळी  एकीकडे यंदाची दिवाळी आपले दिवाळे कसे काढणार यावर चर्चा करतात तर दुसरीकडे आपल्या कमाईची बढाई मारतात.
" अरे यावेळी तर मी xxxx  ( महागड्या) दुकानातून कपडे घेतले. दिवाळी आहे यार, एव्हढा खर्च तर करूच शकतो."
" मी तर नवीन मोबाइल घेऊन दिला बायकोला/ मुलाला/आईवडिलांना. काय जुनाच वापरायचा ? " 
आणि बायकांमध्ये दिवाळीच्या फराळाचा सुग्रणपणा दाखवण्याची  चढाओढ सुरु होते.
     " आमच्याकडे तर यांना माझ्याच हातचा फराळ लागतो. आणि मी बाई सगळे काही करते. लाडू, अनारसे, चकली,चिवडा, करंज्या आणि काय काय. शेवटी दिवाळी काय एकदाच तर येते वर्षातून ?" ( बाकी सण काय तीन चारदा येतात का ? )
" आमच्याकडे तेच ते टिपिकल पदार्थ नाही बाई आवडत.आजकाल तर काय लाडू चिवडा वर्षभर फस्त करणे सुरूच असते. आणि देवाला सुद्धा काही वेगळे नको का ? मी तर दरवर्षी नवीन रेसिपी करते. "
  आदल्या पिढीतल्या बायका आपण भाजणी कशी बनवतो, उंडी कशी चांगली होते, लाडू कसा करतो यावर आपापले मत मांडायच्या आणि मग दुसरीने त्यात काहीतरी खोच काढायची आणि आपण कसे भाजणी -उंडी expert आहोत हे दाखवण्यासाठी एकमेकींवर कुरघोडी करायच्या.
आताच्या पिढीत कोण घरीच सगळे काही बनवते आणि कोण  बाजारातून विकत आणते या वरून टीकाटिप्पणी सुरु असते.
" निदान एक तरी दिवस स्वतः काही घरी बनवावे, वर्षभर तर विकताचेच खात असतात. काय बाई आहे, काहीच करत नाही."
" वर्षभर तर राब राब राबतो , निदान दिवाळीत बाकीच्या कामाच्या रगाड्यात एखाद्या गृहउद्योगातून फराळाच्या वस्तू आणल्या तर काय वाईट ? त्यांची सुद्धा कमाई होते आणि आपला हातभार लागतो."
 कपडे , घरातल्या वस्तू, रंगरंगोटी, सजावट , फराळ, पाहुणचार, भेटवस्तू सगळ्या सगळ्या मध्ये चढाओढ सुरु असते. कधी कधी चढाओढ नसते पण दिखावा सुद्धा असतोच. मनात नसून सुद्धा, परवडत नसतांना सुद्धा लोक काय म्हणतील या भीतीने सण साजरा करण्याची वृत्ती असते.
आता हा सण साजरा करण्यातली सुद्धा इतकी मतमतांतरे आहेत कि माझी मति गुंग होते.
कुणी म्हणते उगाच निरर्थक भेटवस्तू देऊ नका, उगाच पैसे वाया जातात आणि घरात जागा नाही नकोश्या वस्तू ठेवायला.
कुणी म्हणते भेट देणे महत्वाचे, स्वस्त-महाग महत्वाचे नाही. दिल्याशिवाय कुणाला काही देण्याची सवय कशी काय लागेल ? आणि त्यामुळेच तर बाजारात पैसे खेळात राहतो.
कुणी म्हणतो काय गरज आहे सजावटीसाठी सामान विकत आणायची ? घरीच कचऱ्यातून कला करा.
तर कुणी म्हणते कि स्वदेशी वस्तू घ्या आणि त्यामुळे गरीबाच्या घरी सुद्धा दिवाळी साजरी केल्या जाईल. ते पुण्य मिळेल.
कुणी म्हणते ऑनलाईन खरेदी करा तर कुणी म्हणते बाजारदुकानांना चालना द्या.
कुणी म्हणते फटाके फोडू नका, प्रदूषण कमी करा, तर कुणी म्हणते फटाके फोडल्यामुळे वातावरणातले उपद्रवी जीवजंतू,किटाणू नष्ट होतात.
कुणी म्हणते कश्याला एव्हढ्या पणत्या दिवे लावून तेलाचा,विजेचा अपव्यय करता ?
तर कुणी म्हणते दिव्यांचा सण आहे तर घर काय अंधारलेले ठेवणार का ?
कुणी घरीच दिवाळी साजरी करावी असा अट्टाहास ठेवतात तर कुणी या सुट्ट्यांच्या दिवसात भ्रमण दौरा काढतात.
   हे सगळे ऐकून काय करावे काय करू नये असा प्रश्न पडतो. एकीकडे वाढलेला खर्च तर दुसरीकडे सण साजरा करण्याची रूढी आणि इच्छा यात दिवाळी हरवून गेल्यासारखी वाटते.
टिकल्या फोडतांना मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद आणि लक्ष्मीसमोर हात जोडणाऱ्या मोठ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानी भाव दोन्ही हरवून गेले आहे.
-पूर्णिमा देशमुख पुरेकर 

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

एकतर्फी प्रेम - दैवी सौंदर्य, शापित विद्रुपता

 एकतर्फी प्रेम - दैवी सौंदर्य, शापित विद्रुपता 

गेल्या काही वर्षांपासून प्रेमाचा स्वीकार न केल्यामुळे ऍसिड टाकून विद्रुप करण्याच्या अमानुष कृत्यांची लक्षणीय वाढ झालेली आहे. एकतर्फी प्रेम हि संकल्पना काही नवीन नाही. पण "मुलीचा नकार" पचवण्याची ताकद कापुरुषांमध्ये अजूनही आलेली नाही. असले निंदनीय कृत्य करणारे खरेच प्रेम करत होते का ? ज्या प्रेमाला  कथा पुराणांनी जगातले सर्वात उद्दात्त स्थान दिलेले आहे ते प्रेम असले अक्षम्य कृत्य करणे तर दूरच पण तस विचार सुद्धा करणार नाही.
राधा कृष्णाचे प्रेम एकतर्फी नव्हतेच. पण राधा विवाहित होती आणि सामाजिक नीतिनियमांच्या बंधनात अडकलेली असून सुद्धा तिचे प्रेम सोन्यासारखेच लखलखते राहिले. कृष्णाने वृंदावन सोडल्यानंतर कधीच तिची भेट घेतली नाही. तरी तिचे त्याच्या जीवनातले स्थान सर्वोच्चच राहिले.
मुलाने प्रेमाराधन  केल्यानंतर ते स्वीकारणे हे अनेकदा मुलींसाठी क्रमप्राप्तच होते. असे असले तरी मुलीने "propose " करण्याचे प्रसंग सुद्धा पुराणात उल्लेखित आहेत. रुख्मिणी, हिडिंबा,उलुपी,चित्रांगदा,सावित्री या सारख्या स्त्रियांनी स्वतःहूनच पुढाकार घेतलेला आहे. भलेही त्यांचे प्रेम एकतर्फी होते तरीसुद्धा त्या काळातल्या सभ्य,आर्यत्वाच्या शिष्टाचाराप्रमाणे त्यांचा विवाह प्रस्ताव स्वीकारलेला आहे. एकतर्फी प्रेमाची हि उदाहरणे सुंदरच आहेत.
 पण प्रेमभावनेचा स्वीकार न केल्यामुळे  शाप देऊन अथवा अन्य शिक्षा देऊन त्या नकाराचा वचपा काढणे हे सुद्धा पुराणांमध्ये  उल्लेखित आहेच. शूर्पणखेचे उदाहरण तर सगळ्यांनाच माहिती आहे. तिने पहिले रामाकडे आणि नंतर लक्ष्मणाकडे प्रेमयाचना केली पण त्यांनी नकार दिल्यावर ती चिडून त्यांच्यावर वार करण्यास येते आहे हे पाहताच रामलक्ष्मणानें तिचे नाक कान कापून टाकले. स्वरक्षणार्थ असे केले असे म्हणू शकतो. पण तरीसुद्धा हि एकप्रकारची शिक्षाच नव्हे का ? या अपमानाचा सूड घेण्यासाठीच तर रावणाने सीताहरण केले. शूर्पणखेला शिक्षा म्हणून दिलेली  हि विद्रुपता कितपत योग्य वाटते ?  त्या ऐवजी अन्य कुठला उपाय नव्हता का ?
 दुसरे उदाहरण गणेश आणि तुलसी यांचे देते. इथे दोघांनीही एकमेकांना शाप दिलेला आहे. तुलसी हि धर्मध्वज राजाची कन्या होती. तपसाधनेच्या तेजाने झळझळणाऱ्या गणेशाला पाहून ती त्याच्या प्रेमात पडली. तिने त्याच्यासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण गणेशाने त्यास नम्रपणे नकार दिला. तिने पुन्हा पुन्हा त्याचे आज़र्व केले. पण गणेशाचा नकार ठाम होता. त्यामुळे चिडून तिने गणेशाला शाप दिला कि " तुला तुझ्या मनाविरुद्ध विवाह करावा लागेल." या  शापाने क्रोधीत होऊन गणेशाने सुद्धा  तिला शाप दिला " तू असुराची पत्नी होशील आणि त्या नंतर एक झुडपे बनून राहशील."
हे ऐकून तुलसीला पश्चाताप झाला. तिने गणेशाची क्षमा मागितली. त्यामुळे गणेशाने उशाप दिला कि विष्णू तुझा उद्धार करेल आणि तू तुळशीचे झाड होऊन पृथ्वीवर राहशील.तुझी पाने त्याला सगळ्यात जास्त प्रिय होतील . पण माझ्या पूजेत तुझी पाने निषिद्ध होतील. "
दैत्यगुरू शुक्राचार्यांनी  मुलगी  देवयानीचे तर संपूर्ण जीवनच प्रेमभंग आणि विश्वासघाताने काळोखून गेलेले आहे. संजीवनी विद्या मिळवण्यासाठी शिष्य बनून आलेल्या बृहस्पतीपुत्र कचावर देवयानी प्रेम करू लागली. कचाने तिला दूर लोटले नाही. फसवणूक करून विद्या प्राप्त करण्याच्या हेतूने आलेल्या कचाला जेव्हा दैत्यांनी मारून जाळून टाकले तेव्हा त्याची राख दारूत मिसळून शुक्राचार्यांनी पिण्यास लावली. मृत कचाला जिवंत करण्यासाठी देवयानीने आपल्या वडिलांना खूप विनंती केली, एव्हढेच नव्हे तर आजन्म अविवाहित राहण्याची धमकी दिली. शुक्राचार्यंनी मुलींच्या प्रेमापायी तिला संजीवनी मंत्र शिकवला. कचाला जिवंत करण्यासाठी त्यांनी मंत्र  म्हणताच त्यांचेच पोट फाडून कच बाहेर आला. शुक्राचार्य गतप्राण पडले होते. कचाने देवयानीला संजीवनी मंत्र म्हणून त्यांना जिवंत करण्यास सांगितले.प्रेमभोळ्या देवयानीने तसे करताच कचाला तो मंत्र समजला. तो त्वरित तिथून निसटला. देवयानी स्तंभित झाली. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा तिने आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार करताच कपटी कच  तिला नकार देत म्हणाला " तुझ्या पित्याच्या पोटातून मी बाहेर आलो याचा अर्थ मी त्यांचा मुलगा झालो. तू माझी बहीण झालीस. आपला विवाह शक्य नाही."
हा विश्वासघात आणि कपटीपणा तिच्यासाठी धक्कादायक होता. तिने त्याला शाप दिला " ज्या विद्येसाठी  तू हे सगळे कपट  कारस्थान केलेस आणि मला फसवले ती विद्या तू कायमची विसरून जाशील. "  आणि याच शापामुळे देवांना कधीच संजीवनी विद्या मिळू शकली नाही.
यावर कचाने सुद्धा देवयानीला शाप दिला कि तुला इच्छित प्राप्त होऊन सुद्धा त्याचे सुख मिळणार नाही. म्हणजेच तू कधीच सुखी होणार नाहीस. आणि झालेही तसेच. ययातीने तिच्यासोबत विवाह केला तरी प्रेम मात्र शर्मिष्ठेवरच केले. तिच्या वाट्याला अवहेलनाच आली.
असे म्हणतात कि प्रेम हे खूपदा दुःखदायीच असते. सफल झाले तर ठीक नाहीतर प्रेमभंगाचे दुःख. आणि त्यातही एकतर्फी प्रेम होणे हेच मुळात एखाद्या शापा सारखे वाटते. आयुष्यच विद्रुप झाल्यासारखे वाटते. पण खरे प्रेम एकतर्फी असले तरीसुद्धा विद्रुपतेवर मात करून सौन्दर्य निर्माण करू शकते.
करण जोहरच्या ए दिल है मुश्किल मधले एक वाक्य सार्थ आहे
 " एकतर्फा प्यार कि ताकत हि कुछ और है, दुसरे रीश्तोकी तरह ये मोहोब्बत दो लोगोमें नहीं बँटती ; बस मेरे हक में रहती है "
प्रेमाचे सौंदर्य असेच असावे, नाही का ?

- पूर्णिमा देशमुख पुरेकर 

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

आंधळं पालकत्व , अज्ञानी पुत्रत्व

                  आंधळं पालकत्व , अज्ञानी  पुत्रत्व 
 इंटरनेटच्या माहिती जाळामध्ये अनेकदा प्रस्थापित संकल्पनांना छेद देण्याऱ्या पोस्ट येतात. विषयसंबंधित तीन पोस्ट मनात ठसल्या.
पहिली पोस्ट होती एका आईच्या "confession " बद्दल. त्यात ती म्हणते कि "आज मी मोकळेपणाने मनातलं खरं खरं सांगते. मुले आता मोठी,जाणती झालेली आहेत. या गोष्टी मी फक्त आई आहे म्हणून करायलाच हव्यात, नव्हे, मला तसेच वाटायला हवे असा जो पूर्वग्रह सगळ्यांच्या मनात आहे तो मला मान्य नाही. या नंतर ती अनेक गोष्टीबद्दल बोलते. उदा. आईच्या खाण्यातील घास मुलाला द्यायलाच हवा, आईने मुलांसाठी त्याग करायलाच हवा, नवऱ्याच्या आधी मुलांना प्राधान्य द्यायला हवे, आईला सगळे माहिती असते, आई म्हणजे देव, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ, आई कधी चुकूच शकत नाही या सारख्या अनेक गोष्टीबद्दल तिने खूप निर्भीडपणे लिहिले. शेवटी ती म्हणाली कि " आई माणूसच असते. आणि चुका करणे, चुका होणे कुठल्याच मनुष्याला चुकले नाही. मला देवपण नको. माणूस म्हणूनच वागवा. नाहीतर मनाविरुद्ध लादलेल्या या देवत्वाच्या ओझ्याखाली मी गुदमरून जाईन."
    या संदर्भात मी माझे स्वतःचेच उदाहरण देते. मला लहान बाळांचे काही करण्याची कधी वेळ आलीच नाही. जेव्हा मी स्वतः आई झाली तेव्हा मला अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. माझ्यासाठी ते नवीनच होते. उलट माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा जास्त सवय होती.कारण त्याने त्याच्या लहान भाऊबहिणींच्या मुलांना सांभाळण्याचे काम केलेले होते. पण तरीसुद्धा स्वतः आईवडील बनल्यानंतर जी एक जबाबदारी येते,एक बंधन येते , त्याने तो सुद्धा दबकूनच गेला होता. मुलांच्या बाबतीत निर्णय घेतांना एक प्रचंड दडपण येते. आपला निर्णय प्रत्येक वेळी योग्यच ठरेल असा दंभ मी तरी पाळत नाही. हा, माझा हेतू चांगला होता असे म्हणू शकते, पण निष्पक्षपणे पाहणाऱ्याला कदाचित ते चुकीचे वाटू शकते. कोणी सांगावे उद्या मुलांनाच आमचे काही चुकले असेही वाटू शकते. मुलांना तसे मला स्पष्ट सांगता यावे, आमच्यात तसा मोकळा संवाद व्हावा असे मात्र निश्चितपणे वाटते. माझ्या आईवडिलांसोबत माझे आणि माझ्या बहिणीचे असेच मोकळे नाते असल्यामुळे वाद असले , मतमतांतरे असली तरीसुद्धा आता समानतेच्या पातळीवर आमचे नाते आहे हे मी अभिमानाने सांगू शकते.
या उलट काही पालक " कुमाता न भवति " या भ्रमात अजूनही जगत आहेत. आम्ही आईवडील आहोत, चुकूच शकत नाही, असे छातीठोकपणे सांगत असतात, आणि आपल्या पालकत्वाच्या ओझ्याखाली मुलांना दडपून टाकतात. मातापित्यांच्या आदर्शत्वाच्या कल्पनेला छेद देणारे अनेक दाखले आपल्या पुराणांमध्ये सापडतात. वडील म्हणून दशरथ ,जनक, धृतराष्ट्र, ययाती, शंतनू  चुकले नाहीत का ? गांधारी तर डोळे असून आंधळी झाली आणि मुलांना डोळसपणे वाढवण्यात अपेशी ठरली. आपल्याच महत्वाकांक्षांपायी मुलांचा बळी देणारे कितीतरी पालकांचे उदाहरणं सापडतात.
दुसरी पोस्ट होती " बधाई हो " सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेली. आश्चर्य म्हणजे ती पोस्ट एका लेखकाने लिहिलेली होती. त्यात त्याने म्हंटले होते कि हा सिनेमा अनेक मुलांना,पुरुषांना आवडला नाही. कारण त्यात आई वडील हे माणूस आहेत, त्यांच्यासुद्धा खाजगी भावना असू शकतात हे नायक जसा मान्य करण्यास तयार नसतो, अजूनही भारतीय समाजातल्या पुरुषांची आणि अनेक स्त्रियांची तशीच मानसिकता आहे.
   मुले,घरदार आणि नोकरी या सगळ्यात नवराबायको इतके बुडून गेले आहेत कि त्यांना एकमेकांसाठी वेळ देणे अशक्य झाले आहे. " माझ्या नवऱ्याची बायको" या सिरीयल मधला नायक म्हणतो कि " माझी मैत्रीण आणि प्रेयसी होती ती संसाराच्या रगाड्यात कुठेतरी हरवून गेली. बायको सुद्धा राहिली नाहीस. कायम तू मुलाची आई,किंवा सून म्हणूनच समोर येतेस. " अर्थात बायको सुद्धा नवऱ्याला हेच म्हणू शकते. अनेक नवरे बायकोला कपडालत्ता,दागदागिने देऊन स्वतःचे नवरा म्हणून कर्तव्य पार पाडल्याचा अविर्भाव मिरवीत असतात. बायकोसोबत बोलायचे म्हणजे  बाहेरच्या आणि घरातल्या कटकटीचा राग काढण्यापुरते तोंड उघडतात. जवळीक फक्त शारीरिक नाही तर संवाद करणे, सोबत राहणे एकमेकांसोबत काही क्षण साजरे करणे हे सुद्धा अभिप्रेत असते. पण तसे होत नाही. बरं जे असे काही करायला जातात त्यांना " काय हे विचित्र चाळे , मुलाबाळांना सोडून कसे काय बाहेर फिरायला जाऊ शकतात " असले टोमणे ऐकावे लागतात.
तिसरी जी पोस्ट होती त्यात एकच वाक्य सगळे काही बोलून गेले,  " विवाहित मुलीच्या संसारात जसे आईने  दखल, लुडबुड करायला नको तसेच विवाहित मुलाच्या  सुद्धा संसारात त्याच्या आईने दखल , लुडबुड करायला नको."
भारतीय संस्कृतीने आईवडिलांना "देवतुल्य " मानले आहे. कारण मनुष्याला या संसारात आणण्यापासून त्याचे पालनपोषण करणे आणि रक्षण करणे, शिक्षण, संस्कार  देणे हे सगळे आईवडीलच तर करतात. प्रसंगी स्वतः उपाशी राहून , कष्ट, हालाअपेक्षा सोसून आपल्या मुलांचे भविष्य मात्र उज्ज्वल करतात. त्यामुळेच मातृदेवोभव, पितृदेवोभव,आचार्यदेवो भव असे बाळकडू पिढ्यानपिढ्या आपल्याला मिळत गेले आहे. आणि ते सत्यच आहे.आपल्या मातापित्यांची सेवा सुश्रुषा करणे हे प्रत्येकच मुलामुलींचे कर्तव्य आहे.त्यांनी केलेल्या प्रेमाचे ऋण कधीच फेडू शकत नाही हे देखील निर्विवाद सत्य आहे.
पण या सगळ्यात आपण आपले आई वडील हे सगळ्यात प्रथम माणूस आहेत हेच मुळात विसरून जातो.आणि त्याचमुळे मुलांच्या पलीकडे सुद्धा काही जग आहे हे मुलांना तर लक्षात येतच नाही पण बहुतेक आईवडील सुद्धा विसरून जातात. आणि मग एक विचित्र चक्रात सगळे अडकून जातात. पहिले मुलांना ७ ते ९ वर्षाच्या वयात गुरुकुलात पाठवून द्यायचे. विद्याभ्यास संपवून मुले गृहस्थश्रमात प्रवेश करायचे. लग्नानंतर मुलाला  मुलगा झाल्यानंतर आई वडील "त्यांच्या" गृहस्थाश्रमातून निवृत्ती घेऊन संन्यासाश्रम स्वीकारायचे. यात अपेक्षा अशी होती कि पुढ्च्या पिढीच्या  हातात सूत्रे सोपवून  मनुष्याने समाजाचे ऋण फेडण्यासाठी वेळ द्यावा. जेणेकरून मनुष्य सांसारिक मोहापासून दूर होईल आणि यामुळे दोन पिढ्यांमधील संघर्ष सुद्धा टाळला जातो. पण कालानुरूप हे धर्माचरण लुप्त झाले. आणि घराघरांमध्ये भांडे वाजायला लागली.
एका समाजशास्त्रज्ञाचे मत आहे कि ९० टक्के कौटुंबिक कलह हे मुलामुलींच्या आईवडिलांमुळेच निर्माण होतात. पुरुषप्रधान व्यवस्था जरी ह्यासाठी फक्त "सासूसुनेचा वाद " यालाच जबाबदार धरत असली तरी अनेक संघर्ष हे मुलगा आणि वडील यांच्यात आपले वर्चस्व, सत्ता,कर्तृत्व स्थापित करण्याच्या सुप्त महत्वाकांक्षा यामुळे सुद्धा होतात. प्रत्येक वेळी मुलाने वेगळे घर केले याचा अर्थ सासूसुनेचें पटत नव्हते असा होत नाही. याचे उत्तम चित्रण रेखा,अनुपम खेर अभिनित "संसार" या सिनेमा मध्ये केल्या गेले आहे. फक्त पितापुत्रांमधल्या या संघर्षाकडे समाज कानाडोळा करतो. कित्येक पालक आम्ही मोठे म्हणून आमचाच अनुभव कामाचा आहे, आमचाच सल्ला घ्यायला हवा या अट्टाहासापायी घरात आकांड तांडव करतात. आधीची पिढी जरी अनुभवी असली तरी पुढच्या पिढीतल्या समस्यांच्या वेळी तोच अनुभव कामी पडेल असे जरुरी तर नाही ना ? नवीन काळाची नवीन समस्या असेल तर कधी कधी उपाय सुद्धा नवीनच लागतो.
  बापाचा जोडा मुलाला होऊ लागला कि त्याला मित्रत्वाच्या नात्याने राहावे असे संस्कृत सुभाषित आहे. आईवडिलांना एकेरी हाक मारा अथवा अहोजाहो करा, डोळस पालक आणि सुज्ञ मुलेच या आद्य नात्याला सुंदर रूप देऊ शकतात.

-  पूर्णिमा देशमुख पुरेकर 

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

घरासाठी घर घर

                                       घरासाठी घर घर 
" तुम्ही सरळ फ्लॅटच घेऊन टाका. डोक्याला तापच नाही. " एकाची सूचना.
" फ्लॅट म्हणजे काय हो ? चाळीतल्या खुराड्यांचे नवीन नाव आहे, झाले. आपल्या मर्जीने ऐसपैस बांधलेले घर कधीपण चांगले." दुसऱ्याचा सल्ला.
" गावाच्या थोडे बाहेर असले ना कि जरा शांत निवांत वाटते हो. नाहीतर गावात तर नुसता गजबज , गोंगाट असतो."
" घर घ्यायचे ना तर कधी पण शाळा,ऑफिस,बाजार यांच्या जवळपासच घ्यावे. घर दूर असलं ना कि येण्याजाण्यातच वेळ,पेट्रोल आणि एनर्जी वाया जाते. आणि हाडं खिळखिळी होतात ते वेगळेच. "
" रेडी पझेशन वाला फ्लॅट घ्या. म्हणजे भाडे देणे वाचते आणि रंगरंगोटी,फर्निचर यांचा पसारा आवरायची झंझटच नाही. शिवाय  ताबडतोब राहता येते."
" अंडर कन्स्ट्रेशन फ्लॅट घायचा बरं का ! म्हणजे आपल्याला जे काय बदल करायचे ते करता येतात, शिवाय ते स्वस्तही पडते.टॅक्स ची बचतही होते ना. "
" आजकाल मस्त जिम , स्विमिंग पूल आणि काय काय सोयी असलेल्या कॉलनी असतात. मस्त आलिशान फ्लॅट घ्या. स्टेटस मेंटेन करावे लागते."
" साधासा आपल्या बरोबरीचा शेजार असलेले घर घ्यावे. फार श्रीमंत शेजार असला कि नाकापेक्षा मोती जड अशी स्थिती होते, आणि मुलांवर वाईट परिणाम होतो ते वेगळेच. कोणी बोलायला नाही, अडीअडचणीला कामाला  येऊ शकणार नाही असा शेजार काय कामाचा ?"
"मस्तपैकी मोठे, आलिशान, ३-४ bhk घर घे रे !  पै पाहुणे आले कि गैरसोय नको. आजकाल प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम हवी असते, प्रायव्हसी हवी असते ना.आपल्याकडे कोणी खाली झोपावे लागले असे टोमणे नाही ऐकायचे बाई मला."
"छोटेसे पण पुरेसेच घर बरे असते. दिवसेंदिवस मोठे घर सांभाळणे कठीण जाते गं. साफसफाई करणे सुद्धा जमत नाही. कामाला मिळत नाही. आणि आजकाल किती पै पाहुणे येतात? सगळे २ दिवस येतात आणि जातात. adjustment करावीच लागते. खाली गाद्या टाकून गप्पा मारण्यात सुद्धा मजा असते."
मागच्या पिढीपर्यंत तरी आपले घर असावे असे स्वप्न प्रत्येक भारतीय बघत होता. उपवर मुलीचे रंग,रूप आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जशी बघतात, तसेच मुलाची नोकरी,पगार आणि घर हा योग्यतेचा मापदंड. म्हणूनच "असावे आपुले घरकुल छान" असे स्वप्न प्रत्येक भारतीय बघायचा.
एक घर घ्यायचे त्यासाठी इतक्या सल्ला मसलती होतात कि डोके भणभणायला लागते. कष्ट करून, घाम गाळून पैपै जमवून घर बनवायचे, आणि  एवढे करून जेव्हा घर बनते  तेव्हा त्यात  काही ना काही खुसपट काढल्याच जातात. घर घेण्याचे स्वप्न तर पूर्ण होते. पण स्वप्नपूर्तीचा आनंद मात्र झाकोळून जातो. तसेही म्हणतातच ना " स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा" !
एकीकडे नवीन जागी जम बसण्याची कसरत  तर दुसरीकडे कर्जाचे हफ्ते आणि घरखर्च यांचा ताळमेळ जमवण्याची खटपट. डोक्याचा भुगा होतो. असे वाटते उगाच घर घेतले. आधी जसे होतो तसेच बरे होते.
घर घेण्याच्या बाबतीतली दुसरी बाजू सुद्धा आता लक्षात घ्यायला हवी.
 काही दिवसांपूर्वी पेपर मध्ये लेख आला कि मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याचे प्रमाण फार कमी झाल्यामुळे रिअल इस्टेट बाजाराला फटका बसतो आहे आणि  आर्थिक मंदी साठी हे सुद्धा एक मोठे कारण आहे. असे का झाले यामागची करणे सांगतांना लेखकाने खालील करणे सांगितली.
काही वर्षांपूर्वी संगणक क्रांती झाल्यानंतर पंचविशीतली पोरं लाखोंच्या पगाराची धनी झाली. लग्न झालेले नसल्यामुळे संसाराची भुणभुण नसणे, गावाकडे आई वडील अजूनही कमावते असलेले आणि तिथे वाडवडिलांची घर असल्यामुळे ह्या मुलांनी गुंतवणूक म्हणून घर घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे बाजार भाव वाढला. पण खरे प्रश्न नंतर  निर्माण झाले. ह्या मुलांमध्ये नोकरी बदलून दुसरीकडे जाण्याचा कल वाढला. मग ते घर भाड्याने द्या किंवा विकून दुसरीकडे  घ्या अशी स्थिती आली. आणि देशात असले तर एक वेळ  ठीक आहे, पण विदेशात गेल्यानंतर प्रॉपर्टी सांभाळणे कठीण जाऊ लागले. चांगला भाडेकरी मिळाला तर ठीक नाहीतर डोकेदुखी आणि घर रिकामेच ठेवले तर "dead investment " झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागू लागले.
आईवडील मुलाकडे आपले घर आणि देश सोडून राहायला तयार नाहीत, आणि देशात चांगली नोकरी मिळणे कठीण झाल्यामुळे आहे तिथेच राहण्याचा नाईलाजाने घेतलेले निर्णय यात एक मोठा वर्ग फसला.आणि पुन्हा मुलगा तर पैसे कमावण्यासाठी आईवडिलांना एकटे सोडून चालला गेला असे टोमणे आणि टोचणी सहन करावी लागते ते वेगळेच. त्यात भर म्हणजे विदेशी नागरिकत्व घेतल्यानंतर स्वतःचे घर आणि वाडवडिलांची घर यांची विक्री करणे एक खूप मोठी कायदेशीर गुंतागुंत बनली. आणि मग पुढच्यास ठेच मागच्यास शहाणपण या उक्तीनुसार स्वतःचे घर घेऊन डोकेदुखी विकत घेणे नको असा विचार मुलंमुली करू लागली. त्या पेक्षा आहे  तिथे भाड्याने घर घ्यावे, जितके दिवस राहावे लागतील, राहावे आणि नोकरी  बदलली कि पुन्हा दुसरीकडे बिऱ्हाड  घेऊन जावे हे सोयीस्कर अशी मानसिकता बनली.
ज्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी मोठी घर बांधली होती किंवा मोठे फ्लॅट्स घेतले होते ते विकणे सुद्धा कठीण झालेले आहे. "हम दो,हमारा एक" असे छोटेखानी कुटुंब १-२ bhk  घरांना प्राथमिकता देतात. आणि ज्यांचे घर आहे  त्यांची मुले नोकरी व्यवसायानिमित्त दुसरीकडे गेलेली आहेत आणि मुलांकडे राहायला जावे असे ठरवले तर  "माझे" घर सोडून "मुलासुनेच्या " घरात राहायला जाण्यास मनाची तयारी नसते, आणि तिथे जमले नाही तर  आपले "हक्काचे" घर असलेले बरे असा विचार करून ते घर विकणे जमत नाही. बरे तिथेच राहायचे असे ठरवले तर वय झाल्यामुळे एव्हढे मोठे घर सांभाळणे कठीण होऊन बसते.दुखले खुपले तर करायला कोणी नाही. नोकरी सोडून मुलं कितीदा येणार ? बरे पिढीजात व्यवसाय सुद्धा आता पिढीजात राहिले नाहीत. त्यांना सुद्धा घराचे  आणि व्यवसायाचे काय करावे हा प्रश्न भेडसावतो.
धरवतही नाही आणि सोडवतही नाही अशी त्रिशंकू अवस्था होऊन बसली आहे. घर बनवण्यात लागलेली घरघर आता घराचे काय करायचे या घरघरीत बदलून गेलेली आहे.

- पूर्णिमा देशमुख पुरेकर

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

शिष्टाचार, चालीरीती , व्यवहार आणि सोय

                          शिष्टाचार, चालीरीती , व्यवहार आणि सोय 
" सिंहासनी श्रीराघव बसता , "वामांगी " तू बसशील सीता,
जरा गर्विता ; जरा लज्जिता, राजभूषणा भूषविल हि,कमनीय तंव आकृती. "
 ग.दि.मा च्या गीतरामायणातल्या एका गीतातली ओळ ऐकली आणि शिष्टचार, चालीरीती, तथाकथित संस्कारी वागणे यांचा दुसऱ्या बाजूने विचार करावासा वाटला.
खरेतर आपल्या धर्माने पत्नीला "वामांगी " असे संबोधून तिला राजरोसपणे पतीच्या बाजूला बसण्याचा मान आणि अधिकार दिलेला आहे. पूजेच्या वेळी पत्नी नवऱ्याच्या हाताला हात लावून हा अधिकार बजावते. पण तीच पत्नी जर इतर वेळी मोठ्यांच्या उपस्थितीत नवऱ्याचा बाजूला बसली तर कोण गहजब होतो!  कितीतरी घरांमध्ये तर अजूनही नवरा,सासरा आणि इतर पुरुष नातेवाईकांच्या बाजूने बसणे निषिद्ध मानल्या जाते. पुरुषांच्या आधी जेवणे असंस्कारी समजल्या जाते. जेवण तर दूरचीच गोष्ट , साधे वर्तमानपत्र पहिले पुरुषानेच वाचले पाहिजे असे विचित्र नियम असतात.
अश्यावेळी नोकरी करणाऱ्या , आजार असलेल्या स्त्रियांचे खूप हाल होतात. तसेही आजकाल पंचविशी पासूनच काही ना काही शारीरिक त्रास असतात, त्यात लग्नानंतर या असल्या चालीरीतींमुळे अजून भर पडते.
माझ्या माहितीतल्या एका finance कंपनी मध्ये काम करणाऱ्या मुलीवर अशीच कुचंबणा  होऊन वरिष्ठांसमोर मान खाली घालण्याची वेळ आली. कारण काय तर आदल्या दिवशी रात्री जाहीर केलेले कर सवलतींचे बदलेले नियम तिला सकाळी पेपर न वाचल्यामुळे माहितीच नव्हते. आणि तेव्हा इंटरनेट नव्हता. तिचे पुरुष सहकारी एकमेकांना कोपरखळ्या मारीत तिची टिंगल करत होते आणि तिच्या सोबतच्या इतर स्त्रिया आपल्यावर हि वेळ येऊ नये म्हणून काय करावे लागेल या चिंतेत पडल्या.
बरे या चालीरीती फक्त स्त्रियांसाठीच त्रासदायक नाहीत तर पुरुषांसाठी सुद्धा तापदायक ठरतात. काही प्रसंग उदाहरणार्थ देते.
प्रसंग १ - नवरा , बायको आणि ३ पाहुणे कार मधून जाणार होते. २-३ तासांचा प्रवास होता.त्यातल्या ३ बायका स्थूल आणि पुरुष रोड होते.पुरुष पाहुणा स्वतःचे महत्व दाखवण्यासाठी आधीच समोरच्या सीटवर बसून गेला होता.आपला संस्कार दाखवण्यासाठी बायको आणि अन्य दोघी मागे अतिशय दाटीवाटीने  बसल्या. प्रवास संपेपर्यंत तिघींपैकी कुणाचा हात आखडून गेला, कुणाचा पाय ! नवऱ्याला त्यांची गैरसोय दिसत होती पण बोलणार कसे ?
प्रसंग २ - नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतांनाच सूनबाईला डॉक्टर कडे  नेण्याची वेळ आली. सासूबाई स्वतःच आजारी. आता ऑटो मध्ये सुनबाई सासऱ्याच्या बाजूला एकाच सीट वर कश्या बसणार या चर्चेतच १-२ तास वेळ गेला. शेवटी शेजारच्या काकू सोबत आल्या,त्या मध्ये बसल्या आणि पेच सोडवला.
प्रसंग ३ - मी नवऱ्याच्याच बाजूला बसणार या हट्टापायी बायको समोरच्या सीटवर बसल्यामुळे , उंच असलेले  मामेसासरेबुवा बिचारे पाय आखडून मागच्या सीटवर बसले.
     शिष्टाचार, संस्कार यापायी सोयीचा बट्ट्याबोळ वाजला. भारतीय असो किंवा पाश्च्यात्य शिष्टाचार असो दुसऱ्याला त्रासदायक होणारे, कुणाची गैरसोय करणाऱ्या रीती पाळण्यात कुठली " सभ्यता " दिसून पडते ?

  पूर्णिमा देशमुख पुरेकर -