गुरुवार, ७ मे, २०२०

दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( 2)


दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( 2)
" तुमच्या मते युवराज होण्यासाठी सर्वात योग्य कोण आहे द्रोणाचार्य ? युधिष्ठिर कि दुर्योधन ? " हस्तिनापूरचा प्रधान विदुर विचारत होता. "तुम्ही दोघांनाही इतकी वर्ष शिकवले आहे. फक्त शस्त्रकौशल्यच नव्हे तर त्यांचे अन्य गुणावगुण तुम्हाला समजलेच असतील. या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे ?"
द्रोणाचार्य दुविधेत पडले.प्रश्न सहजच केलेला नव्हता आणि उत्तर देणेही सोपे नव्हते. विदुराला नेहमीच युधिष्ठिराची बाजू उचलून धरताना त्यांनी बघितले होते. फार काय भीष्मांना सुद्धा युधिष्ठिराबद्दल जास्त ममत्व होते हे सुद्धा इतक्या वर्षात त्यांच्या लक्षात आले होते. द्रोणाचार्यांना कुरुकुलातले राजकारण आणि त्याचे दूरगामी परिणाम समजत होते. पण एक शिक्षक असल्यामुळे आपल्याच दोन शिष्यांमध्ये तुलना करून निवड करणे त्यांना पक्षपातीपणा केल्यासारखा वाटत होता.
" खरे सांगायचे तर दोघेही तुल्यबळ आहेत महात्मा विदुर. युधिष्ठीर खडग चालवण्यात कुशल आहे तर दुर्योधनासारखा गदायुद्ध करणारा अन्य कोणी नाही. दोघेही सर्वच शस्त्रविद्या उत्तम जाणतात. दोघेही पराक्रमी आणि वीर आहेत."
" ते तर मी जाणतोच आचार्य. पण एक युवराज म्हणून त्यांच्यात राज्य चालवण्यासाठी लागणाऱ्या गुणांबद्दल विचारतो आहे मी." विदुराने पुन्हा प्रश्न केला.
" युधिष्ठिराप्रमाणेच दुर्योधन सुद्धा वेदविद्या पारंगत आहे. न्यायनीतीशास्त्र आणि राज्यशासन या विषयांमध्ये दोघेही प्रवीण आहेत. युधिष्ठिर हा शास्त्र प्रमाण मानून चालतो. तो धर्मवेत्ता आहे. पण दुर्योधनाने अनेकवेळा काही नियमांना कालबाह्य ठरवून माझ्यासोबत वाद केलेले आहेत. पण असे असले तरीसुद्धा तो नियमाने कर्म करण्याचा आग्रही आहे. "
द्रोणाचार्यांचे हे कूटनीतीपुर्ण उद्गार ऐकून विदुर अस्वस्थ झाला. तेव्हढ्यात तिथे भीष्म पितामह आले. त्यांच्या संभाषणाचा धागा पकडत ते म्हणाले,
" खरेच दोघांमधून एकाची निवड करणे कठीण कार्य आहे. दोघेही आपल्या आपल्या ठिकाणी योग्यच आहेत. वैयक्तिक मत विचारलं तर मला जरी युधिष्ठीर जास्त योग्य वाटत असला तरी माझी निष्ठा कुरुकुलाच्या राज्यसिंहासनासोबत बांधली गेली आहे अन त्यादृष्टीने विचार करता मला दुर्योधनच जास्त योग्य वाटतो."
भीष्माचे हे बोलणे उपस्थित दोघांसाठी धक्कादायक होते. त्यांचे चेहरे पाहून भीष्मांनी एक सुस्कारा टाकत स्पष्टीकरण दिले.
" इतकी वर्ष युधिष्ठिर वनात राहिलेला आहे. त्याचे शिक्षण आणि शास्त्राभ्यास जरी उत्तमपणे झालेले असले आणि त्यात तो सर्वोत्तम असला तरीसुद्धा दुर्योधन हा जन्मापासून राजकुलात राहिलेला आहे. त्याचे अवलोकन खूप चांगले आहे. त्याची राजकारणाची समज आणि कूटनीतीची जाण युधिष्ठिरापेक्षा जास्त खोल आहे." वयोवृद्ध भीष्मांनी थोडा श्वास घेतला. तेवढा अवकाशही विदुरासाठी पुरेसा होता. रागाने उसळत तो म्हणाला,
" पितामह, ज्याला तुम्ही कूटनीतीची जाण म्हणता ना तो त्याचा कपटीपणा आहे.एक शासक बनण्याच्या लायकीचा तर तो नाहीच पण मी सांगतो, त्याला युवराज घोषित केले ना तर प्रजा सुद्धा त्याला नाकारेल."
यावर भीष्मांनी मान हलवली. " विदुर, तुला धर्माची उत्तम समज आहे पण दुर्योधनाच्या बाबतीत तुझी दृष्टी अंध आहे. तुझ्यापेक्षा मी वयाने मोठा आहे पण तेव्हढेच एक कारण नाही, आजपर्यंत कुरुकुलातल्या प्रत्येकाच्या स्वभावाचे वैशिष्ठ्य मला तुझ्यापेक्षा जास्त चांगले समजते. कोणाचे बलस्थान काय आहे आणि कोण कुठे दुबळा ठरतो हे तू बघतच नाही आहेस. युधिष्ठीर जरी धर्माचा पुढारी असला तरी तो एकटा स्वतःहून फार काही करू शकत नाही. प्रत्येकवेळी त्याला भीम आणि अर्जुनाची गरज पडते. एका  राजासाठी असे परावलंबित्व धोकादायक असते. एक उत्तम राजा आपले सामर्थ्य कुणा एकाच्या जोरावर मर्यादित ठेवत नसतो हे तत्व तू विसरतो का विदुर ? "
" मला मान्य आहे पितामह पण मग दुर्योधनाचे तरी वेगळे काय आहे ? तो आणि त्याचे भाऊ त्या नीच शकुनिच्या तालावर नाचत असतात. निदान भीम आणि अर्जुन युधिष्ठिराप्रमाणेच सज्जन आहेत. भावाच्या आज्ञेत आहेत. दुर्योधनाच्या बाबतीत तसे काही नाही." विदुराच्या म्हणण्याला द्रोणाचार्यांनी सुद्धा मान हलवून दुजोरा दिला.
" तुमचे म्हणणे काही अंशी खरे असले तरी एक विसरता. उद्या जर दुर्योधनापासून शकुनिला दूर ठेवले,पांडवांना बाजूला केले तरी राज्यावर शासन करण्यास आणि प्रसंगी युद्ध झाल्यास लढून राज्याचे रक्षण करण्यासाठी तो एकटाच सक्षम आहे. पण भीम आणि अर्जुनाशिवाय युधिष्ठीर एकटाच काही करू शकणार नाही. हे तुम्हाला अप्रिय वाटत असले तरी सत्य आहे. आणि प्रजा राजाला एक बलवान रक्षकाच्या भूमिकेत बघत असते. त्यामुळे दुर्योधनाला प्रजा नाकारणार नाही."
दुर्योधनाच्या पक्षाकडून भीष्म असा प्रतिवाद करतील हे विदुरासाठी अनपेक्षित होते. दोन दिवसांनी जेव्हा युवराज कोण होणार याची घोषणा होईल तेव्हा भीष्म पितामह आणि महाराज धृतराष्ट्र दुर्योधनाचेच नाव घेतील याची चिंता त्याला भेडसावू लागली. काय करावे म्हणजे स्वतः धृतराष्ट्रच युधिष्ठिराला युवराज्याभिषेक करतील याचा तो विचार करू लागला.
अखेर तो निर्णायक दिवस उजाडला. राजसभा खच्च भरली होती. हस्तिनापूरचा युवराज कोण हे आज कळणार होते. सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती. मंत्रिमंडळ आणि प्रजा यांच्यात दोन गट पडले होते. एक गट युधीष्ठीराकडून होता तर दुसरा दुर्योधनाकडून.
सभेत आधीच ठरल्याप्रमाणे दोन्ही राजकुमारांना न्यायदानाचे एक कार्य करावे लागणार होते. तक्रार एकच राहणार होती. पण ज्याचा न्यायनिवाडा सर्वोत्तम असेल तोच युवराजपदासाठी निवडल्या जाणार होता.
पाच मित्रांनी कट करून एका सावकाराच्या घरात दरोडा घातला होता. त्या पाचही आरोपीना पकडले होते. त्यांना काय शिक्षा द्यावी हे राजकुमारांना ठरवायचे होते. हीच त्यांची परीक्षा होती.
वयाने ज्येष्ठ म्हणून युधिष्ठिराला प्रथम संधी दिल्या गेली. त्याने सर्व आरोपींचे वर्ण, त्यांचे व्यवसाय,त्यांची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती याबद्दल सखोल माहिती घेतली. आणि त्यानंतर प्रत्येकाला त्याच्या वर्णाप्रमाणे तसेच आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीनुसार वेगवेगळा दंड केल्या जावा असा न्यायनिवाडा दिला.
युधिष्ठिराने न्याय आणि नीतिधर्माला धरून न्यायदान केल्याचे पाहून सभेतले बहुतेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या मनात युधिष्ठिराचे युवराजपद पक्के झाले. पण अजून दुर्योधन बाकी होता.
" महाराज, युधिष्ठीराने जो न्याय दिला तो प्रस्थापित समाज,धर्म आणि नीतिनियम यांना अनुसरून असला तरी मला तो मान्य नाही. मला असा न्याय करायला लावणारा धर्मही मान्य नाही. " दुर्योधनाचे हे धारिष्ट्य पाहून सभा थक्क झाली. त्याच्या या बोलण्याने पुन्हा त्याच्या "दुष्ट" प्रतिमेला उजाळाच मिळाला जणू. लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. जो तो एकमेकांना विचारू लागला.
"अरे कसा राजकुमार आहे हा ? धर्माची गोष्ट मान्य नाही म्हणतो ? "
" आज धर्म मान्य नाही म्हणतो आहे उद्या काय म्हणेल ? "
विदुराने हात उंचावून सभेला शांत केले. काहीश्या चढ्या आवाजात तो दुर्योधनाला म्हणाला,
"राजकुमार दुर्योधन, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ? तुमचा न्याय काय आहे ते सांगा. राजकुमार युधिष्ठिराच्या न्यायदानावर भाष्य करायची अनुमती नाही तुम्हाला."
दुर्योधनाने एकवार सभेवर नजर फिरवली. ठाम स्वरात तो बोलू लागला.
" क्षमा असावी महाराज, मी युधिष्ठिराच्या न्यायदानावर नव्हे तर प्रचलित न्यायपद्धतीवर भाष्य करत होतो. अनुमती असेल तर मी माझी भूमिका स्पष्ट करतो. " महाराजांनी होकार देताच तो पुढे म्हणाला,
" महाराज, न्यायाधीश हा निष्पक्ष असायला हवा हे तर आपणा सर्वांनाच मान्य आहे, मग न्याय निष्पक्ष का नको ? एकसमान का नको ?
अपराध जर एकच आहे तर अपराधाची शिक्षा सुद्धा एकच असायला हवी, समान असायला हवी असे माझे स्पष्ट मत आहे. कुणी उच्च वर्णाचा आहे म्हणून त्याला जास्त शिक्षा आणि कुणी नीच वर्णाचा आहे म्हणून कमी शिक्षा करावी हे मला पटत नाही. कुणाच्या वर्णामुळे किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे अपराधाची तीव्रता कमी जास्त ठरवता येते का ? उद्या जर कुणी हत्या केली तर क्षत्रिय म्हणून त्या हत्येची शिक्षा नाही आणि क्षुद्राला त्याबदली मृत्युदंड दिल्या जात असेल तर असल्या न्यायधर्माला निष्पक्ष कसे काय म्हणावे ? एकवेळ दंड म्ह्णून काही मूल्य चुकवण्याची शिक्षा असेल तर आर्थिक परिस्थिती लक्षात घेणे समजू शकते. पण इतर वेळी असले असमान निकष लावणे म्हणजे समतोल न्याय होत नाही.
या पाचही जणांनी संगनमत करून चोरी केलेली आहे. चोरीचा ऎवजही कदाचित ते एकमेकात समान वाटून घेणार असतील. मग आता पकडल्या गेल्यानंतर ते वेगवेगळे कसे काय ठरू शकतात ? म्हणूनच माझ्या मते या पाचही जणांना प्रत्येकी दोन वर्ष कारावासाची शिक्षा देणे योग्य ठरेल."
दुर्योधनाचे बोलणे ऐकताच सभेत स्मशान शांतता पसरली. काय बोलावे हे कुणालाच समजेना. दुर्योधनाने फक्त तत्कालीन न्यायपद्धतीच नव्हे तर वर्णव्यवस्थेवरच हल्ला केला होता. त्याच्या बोलण्यातले तथ्य गळी उतरवणे कठीण जाऊ लागले. त्यांनी मान हलवून दुर्योधनाला नकार दिला. विदुराला मंत्रिगणांच्या चेहऱ्यावरून त्यांचा निकाल काय असावा हे समजले. मनोमन खुश होऊन तो महाराजांना म्हणाला,
"महाराज , न्याय आणि धर्म हे राज्याचा आधार असतात. आणि जो व्यक्ती या आधारांवरच वार करतो तो राज्याचे कल्याण आणि प्रजेचे रक्षण कसे काय करू शकेल ? राजकुमार दुर्योधनाचे विद्रोही विचार राज्यासाठी घातक ठरू शकतात. पण राजकुमार युधिष्ठिरांनी केलेल्या न्यायदानातून त्यांच्यात धर्माची जाण आहे हे तर सिद्ध होतेच पण त्याचसोबत प्रजेतल्या दुर्बल घटकांबद्दल त्यांना वाटणारी करुणा स्पष्टपणे दिसून येते. म्हणूनच युवराज म्हणून मी आणि सगळे मंत्रीगण राजकुमार युधिष्ठिरांची निवड करतो आहे. एक निष्पक्ष आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून आपण आपला अंतिम निर्णय द्यावा अशी मी विनंती करतो. "
विदुराचे शेवटचे सूचक वाक्य धृतराष्ट्राला भेदून गेले. खरेतर एक पिता म्हणून नव्हे पण एक राजा म्हणून त्याला दुर्योधनाचे विचार पटले होते. पण आज जर तो मंत्रिमंडळाविरुद्ध गेला असता तर त्याने पक्षपातीपणा केला असा आरोप त्याच्यावर झाला असता. त्याची प्रतिमा मालिन झाली असती आणि कदाचित त्याचे राज्यपदहि हिरावल्या गेले असते. आणि एकदा का राज्यपद गेले कि मग तोच काय त्याच्या पुत्रांना कोणी वाली नव्हता राहणार. एक आवंढा गिळून त्याने आधीच झालेल्या निर्णयावर आपले शिक्कामोर्तब केले. युधिष्ठीर हस्तिनापूरचा युवराज आणि भावी राजा म्हणून घोषित झाला.
*********************************************************************************
एक शिष्य म्हणून दुर्योधन उत्तम होता. तो बुद्धिमान तर होताच पण शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही विद्यांमध्ये तो पांडवांच्या तोडीचा होता. त्याने आणि भीमाने द्रोणाचार्य आणि नंतर बलरामाकडे गदायुद्धाचे शिक्षण घेतले. पण त्यातले त्याचे नैपुण्य बघून स्वयं बलरामानेच स्वीकारले कि दुर्योधनासारखा गदायुद्ध प्रवीण संपूर्ण जगात कोणी नाही.
एका क्षत्रियांप्रमाणेच तो गुरु,ब्राम्हण,ऋषी आणि गोधनाची सेवा करत असे. प्रत्यक्ष दुर्वास ऋषींना त्याने आपल्या सेवेने प्रसन्न करून घेतले होते. यज्ञयागासाठी विपुल दानदक्षिणा देणे आणि मंदिरे अन्नछत्र निर्माण करणे यासारख्या कार्यासाठी तो सदैव तत्पर असे.
पण इतके असूनही त्याला "दुष्ट" अशी उपाधी का मिळाली ?
महाभारतामध्ये एकूण तीन प्रसंगी दुर्योधन प्रस्थापित समाजरचनेच्या किंवा शिष्टचाराच्या विरुद्ध जातांना दिसतो. उपरोक्त प्रसंग आणि सूतपुत्र कर्णाला अंगराजपद देण्याचा प्रसंग या वेळी त्याचे हे विद्रोही विचार आणि आचरण दिसून पडते. तत्कालीन समाजाला जरी ते मान्य नसले तरी त्यासाठी त्यांनी दुर्योधनाला अधर्मी मानलेले नाही.
 दुर्योधनाने अधर्माची परिसीमा गाठली ती द्रौपदी वस्रहरणासमयी !
**********************************************************
- सौ.पूर्णिमा देशमुख पुरेकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा