मंगळवार, १२ मे, २०२०

दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( 8 )


श्री
दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( 8  )

 नेहमीप्रमाणेच आजही तो पाण्यात उभा होता. अंतःस्फूर्तीने त्याला समजून चुकले होते कि आज त्याचा आणि युद्धाचा सुद्धा अंतिम दिवस असेल.
आज जो काय सोक्षमोक्ष लागायचा तो लागेल. त्याच्या डोळ्यासमोरून युद्धात वीरता दाखवलेले अनेक योद्धे तरळले.
त्याचे पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, त्याचे लाडके भाऊ,त्याचा सोबती कर्ण,प्रिय पुत्र लक्ष्मण आणि शकुनिमामा ! त्याच्या अधिकारासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.
पाण्यातच उभे राहून त्याने अश्रुरुपाने त्यांचे तर्पण केले. तोच मागून एक आवाज आला.
" अच्छा, या पाण्यात लपून बसला आहेस का दुर्योधना ? का रे ? मरणाची भीती वाटते आहे का आता ? अधर्म करताना नाही वाटली भीती तुला ? " कृष्णाचा उपहासात्मक प्रश्नाने तो खवळला.
" तुला चांगलेच माहिती आहे वासुदेवा ,हा दुर्योधन मरणाला कधीच भ्यायला नाही. आणि कसला अधर्म ? माझ्या वाटणीच्या राज्यावर मी हक्क दाखवला म्हणून अधर्म ? कोणी ठरवलं धर्म काय आणि अधर्म काय ? तू ? तू कुठला धर्म पाळला ? पितामह भीष्मांना मारले तो धर्म होता ? द्रोणाचार्यांना खोटे बोलून शस्त्रत्याग करायला लावला आणि मग मारून टाकले, तो धर्म होता ? जमिनीवर, निशस्त्र असलेल्या माझ्या कर्णाला मारले तो धर्म होता ? निदान आता तरी धर्माधर्माच्या गोष्टी मला सांगू नकोस कृष्णा. "
" त्या सगळ्यांनी द्रौपदी वस्रहरणाच्या वेळी मौन राहून अधर्माला मूकसंमती दिली, अधर्माची साथ दिली, म्हणून त्यांचा शेवट असा झाला दुर्योधना. आता तरी भानावर ये आणि पांडवांसोबत संधी कर, युद्ध थांबव आणि त्यांना त्यांचे राज्य वापस दे. मला खात्री आहे ते तुला उचित मान नक्कीच देतील. " कृष्णाने त्याला सुचवले.
कृष्णाचे बोलणे ऐकून दुर्योधन जन्मात प्रथमच विषादाने हसला. त्याचे हसणे बघताच कृष्ण काय ते समजला.
"आणि तू जर आत्ताही अधर्म सोडला नाही तर तुझी गत त्यांच्यापेक्षाही वाईट होईल हे आधीच सांगतो आहे." कृष्ण कडाडला.
दुर्योधन पुन्हा हसला. आता अजून वाईट गत होण्यास शिल्लकच काय राहिले होते ? त्याचे भाऊबंद, सगेसोयरे, मुलं आणि मित्र धारातीर्थी पडले होते. उरला होता तो एकटाच. एकाकी. नाही.  त्याचे तत्व आजही त्याच्या सोबत होतेच की ! ज्या तत्वांना त्याने आजपर्यंत छातीशी कवटाळून जीवन उपभोगले होते, ते तत्व सोडून ' मानाचे स्थान ' घेऊन काय करणार होता तो ? हस्तिनापूरचा युवराज दुर्योधन, त्या कुंतीपुत्रांचा   मिंधा, आश्रित बनून जगणार ? नाही. कदापि नाही. त्याला मृत्यूची भीती नव्हती. त्याने मरण स्वीकारले.
" वासुदेवा, आजपर्यंत मी कधीच नियमाविरुद्ध कार्य केले नाही. मी अनेक वाईट कृत्ये केली, पण ती नियमांच्या चौकटीत राहूनच. लहान होतो तेव्हा सुद्धा भीम आमच्यासोबत दांडगाई करून आम्हाला त्रास देत होता. तेव्हा कोणी त्याला अडवले नाही. का ? फक्त ते पितृहीन होते म्हणून त्यांना सहानुभूती मिळाली. आणि आम्ही ? आमच्याकडे कधी कोणी प्रेमाने बघितले का ? कितीतरी वेळा माझ्या भावांना भीमाच्या भीतीने झोपेत दचकतांना बघितले होते मी. तेव्हापासूनच त्या कुंतीपुत्रांबद्दल चीड निर्माण झाली. मान्य कि मी त्याला मारण्याचा कट केला. पण हस्तिनापूरच्या राज्यावरचा माझ्या अधिकारासाठी मी सगळे करत होतो. त्यासाठी साम,दाम, दंड भेद सगळे काही वापरले. ते सगळे नीतिशास्त्रानुसारच. ते कुंतीपुत्र माझे शत्रू आहेत आणि राहणारच. राज्य तर त्यांनाही हवेच होते. पण ज्येष्ठ पुत्राचा ज्येष्ठ पुत्र म्हणून आणि औरस पुत्र म्हणूनसुद्धा माझाच अधिकार आहे हे सगळ्यांना मान्य असूनही तुम्ही मला चुकीचे ठरवले. द्यूतामध्ये एकदा राज्य गमावल्यानंतर ते परत देण्याचा प्रश्नच येत नव्हता. काय चुकले माझे ? " दुर्योधनाचा संताप उफाळून आला.
" आणि द्रौपदी वस्त्रहरण ? ते कुठल्या नियमामध्ये बसत होते दुर्योधन ? तू राज्यासाठी भलेही पांडवांना शत्रू मानून कटकारस्थाने केली. पण द्रौपदीला भर सभेत अपमानित करण्याचा अक्षम्य अपराध तू केलेला आहेस. द्रौपदीच काय, तिच्याजागी दुसऱ्या कोणाही सामान्य स्त्रीसोबत असे जघन्य कृत्य तू केले असतेस ना तरी त्या अपराधाला क्षमा नाहीच. एका स्त्रीला अपमानित करून कुठले वीरत्व सिद्ध केलेस रे तू ? " कृष्णाचे बोलणे दुर्योधनवर लाज एखाद्या आसुडासारखे फुटत होते.
या वेळी मात्र दुर्योधन अंतर्मुख झाला. त्याचे गप्प बसणे बघून कृष्णाचा पारा अजूनच चढला.
" आता का दातखीळ बसली तुझी? बोल ना आता ? कुठला नियम पाळला तू ? "
एक खोल श्वास घेऊन दुर्योधन बोलू लागला.
" द्रौपदीचा मानभंग हि माझी एकमेव चूक आहे वासुदेव. आणि फक्त तुझ्याचसमोर मी आज ती मान्य करतो."
" चूक ? " कृष्ण संतापला. "चूक नाही दुर्योधन, सर्वात मोठे पाप आहे ते तुझे. त्याला प्रायश्चित्त नाहीच."
" तसे म्हण हवेतर. पण वासुदेवा, भानुमतीची शपथ घेऊन मी सांगतो, त्या दिवशी मला फक्त त्या अहंकारी द्रौपदीला धडा शिकवायचा होता. पांडवांचा पाणउतारा करायचा होता. आणि त्या भावावेगातच मी ते कृत्य करून बसलो. मला तिची अभिलाषा नव्हती." दुर्योधनाचे स्पष्टीकरण तुटपुंजेच असले तरी त्यामागचा प्रामाणिक स्वर जाणवला. काही क्षण शांततेत गेले. पण लगेच त्याने आवाज चढवून सवाल केला,
" माझ्या या पापाची शिक्षा भोगायला मी तयार आहे वासुदेवा, पण माझे बोलणे लक्षात ठेव. तुम्ही मला दुष्ट, अधर्मी म्हणत आला आहेत ना. या अधर्मी दुर्योधनाला मारण्यासाठी तुम्हाला सुद्धा अधर्माचीच कास धरावी लागेल. पराजित होऊनही मी स्वर्गसुख भोगेन, पण जिंकून सुद्धा तुम्हाला सर्वस्व गमवावे लागेल. जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागतील. जा सांग तुझ्या त्या कुंतीपुत्रांना. हा दुर्योधन त्यांची वाट पाहतो आहे म्हणावे. आजही त्या पाचही जणांना यमसदनी पाठवण्याची ताकद आहे माझ्यात. हिम्मत असेल तर समोर या."
**********************************************
" सुयोधना, आम्हा पाचपैकी कुणाही एकाची निवड करून त्याच्यासोबत युद्ध कर. जर तू जिंकलास तर इंद्रप्रस्थासकट सगळे राज्य तुझे होईल."
युधिष्ठीराने अनपेक्षित डाव टाकला. त्याचे हे बोल ऐकून अर्जुन,नकुल आणि सहदेव मनात धास्तावलेच. कारण दुर्योधनासारख्या प्रचंड ताकदीच्या योद्ध्यांसोबत लढणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देणे होते. गदायुद्धात त्याच्या तोडीचे संपूर्ण जगात कोणी नव्हते. बलराम त्याचे गुरु जरी असले तरी त्यांचा तो शिष्य गुरुच्याही वरचढ ठरला होता. नकुल सहदेव तर काय अर्जुनही त्याच्या पासंगाला पुरला नसता.
सगळ्यांनाच वाटले कि युधिष्ठीराने असला डाव टाकून मूर्खपणा केलेला आहे म्हणून. सगळ्यांनाच वाटले कि दुर्योधन नकुल  किंवा सहदेवापैकी एकाला निवडेल आणि ज्या राज्यासाठी हा सगळं नरसंहार घडवल्या गेला तो व्यर्थ जाईल. राज्य दुर्योधनालाच मिळेल.
पण दुर्योधनाने त्या अंतिम समयी देखील आपला क्षत्रिय बाणा सोडला नाही.
"  तुला काय वाटले युधिष्ठिर ? ह्या नकुल सहदेवांसारख्या सोबत लुटुपुटीचे युद्ध करून राज्य मिळवू ? लक्षात ठेवा, हा दुर्योधन क्षत्रिय आहे आणि एक खरा क्षत्रिय आपल्या तोलामोलाच्या योद्ध्यांसोबतच युद्ध करतो. तसे तर तुमच्यापैकी कोणीच स्वतःला क्षत्रिय म्हणवण्याच्या लायकीचे राहिले नाही आहेत कारण या युद्धात जेव्हा नियम तोडले तेव्हाच तुमचे क्षत्रियत्व तुम्हाला सोडून गेले होते. पण जाऊ द्या, तुम्हाला क्षत्रियत्व शिकवण्याची वेळ कधीच गेली आहे. भीमा, ये समोर आणि हिम्मत असेल तर कर माझ्यासोबत द्वंद्वयुद्ध. " दुर्योधनाने ललकारले.
भीषण युद्ध सुरु झाले. दुर्योधनाच्या तडाख्यांसमोर भीम कमी पडू लागला. दोनदा तर तो बेशुद्दच पडला. शेवटी दुर्योधनाची सरशी होते आहे असे दिसताच अर्जुनाने आपल्या मांडीवर थाप मारून भीमाला संकेत दिला. लडखडत्या पावलांनी भीम उठला . त्याने आपली गदा उंचावली,
दुर्योधन प्रतिकार करण्यासाठी सरसावला पण...
भीमाने त्याच्या मांडीवर आणि कोमल अवयवांवर प्रहार केला. प्राणांतिक वेदनेतही दुर्योधन भीमाच्या त्या अधर्मी डावपेचाने आश्चर्यचकित झाला,क्रुद्ध झाला. पण भीमाने एकामागोमाग एक असे वार केले आणि
तो अजेय पराक्रमी योद्धा खाली कोसळला !
*******************************************************
कृष्णाला नमस्कार करत त्याने शेवटचा श्वास घेतला. पांडव विजयोन्मादाने चित्कारत होते. त्याच्या पापांचा पाढा वाचून त्याला दूषणे देत होते.  पण कृष्णाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. आज कृष्णाला त्या वीर कुरुश्रेष्ठांचे, सुयोधनाचे सद्गुण आठवत होते.
जन्मभर त्याने ऋषीमुनी आणि ब्राम्हणांचा यथोचित मान ठेवून रक्षण केले, कर्णाप्रमाणेच त्याने देखील विपुल दाने दिली होती कारण त्याने दिलेले दान दुप्पट होईल असे त्याला वरदान मिळाले होते ना ! 
तो एक उत्तम राज्यकर्ता होता, न्यायी,समानतेचा पुरस्कर्ता आणि धर्मानुसारी शासक होता.त्याचे प्रजेवर आणि प्रजेचे त्याच्यावर अतोनात प्रेम होते. त्याने आपली सगळी कर्तव्ये डोळसपणे आणि उत्कृष्टपणे पार पाडली होती. एक पुत्र,पती, पिता, मित्र आणि राजा म्हणून तो सर्वोत्तम तर होताच पण त्याचे शत्रुत्व सुद्धा प्रामाणिक होते. अंतिम युद्धामध्ये सुद्धा त्याने पांडवांपैकी त्याच्या तुल्यबळ असलेल्या भीमालाच ललकारले होते. तसे बघितले तर पांडवांपैकी कोणीच त्याच्या तोडीचे नव्हते. त्याने भीमाव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाला सहज यमसदनाला पोहचवले असते. पण त्याने तसे केले नाही. तो सर्वार्थाने क्षत्रिय होता. मृत्यू सुद्धा त्याचे वीरत्व पाहून खजील झाला.
   वैष्णव यज्ञ करणारा दिग्विजयी दुर्योधन, ज्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर द्वारका सोडून संपूर्ण आर्यावर्त जिंकले होते तो महापराक्रमी दुर्योधन आज स्वर्गात अढळ स्थानी विराजमान झाला होता.
त्या  क्षत्रियांच्या कलेवरावर स्वर्गातुन अप्सरा,गंधर्व यक्षकिन्नर आणि देवही पुष्पवर्षाव करत होते,त्याचे स्तुतीसुमने गात होते.
तो कलियुगाचा अवतार होता. ज्याप्रमाणे त्याने अनेक अधर्म केले त्याचप्रमाणे धर्मकार्यसुद्धा केले. म्हणूनच त्याचे विद्रोही विचार येणाऱ्या कलियुगात " धर्मसम्मत आणि न्यायसम्मत " ठरतील हे कृष्णाला ठाऊक होते.
द्रौपदीचा मानभंग करून त्याने स्त्रियांच्या मूलभूत अधिकाराला वाचा फोडण्याच्या कार्याला उद्दयुक्त केले. ते सुद्धा कलियुगाचा अवतार असल्यामुळेच.
भविष्यात स्त्रियांना आजपर्यंत मिळालेले  समान स्थान मिळवून देण्यासाठी त्याला तसे अधर्म घडवून आणावे लागले. कारण कोणीतरी समाजाला, न्यायशास्त्राला आणि धर्मपुरुषाला आरसा दाखवुन त्यांचा अन्यायी चेहरा दाखवणे गरजेचे होते.आणि त्यामुळेच  उदासीन अश्या समाजमनात विचारमंथनाला सुरुवात होणार आहे याची खात्री होती.
आज  तो श्रेष्ठ कुरुवंशी चिखलात चिरनिद्रा घेत होता.
प्रत्यक्ष महादेवाने दुर्योधनाचे वरचे शरीर निर्मिले होते. वज्राप्रमाणे कठोर. आणि देवी पार्वतीने फुलांप्रमाणे कोमल असे नाभीखालचे अंग बनवले होते.  
आज तो देह मातीमोल झाला होता. आज एक विद्रोही आत्मा जगाच्या नियमबंधनातून मुक्त झाला.
- सौ.पूर्णिमा देशमुख पुरेकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा