श्री
दुर्योधन - एक संपूर्ण
क्षत्रिय ( १)
कुणाच्या तरी रडण्याने सुयोधन दचकून जागा झाला.
त्याने आजूबाजूला नजर टाकली. अयोबाहू , त्याचा छोटा भाऊ झोपेतच रडत होता,बडबडत होता.
"भीमा नको, मला मारू नको. मला पाण्याची
भीती वाटते रे. मला नको टाकू पाण्यात."
त्याच्या आवाजातली भीती सुयोधनाला जाणवत होती.
तो त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू लागला.
"घाबरू नकोस अयो, मी आहे ना तुझ्याजवळ.
तुला काही होणार नाही." झोपेतही अयोबाहुला सुयोधनाचा आश्वासक स्पर्श कळला.
"दादा, मला भीमापासून वाचवशील ना ?
" तो पुटपुटला.
"हो रे, एक भीम काय, हजारो भीम जरी आले
ना तरी मी तुमचे रक्षण करेन. झोप बाळा. " अयोभाऊ झोपी गेला. पण सुयोधनाची झोप
उडाली.
पण हि काही आजचीच गोष्ट नव्हती. कुंतीपुत्र हस्तिनापुरात
आल्यापासून त्याला आणि त्याच्या भावांना घोर लागलेला होता. म्हणायला जरी ते १०० असले
तरी सुयोधन आणि सुशासनापेक्षा बाकी सगळे लहानच होते. बाकी चार कुंतीपुत्र एव्हढे वाईट
नव्हते. पण तो दुष्ट भीम मात्र त्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हता. वयाच्या
मानाने तो खूपच आडदांड होता. त्यातच त्याला आपली शक्ती दाखवण्यासाठी लहान मुलांना त्रास
देण्याची,भीती दाखवण्याची दुष्ट सवय होती. रोजच तो कुणाला ना कुणाला छळत असे. कधी कुणाला
झाडाला उलटे लटकावून ठेवायचा तर कधी कुणाचे केस धरून त्यांना खोल हौदाच्या पाण्यात
बुचकळून गुदमरून टाकत असे. त्याची तक्रार केली तर पितामह भीष्म त्याचीच बाजू घेत असत.
"अरे लहान आहे रे तो. गमतीत करतो सारे काही.
त्याचा वाईट हेतू नाही आहे. इतकी वर्ष जंगलात राहिला ना, माहिती नाही रे त्याला दुसरे
काही खेळ. तुम्हीच त्याला तुमच्यात घेऊन नवीन खेळ शिकवा. मग तो असे वागणे विसरून जाईल."
सुयोधनाने ते सुद्धा करून बघितले. पण भीमाला
त्यात रस नव्हता.
" ह्यॅ, असले बायकी खेळ मी नाही खेळणार.
तुम्हीच खेळा. " असे म्हणत तो त्यांना डिवचत असे.
दिवसेंदिवस त्याची दहशत वाढतच चालली होती. सुयोधनाचे
छोटे भाऊ झोपेतही भीतीने थरथरत असायचे, दचकून रडायचे.
शेवटी सुयोधनाने सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने
भीमाला ललकारले. मुष्टीयुद्धात भीमाला असे काही झोडपून काढले कि पुन्हा तोंड वर करणार
नाही. पण झाले उलटेच. भीमाने साळसूदपणाचा आव आणून पितामहांकडे त्याची तक्रार केली.
सुयोधनाने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा कांगावा केला. पितामह चिडले. त्यांनी
लगेच धृतराष्ट्राच्या कानावर हि बातमी घातली. भर सभेत त्याला बोलावल्या गेले. त्याची
बाजू न ऐकता उलट त्यालाच समज दिल्या गेली आणि मग त्याला सभेबाहेर पाठवून दिले. रागाने
लाल झालेला सुयोधन सभागृहाच्या छोट्या दाराबाहेर उभा होता. सभेतले बाकी लोक आणि त्याचे
बाबा मुख्य दाराने बाहेर पडले पण काही लोक अजूनही आतच होते.त्यांच्या तोंडून आपले नाव
ऐकताच सुयोधन लपून ऐकू लागला. पितामह भीष्म, विदुर काका आणि कृपाचार्य बोलत होते. पितामह
म्हणत होते,
" धृतराष्ट्राने मुलाला वेळीच आवर घालायला
हवा. उद्या जर बिचाऱ्या पांडुपुत्रांना काही झाले तर मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही.
अरे, ते बिचारे बापाविना निराधार झालेले पोरं आहेत. ते असं वागणार नाहीतच. त्यांच्याबद्दल
असले आरोप करून स्वतःची प्रतिमा चांगली करायचा डाव आहे हा. राजा या नात्याने धृतराष्ट्राला
कठोर व्हावेच लागेल."
" पण त्याला स्वतःलाच हे नको आहे ना ! काही
ठोस करायचे म्हंटले कि त्याची स्वतःचीच महत्वाकांक्षा आड येते. स्वतःला राजा होता आले
नाही म्हणून आपल्या पोराला राजा करायचे आहे त्याला. पण खरा युवराज तर युधिष्ठीरच आहे.
" मृदुभाषी कृपाचार्यांचे हे बोलणे ऐकून सुयोधनाला धक्का बसला. तेवढ्यात विदुरकाका
बोलू लागले.
" मी तर त्याच्या जन्माच्या वेळीच म्हंटले
होते कि असल्या अपशकुनी, कुलविनाशी मुलाला मारून टाका म्हणून, पण तेव्हा माझे ऐकले
नाही तुम्ही. सगळ्या ज्योतिष्यांनी सुद्धा तेच सांगितले. पण पित्याचा मोह आड आला. काय
तर नाव ठेवले, सुयोधन ! सुयोधन नाही, दुर्योधन म्हणायला हवे त्याला."
सुयोधनाला दुसरा धक्का बसला. तो अपशकुनी ? कुलविनाशी
? का ? काय केले होते त्याने असे ?
सुयोधनाच्या मनात थैमान सुरु झाले. उलट सुलट
विचारांच्या भोवऱ्यात असतांनाच त्याला आजपर्यंत पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली.
कुरुकुलातले प्रत्येक जण त्याच्याकडे भीतीने
का बघत, पितामह भीष्मांच्या डोळ्यात तो समोर आला कि धास्ती आणि चीड का उमटत असे, विदुरकाकांच्या
नजरेत घृणा का होती हे आज त्याला कळले.
एकाएकी सुयोधन मोठा होऊन गेला. आपल्या महालाकडे
जाता जाता त्याला दिसले त्याचे बाबा. कुणाचा तरी आधार घेत,एका हाताने मुकुट सांभाळत
बागेत फिरत होते. जन्म दिला म्हणून ते पिता होते. पण ते कधी त्यांचे बाबा झाले का
?
दृष्टिहीन असल्यामुळे त्यांच्या ऐवजी लहान भावाला
राजा केले याचा राग त्यांच्या मनात एखाद्या सुप्त ज्वालामुखीसारखा खदखदत होता. पांडूकाका
अकाली मृत्यमुखी पडले म्हणून त्यांना नावापुरते राजा बनवून ठेवले होते. त्यांचे प्रेम
मुलगा म्हणून होते का ? कि कृपाचार्य म्हणाले तसे त्यांच्या अपूर्ण महत्वाकांक्षा पूर्ण
करणारे साधन म्हणून ते त्याच्याकडे बघत आले ?
पित्याचा बलदंड आधार त्याला कधी मिळालाच नाही.जो
बाप स्वतःच न्यूनगंड बाळगून स्वतःला असुरक्षित समजून वावरत होता तो आपल्या मुलांना
काय सुरक्षा देणार ? कायम ते परिस्थितीपुढे लाचार बनून जगत राहिले. घुसमटत राहिले.
नाविक नसलेले जहाज जसे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला वळते तसे त्यांचे निर्णय असायचे.
त्यांच्याकडे काय दाद मागणार ?
तेव्हढ्यात त्याची आई गांधारी त्याला दिसली.
डोळ्यावर पट्टी बांधलेली त्यांची आई, जाणून बुजून आंधळी झालेली. एकीकडे स्वतःवर अन्याय
झाल्याची भावना तिला जाळत होती तर दुसरीकडे असहाय्य पतीला आणि राणीपदाचे कर्तव्य सांभाळण्याच्या
कसरतीत ती आई म्हणून त्यांच्या वाट्याला कितीशी आली ? समोर आली ती सुद्धा त्याच्या
कृत्यांचा जाब विचारण्यापुरतीच. कधी प्रेमळ समजूतदार पण खंबीर आई मिळालीच नाही. तिच्यापेक्षा
कुंतीकाकू बरी. प्रत्येकवेळी ठामपणे आपल्या पोरांच्या बाजूने उभी राहते.
त्याने सभोवार नजर फिरवली. एवढा मोठा कुरुकुलाचा
राजमहाल. कश्याला काही कमी नाही. पण इथे कधी घरपण वाटलेच नाही. कधी निखळ प्रसन्नता
जाणवलीच नाही. सगळीकडे भकास, भयग्रस्त मरगळलेले वातावरण होते.
तेव्हढ्यात त्याच्या भावांचा गलका कानावर पडला.
त्यांचा आनंदी गोंगाट, खिदळणे ऐकून त्याच्या मनावरचे उदास सावट तर दूर झाले. "
दादा आला, दादा आला. " म्हणत त्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. सुयोधन त्यांच्याकडे
बघून हसला. पण लगेचच एक काळजी मनात घर करून गेली. उद्या जर खरेच ते कुंतीपुत्र राजा
बनले तर त्याच्या या भावांचे काय होणार ? कुठे जाणार ते सगळे ? त्या दुष्ट भीमाचे आश्रित
होऊन जगावे लागेल का त्यांना ? नाही. कदापि नाही. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने
निश्चय केला.
जन्माने असो किंवा कर्माने असो, त्यांचे आईबाप
जरी बघू शकत नसले, त्यांचे पालन करू शकत नसले तरी आजपासून तोच त्यांचा पालक बनणार होता.
त्यांच्या आणि स्वतःच्या हक्कासाठी लढणार होता.
ज्येष्ठ भ्राता म्हणून आपल्या लहान भावंडांचे
भविष्य सुरक्षित ठेवणे, त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणे आणि ज्येष्ठ पुत्र या
नात्याने मातापित्यांचे स्वप्न आणि इच्छा पूर्ण करणे हे त्याचे कर्तव्यच होते. त्याचबरोबर
मातापिता कसेही असले तरी त्यांचे ऋण होते त्याच्यावर.
आणि एक खरा क्षत्रिय आपले ऋण कधीच अपुरे ठेवत
नाही.
आजपासून त्याचे ध्येय एकच !
हस्तिनापूरचा " अभिषिक्त" सम्राट बनणे
!
त्याच्या आणि राजसिहांसनाच्या मध्ये येणाऱ्या
कुणालाही थारा द्यायचा नाही. त्याच्या विरुद्ध येणारा प्रत्येक जण त्याचा शत्रू होईल.
मग ते कुंतीपुत्र असेना का. भीम तर आधीपासूनच त्यांच्यासोबत शत्रूवत वागत आलेला होता.
आता त्याच्या सगळ्या कृत्यांना तो त्याच्याच भाषेत उत्तर देणार होता.
शत्रूला दयामाया दाखवायची नाही.
कुणाला ठार मारावे लागले तरी चालेल.
कटकारस्थाने करावे लागले, राजकारण करावे लागले
तरी चालेल.
साम,दाम, दंड भेद सगळे काही वापरावे लागले तरी
चालेल.
युद्ध करावे लागले तरी चालेल.
स्वतःला दुष्ट, दुराचारी आणि काय बरे, हा,
" कुलविनाशी " म्हणवून घ्यावे लागले तरी चालेल.
"दुर्योधनाची" निश्चयी पाऊले " दुःशासनाच्या " महालाकडे वळली.
प्रत्येक लहान बाळाच्या विश्वाचा केंद्रबिंदू
त्याचे आईबाबा असतात. आजीआजोबा, काका काकू,मामा मावश्या आणि बाकी नातलग हे त्या गोलाच्या
परिघात असतात. जन्म देणे, अन्न,वस्त्र निवारा देणे, सांभाळ करणे आणि शिक्षण देऊन आपल्या
पायावर उभे करणे, मुलांसाठी खस्ता खाणे हे प्रत्येकच मातापिता करत असतात. पण फक्त यालाच "संगोपन"
करणे म्हणतात का ?
जेव्हा
आई वडील आपल्या मुलांकडे आपल्या महत्वाकांक्षांची इच्छापूर्ती करणारे साधन म्हणून बघू
लागतात तेव्हाच बालक आणि पालक हे नाते " investor and investment " सारख्या
व्यावहारिक पातळीवर उतरते. आम्ही तुमच्यासाठी एव्हढ्या खस्ता खाल्ल्या मग त्याची परतफेड
करायला नको का असा प्रश्न जेव्हा पालक करतात तेव्हा हेच अधोरेखित होते.
दुर्योधन आणि बाकी कौरवांना साधे सुधे निरागस
बालपण कधी मिळालेच नाही. एक सुरक्षित, आनंदी आणि निरपेक्ष प्रेमाचे वातावरण मिळालेच
नाही. मातापिता जरी शरीराने आणि मनाने दुबळी ठरली तरी त्यांच्या भोवती एवढा मोठा परिवार
होता. पण तिथूनही कौरवांना प्रेम मिळाले नाही. जो तो आपापल्या प्रतिज्ञा आणि प्रतिमांच्या
मध्ये अडकलेला होता. दुर्योधनाच्या जन्मसमयी केलेल्या भाकिताने त्याचे आयुष्य बदलून
टाकले.लोकांच्या पूर्वग्रहदूषित नजरेमुळे आणि एका असुरक्षित भविष्याच्या भीतीमुळे त्याच्या
विचारसरणीवर नकारात्मक परिणाम झाला.
असे असूनही एक पुत्र आणि थोरला भाऊ या नात्यांमध्ये
दुर्योधन आदर्श होता. आपल्या मातापित्यावर आणि लहान भावंडावर त्याचे किती प्रेम होते
हे सर्वांनाच ठाऊक होते. पण ज्या भीष्म आणि विदुराकडून त्याला पदोपदी हिणवणूक आणि निर्भत्सना
मिळत असे त्यांच्या विरुद्ध उभे ठाकतांना सुद्धा तो त्यांची ज्येष्ठता आणि योग्यता
याची जाणीव ठेवून होता. फक्त पांडव समोर आले कि त्याची सद्बुद्धी आणि विवेक त्याची
साथ सोडून जात.
हस्तिनापूरचा राजा बनण्याची इच्छा ठेवणे हा धर्म
होता आणि त्याचा वारसाहक्क सुद्धा न्याय्य होता. पण त्या इच्छेचे रूपांतर जेव्हा सत्तालालसेमध्ये
झाले, युद्धपिपासा निर्माण झाली तेव्हाच दुर्योधनाकडून धर्माची सीमा लांधल्या गेली.
सत्तेसाठी आपल्याच चुलत भावंडांना शत्रू मानून
त्यांच्याविरुद्ध कारस्थाने करणे, त्यांना जीवे मारण्याचा अमानुष प्रयत्न करणे हा अधर्म
त्याच्याकडून घडत गेला.
पण विधात्याचा न्याय देखील किती विचित्र आहे
कि ज्या भीमाला शत्रू मानून दुर्योधनाने अधर्माच्या रस्त्यावर पहिले पाऊल टाकले त्याच
भीमाला त्याने लहान कौरवांसोबत केलेल्या दुष्ट कृत्यांमुळे, दंडेलशाही केल्यामुळे सदेह
स्वर्गारोहण नाकारण्यात आले.
अयोभाऊ आणि इतरांना अश्या प्रकारे न्याय मिळाला
असे मानावे का ?
*************************************************
*************************************************
- सौ.पूर्णिमा
देशमुख पुरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा