श्री
दुर्योधन- एक संपूर्ण क्षत्रिय
शकुनिबद्दल लिहिल्यानंतर जेव्हा माझ्या मावसभावाने
मला चिडवत म्हंटले कि आता तू सगळ्याच "villains " बद्दल लिही, तेव्हा त्यानंतर
दुर्योधनाबद्दल लिहिणे तर क्रमप्राप्तच होते. अनेकांच्या मते तो महाभारताचा खलनायक
आहे तर काही नवीन लेखकांच्या मते वारसाहक्काच्या नियमानुसार तो बरोबरच होता,चांगला
होता. दुर्योधन कसाही असो पण त्याच्याशिवाय महाभारत अपूर्ण आहे.
दुर्योधनामागचे गूढ वलय भेदण्याचा प्रयत्न अनेकांनी
केलेला आहे. सर्वात प्रथम आहे प्रसिद्ध नाटककार "भास ". दुर्योधनाच्या व्यक्तिमत्वाची
भुरळ पडूनच त्याने नियमांविरुद्ध जात "ऊरूभंगम" हे नाटक लिहिले आणि नाट्यशास्त्रात
नवीन प्रकार रुजू केला. दुर्गुणांची नकारात्मक बाजू असलेला नायक असणे हे जसे नवीन होते
तसेच कथेचा शोकांत होणे हेसुद्धा अप्रचलित होते.
महाभारत, मानसशास्त्र आणि पौराणिक इतिहास या
विषयांच्या अनुषंगाने दुर्योधनावर सर्वाधिक शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. अगदी कृष्णालाही
त्याने दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. हे वाचल्यानंतर तर माझ्यासारखीने त्याच्यावर
लिहिणे किती धारिष्ट्याचे ठरेल याचीच मला भीती वाटू लागली. पण म्हणतात ना
"fools rush in where angels fear to tread " तसे काहीसे माझ्याही बाबतीत
झाले.
दुर्योधनाबद्दल जेव्हा लिहायला सुरुवात केली
तेव्हा त्याच्या अनेक पदरी व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा परिचय झाला. पण लिहायला बसले
तेव्हा का कोण जाणे एका लेखात त्याच्या स्वभावाचा ठाव घेणे कठीण होऊ लागले. मनातल्या
मनात दुर्योधन माझ्या तुटपुंज्या शब्दसंपदेला खिजवत हसून म्हणाला,
" एक से मेरा क्या होगा? "
मग मी पण त्याच्याच प्रमाणे हट्टीपणा केला. आणि
छोटे छोटे लेखांश लिहिण्यास सुरु केले. तो जसा समजला तसा शब्दात व्यक्त करण्याचा हा
खूप छोटासा प्रयत्न आहे.चूक भूल माफ.
*****************************************************************************
प्रत्येक गुण आणि अवगुण हे एका सीमारेषेने विभाजित
असतात. सीमा ओलांडली कि गुणाचा अवगुण होण्यास काय वेळ लागतो ?
सीमेच्या अलीकडचा स्वाभिमान पलीकडे जाताच अभिमान,
अहंकारात बदलतो. निश्चयी,ठाम स्वभाव सीमा ओलांडताच हट्टीपणा, दुराग्रहीपणा होऊन जातो.
अगदी साधा सरळ स्वभाव पराकोटीला पोहचून रेष सोडताच भोळसट्पणा आणि मूर्खपणा म्हणवून
हिणवल्या जातो तर चातुर्य , व्याव्हारिकपणा या गुणांचा अतिरेक होताच त्याचे कपटीपणात,
संधिसाधूपणात रूपांतर होऊन जाते. कृतज्ञतेने विवेकाची सीमा लांघली कि ती मानसिक दास्यत्वाकडे
झुकू लागते.
महाभारतातले व्यक्ती काय आणि आजच्या काळातले
आपण सगळे काय या सीमारेषेच्या आजूबाजूलाच वावरत असतो. कधी गुणाचे पारडे जड असते तर
कधी अवगुणांचे. त्यामुळे सगळेच जर तसे आहेत तर मग दुर्योधनाची कथा वेगळी कशी असणार
?
असे असले तरी या नियमाला अपवाद ठरले ते स्वतः
महाभारत लिहिणारे महर्षी व्यासच ! इतके तटस्थपणे, कुठलीच सीमारेषा न ओलांडता इतिहास
लिहिणे फक्त त्यांनाच जमू शकले. व्यासांनी ना कुणाचे समर्थन केले ना कुणावर दोषारोपण.
जे काही घडले ते जसेच्या तसे सांगितले. ते वाचल्यानंतर त्यातून ज्याला जसा अर्थ काढायचा
तसा काढू शकतो. तुम्ही reading between the lines कसे करता यावर ते सोडून दिले आहे.
त्यामुळेच त्याची अनेक संस्करणे झाली. त्यानंतरच्या पुराणवाङ्मयामध्ये त्यावर भाष्ये
झाली. अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. महाभारताचे
युद्ध सगळ्यात वेगळे का ठरले ? फक्त राज्यावरच्या अधिकारासाठी घडलेले ते सामान्य युद्ध
नव्हते. अशी तर अनेक युद्धे त्या आधीही होऊन गेलीत.त्यानंतरही झालीत. आणि होतीलही.
गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे ते एक “ धर्मयुद्ध
“ आहे.
एका बाजूला धर्म आहे आणि दुसऱ्या बाजूला अधर्म.
सीमेच्या अलीकडे कृष्ण आहे तर पलीकडे दुर्योधन
!
धर्माचे पालन करता करता दुर्योधनाने सीमारेषा
का आणि कशी ओलांडली हे समजण्यासाठी त्याच्या जन्मापासून आरंभ करावा लागेल.
*****************************************************************************
- सौ.पूर्णिमा
देशमुख पुरेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा