मंगळवार, १२ मे, २०२०

दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( ७)


श्री
दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( ७)

कर्णाच्या चितेची धग कमी झालेली असली तरीपण दुर्योधनाच्या मनात पेटलेला आक्रोश अजूनही धगधगत होता. डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. आठवणींचे वादळ घोंगावत होते. हुंदक्यांनी त्याचे शरीर गदगदून गेले होते. कर्ण, त्याचा परम मित्र आज त्याला सोडून गेला होता.
किती क्षण गेले तरी कर्णाच्या स्मृती समुद्रातल्या लाटेसारख्या अंगावर धावून येत होत्या.
त्या लाटांच्या आवेगात वाहावल्या गेल्याप्रमाणे त्याची पाऊले त्याच्याही नकळत युद्धभूमीच्या दूर कुठेतरी मृत्यूची वाट बघणाऱ्या त्या वयोवृद्ध तपस्वी कडे वळली. काहीच बोलता तो अगतिक योद्धा त्यांच्या पायाजवळ उभे राहून  मूक रुदन करत होता.
"कोण रडते आहे ? समोर या. " थरथरत्या स्वरातही आज्ञा होती.
दुर्योधन त्यांच्याजवळ गेला. त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून भीष्म स्तब्ध झाले.
" बाळा तू ? काय झाले ? " आज पहिल्यांदाच ती प्रेमळ हाक ऐकून दुर्योधनाचे बांध फुटले.
" आजोबा, आज माझा कर्ण मला सोडून गेला. मी एकटा पडलो आजोबा, खूप एकटा. कर्ण, माझा कर्ण......!" स्फुंदत त्याने सगळं वृत्तांत कथन केला.
ते ऐकताच भीष्मांच्याही डोळ्यात अश्रू दाटले. मृत आत्म्याला नमस्कार करून त्यास शांती मिळावी अशी प्रार्थना त्यांनी केली. 
" दुर्योधना, तुझ्यासारख्या वीर पुरुषाला असे रडणे शोभत नाही." त्यांनी समजावले. 
" का रडू नको आजोबा ? ज्याच्या वीरतेचे पोवाडे गायले जात त्या महारथी योद्द्याला असा मृत्यू यावा ? नाही, हा अधर्म आहे. युद्धनियमाविरुद्ध आहे." एखाद्या जखमी सिंहाप्रमाणे तो गुर्रावला.
" कर्ण तुझा परम मित्र होता, तो वीर योद्धा होताही. पण त्याने अधर्माची कास धरली आणि म्हणूनच त्याची हि गत झाली. आता तरी माझे ऐक, पांडवांना त्यांचे राज्य वापस करून टाक. हा विनाश थांबावं." भीष्मांनी पुन्हा दुर्योधनाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
"आता हा विनाश थांबवणे ना मला शक्य आहे ना त्या वासुदेवाला. तसेही तुम्हीच तर म्हणत आला आहेत ना कि मी कुलविनाशी आहे म्हणून. मग तुमचे शब्द खाली कसे पडू देऊ ? " नेहमीप्रमाणे ताठा असलेल्या दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आज मात्र हताश भाव होते. भीष्मांना ते पाहून गलबलून आले. त्यांच्या म्हाताऱ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते काही बोलणार तोच दुर्योधनाने त्यांना थांबवले.
" काय वाईट केले होते मी आजोबा ? का मला तुमच्या मांडीवर बसण्याचा हक्क मिळाला नाही ? का तुम्ही कधीच माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला नाही ? मला प्रेमाने घास भरवला नाही ? का आजोबा ? का ? दुर्योधनाचे प्रश्न भीष्मांना बाणांपेक्षाही जास्त टोचू लागले.
" नाही रे माझ्या बाळा, तुझ्यावर सुद्धा मी बाकीच्यांप्रमाणेच प्रेम केले रे. मला दाखवणे जमले नाही  आणि तुला ते दिसले नाही. पण प्रेम नसते, तुझ्याबद्दल आपुलकी ,माया वाटत नसती तर तुला वेळोवेळी अधःपातापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न का केला असता रे ? तुझ्याकडून का  लढलो असतो ,सांग ना ? "
" माझ्याबद्दल प्रेम नव्हते, तुमच्या त्या लाडक्या कुरुवंशाची काळजी होती तुम्हाला." दुर्योधन फुरंगटून म्हणाला.
" आणि तू त्याच कुरुवंशातला माझा सर्वोत्तम क्षत्रिय वीर वंशज आहेस दुर्योधना ! तुझे शौर्य, तुझे शासन ,तुझी न्यायी वृत्ती बघून किती समाधान वाटायचे कसे सांगू ? युवराज असूनही तू राजाचे  सगळे अधिकार घेतले तेव्हा म्हणूनच तुला अडविले नाही मी. त्यामागचे कारण का नाही समजून घेतलेस ? " भीष्मांचा आवाज कापरा झाला.
दुर्योधन पुन्हा एकदा गलबलून गेला. पितामहांच्या शब्दांनी आतून सुखावला. जी आस त्याच्या मनात बालपणापासून अतृप्त राहिली होती ती आज तृप्त झाली होती.त्याने त्यांच्या बाणांवर विसावलेल्या हातावर अलगद डोके टेकवले.
" बोलून का नाही दाखवले आजोबा ? कायम मला रागवत आलात, उपदेश देत आलात. " त्याने विचारले. 
" तू तेव्हढेच लक्षात ठेवलेस. फक्त त्या पांडवांच्या बाबतीत तू ईर्ष्येने,असूयेने वागत आलास आणि सगळ्या चांगल्यावर पाणी फेरले. देऊन टाकायचे होते त्यांना त्यांचे राज्य वापस. पण नाही,तुझा अहंकार आडवा आला. सुई इतकी भूमी पण देणार नाही असे बोलून विनाशाला निमंत्रण दिलेस. आता उशीर झाला पण माझ्या मनात तुझ्याविषयी यत्किंचितही द्वेष नाही , राग नाही. आणि तूसुद्धा माझा राग धरून ठेवू नको रे. "
भीष्मांनी आज़र्व केले.
" नाही आजोबा, राग नाही तुमचा. खूप खूप प्रेम केले मी तुमच्यावर, खूप आदर करतो मी तुमचा. तुम्ही तर इच्छामरणाचे वरदान मिळालेले आहात , फक्त एकच विनंती आहे,उद्या जेव्हा माझे अंतिम युद्ध होईल तेव्हा मला मृत्यूला ताठ मानेने सामोरी जाण्याचे बळ द्या. "
दुर्योधनाने हात जोडले.
" तू संपूर्ण क्षत्रिय आहेस दुर्योधना, आणि तुला क्षत्रियोचितच मृत्यू येईल. जगासाठी जरी तू पराभूत झालास तरी विजयी योद्धयाप्रमाणे  स्वर्गलोक मिळवशील. " भीष्मांनी सद्गतीत स्वरात आशीर्वाद दिला.
दुर्योधनाची दूर जाणारी बलदंड आकृती अश्रूभरल्या नजरेने ते बघत राहिले.
" आज मला कळले कि जन्मात पहिल्यांदाच विदुर चूक बोलत होता. कुलविनाश तुझ्यामुळे नाही झाला दुर्योधन, माझ्यामुळे झाला. आमच्या कलुषित वागण्यामुळेच तुला चांगुलपणाचा रस्ता दाखवू शकलो नाही. आम्हीच तुला विनाशाच्या,अधर्माच्या खाईत लोटले. आणि आता तुझा कडेलोट थांबवणे ना मला शक्य आहे ना तुला. हे प्रभू, शक्य असल्यास मला क्षमा करा!
भीष्मांच्या अश्रूंचा पाट गंगेच्या पवित्र पाण्यात विरून गेला.

मूळ महाभारतामध्ये भीष्मांनी अनेक ठिकाणी दुर्योधनाबद्दल गौरवोद्गार काढले आहे. पण दुर्योधनाच्या इतर कृष्णकृत्यांमुळे भीष्मांना आणि विदुरादि ज्येष्ठांना कधी त्याच्यावर आगपाखड करावी लागली तर कधी त्याला समजावणीच्या गोष्टी सांगून होणारा विनाश थांबवण्याचा प्रयत्न करावा लागला.
पण नुसत्या शब्दांनी हा संघर्ष टळला नसता त्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक होते.
म्हणतात ना कि " दुर्जनांच्या क्रियेपेक्षा सज्जनांच्या निष्क्रियतेमुळेच धर्माचा ऱ्हास होतो."
ज्या कुरुवंश आणि हस्तिनापूरच्या रक्षणासाठी भीष्मांनी स्वतःचे आयुष्य समर्पित केले त्यांनी राज्य रक्षणासाठी, भाऊबंदकी थांबवण्यासाठी फारसे असे काहीच केले नाही. ना राजकारण केले ना मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊन राजाला नमवले. ते फक्त स्वतःची अगतिकता कुरवाळत राहिले.
जे होत राहिले त्याकडे मूक प्रेक्षकासारखे बघत राहिले.आणि त्यांच्या या निष्क्रियतेपायीच कौरव पांडवांमधला संघर्ष पेटत गेला आणि वणव्याची रूप घेऊन त्याने संपूर्ण कुरुवंशाचा नाश केला.
युद्धातही त्यांनी आपण पांडवांना मारणार नाही अशी विचित्र अट टाकून युद्धाच्या हेतूंचीच पायमल्ली केली. शत्रूला मारणार नाही असे म्हणणाऱ्या सेनापतीचा काय उपयोग ? म्हणायला फक्त ते हस्तिनापूरच्या ध्वजाखाली लढले, पण त्यांची निष्ठा पांडवांच्या ठायी होती. दुर्योधनाला हे माहिती असूनही त्याने त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवून त्यांना सेनापतिपद दिले.
खरेतर या मानापमानाच्या खेळापायी दुर्योधनाला इच्छा असूनही ना कर्णाला सेनापती बनवता आले ना अश्वत्थामाला. त्याची युद्धनीती चुकत गेली असे जरी सगळे मानत असले तरी दुर्योधनाने नियम आणि ज्येष्ठत्व  सांभाळून जाणून बुजून स्वतःलाच पराजयाकडे नेले असेच वाटते.

- सौ.पूर्णिमा देशमुख पुरेकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा