श्री
दुर्योधन -एक संपूर्ण
क्षत्रिय ( ६)
आपल्या राजमहालातल्या सज्जात
उभा असलेला कर्ण
रस्त्यावरचे दृश्य बघण्यात मग्न
होता.
हस्तिनापूर आज नवपरिणीत
वधू सारखी सजली होती
जणू. सुगंधी अत्तरांच्या
पाण्यात रस्ते
नाहून निघाले होते.
रंगीबिरंगी रांगोळ्या आणि दारोदारी
तोरणे नगराची शोभा
वाढवत होते. घरांवर
सोडलेल्या फुलांच्या माळा उत्साहाच्या
वाऱ्यांनी डुलत होत्या,हसत होत्या.
राळ,गुग्गुळ आणि
चंदन कर्पुराचा पवित्र
गंध सगळ्या आसमंतात
भरून गेला होता.
काय होते बरे
आज एव्हढे विशेष
?
आज दुर्योधनाने
आरंभिलेल्या महान अश्या
'वैष्णव यज्ञाची' पूर्णाहुती
होती. एक द्वारका
वगळता संपूर्ण आर्यावर्ताला
त्याने हस्तिनापूरच्या अधिपत्याखाली आणले होते.
त्याच्या अत्त्युच पराक्रमाच्या दुदुंभीने
सगळ्या राजांच्या मनात धडकी
भरली होती. अनेक
राजे त्याच्याशी मैत्रीचे
संधान करून त्याचे
अंकित झाले होते.
कर्णाच्या चेहऱ्यावरचे अभिमान,
कौतुक आणि आनंदाचे
मनोवेधक विभ्रम त्याची पत्नी
वृषाली न्याहाळत होती अन
त्याचवेळी तिच्याही मुखावर आपल्या
पतीचा सार्थ अभिमान
उमटला. कारण दुर्योधनाच्या
या दिग्विजयामध्ये तिच्या
पतीचा, महारथी कर्णाचा सुद्धा
मोलाचा वाटा होता.
तिच्या हातातले सुवर्ण
कंकण किणकिणले. कर्ण
मागे वळला. भरजरी वस्त्र
आणि त्यावरचे सुवर्णालंकार
तिचे सौंदर्य द्विगुणित
करत होते. कर्णाने
नजरेनेच तिला पावती
दिली.
"झाली का
तय्यारी ? यज्ञमंडपी जाण्याची वेळ
झाली आहे. उशीर
झाला तर दुर्योधन
नाराज व्हायचा. " दोघेही
जायला निघाले.
" तुम्हाला अजूनही त्यांचा
इतका धाक का
वाटतो ? " किंचित फणकाऱ्याने, किंचित
हसत तिने विचारले.
कर्ण मध्येच
थबकला. " धाक ? नाही वृषाली.
दुर्योधनाचा धाक नाही
वाटत. पण मी
वेळेवर गेलो नाही
तर त्याला वाईट
वाटेल म्हणून घाई
केली एवढेच. " त्याने
स्पष्ट केले.
" मला तर
बाई त्यांची भीतीच
वाटते." भाबडेपणाने तिने सांगून
टाकले.
कर्ण हसला."
अगं त्याच्या चेहऱ्यावरच्या
कठोरपणावर जाऊ नको.
तो त्याचा युवराज
म्हणून मुखवटा आहे.प्रत्यक्षात
तो खूप चांगला
आहे "
वृषाली मनात विचार
करू लागली. कर्णाला
जे दुर्योधनाबद्दल वाटते
ते त्याने "अंगराज
" बनवल्यामुळे असेल कदाचित.
दुर्योधनाचा शत्रू असणाऱ्या अर्जुनाचा
प्रतिस्पर्धी म्हणून तर त्याने
सख्य केले नसेल
? पण असे स्पष्ट
कसे विचारणार ?तिच्या
मौनाचे कारण त्याच्या
लक्षात आले.
" नाही, मला तो
चांगला वाटतो ते त्याने
मला अंगराज बनवले
म्हणून नव्हे. खरेतर ते
त्याचे उपकारच आहे. पण
इतक्या वर्षांच्या सहवासाने मला
त्याच्या स्वभावाची खोली समजली
आहे. तसं पाहिलं
तर जेव्हा मी
शस्त्रस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी
उभा झालो तेव्हा
मी खरोखरच चांगला
धनुर्धर आहे का
नाही हे कळण्याआधीच
त्याने एका यत्किंचित
सुतपुत्राला स्वतःच्या वाटणीचे अंगदेशाचे
राज्य देऊन टाकले.
का ? कारण केवळ
क्षत्रिय नसल्यामुळे कोणावर अन्याय
होत आहे हे
त्याला पटले नाही.
प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध तर तो
गेलाच, पण खुद्द
त्याच्या मातापित्यांनासुद्धा त्याचे हे वागणे
पटले नाही. पण
तरी त्याने आपला
निर्णय बदलला नाही. माझ्यासारख्या
अनेकांना त्याने आपले कर्तृत्व
दाखवण्याची संधी दिली
आहे. त्याचे हे
विचार कदाचित कालानुरूप
नसतील पण येणाऱ्या
युगात त्याचे हे
विचार समाजमान्य होतील
हे नक्की." कर्णाने
भाकीत केले.
बोलता बोलता त्यांचा
रथ नगराच्या मुख्य
मार्गावर आला. कर्णाला
बघताच प्रजा दुर्योधनासोबतच
त्याचाही जयजयकार करू लागली.
कर्ण नेहमीप्रमाणेच भारावून
गेला. त्याने कधी
स्वप्नातही विचार केला नव्हता
असे प्रेम आणि
कीर्ती त्याला मिळाली होती.
आणि हे सगळे
दुर्योधनामुळेच प्राप्त झाले होते.
पुन्हा एकदा त्याच्या
ऋणाची फेड कशी
करावी याचा तो
विचार करू लागला.
रथ राजमहालाच्या
विस्तीर्ण प्रांगणात शिरला. कर्ण
आणि वृषाली यज्ञमंडपाकडे
गेली. सर्व ज्येष्ठांना
त्यांनी नमस्कार केला. तोच
दुर्योधन तिथे आला.
कर्णाला बघताच त्याच्या चेहऱ्यावर
प्रसन्न हास्य खुलले.
"अरे किती
वेळ ? पूर्णाहुतीला आरंभ
होईलच आता. मला
तर वाटले कि
तू आता सगळे
झाल्यावर फक्त पक्वान्न
खायलाच येतो कि
काय ? "
दुर्योधनाने त्याच्या पाठीवर
थाप मारली. दोघेही
मित्र दिलखुलास हसले.
यज्ञवेदीकडे जाता जाता
कर्ण म्हणाला,
" उशीर करून
कसा चालेल ? वैष्णव
यज्ञ काय रोज
रोज थोडीच होतो
? आजपर्यंत संपूर्ण आर्यावर्तात कोणीच
हा यज्ञ केलेला
नाही आहे. स्वर्गातही
फक्त इंद्रानेच शापमुक्तीसाठी
हा यज्ञ केल्याचे
त्याच दिवशी आचार्यांनी
सांगितले, नाही का
? म्हणजे माझा हा
महान पराक्रमी मित्र
आज प्रत्यक्ष देवेंद्रांच्या
तोलामोलाचा झाला आहे.
हा अभूतपूर्व क्षण
पाहण्याचे भाग्य मी कसे
काय सोडणार होतो
? "
त्याची स्तुती ऐकून
दुर्योधन हसला. पण लगेच
गंभीर होत म्हणाला,
" देवेंद्राचे जाऊ दे.
पण माझ्या ह्या
यशात तुझाच मोठा
वाटा आहे मित्रा.
तू माझ्या सोबत
होता, माझा पाठीराखा
होता म्हणून हे
सगळे शक्य झाले.
त्याचे प्रेम पाहून
कर्ण गहिवरला. " मी
काहीच केले नाही
मित्रा. खरेतर तुझ्यामुळेच मी
आज या स्थानी
आहे. तुझे उपकार
कसे फेडू हेच
मला समजत नाही."
दुर्योधनाच्या चेहऱ्यावर सात्विक संताप
फुलला. " कितीदा सांगू तुला
, सारखे उपकार उपकार करू
नकोस म्हणून ? उपकाराची
भाषा काढून तू
आपल्या मैत्रीचा अपमान करतोस.
योग्यता असल्याशिवाय कुणालाच काही
मिळत नाही हे
तुला कितीवेळ सांगू
? तुझ्यात कर्तृत्व होते म्हणूनच
तू मिळालेल्या संधीचे
सोने केले. तुझ्यात
गुण नसतेच तर
मग तुला राजा
बनवून सुद्धा तू
राजपद टिकवू शकलात
नसतास. प्रजेने कधीचाच उठाव
केला असता. "
कर्णाने त्याला मिठी
मारून मूकपणे क्षमा
मागितली आणि त्याचा
राग शांत केला.
" बरे,चुकले
माझे. आता चल,
यजमानाने आनंदाने समिधा अर्पण
केल्या तरच देव
हविर्भाग स्वीकारतात. ते बघ,
भानुमतीवहिनी वाट बघतात
आहे तुझी.
दुर्योधन
आणि भानुमती यज्ञवेदीसमोर
बसले. उपस्थित ब्राम्हणवर्गाला
त्यांनी विनम्र प्रणाम केला
आणि पूर्णाहुतीला सुरुवात
झाली.ब्रह्मवृंदांच्या उच्चरवातल्या
मंत्रघोषाने यज्ञभूमी दुमदुमली.
कर्णाने आजूबाजूला नजर
टाकली. देशोदेशीचे राजेमहाराजे आणि
राजप्रतिनिधी जमले होते.
दुसऱ्या बाजूला मंत्रीगण आणि
त्यांचे कुटुंबीय बसले होते.
आणि त्यामागे जनप्रतिनिधी
आणि गणमान्य व्यक्ती
होते. आणि आश्चर्य
म्हणजे क्षुद्रवर्गातल्या लोकांनाही आमंत्रण दिलेले
दिसत होते. दुर्योधनाने
आजच्या अभूतपूर्व समयी कुणालाच
वगळले नव्हते. सगळ्यांना
खुले निमंत्रण दिलेले
होते.
कर्णाला गत काही
वर्ष आठवली. पांडव
वनवासात गेल्यानंतर दुर्योधन जरी
युवराज झाला तरी
अल्पावधीतच त्याने आपले कर्तृत्व
सिद्ध करून मंत्रिमंडळ
आणि प्रजेला जिंकले
होते. त्याचे शासन
न्यायी तर होतेच
पण कृषी आणि
वाणिज्य क्षेत्रात त्याने अनेक
बदल घडवून हस्तिनापूर
राज्याला समृद्धीच्या शिखरावर नेऊन
ठेवले होते. त्याचे
हेरखाते सर्वदूर पसरले होते
आणि राज्यात
घडणाऱ्या इत्यंभूत घटना त्याला
सांगत होते. प्रजेला
जर कुठलाही त्रास
होत असला तर
त्याची सूचना लगेच त्याला
मिळायची आणि तो
त्यावर त्वरित उपाय योजना
करत असे. त्याचमुळे
त्याच्याबद्दल जरी पहिले
मंत्रिमंडळ साशंक असले,पूर्वग्रहदूषित
असले तरी हळूहळू
त्याने त्यांचा विश्वास आणि
सहकार्य मिळवले होते. आणि
प्रजेचा तर तो
अत्यंत लाडका होता. त्यांच्या
मनावरचा अनभिषीत राजा झाला
होता.
समान न्यायाचा
तो पुरस्कर्ता तर
होताच पण फक्त
प्रजेपुरताच नव्हे तर ज्या
राजांना त्याने जिंकले होते
त्यांनाही त्याने मांडलिक बनवून
न ठेवता स्वातंत्र्य
दिले होते. पुढे
जर युद्ध झाले
तर त्याच्याच बाजूने
त्यांनी लढावे अशी सक्ती देखील
केलेली नव्हती. जेव्हा कर्णाने
त्याला याबाबत विचारले
तेव्हा तो म्हणाला
होता ,
" बळजबरी करून मिळवलेल्या
निष्ठा ह्या विश्वासघातकी
ठरतात. त्यापेक्षा उघड उघड
शत्रुत्व चांगले असते. आणि
कर्ण, तुला तर
माहितीच आहे कि
कुरुकुलामधल्या ज्येष्ठांच्या निष्ठा मुखवटा घेऊन
जगतात आहे. वरून
जरी ते कुरुकुलाकडून
आहेत,माझ्याकडून आहेत
असे म्हणत असले
तरी आतून ते
माझ्या विरुद्धच जाणार आहेत,
अस्तिनातले निखारे ठरणार आहेत.
त्यांना फेकूही शकत नाही
आणि सोसूही शकत
नाही अशी माझी
त्रिशंकू अवस्था आहे.त्यात
या राजांची भर
कश्याला घालू ?"
दुर्योधनाच्या शब्दांमागची वेदना कर्णाला
जाणवली. तो काहीच
बोलू शकला नाही.
काय बोलणार ? कुरुकुलातले
प्रत्येक जण आपल्या
प्रतिज्ञा आणि प्रतिमांमध्ये
अडकले होते. स्वतः
दुर्योधनसुद्धा " दुष्ट" पणाच्या प्रतिमेआड
लपला होता. आता
तर प्रतिमा कोणती
आणि मूळ रूप
कोणते हेच समजेनासे
झालेले होते. पण मित्र
म्हणून कर्णाला त्याचे दुःख
आणि बोच समजत
होती.
योगायोगाने त्याला दिसली
राणीवशात बसलेली राजकुमारी लक्ष्मणा
, दुर्योधनाची लाडकी लेक.
ज्यादिवशी लक्ष्मण आणि
लक्ष्मणाचा जन्म झाला
त्या दिवशी दुर्योधन
अत्यंत आनंदित होता. पिता
म्हणून दुर्योधन खूप प्रेमळ
आणि दक्ष होता.पुत्र लक्ष्मण हा
पित्याप्रमाणेच पराक्रमी होता. आपल्या
पित्याचा त्याला अभिमान तर
होताच पण प्रेमही
होते.
दुर्योधनाने आपल्या मुलांमध्ये
कुठलाच भेद केला
नाही.कुटुंबातल्या ज्येष्ठांचा
विरोध पत्करून त्याने
दोघांनाही शस्त्र आणि शास्त्राचे
शिक्षण दिले.आजपर्यंत
कुरुकुलातल्या मुलींना शस्त्र चालविणे
वर्ज्य होते. पण दुर्योधनाला
ते पटले नाही.
लक्ष्मणा आईप्रमाणेच द्वंद्वयुद्धात पारंगत
होती. आणि तिला
गृहकृत्यदक्ष करण्याचे उत्कृष्ट काम
भानुमतीने केलेले होते.दुर्योधनाला
आपल्या या लेकीचे
खूप कौतुक होते.
जेव्हा तिच्या स्वयंवरात
कृष्णाच्या मुलाने,सांबाने तिचे
हरण केले तेव्हा
तो क्रोधाने तळपत
होता आणि प्रत्यक्ष
कृष्ण आणि गुरु
बलराम यांच्याविरुद्ध उभा
ठाकला होता.त्यांना
युद्धासाठी ललकारले होते.पण
शेवटी जेव्हा त्या
दोघांनी आणि पितामह
भीष्मांनी मध्यस्थी केली होती
तेव्हा नाखुशीनेच त्याने संमती
दिली. पण आपल्या
प्रिय पोरीला मनाविरुद्ध
संसार करावा लागतो
आहे या कल्पनेनेच
तो एखाद्या घायाळ
सिंहाप्रमाणे त्याच्याजवळ रडला होता.
इतकी वर्ष होऊनही
त्याच्या मनातली ती बोच
अजूनही कायम होती.
पण असे असले
तरी सुद्धा त्याने
हेही नाते उत्तमपणे
पार पाडले. आणि
लक्ष्मणाने देखील तिच्यावरचे संस्कार स्मरणात
ठेवून सासरच्यांना जिंकले
होते.
वैष्णव यज्ञासाठी म्हणूनच
त्याने मुलीचे सासर असलेल्या
द्वारकेला वगळले होते.
समारोपात्मक शांतिपठण ऐकताच
कर्णाच्या विचारांची शृंखला तुटली.
भानावर येत त्याने
एक सुस्कारा सोडला.
आणि तो सगळ्यांसोबत
उठून उभा राहिला.
हात जोडून त्याने
त्या यज्ञदेवाला नमस्कार
केला आणि आर्ततेने
प्रार्थना केली,
"देवा, भविष्यात होणाऱ्या
युद्धात पराक्रम करून मला
विजय मिळू दे
,ज्यायोगे माझ्या या मित्राचे
उपकार फेडून त्याच्या
ऋणातून मी मुक्त
होईल. मला आशीर्वाद
दे. "
**********************************************************************************
उत्तराखंड मध्ये जाखोल
नामक एका छोट्याशा
खेड्यात दुर्योधाचे मंदिर आहे.
जवळच्याच गावी कर्णाचे
मंदिर आहे. जाखोल
गावचे रहिवासी स्वतःला
कुरुंचे वंशज मानतात.
पण इथे ते
पांडवांची नव्हे तर दुर्योधनाची
पूजा करतात. ५०००
वर्षापूर्वीचे हे मंदिर
अतिशय सुंदर आहे.
आणि दुर्योधनाच्या सन्मानार्थ
वर्षातून एक मोठा
उत्सव तिथे साजरा
केल्या जातो.
त्या खेड्याला
लागून असलेली नदी
खूपच वैशिष्टयपूर्ण आहे.
असे म्हणतात कि
जेव्हा पांडवांनी छलकपट करून
दुर्योधनाचा वध केला
तेव्हा या गावात
राहणारे कुरुसैनिक आपल्या राजाच्या
निधनाने हमसून हमसून रडू
लागले. इतके रडले
कि त्यांच्या आसवांनी
नदीचे रूप धारण
केले. आणि म्हणूनच
त्या नदीचे नाव
' तमस ' असे पडले
आणि कालौघात अपभ्रंश
होऊन ते नाव
टोन्स असे झाले.
पण आजही त्या
नदीचे पाणी खारटच
आहे.
गावातले नवतरुण लोक
आपण खलनायक ठरलेल्या
दुर्योधनाची पूजा करतो
हे सांगण्यास जरी
लाजतात आणि ते
मंदिर महादेवाचे आहे
असे सांगतात तरीसुद्धा
जुने जाणते लोक
दुर्योधनाला विसरले नाहीत. त्यांची
मान्यता आहे कि
अदृश्यरूपाने दुर्योधन आजसुद्धा त्याचे
रक्षण करतो आहे,
आणि त्यांच्या समस्या
सोडविण्यास मदत करतो.
दुर्योधनाचे अजून एक
मंदिर केरळ मध्येही
आहे. तिथे दुर्योधन,दुःशासन ,दुःशला आणि
भीष्माचे प्रतीकात्मक पूजन होते.
पूजा करणारे ' कुरव
' समाजाचे पुरोहित आहेत.
ह्या मंदिरात
दुर्योधन हा 'न्यायी
राजा' मानून पुजल्या
जातो याचाच अर्थ
तो पूर्णपणे खलनायक
नव्हता.
इतिहास हा जेत्यांचा
असतो हेच खरे.
महाभारतामध्ये युधिष्ठिराचा ' राजसूय' यज्ञ सगळ्यांना
आठवतो. पण दुर्योधनाने
अतिशय दुष्कर असा
'वैष्णव यज्ञ ' केला होता
हे फारच कमी
लोकांना माहिती असेल.
दुर्योधन हा जसा
वेद ज्ञानी होता
तसाच तो यज्ञसंस्कृतीचा
पुरस्कर्ता होता. पांडव वनवासात
गेल्यानंतर दुर्योधनाने एक सर्वोत्तम
राजा होण्यासाठी अवश्य
ते सर्व कर्तृत्व
उत्कृत्ष्टपणे दाखवले. नेहमी त्याचे
चित्रीकरण अत्याचारी, दुष्ट असे
करण्यात येते पण
प्रत्यक्षात तो अतिशय
न्यायी आणि राजकारण
चतुर राज्यकर्ता होता.
भारतीय राजवंश हे कधीच
एकाधिकारशाहीप्रमाणे किंवा हुकूमशाहीप्रमाणे नव्हते.
राजाला जरी देव
मानत असत तरीसुद्धा
मंत्रिमंडळ आणि प्रजा
यांनासुद्धा समान अधिकार
होते. म्हणूनच प्रजेचा
विद्रोह होऊन विनाश
होईल असा धाक
राजांना असायचा.
पण दुर्योधनाच्या
बाबत तसे काही
घडले नाही. याचा
अर्थ हस्तिनापूरच्या सिंहासनावर
जो अधिकार तो
दाखवत होता तो
वृथा नव्हता. फक्त
कुटुंबात जन्माला म्हणून आयते
वायते पद मिळवायचा
हट्ट नव्हता.
तो एक
उत्तम पिता तर
होताच पण दुर्योधन
लक्षात राहतो ते कर्णाचा
मित्र म्हणून.
कर्णाला राज्य दिल्यानंतरहि
दुर्योधनाने त्याला कधीच आश्रित
म्हणून वागवले नाही. उलट
त्याने त्याला आपल्या बरोबरीचा
मानले. दोघांचे नाते विलक्षण
होते. आपण कौंतेय
आहोत हे कळूनसुद्धा
कर्णाने दुर्योधनाची साथ सोडली
नाही. अगदी राज्यपद
आणि द्रौपदीचे प्रलोभन
मिळाल्यानंतरही त्याने दुर्योधनाची मित्रता
तोडली नाही. शेवटपर्यंत
तो दुर्योधनाची संरक्षक
ढाल बनून राहिला.
मृत्यू समोर असतांनाही
त्याने दुर्योधनाच्या विजयाची कामना केली.
मैत्रीसाठी जीव देण्याचे
हे असाधारण उदाहरण
आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये
कोणी अशी तीव्र
भावना उद्युक्त करणे
हे सुद्धा साधारण
काम नव्हेच. कर्णाला
दुर्योधनाबद्दल जे वाटायचे
ते जरी उपकाराच्या
जाणिवेने झाकोळल्यासारखे वाटत असले
तरीसुद्धा दुर्योधनाचे कर्णावरचे प्रेम
हे निरतिशय प्रामाणिक
होते. स्वार्थी नव्हते.
कर्ण धारातीर्थी
पडल्यानंतर म्हणूनच बलाढ्य दुर्योधन
, कठोर दुर्योधन आपल्या परम
मित्रासाठी एखाद्या अजाण बालकासारखा
ढसा ढसा रडला.
कर्ण कौंतेय
होता हे कळल्यानंतर
जेव्हा युधिष्ठीर त्याचे अंत्यसंस्कार
करण्यास सिद्ध झाला तेव्हा
कृष्णाने त्याचा "नात्याचा" अधिकार अमान्य करून दुर्योधनाच्या "मैत्रीच्या
" नात्याचा मान ठेवला.
अधर्माच्या वाटेवरचे ते
दोघे सोबती " मित्रधर्माच्या
" नात्यात अद्वितीय ठरले !
*****************************************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा