गुरुवार, ७ मे, २०२०

दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय (३ )


दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय (  )
हलकेच, लाजभरल्या नजरेने भानुमतीने तिच्या स्वयंवरासाठी जमलेल्या सगळ्या राजपुरुषांवरून नजर फिरवली. अन त्याला बघताच तिची नजर खिळली.
तो देखणा तर होताच.त्यातच आकर्षक आणि कमावलेले शरीर सौष्ठव त्याच्या रुबाबात भर घालत होते. राजबिंडे रूप आणि आत्मविश्वासाचा डौल बघत रहावा असाच होता. भानुमती त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे खेचल्या गेली. त्याच्या नजरेत फक्त तिची अभिलाषा नव्हती,जिंकण्याची ईर्षा नव्हती तर प्रेमाचा अस्फुट अंकुर उमलला होता.  कोण आहे हा ?
"भानुमती, या दोन राजकुमाराच्या बाजूला जो राजपुरुष आहे ना तो दुर्योधन आहे. बलाढ्य कुरुकुलाचा युवराज ! " - सौंदर्यवती,सुलक्षणी अश्या भानुमतीची पट्टदासी जमलेल्या राजपुरुषांची माहिती देत होती. खुद्द तिचा पिता,प्राग्ज्योतिषनगरीच्या (कलिंग) राजानेच तिला राजकुमारीला धोकादायक राजपुरुषांबद्दल माहिती द्यायला सांगितले होते ना. भानुमती ज्याच्याकडे बघत होती तो तोच होता. कुरुकुलाचा युवराज- दुर्योधन !
भानुमतीने पुन्हा त्या राजपुत्राकडे बघितले.एकच क्षण तिची नजर त्याच्या नजरेत अडकली. तिच्या डोळ्यातले अनुरक्त भाव त्याला समजले.
" खरेतर त्यांचे नाव ' सुयोधन' असे ठेवले होते, पण त्यांच्या जन्मासमयी ज्योतिष्यांनी भविष्य वर्तवले कि हे मूल कुरुकुलाचा नाश करेल. ह्याचा त्याग करा. पण त्याच्या पालकांनी नकार दिला. आणि ज्येष्ठ पुत्र म्हणून त्याला मान दिला.त्याला युवराज केले. तू त्यांचा विचार करू नको हं! उगाच अश्या दुष्ट माणसासोबत आयुष्य कश्याला वाया घालवायचे ?" दासीने इशारा दिला.
दासीचे तिच्या कानात कुजबुजणे त्याला ऐकू गेले असल्यासारखे त्याचा चेहरा ताठरला. एका निमिषासाठी त्याच्या गहिऱ्या डोळ्यात विद्ध झाल्याचे भाव दिसले पण लगेच त्याने चेहरा सहज केला.
हातात सुगंधी पुष्पांची माला घेऊन ती त्याच्याकडे गेली. पण आधीच आदेश मिळालेल्या दासीने तिला हलकासा धक्का देऊन पुढे जायला भाग पाडले.भानुमती गोंधळली.आपसूक चार पावले पुढे गेली पण अचानक...
दोन बलदंड हातांनी तिला थांबवले आणि भानुमतीने वळून बघताच तिला समोर आपले भविष्य दिसले. दुर्योधनाने तिला उचलले आणि तिने फुलांची आणि करकमलांची माळ त्याच्या गळ्यात घातली. सगळीकडे गोंधळ माजला. दुर्योधनाने बळजबरीने भानुमतीला पळवले याचा विरोध होऊ लागला. पण दुर्योधन आणि त्याचा मित्र कर्ण सर्वांना पुरून उरले. वधूपिता राजा भगदत्त काहीश्या नाईलाजानेच दुर्योधनापुढे हात जोडून उभा राहिला. दुर्योधनाने त्याचे हात आपल्या हातात घेऊन त्याला आश्वस्त केले.
"महाराज, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या मुलीला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन. तिच्याशिवाय मी कुणालाही पत्नीचे स्थान देणार नाही हे वचन देतो. " राजा भगदत्त काही बोलणार त्याआधीच त्यांना नमस्कार करून  दुर्योधन रथावर आरूढ होऊन पुढे निघून गेला.
रथात बसलेली भानुमती उलटसुलट विचारांच्या आवर्तनात अडकली होती. झाले ते योग्य झाले का ? ज्या अर्थी बाबांनी दासीकरवी इशारा दिला त्याअर्थी दुर्योधन त्यांना पसंत नव्हता. पण राजशिष्टाचार पाळणे भाग होते म्हणून कुरुकुलाला स्वयंवरात आमंत्रित केले होते. आणि ज्याला आपण पती म्हणून स्वीकारले ते खरेच एव्हढे दुष्ट आहेत का ? ज्या गोष्टी त्यांच्या बद्दल ऐकल्या त्या खऱ्याच आहेत. पण मग त्यांच्या डोळ्यातले प्रामाणिक भाव खोटे होते का ?
दुर्योधनाने तिच्याकडे बघितले. तिच्या बोलक्या चेहऱ्यावरून तिच्या मनातला गोंधळ सहज समजू शकत होता.
"भानुमती, तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल अनुरुक्ती दिसली म्हणूनच मी हे धारिष्ट्य केले.लोकांना जरी वाटत असले कि मी तुझे बळजबरीने हरण केले तरी मला तुझा होकार समजला होता. मी बरोबर बोलतो आहे ना ? " त्याने प्रश्न केला.
भानुमतीने मान हलवून अनुमोदन दिले. दुर्योधनाने सुटकेचा निश्वास सोडला.
" होकार नसता तरी तुम्ही अपहरण केले असते का आर्यपुत्र ? "
" नाही. बळजबरीने लग्न केल्याने काय परिणाम भोगावे लागतात हे माझ्या आईमुळे मला माहिती आहे. कुठेतरी मीसुद्धा ते परिणाम भोगतोच आहे. मला पुन्हा ती चूक घडू द्यायची नव्हती. "
दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून भानुमती चक्रावली. हे तर त्यांच्या "दुष्ट" अश्या प्रतिमेविरुद्ध आहे.
दुर्योधनाला हा विचार सुद्धा कळला. दुसरे कोणी असते तर त्याने पर्वा केली नसती. खरेतर कितीतरी वर्षांपासूनच त्याने कुणाची पर्वा करणे सोडून दिलेले होते. पण भानुमती कोणी दुसरी नव्हती. त्याची पत्नी होती. अर्धांगी. सहचरणी.
"जन्म कोणाच्या पोटी व्हावा हे ठरवणे जसे माणसाच्या हाती नसते ना, तसेच जन्म कुठल्या समयी घ्यावा हे देखील आपल्या हाती नसते. जन्मताच "अपशकुनी" असा शिक्का माझ्या भाळी बसला. समजू लागले तेव्हापासून कुरुकुलातल्या प्रत्येकाच्या नजरेतली भीती माझा पाठलाग करते आहे. सुरवातीचे काही वर्ष आईबाबांकडून  थोडेफार लाडकोड मिळाले. पण नंतर ते कुंतीपुत्र आले आणि ते लाड सुद्धा हिरावल्या गेले. पहिले हट्ट केले. पण पिता नसल्यामुळे त्या सगळ्यांना सहानुभूती मिळत गेली आणि मी तर बोलून चालून कुलविनाशी.  मला कोण विचारणार ?  मग मी सुद्धा ठरवून टाकले कि म्हणताच आहात तर आता मी "दुष्ट" बनतोच. मी खूप वाईट कृत्य केली. पण फक्त त्या कुंतीपुत्रासोबतच. "
भानुमतीला त्याच्या मनातली खंत,वेदना समजली.  पण मग लगेच दुसरा विचार मनात डोकावला.पांडवांसोबत प्रतिस्पर्धा  करण्याच्या नादात त्याने जर अजून राण्या केल्या अन सवतीसुभा झाला तर ?
आपल्याच विचारांच्या तंद्रीत असलेल्या दुर्योधनाने जणू काही तिच्या मौन प्रश्नाचे उत्तर दिल्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली.
"भानुमती, धर्माने क्षत्रियाला अनेक विवाह करण्याची अनुमती दिलेली आहे. वंशविस्तारासाठी म्हणा किंवा राजकारणाचा भाग म्हणून म्हणा राजघराण्यात हि प्रथा सर्रास प्रचलित असली तरी मला हि प्रथा मान्य नाही.म्हणूनच  तुझ्या पित्याला मी जे वचन दिले तेच तुला देखील देतो आहे. माझ्या आयुष्यात पत्नीचे स्थान फक्त आणि फक्त तुझेच राहील. दुसरी कोणी त्यावर अधिकार सांगणार नाही. "
" का आर्यपुत्र ? " भानुमतीने कसोशीने मनातला आनंद लपवत प्रश्न केला.
" विवाह होतांना पती पत्नी हे काया, वाचा आणि मनाने एकमेकांना स्वीकारतात. जेव्हा तुम्ही अग्नीसमोर हे वचन देता तेव्हाच तुमची निष्ठा त्या व्यक्तीसोबत जुळल्या जाते. आणि तुला माहितीच असेल कि कुरुंचे रक्त निष्ठेला किती मोल देतात ते. एक खरा कुरुपुरुष आपली निष्ठा कधीच त्यागत नाही, मग ती निष्ठा  राजसिंहासनाप्रती असो, वचन किंवा प्रतिज्ञेप्रती असो किंवा व्यक्तीप्रति असो. आजपर्यंत फक्त पत्नीनेच पतीसोबत एकनिष्ठ राहावे, अन्य कुणाचा विचारही मनात आणू नये असे सगळ्या स्त्रियांना कानीकपाळी ओरडून सांगितल्या जाते.पुरुष मात्र कसाही वागला तरी चालून जाते. पण असला एकतर्फी नियम मला मान्य नाही. पतीची निष्ठा जर विभाजित झाली तर दोघींवरही अन्याय होतो आणि  कुटुंबात अनर्थाची बीजे फुटतात. आणि त्याचे परिणाम अश्राप अश्या मुलांना भोगावे लागतात. मला ते नको आहे. "  एक क्षण थांबून दुर्योधन पुढे बोलू लागला.
" माझे विचार कदाचित विद्रोही वाटतील पण येणाऱ्या काळात हि बहुविवाहाची अनिष्ट प्रथा बंद पडेल असे मला ठामपणे वाटते. निदान धर्माने आणि न्यायनीतीशास्त्राने हि प्रथा कालबाह्य ठरवावी असे वाटते."
भानुमती दुर्योधनाचे कालविरुद्ध विचार ऐकून थक्क झाली. जी प्रतिमा त्याच्याबद्दल राजघराणातल्या लोकांच्या मनात वसली होती त्या प्रतिमेला तडा जात होता.
वातावरणातले गांभीर्य घालवत दुर्योधन तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
" प्रथा जाऊ दे. माझ्या बाबतीत म्हणशील तर तुला पाहिल्या क्षणीच तू माझे हृदय चोरून घेतलेस, आता दुसरीला द्यायला माझ्याकडे दुसरे हृदयच नाही. मग काय करू ?" त्याचे मिस्कील हसणे पाहून तिच्या गालावरच्या खळ्या खुलल्या.
" पण स्वारींनी त्या बदल्यात माझे हृदय चोरले त्याचे काय ?  " तिच्या लाजऱ्या शब्दांचा मधुर
 नाद त्याच्या दिलखुलास हास्यात मिसळला.
*********************************************************************************
वचन  दिल्याप्रमाणे दुर्योधनाने एकच लग्न केले.राजकारणासाठी, वंशविस्तारासाठी पांडवांनी अनेक  विवाह केले. पण दुर्योधनाला तसे करणे मान्य नव्हते. शेवटपर्यंत तो भानुमतीसोबत एकनिष्ठ राहिला.
भानुमतीबद्दल महाभारतात तीन चार ठिकाणी उल्लेख आलेले आहेत.
ती अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान तर होतीच पण त्याचसोबत शस्त्रविद्या आणि द्वंद्वयुद्धातही पारंगत होती. स्त्रीपर्वात गांधारी तिची स्तुती करतांना म्हणते कि तिने अनेकदा दुर्योधनाला पराजित केले होते. आणि त्याचसोबत ती एक कुशल गृहिणी सुद्धा होती. एक युवराज्ञी म्हणून तिने राजमहालातले सगळे कर्तव्य चोखपणे पार पाडले होते. दुर्योधनाप्रती तिचे प्रेम आणि निष्ठा पाहूनच कदाचित वेदव्यासांनी फक्त तिच्यासाठीच   " सतिरत्न " असा गौरवावोद्गार काढला.
भानुमती बद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यातलीच एक विशेष वाटते.
एकदा कर्ण आणि भानुमती तिच्या महालात चौसर खेळात असतांना अचानक तिथे दुर्योधन आला. कर्णाची त्याच्याकडे पाठ असल्यामुळे त्याला ते कळले नाही पण भानुमती त्याला पाहून चटकन उभी झाली. कर्णाला वाटले कि ती हरते आहे म्हणून खेळ सोडून उठून जाते आहे. त्याने तिचा हात धरून बसण्याचा आग्रह करतांना तिच्या पदराला लागलेली मोत्यांची माळ तुटली आणि मोती घरंगळले. कर्णाने वळून पाहताच त्याला दुर्योधन दिसला. भानुमती आणि कर्ण गोरेमोरे झाले. त्यांना भीती वाटली कि कदाचित दुर्योधनाला त्यांच्याबद्दल काही गैरसमज होतो कि काय !
पण दुर्योधनाने त्या दोघांकडे हसून बघत केवळ इतकेच विचारले ,
" आता हे मोती फक्त उचलून देऊ, का त्यांची माळ पण मलाच बनवावी लागेल ? "
दुर्योधनाचा त्यांच्यावरचा हा विश्वास पाहून कर्ण आणि भानुमती दोघेही खजील झाले.
जिथे आत्यंतिक प्रेम असते तिथेच अतुट विश्वास असतो हेच या वरून सिद्ध होते , नाही का ?
दुर्योधनाचे भानुमतीवरचे अलोट प्रेम हे तसे सगळ्यांसाठी आश्चर्याचा विषय असले तरी दुर्योधनाच्या स्वभावाची एक खासियत अशी होती कि त्याच्या भावना टोकाच्या असत. कुणावर जर त्याने प्रेम केले तर शेवटच्या श्वासापर्यंत ते अबाधित राही आणि शत्रुत्व केले तरी मरेपर्यंत तो ते निभावत असे.त्याची मैत्रीहि तशीच होती. एकदा जर कुठले तत्व स्वीकारले तर मग तो शेवटपर्यंत ते सोडत नसे. कदाचित कुरुकुलातल्या रक्ताचा हा गुण त्याच्यात पूर्णपणे उतरला असेल.
एकपत्नीव्रताचे पालन करून दुर्योधनाने धर्माचेच पालन केले असेच म्हणावे लागेल.
*********************************************************************
- पूर्णिमा देशमुख पुरेकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा