शनिवार, ९ मे, २०२०

दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( ४ )


श्री
दुर्योधन - एक संपूर्ण क्षत्रिय ( )

" हो, मी मानतो माझ्याकडून पांचालीचा मानभंग करण्याचा अधर्म घडला. पण अधर्म काय मीच केला का ? त्या युधिष्ठिराचे काय ?  आपल्याच भावांना आणि पत्नीला एखाद्या मालमत्तेसारखे विक्रीला लावणे ह्याला जर धर्म मानत असाल तर असला धर्म करता अधर्मी म्हणवून घेणे चालेल मला. "
दुर्योधनाचे मर्मभेदक शब्द कृपाचार्यांच्या काळजावर वार करून गेले. द्यूतक्रीडेनंतर कुरुराजसभेत जो काही निंदनीय प्रकार घडला होता त्यानंतर राजा धृतराष्ट्र, गांधारी,पांडव आणि द्रौपदी इतर लोक सभा सोडून गेले होते. पण भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि विदुर व्दिडमुख होऊन गलितगात्र अवस्थेत डोक्याला हात लावून बसले होते. जे काही घडले त्याने कृपाचार्य सुद्धा हादरले होते. पण पितामहांची स्थिती पाहून कुलगुरू कूर्पाचार्यांनी दुर्योधनाला राजसभेचा अपराधी ठरवून जाब विचारण्यासाठी बोलावले. रागाने धुसमुसत तो राजसभेत आला, त्याने सर्वांना नमस्कार केला पण कोणीच त्याच्याकडे बघत नव्हते, आशीर्वाद देण्याच्या मनस्थितीत नव्हते. कसे राहणार ?
 कृपाचार्यांनी जेव्हा त्याला त्याच्या अपराधांचा पाढा वाचून दाखवला तेव्हा तो उलट त्यांनाच जाब विचारू लागला.
" द्रौपदीचा अपमान केल्याचे माझे पाप तुम्हाला दिसते. पण मी पुन्हा विचारतो . स्वतःला मोठा धर्माचारी म्हणवणाऱ्या युधिष्ठीराने स्वतःचे भाऊ आणि बायको वस्तूप्रमाणे पणाला लावली ते का डोळ्याआड करता तुम्ही ? सर्वात मोठा अधर्म तर त्यानेच केलेला आहे. राज्य गमावल्यानंतर त्याने तिथेच हार मान्य करून खेळ थांबवायचा होता. कुठल्या अधिकाराने त्याने स्वतःच्या माणसांना पणाला लावले ? मला तुम्ही कितीही दुष्ट म्हणा पण माझ्या भावांना आणि पत्नीला मी असे पणाला लावलेच नसते. मग भलेही माझे प्राण गमवावे लागले असते, मला भित्रा,पळपुटा म्हंटले असते तरी मी असला खेळ खेळलोच नसतो. मला अधर्मी म्हणता तर युधिष्टिराला काय म्हणाल तुम्ही ? सांगा ना ? त्याला सुद्द्धा माझ्याप्रमाणे जाब विचारण्यासाठी बोलवा."
आता मात्र भीष्म चवताळून उठले. रागाने थरथरत ते गरजले ,
" लाज नाही वाटत तुला असे बोलायला ? युधिष्ठिराचे नावही घ्यायची तुझी पात्रता नाही आहे. त्या पांडवांचे वैभव, त्यांची कीर्ती बघवत नव्हती म्हणून तुम्ही हे सगळे कारस्थान रचले. पण द्रौपदीने तुझे काय वाईट केले होते ? स्वतःला मोठा क्षत्रिय समजतो ना तू ? मग आज आपल्याच कुटुंबातल्या एका स्त्रीवर असा अन्याय करण्याची हिम्मतच कशी झाली तुझी ? एका अबला स्त्रीची अशी विटंबना केली तू , हेच का तुझे क्षत्रियत्व ? क्षत्रिय काय , तू मनुष्य म्हणायच्या लायकीचा राहिला नाही आहे. पशु आहेस तू दुर्योधन, पशु ! "
भीष्मांचे हे घणाघाती प्रहार दुर्योधनाच्या मनाला छेदून गेले पण वरकरणी त्याने तसे दाखवले नाही.
" तुम्हाला तसे वाटत असेल तर असो, पण मी पुन्हा म्हणतो, द्यूतक्रीडेमध्ये युधिष्ठीराने सुद्धा आपली मनुष्यत्त्वाची सीमारेषा ओलांडली आहे. जर त्याने पराजय मानून पुढे खेळण्यास नकार दिला असता तर मी काहीही करू शकत नव्हतो. माझ्याइतकाच तोसुद्धा दोषी आहे."
दुर्योधन स्वतःचा बचाव करतच नव्हता. पण उलटे युधिष्ठिराच्या चुका दाखवून तो तिथे जमलेल्या सगळ्या ज्येष्ठांना पेचात टाकत होता. युधिष्ठिराच्या बाजूने काही प्रतिवाद करता येत नव्हता अन म्हणून ते सगळे अजूनच आतल्या आत धुमसत होते. त्यांचे मौन बघून दुर्योधन छद्मी हसला.
" ज्येष्ठ मान्यवर, आज पर्यंत जाणून बुजून तुम्ही सर्वांनी माझी " एक दुष्ट, दुराचारी आणि कुलनाशक " अशी प्रतिमा निर्माण केलेली आहे. कारण तुम्हाला ते कुंतीपुत्र जास्त प्रिय आहेत. त्यामुळे मला वाईट ठरवून त्यांना चांगले करणे तुम्हाला सोपे जाते. कुंतीपुत्र कधीच काही अधर्म करू शकत नाहीत असा मारे आव आणत आला  आहात. पण आज त्या युधिष्ठिराला आरोपी करता तुम्ही मला, या हस्तिनापूरच्या युवराजाला इथे अपराधी आणि अधर्मी म्हणून बोलावले. खरेतर तुम्हाला तो अधिकार नसला तरी मी तुमचे ज्येष्ठत्व मानून इथे आलो. माझा अपराध मी मान्य करतो,पण याची शिक्षा तुम्ही मला देऊ शकत नाही. कारण मला दंड देतानाच तुम्हाला युधिष्ठिराला सुद्धा दंड द्यावा लागेल. आणि ते तुमच्याच्याने होणार नाही.तेव्हा जसे द्रौपदीच्या प्रश्नांपुढे तुम्ही मूग गिळून गप्प बसले ना तसेच आता बसा. आणि या पुढे स्वतःला निष्पक्ष, धर्मरक्षक म्हणविणे सोडून द्या. येतो मी ! " मान खाली घालून बसलेल्या त्या ज्येष्ठ धर्मज्ञांना कुत्सित हास्य करत त्याने नमस्कार केला आणि आपल्या उत्तरियाला एक झटका देत तो तिथून चालला गेला.
( काल्पनिक प्रसंग)
******************************************************************************
संस्कृत भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात.' हरण ' या शब्दाचे देखील अनेक अर्थ आहेत.
हरण म्हणजे बळजबरी करून नेणे, खेचून आणणे, चोरून नेणे , दूर करणे असे जवळपास -१० अर्थ आहेत. (सं- spokensanskrit.org)
मूळ महाभारतामध्ये द्रौपदीचे ' वस्त्रहरण' केले असा उल्लेखच नाही आहे. महाभारतामध्ये जर कोणी कुठला अपराध केलेला  असेल किंवा काही अभूतपूर्व कार्य केलेले असेल तर सगळीच पात्रे त्याचा वारंवार उल्लेख करत असतात. पण ना 'वस्त्र हरण' असा उल्लेख येतो ना कृष्णाने तिला वस्त्र पुरवले असे काही लिहिले आहे. द्रौपदीचा मानभंग झाला, तिची विटंबना झाली असेच उल्लेख आहेत. वनवासात असतांना जेव्हा कृष्ण पांडवांना भेटण्यास येतो तेव्हा द्रौपदी विलाप करत म्हणते कि, 
" दुःशासन जेव्हा माझे केस धरून मला राजसभेत ओढून नेत होता तेव्हा माझ्या मदतीला ना माझे पाच पती आले, ना पाच पुत्र. कृष्णा ,तू सुद्धा आला नाहीस. रजस्वला असलेल्या माझी जी विटंबना त्या दिवशी झाली त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तरी आता तुम्ही कौरवांसोबत युद्ध करा आणि मला न्याय मिळवून द्या. "
दुसऱ्या प्रसंगी कर्णाला मारण्यापूर्वी कृष्ण त्याची निर्भत्सना करतांना द्रौपदीला सभेत बोलावण्याचा आदेश आणि तिच्यासाठी जे अपशब्द तो वापरतो त्याचाच उल्लेख करतो. तिथे सुद्धा वस्त्राचे हरण असा शब्द येत नाही. खरेतर द्रौपदीचे वस्त्रहरण हा खूप विवादास्पद विषय आहे. ते खरेच झाले कि नंतरच्या संस्करणांमध्ये टाकले गेले याबद्दल खूप मतमतांतरे आहेत. 
त्याचप्रमाणे द्रौपदी दुर्योधनाला " अंध पित्याचा अंध पुत्र" असे म्हणून हिणवते या प्रसंगाचाही उल्लेख नाही आहे. आणि दुर्योधन तिला आपल्या मांडीवर बसवण्याची सूचना देतो असे सुद्धा मूळ महाभारतात लिहिलेले नाही.  कर्ण द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये उपस्थित नव्हता आणि त्याचमुळे सूतपुत्र म्हणून त्याला नकार देऊन अपमानित करण्याचा प्रश्नच नव्हता असेही जाणकारांचे मत आहे.
पण ते काहीही असले तरी द्रौपदीचा अपमान होणे हीच मुळात सामान्य घटना नाही आहे.
कुठल्याही स्त्रीला काय आणि पुरुषाला काय असे केस धरून खेचत नेणे, फरफटत आणणे हे अतिशय अपमानास्पद आहे. द्रौपदीच्या जागी अन्य कोणीही स्त्री असती किंवा पुरुषही जरी असता तरी याला अपमान आणि विटंबनाच म्हंटल्या जाईल. आजसुद्धा जर कोणी कुठल्याही मनुष्यासोबत अशी वर्तणूक केली तर त्याला अपमानच म्हणणार, अपराध आणि अमानुषपणाच म्हणणार.
द्रौपदी इंद्रप्रस्थाची सम्राज्ञी तर होतीच पण ती संपूर्ण आर्यावर्तावर वर्चस्व असलेल्या कुरुकुलाची स्नुषा होती. त्यासमयी ती रजस्वला अवस्थेत होती. आणि ज्या सभेमध्ये भीष्मांनी त्या दिवशी स्त्रियांचा प्रवेश वर्ज केलेला होता त्यादिवशी तिला असे खेचून आणणे यापरती मोठी विटंबना काय होऊ शकते ? एव्हढेच नव्हे तर कर्ण तिच्या बद्दल जे उद्गार काढतो ते तर अतिशय खालच्या स्तरावरचे आहेत. दुर्योधनापेक्षा तर कर्णाचे वागणे अतिशय हीनवृत्तीचे आहे.  नीच मनोवृत्तीचे ध्योतक आहे.  
राहता राहिला वस्त्रांचा प्रश्न तर महाभारतकालीन लोकांची वेशभूषा याबद्दल इतिहासतज्ञ म्हणतात कि उत्तरीय म्हणजे छातीवरून पांघरण्याचे वस्त्र हे फक्त क्षत्रिय आणि क्वचित काळी ब्राम्हण घेत असत. दासांना उत्तरीय घेण्याचा अधिकार नव्हता. म्हणूनच पांडव जेव्हा दास होतात तेव्हा दुर्योधन त्यांना उत्तरीय काढून ठेवण्याचा आदेश देतो. पण द्रौपदीसाठी हा नियम लागू होत नव्हता. म्हणून  तिचे दासत्व अधोरेखित करून पांडवांचा पाणउतारा करण्यासाठी फक्त तिला सभेत आणण्याचा आदेश देतो. पुढे जे काही घडले ते कर्ण आणि दुःशासन यांचे काळे कृत्य असले तरी मुळात दुर्योधनाचे वागणेही समर्थनीय नाहीच आहे. ते पूर्णपणे  अक्षम्य असून माणुसकीला काळिमा फासणारेच आहे.
द्रौपदीचा अपमान हा दुर्योधनाच्या संपूर्ण आयुष्यात त्याने  केलेल्या अपराधांचा कळस होता. अन त्याच दिवशी त्याने त्याची अधोगती गाठली.

-          सौ.पूर्णिमा देशमुख पुरेकर



 

 


 










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा