मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

कोजागिरी पौर्णिमा आणि भुलाबाई

कोजागिरी पौर्णिमा आणि भुलाबाई ! अनेक आठवणी आज नेहमी प्रमाणे फेर धरून नाचत आहेत.  दुपार पासून रांगोळी आणि भुलाबाई ची सजावट करणे, स्वतः छान  तयार होईपर्यंत संध्याकाळ व्हायची. बाबा आम्ही मोठ्या झालो तरी सुद्धा आमच्यासाठी आणि आमच्या साळकाया साठी किती प्रकारचे चॉकलेट्स आणि बिस्किट्स आणायचे, आई भुलाबाईच्या खिरापती साठी अनेक पदार्थ बनवायची. आपल्या कडची खिरापत वेगळी व्हायला हवी यासाठी आम्ही कितीतरी खटाटोप करायला लावायचो तिला. अर्थात आईला स्वतःलाच पदार्थ बनवायची हौस आहेच. आमचे लग्न झाल्या नंतर सुद्धा ती अजूनही भुलाबाई साजरी करतेच.
    आज आठवते ते घरोघरी भुलाबाई चे गाणे म्हणत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हिंडणे. तेव्हा खाल्लेल्या मटकीच्या  उसळीची आणि चिवड्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. कोणी प्लिज ते सगळे पार्सल करेल का ?
  सगळीकडे खादाडी करून आल्यानंतर आजोबा, बाबा, आई ,ताई आणि मी गच्चीवर जायचो. ते वातावरण तर मी कधीच विसरू शकत नाही. बाबा संध्याकाळीच गच्चीवर पाणी टाकून, पाणी सुकल्यानंतर सतरंजी टाकून ठेवायचे. ती थंड सतरंजी, चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश, चांदण्यांसारखीच फुललेल्या चमेलीचा सुगंध , आटवलेले दूध, त्यात चंद्र दिसतो का हे बघणे, आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या शेंगा, गूळ मीठ  खात गप्पा मारणे आणि विविध भरती वरची गाणी ऐकणे  हे सगळे कसे विसरणार ?
 पंचतारांकित हॉटेल मध्ये सुद्धा हा साधा भोळा आनंद मिळणार नाही. आज ते सगळेच स्वरूप बदलले. भुलाबाई ची गाणी मुलींना माहितीच नाही. शाळा आणि ट्युशन ,परीक्षा आणि मोबाइल मध्ये गुरफटलेल्या लहानग्यांना भुलाबाई साठी वेळ नाही. कोजागिरीच्या चांदण्यांचा आवाज डीजे च्या कर्कश्श कल्लोळात बुजून गेला. आटवलेले दूध नो फॅट डाएट च्या नादात वाटी चमच्या पुरतेच राहून गेले.
  माझ्या सारख्या अनेकांच्या मनात उरल्या फक्त त्या आठवणी.
- पूर्णिमा देशमुख पुरेकर 

३ टिप्पण्या:

  1. कोजागिरीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, छान वर्णन केले, या निमित्ताने मलापण बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला, चमचा वाटीने दूध ना घेता भरपूर दूध प्या सगळे��

    उत्तर द्याहटवा
  2. म.उ.
    खुप छान वाचून आमच्या कोजागिरीच्या आठवणी जाग्या झाल्या

    उत्तर द्याहटवा